एक "अर्थ'पूर्ण कारकीर्द (नाममुद्रा)

Vikram limaye
Vikram limaye

देशातील सर्वांत मोठा भांडवली बाजार असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम लिमये यांची नुकतीच नियुक्ती झाली. शेअर बाजार म्हणजे केवळ सट्टा, जुगार आणि झटपट पैसे मिळविण्याचा मार्ग, असा एक गैरसमज आहे. त्यामुळेच ते आपले काम नोहे, अशीच धारणा मराठीचिये नगरी आढळते. परिणामतः या एका महत्त्वाच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांपासून ते व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत सगळीकडेच मराठी टक्का कमी प्रमाणात आढळतो. आता हळूहळू हे चित्र पालटत आहे. त्याची गती वाढविण्यासाठी लिमये यांच्यासारख्यांचे उदाहरण प्रेरणादायी ठरू शकेल. विक्रम लिमये यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेतील "युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानिया' आणि "व्हॉर्टन स्कूल'मधून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. वित्तीय संस्थांचे व्यवसाय व्यवस्थापन हा त्यांचा मुख्य विषय. 1987 पासून मुंबईतील "ऑर्थर एंडरसन'मधून त्यांच्या कारकिर्दीत सुरवात झाली. सिटी बॅंकेतही त्यांनी महत्त्वाच्या पदावर जबाबदारी सांभाळली. "आयडीएफसी कॅपिटल'च्या माध्यमातून अनेक कंपन्यांच्या "आयपीओ'चे (इनिशिअल पब्लिक इश्‍यू) त्यांनी व्यवस्थापन केले आहे. लिमये हे सरकारच्या विविध समित्यांवरही कार्य करत आहेत. "व्यवसायातील प्रशासन' या विषयावरील त्यांची घट्ट पकड पाहूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासक मंडळातही नुकतेच त्यांना सदस्य म्हणून पाचारण करण्यात आले. 
देशहिताच्या दृष्टीने पोषक अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी योगदान देण्यास नेहमी उत्सुक असलेल्या विक्रम लिमये यांच्यावर त्यामुळेच दोन मोठ्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या आहेत. देशातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय शेअर बाजाराची (एनएसई) मुहूर्तमेढ रोवली गेली ती एच. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली. आता त्याच संस्थेचे प्रमुखपद एका मराठी माणसाकडे आले आहे. एनएसईचा दहा हजार कोटींचा "आयपीओ' लवकरच बाजारात येत आहे. अशा वेळी लिमये यांच्याकडे या संस्थेची धुरा येणे हे उल्लेखनीय. त्यांचा अनुभव, ज्ञान यांचा कस लागेल. लिमयेंच्या व्यवसायातील प्रशासनाची पकड आणि अनुभवाचा कस लागणार आहे. अलीकडे संस्थेतील अंतर्गत वादांमुळे चित्रा रामकृष्णन्‌ यांनी राजीनामा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर लिमये यांचे व्यवस्थापनकौशल्यही पणाला लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com