पारंपरिक अमेरिकी राजकारणाला छेद

निखिल श्रावगे (अमेरिकी राजकारणाचे अभ्यासक)
मंगळवार, 5 जुलै 2016

सॅंडर्स, ट्रम्प किंवा हिलरी हे अमेरिकेच्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. वॉशिंग्टनकेंद्रित प्रस्थापित राजकारणाचा पोत बदलू लागल्याचे चिन्ह या निवडणुकीत स्पष्ट दिसते.

अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उणेपुरे चार महिने बाकी राहिले असताना हा सामना आता रंगतदार अवस्थेत येऊन ठेपला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना 1542, तर हिलरी क्‍लिंटन यांना 2811 प्रतिनिधींचा पाठिंबा लाभला आहे. याच पाठिंब्याच्या जोरावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून हिलरी क्‍लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी अनधिकृतपणे निश्‍चित मानली जात आहे. आपापल्या पक्षातल्या इतर नेत्यांना मागे टाकत त्यांना मिळालेले हे यश यंदाच्या निवडणुकीचा विचार करता लक्षणीय म्हणावे लागेल. रिपब्लिकन पक्षातून इतर सर्व नेत्यांनी माघार घेतल्यामुळे ट्रम्प यांनी उमेदवारीवर एकहाती मांड ठोकली आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षात उमेदवारीसाठी प्रतिनिधींचे पुरेसे पाठबळ नसतानादेखील बर्नी सॅंडर्स माघार घ्यायला तयार नाहीत.

दोनशे वर्षांच्या अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका मोठ्या पक्षाकडून महिलेला अध्यक्षीय पदाची उमेदवारी मिळाली आहे. असे करून हिलरींनी आपले नाव इतिहासात कोरून ठेवतानाच 2008 मध्ये बराक ओबामांविरोधात झालेला पराभव पुसून काढला आहे. त्यांना आता खुद्द बराक ओबामा, जो बायडन, जॉन केरी, एलिझाबेथ वॉरेन यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ट्रम्प यांच्याशी बरोबरी करता हिलरी अधिक कणखर नेत्या म्हणून समोर येतात. माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्‍लिंटन यांची पत्नी आणि नंतर सिनेटर असताना वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका त्यांचा राजकीय हटवादीपणा दर्शवतो. हिलरींचा विजय झाल्यास पुढील चार वर्षे रिपब्लिकन नेत्यांकडे कपाळावर हात मारून घेण्याशिवाय गत्यंतर नसेल. हिलरींची एकूण कामाची पद्धत, बेनगाजी प्रकरण आणि परराष्ट्र खाते सांभाळत असताना वापरलेल्या वैयक्तिक "ई-मेल‘मुळे त्यांच्यावर सडकून टीका करायला वाव आहे. वैयक्तिक "ई-मेल‘ प्रकरणामुळे तर हिलरींवर त्यांच्याच खात्यातून टीका होत आहे. श्रीमंतवर्गाशी त्यांचे असलेले संबंध आदी अनेक गोष्टींमुळे त्यांना एखाद्या प्रस्थापित रिपब्लिकन नेत्याकरवी हरवणे जास्त अवघड नसल्याचे वॉशिंग्टनमध्ये मानले जाते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे आपण ही संधी घालवल्याची भावना निष्ठावंत आणि पुराणमतवादी रिपब्लिकन नेते बोलून दाखवत आहेत. जेब बुश यांना बाजूला करण्याच्या नादात सर्व रिपब्लिकन इच्छुकांनी ट्रम्प यांच्याकडे दुर्लक्ष करून मोठी चूक केली असल्याचे ते जाहीर कबूल करतात. त्यामुळेच, रिपब्लिकन पक्षातील बडे नेतेच ट्रम्पविरोधाची भाषा बोलत असताना स्वतः ट्रम्प रिपब्लिकन पक्षाला कितपत एकत्रित करू शकतात, हे पाहावे लागेल.

या सगळ्या धामधुमीत बर्नी सॅंडर्सना झालेले मतदान, तरुणांनी उचलून धरलेले त्यांचे समाजवादी विचार आणि त्यांना मिळालेली अफाट लोकप्रियता दुर्लक्षित करून चालणार नाही. वॉशिंग्टनच्या पारंपरिक राजकारणाला अमेरिकी जनता वैतागल्याचा हा ठसठशीत दाखला आहे. काही दिवसांपूर्वी ओरलॅंडोत झालेल्या गोळीबारानंतर प्रतिक्रिया देताना या हिलरी आणि ट्रम्प यांनी परिपक्वता न दाखवता त्याचे प्राचारिक भांडवल केले. ट्‌विटर आणि इतर माध्यमांतून एकमेकांवर सुरू केलेली वैयक्तिक चिखलफेक या संपूर्ण निवडणुकीचा बाज ढासळवू पाहते आहे. येत्या काही दिवसांत हे दोघे अमेरिकी उपाध्यक्षपदासाठीचे आपापले उमेदवार जाहीर करतील. त्यानंतर सवंगपणे चर्चा होणाऱ्या या दोघांच्या भविष्यकालीन धोरणांकडे अख्खे जग डोळे लावून बसले आहे. याच धोरणांच्या आडून, अमेरिकेचे सामर्थ्य जगावर लादायला त्यांना मदत होणार आहे. उमेदवारांच्या बाबतीत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असे आढळले, की हिलरी आणि ट्रम्प या दोघांच्याही बाबतीत अमेरिकी जनता फारशी उत्साही नाही. यापूर्वीच्या निवडणुकांशी तुलना करता हे दोघेही सर्वांत नावडते उमेदवार असावेत, असे दिसते. जागतिक पातळीवरच्या एकमेव महासत्तेचे सारथ्य या दोघांपैकी एकाच्या हातात येणार असल्याचे निश्‍चित असताना हे वास्तव त्रासदायक ठरेल अशी दाट शक्‍यता आहे. म्हणजेच "नकोसा‘ आणि "अजिबात नकोसा‘ या दोन पर्यायांतून लोक अध्यक्ष निवडणार आहेत.

2000च्या निवडणुकीत अल गोर यांच्यासमोर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांचा टिकाव नाही लागणार अशा समजुतीत असणाऱ्यांचे बुश निवडून आल्यामुळे हसे झाले होते. यंदा रिपब्लिकन पक्षातील इतर नेत्यांनी ट्रम्प यांना खिजगणतीत न धरून वाटचाल केल्यामुळे पश्‍चात्तापाची वेळ आली; अशी वेळ आपल्यावर नको म्हणून हिलरींनी खबरदारी घेणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे आहे. सद्यःस्थिती पाहता ट्रम्प हे एखादा विषय काढून हिलरींना त्यात खेचत आहेत, त्यामुळे सावधपणे आपली धोरणे मांडताना या दोघांच्या राजकीय धूर्तपणाचा कस लागणार आहे. एका ताज्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार हिलरींनी ट्रम्प यांच्यावर सुमारे बारा टक्‍क्‍यांनी आघाडी घेतली आहे. येत्या चार महिन्यांत हे अंकगणित बऱ्याच कारणांमुळे वर-खाली होत राहील. असे असतानादेखील समोर येणाऱ्या प्रत्येक सर्वेक्षणात हिलरींची होणारी सरशी ट्रम्प यांना अडचणीत आणू शकते. प्राथमिक फेरी पार पाडल्यानंतर "व्हाइट हाउस‘च्या रोखाने जाणाऱ्या प्रचाराची व्याप्ती आणि व्याख्या वेगळी असते, त्या अनुषंगाने ट्रम्प यांना आपल्या प्रचाराचा पोत बदलावा लागणार आहे.

सॅंडर्स, ट्रम्प किंवा हिलरी हे अमेरिकेच्या बदलत्या सामाजिक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व करतात. हिलरी यांचा राजकीय प्रवास पाहता त्यांच्या राजकीय जीवनाचा उगम बिल क्‍लिंटन यांच्या अध्यक्षीय काळानंतर सुरू झाला, तर दुसरीकडे व्हरमॉण्ट राज्याचे सिनेटर असणारे बर्नी सॅंडर्स हे देखील वॉशिंग्टनमधील राजकारणात नवे मानले जातात. डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय पाटी तर संपूर्णपणे कोरी आहे. त्यांनी एकही सरकारी पद हाताळलेले नाही. त्यामुळे प्रस्थापित वॉशिंग्टनकेंद्रित राजकारणाच्या चौकटीबाहेरील राजकारण्यांमध्ये यंदा अध्यक्षपदासाठीची रस्सीखेच सुरू आहे. तगड्या आणि मातब्बर राजकारण्यांना मागे टाकत या तिघांनी यंदाच्या निवडणुकीत गाठलेला हा टप्पा बदलत्या सामाजिक संवेदनेचे आणि वॉशिंग्टनकेंद्रित ढाचा बदलत असल्याचे निदर्शक आहे.