देश एकसंध राखणारे उत्तुंग नेतृत्व 

व्यंकय्या नायडू 
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

खऱ्या अर्थाने मुत्सद्दीपणा दाखवून सरदार पटेलांनी, त्रासदायक ठरू शकणाऱ्या या प्रदेशांचे एकत्रीकरण कोणत्याही अडथळ्यांशिवाय केले, तसेच त्या दरम्यान परिस्थिती बिघडून अस्थैर्य निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेतली. प्रचंड उमेदीने बळकट भारताच्या उभारणाचे काम ते करत असताना अजिबात रक्तपात झाला नाही किंवा कोणतेही बंड झाले नाही. 

आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार वल्लभभाई पटेल यांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप. 

देशाचे भवितव्य घडविणाऱ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना कोणताही देश विसरू शकत नाही. भारताचे भवितव्य घडविण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले सरदार वल्लभभाई पटेल हे असेच व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच एखाद्या सेनापतीच्या झपाट्याने आणि द्रष्ट्या नेत्याच्या कुशलतेने त्यांनी देशाचे राजकीय एकीकरण केले. 
फाळणीनंतर देशाचे तुकडे होऊ नयेत यासाठी त्यांनी दाखविलेला द्रष्टेपणा, चातुर्य, कुशलता आणि व्यावहारिक दृष्टिकोन यासाठी, तसेच 560हून अधिक संस्थानांच्या भारतीय संघराज्यातील विलीनीकरणासाठी आजचा भारत त्यांना कृतज्ञतेचे मोठे देणे लागतो. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे, कोणत्याही रक्तपाताशिवाय ही संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली. 

परिस्थितीनुसार विविध पर्यायांचा अवलंब करत, काही घटनांमध्ये पटेल यांनी मैत्रीपूर्ण सल्ला दिला; इतरांचे निर्णय दाखवून सत्ताधाऱ्यांची मने वळविली आणि हैदराबादप्रमाणे काही ठिकाणी बळाचाही वापर केला. संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानात सामील होण्याचा किंवा तसेच स्वतंत्र राहण्याचा पर्याय दिलेला असतानाही सरदार पटेलांनी भारत एकसंध केला. ही अनन्यसाधारण कामगिरी आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामाने स्वतंत्र राहण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली व तसे फर्मानदेखील काढले. त्याच वेळेस त्याने रझाकारांनाही मोकळीक दिली. पाकिस्तानशी भौगोलिक एकसंधता नसूनही हैदराबादला पाकिस्तानात सामावून घेण्याची योजनादेखील केली. त्रावणकोरनेही स्वतंत्र राहण्याचे जाहीर केले. जुनागढच्या नवाबानेही पाकिस्तानचा भाग होणार असल्याचे जाहीर केले. 

या पार्श्‍वभूमीवर "ऑपरेशन पोलो' या सांकेतिक नावाने झालेल्या अत्यंत कौशल्यपूर्ण व वेगवान मोहिमेतून जुनागढचा ताबा मिळविल्यानंतर केवळ चार दिवसांतच हैदराबाद उर्वरित भारतात विलीन झाले. हैदराबादच्या मुक्ततेसाठी व एकीकरणासाठी करण्यात आलेली "पोलिस ऍक्‍शन' 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू झाली आणि 17 सप्टेंबर रोजी पूर्ण झाली. हैदराबादमधील अनेक भागांत व त्या वेळी हैदराबाद प्रांताचे भाग असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातही काही ठिकाणी दरवर्षी 17 सप्टेंबरला "हैदराबाद मुक्ती दिन' साजरा करण्यात येतो. 

खऱ्या अर्थाने मुत्सद्दीपणा दाखवून सरदार पटेलांनी, त्रासदायक ठरू शकणाऱ्या या प्रदेशांचे एकत्रीकरण कोणत्याही अडथळ्यांशिवाय केले, तसेच त्या दरम्यान परिस्थिती बिघडून अस्थैर्य निर्माण होणार नाही, याचीही खबरदारी घेतली. प्रचंड उमेदीने बळकट भारताच्या उभारणाचे काम ते करत असताना अजिबात रक्तपात झाला नाही किंवा कोणतेही बंड झाले नाही. 

गृह विभागातील केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संबंधांविषयीच्या खात्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पटेल यांनी, "राज्यांच्या, आणि एकूणच देशाच्या, सुरक्षेसाठी देशाच्या विविध भागांमध्ये परस्परसहकार्याची आणि ऐक्‍याची गरज आहे...', हे ठामपणे सांगितले. "एकत्रित प्रयत्नांतून आपण देशाला एका नव्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो, तर ऐक्‍याचा अभाव आपल्यापुढे आणखी नवी संकटे उभी करेल,' असा सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला. 

भारताला एका सूत्रात बांधण्यात सरदार पटेल यांची भूमिका निःसंशयपणे महत्त्वाची होती. त्यांनी जे साधले त्या तोडीची कोणतीच गोष्ट कदाचित आधुनिक इतिहासात नसावी. सरदार पटेलांनी देशाच्या उभारणीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते ः इतिहास त्यांना नवभारताचे रचनाकार म्हणून ओळखेल. 

विनम्र स्वभाव हा त्यांचा सर्वांत मोठा गुण. नेतृत्वाबद्दल राष्ट्रपिता महात्मा गांधींची जी कल्पना होती, त्याचे सरदार पटेल हे मूर्तिमंत उदाहरण होते ः "नेतृत्व म्हणजे बळ असे मला एकेकाळी वाटायचे, पण आज मला वाटते नेतृत्व म्हणजे लोकांसोबत राहणे.' 

बॅरिस्टर होऊन इंग्लंडमधून भारतात परतल्यानंतर सरदार पटेल हळूहळू महात्मा गांधींच्या ब्रिटिश सत्तेविरोधातील अहिंसक आंदोलनाकडे वळले. ते गांधीजींचा उजवा हात बनले. खेडा येथील आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी गांधीजींनी त्यांची निवड केली."माझ्या मागे येण्यास अनेक जण तयार होते, पण माझा उपकप्तान कोण असावा, याबाबत माझा निर्णय होत नव्हता. मग माझ्या मनात वल्लभभाईंचे नाव आले,' असे गांधीजी म्हणाले होते. गांधीजींनी पटेलांवर दाखविलेला विश्‍वास चुकीचा नव्हता. सरदार पटेल हे केवळ निष्णात संयोजक न राहता लोकनेते म्हणून पुढे आले. बार्डोली येथील शेतकऱ्यांच्या साराबंदीच्या आंदोलनाचे नेतृत्व केल्यानंतर त्यांना "सरदार' ही उपाधी मिळाली. गुजरातमध्ये पुराने हाहाकार माजविला होता तेव्हादेखील त्यांनी स्वतः पुढे राहून मदत व पुनर्वसन कामाचे नेतृत्व केले. अहमदाबादमधील प्लेगच्या साथीतही त्यांनी अखंडपणे काम केले. 

एकसंध भारताच्या त्यांच्या स्वप्नातूनच अखिल भारतीय प्रशासकीय सेवांची निर्मिती झाली. पटेल त्यास "पोलादी चौकट' म्हणत असत. प्रशासकीय क्षेत्रात उमेदवारी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलताना पटेल यांनी त्यांना दररोजच्या प्रशासकीय व्यवहारांत खऱ्या अर्थाने सेवेची भावना डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यास सांगितले. 
निःपक्षपातीपणा व भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राखण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा त्यांनी केलेला आग्रह आजच्या संदर्भांतही तितकाच लागू पडतो. "प्रशासकीय सेवकाने राजकारणात पडणे परवडणारे नाही व त्याने तसे करूही नये. जातीय विवादांमध्येही त्याने पडू नये. कोणत्याही मार्गाने सचोटीचा मार्ग सोडणे हे सार्वजनिक सेवेला कमी लेखण्यासारखे व तिची प्रतिष्ठा कमी करण्यासारखे आहे,' असा इशारा त्यांनी 21 एप्रिल 1947 रोजी दिला होता. 

सरदार पटेलांनी दिलेल्या प्रचंड योगदानास व इतिहासातील अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर देशाच्या एकीकरणातील त्यांच्या भूमिकेला योग्य तेवढा न्याय देण्यात आलेला नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. अखेरीस, देश सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत असताना आधुनिक व एकसंध भारताच्या उभारणीतील सरदार पटेलांचे अमूल्य योगदान प्रत्येक भारतीयाने स्मरणात ठेवायला हवे, ही गोष्ट मला ठळकपणे सांगावीशी वाटते. 
(अनुवाद : आकाश गुळाणकर)