कोण म्हणतो मराठी मागे?

कोण म्हणतो मराठी मागे?

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात जिव्हाळ्याने चर्चिल्या जाणाऱ्या विषयांपैकी एक विषय म्हणजे मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल वाटणारी चिंता. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी 1926 मध्ये "मराठी भाषा मुमुर्षू आहे काय?‘ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्याचा अर्थ "मराठी भाषा मृत्युपंथाला लागली आहे काय?‘ असा होतो. आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी सुशिक्षित मराठी माणसांचे शिक्षण, पत्रव्यवहार, ग्रंथलेखन इ. गोष्टी इंग्रजी भाषेतच चालतात, हे सांगून पुढच्या काळात मराठी भाषा केवळ घरगुती वापरापुरती मर्यादित राहील की काय, अशी सभय शंका प्रदर्शित केली.

खरे तर, राजवाडे यांच्या आधीच्या काळात; तसेच त्यांच्या काळात कृष्णशास्त्री व विष्णुशास्त्री चिपळूणकर, श्रीधर व्यंकटेश केतकर, विठ्ठल रामजी शिंदे, त्रिंबक नारायण अत्रे यासारखे लेखक सकस मराठी लिहित होते. मात्र त्याची दखल न घेता मराठीचा विकास खुंटल्याची हाकाटी सुरू झाली. पुढे स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, माधवराव पटवर्धन इत्यादींनी भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली व राजवाड्यांच्या विचाराला पाठबळ पुरविले. अलीकडेही काही विद्वान व राजकारणी मराठीच्या विकासाचा मुद्दा लावून धरताहेत. साहित्य संमेलनाच्या अधिवेशनातही मराठीच्या विकासाचा प्रश्‍न कळकळीने मांडला जातो. मराठी भाषेची स्थिती चिंता करण्याजोगी आहे काय, हे पाहिले तर या हाकाटीत फारसे तथ्य नाही, असेच दिसून येईल.

मराठीबाबत सर्वसाधारण चित्र काय दिसते? मराठीत ग्रंथनिर्मिती समाधानकारक आहे. वर्षाला सुमारे तीन हजार नवी पुस्तके, चारशेहून जास्त दिवाळी अंक प्रसिद्ध होतात. कादंबऱ्या, समीक्षा ग्रंथ, मंगेश पाडगावकरांसारख्या कवींच्या कवितासंग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रसिद्ध होतात. ही वस्तुस्थिती मराठीच्या विकासाचा विचार करताना लक्षात घेणे आवश्‍यक आहे.

भाषावापराने जीवनाची तीन अंगे समृद्ध होतात. ती म्हणजे व्यवहार भाषा, साहित्यभाषा व ज्ञानभाषा. या क्षेत्रांत भाषेचा वापर किती व कसा होतो, यावरून तिची समृद्धी कळते. व्यवहार भाषा म्हणून मराठी भाषेचा उपयोग शासन व्यवहारात ग्रामपंचायतीपासून ते विधिमंडळापर्यंत सहजतेने व उपयुक्‍त रीतीने होताना दिसतो. साखर कारखाने, खरेदी-विक्री संघ अशा संस्थांमध्येही मराठीचा उपयोग स्वाभाविकपणे करतात. एकंदरीत व्यवहारभाषा म्हणून मराठीचा उपयोग समर्थपणे होतो. भाषेच्या समृद्धीचे दुसरे लक्षण पाहावयास मिळते ते साहित्याच्या भाषेत. प्राचीन संतसाहित्य विविध जातींच्या संतांनी लिहिलेले होते. पंडिती वळणाच्या भाषेने संतांच्या भाषेत खंड पाडला व ती एका पंडित वर्गाची भाषा बनली. 1932 च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी "मराठी साहित्यिक भाषा एकाच वर्गाकडून, एकाच वर्गासाठी लिहिली जाते, म्हणून या साहित्याचे स्वरूप एकारलेले आहे,‘ असे सांगितले होते. हे चित्र नंतर व्यंकटेश माडगूळकर, भालचंद्र नेमाडे, उद्धव शेळके आदींनी बदलविले. त्यांनी विविध जातींच्या, विविध व्यवसाय करणाऱ्या ग्रामीण लोकांच्या जीवन व्यवहारांचे चित्र त्यांच्या भाषेच्या विविधतेसह रेखाटले. अशा प्रकारच्या प्रयत्नांतून साहित्यिक भाषा म्हणून मराठी समृद्ध झाली.

ज्ञानभाषा होण्याची क्षमता मराठीत आहे खरी; मात्र तिचा पुरेपूर वापर होणे गरजेचे आहे. एकोणिसाव्या शतकात ज्ञान व्यवहारासाठी मराठी भाषा समर्थ करण्याचे प्रयत्न विविध कोषांच्या व ग्रंथांच्या निर्मितीमुळे चालू झाले. विज्ञानासारखे विषय "मराठी विज्ञान पत्रिका‘, तर अर्थशास्त्रासारखे अर्थबोधपत्रिका, "अर्थसंवाद‘, यासारख्या नियतकालिकांतून मांडले जातात. जयंत नारळीकरांसारखे शास्त्रज्ञ विज्ञानविषयक ग्रंथ प्रथमतः मराठीतून मांडतात व नंतर त्यांचे अनुवाद अन्य भाषांत होतात. निरंजन घाटेंसारखे अभ्यासक विज्ञान अन्य भाषांतून मराठीत उत्तमप्रकारे आणतात.

अलीकडे मात्र मराठी भाषेच्या विकासामध्ये नवा अडसर निर्माण होतो आहे. तो म्हणजे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्रजी शाळांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. शास्त्र विषयाबाबत संकल्पनाग्रहणाला महत्त्वाचे स्थान असते. हे संकल्पनाग्रहण मातृभाषेतूनच प्राथमिक व माध्यमिक पातळ्यांपर्यंत होणे आवश्‍यक असते; परंतु आजकाल इंग्रजीचे महत्त्व विपर्यस्त स्वरूपात सांगितले जाते. त्यामुळे खेड्यापाड्यांतही इंग्रजी शाळांना महापूर आला आहे. मराठीवर होणारे हे आक्रमण मराठीच्या विकासासाठी व संवर्धनासाठी आता तातडीने थांबविणे आवश्‍यक आहे.

(लेखक प्राध्यापक, समीक्षक आहेत) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com