आपल्याकडेही का असू नये "वुमेन्स मार्च'? 

श्रीमंत माने
सोमवार, 6 मार्च 2017

परवा ऑस्कर सोहळ्यात विदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट "द सेल्समन'चा पुरस्कार स्वीकारायला इराणी दिग्दर्शक असगर फरहादी उपस्थित नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परकी नागरिकांसदर्भातील धोरणाचा निषेध म्हणून ते गैरहजर राहिले. तेव्हा, अनुशेह अन्सारी यांनी तो पुरस्कार स्वीकारला. इराणमध्ये जन्मलेल्या श्रीमती अन्सारी 2006 मध्ये चाळिसाव्या वाढदिवसानंतर स्वत:च्या खर्चाने अंतराळ स्थानकावर पोचलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पर्शियन वंशाच्या पहिल्या अंतराळवीर! आता त्यांचा संदर्भ येण्याचे कारण आहे, जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये साजरा होणारा "वुमेन्स हिस्ट्री मंथ'!

परवा ऑस्कर सोहळ्यात विदेशी भाषेतला सर्वोत्कृष्ट चित्रपट "द सेल्समन'चा पुरस्कार स्वीकारायला इराणी दिग्दर्शक असगर फरहादी उपस्थित नव्हते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परकी नागरिकांसदर्भातील धोरणाचा निषेध म्हणून ते गैरहजर राहिले. तेव्हा, अनुशेह अन्सारी यांनी तो पुरस्कार स्वीकारला. इराणमध्ये जन्मलेल्या श्रीमती अन्सारी 2006 मध्ये चाळिसाव्या वाढदिवसानंतर स्वत:च्या खर्चाने अंतराळ स्थानकावर पोचलेल्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. पर्शियन वंशाच्या पहिल्या अंतराळवीर! आता त्यांचा संदर्भ येण्याचे कारण आहे, जागतिक महिला दिनानिमित्त अमेरिकेसह काही देशांमध्ये साजरा होणारा "वुमेन्स हिस्ट्री मंथ'! स्त्रियांच्या कर्तबगारीचे अनेक संदर्भ असलेला मार्च महिना असा साजरा करण्याचा ठराव तीस वर्षांपूर्वी, 1987 मध्ये अमेरिकन कॉंग्रेसने संमत केला. आता अमेरिकेसोबत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देशदेखील हा महिना साजरा करतात. अर्थातच 8 मार्च हा त्या उत्सवाचा कळसाध्याय असतो. 

समानतेच्या कितीही गप्पा मारल्या, तरी स्त्री शारीरिकदृष्ट्या दुबळी आहे, असा युक्‍तिवाद करताना रणांगणावरच्या पुरुषांच्या पराक्रमाचे दाखले दिले जातात. परंतु युक्तिवादाला छेद देणारी अनेक उदाहरणे "वुमेन्सहिस्ट्रीमंथ'च्या माध्यमातून समोर आली आहेत. पहिल्या शतकातला रोमन सम्राट डोमिटिअनच्या काळातल्या ऍमेझॉन व अचिलिया या समशेरबाज वीरांगनांचे ब्रिटिश म्युझियममधील शिल्प ते अमेरिकन मिलिटरी अकादमीची पहिली कमांडंट ऑफ कॅडेट्‌स, ब्रिगेडिअर जनरल डायना होलांड असा महिलांच्या शौर्याचा प्रवास आहे. जगभरातल्या अनेक वीरांगना या प्रवासाच्या टप्प्याटप्प्यांवर भेटतात. 
स्त्रियांचे समाजभान व ममत्व टिपण्याचा प्रयत्न होतोय. मलावीमधील थेरेसा कचिंडामोटो "टर्मिनेटर ऑफ चाइल्ड मॅरेजेस' म्हणून ओळखल्या जातात. त्या स्वत: बारा भावंडांपैकी सर्वांत धाकट्या. आतापर्यंत 850 हून अधिक बालविवाह मोडल्याची नोंद त्यांच्या नावावर आहे. भारतात जालंधरच्या प्रकाशबीबी कौर गेली 23 वर्षे "नकोशी' झाली म्हणून मातापित्यांनी रस्त्याच्या कडेला, मंदिरे किंवा गुरुद्वारांच्या पायऱ्यांवर टाकून दिलेली बालके, विशेषत: मुली सांभाळतात. "साप्ताहिक सकाळ'च्या ताज्या अंकात प्राजक्‍ता ढेकळे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडजवळच्या फांगणेच्या आजीबाईंच्या शाळेची दखल घेतलीय; अगदी तशीच शाळा दक्षिण आफ्रिकेत काही आजीबाई चालवतात. फरक इतकाच, इकडे तरुण शिक्षक-शिक्षिका आजींना शिकवतात, तर तिकडे आजीबाई मुलामुलींसाठी शाळा चालवतात. भारताच्या डॉ. आनंदीबाई जोशी, जपानच्या डॉ. केई ओकामी व सीरियातल्या दमास्कसच्या डॉ. तबत एम इस्लामबूलाई या तिघी अन्य देशांतून अमेरिकेला जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पहिल्या महिला. सॅम मॅग्गज यांच्या "वंडर वुमेन' पुस्तकाच्या आधारे तिघींच्या कर्तबगारींची नोंद "सोशल मीडिया'ने घेतलीय. 

महिलांची मिथिला चित्रशैली 
स्त्रीजन्माची कहाणी सांगणारी लोकगीते असोत की कशिद्यावरची कलाकुसर; स्त्री कलेतून अधिक व्यक्‍त होते. महिला अन्‌ कला म्हटले की ऑस्कर, गोल्डन ग्लोब किंवा गेला बाजार ग्रॅमी ऍवॉर्ड, हेच आजचे आपले भावविश्‍व. "ट्‌विटर'ने त्यापलीकडचा कलापरीघ पकडण्याचा प्रयत्न केलाय. "व्हीटनी म्युझियम ऑफ अमेरिकन आर्ट'मध्ये पहिले "सोलो एक्‍झिबिशन' लावणाऱ्या अल्मा थॉमस, अरब जगतातल्या पहिल्या छायाचित्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅलेस्टाइनच्या करिमा अबद, सध्या सगळीकडे चर्चा होत असलेल्या "ऍनिमेशन' जगताचा प्रारंभ करणाऱ्यांच्या पहिल्या पिढीतल्या जर्मनीच्या लॉट रिनिजर, परिचारिका ते शिल्पकार असा प्रवास केलेल्या अन्‌ फ्रॅंकलिन डी रुझवेल्टचे मूळ शिल्प घडविणाऱ्या कृष्णवर्णीय सलमा बुर्क, इतकेच नव्हे तर आपल्या रोजच्या ताटाचा अविभाज्य भाग बनलेल्या काटेचमच्याचा शोध लावणाऱ्या (1 मार्च 1892 ला त्याचे पेटंट मिळाल्याचे आगळे महत्त्व) आफ्रिकन वंशाच्या ऍना मॅनजिन. अशा अनेक कर्तृत्वशालिनींना यंदा "ट्‌विटर'वरील "वुमेन्सहिस्ट्रीमंथ' उत्सवात सलाम करण्यात आलाय. 
हिमालयाच्या पायथ्याला, गंगा-कोशी-नारायणी नद्यांच्या खोऱ्यात, भारत-नेपाळ सीमेवरील तराई प्रदेशातल्या महिलांनी तीन हजार वर्षांहून अधिक काळ मधुबनी किंवा मिथिला किंवा मधुबनी चित्रकलेचे संगोपन केल्याची विशेष दखल जगाने या मार्च मासाच्या निमित्ताने घेतलीय. पद्मश्री सीतादेवींमुळे भारतात बऱ्यापैकी ओळख असलेली खास शैलीतली देवीदेवतांची चित्रे असे या कलेचे स्वरूप असले, तरी तिची अन्य वैशिष्ट्ये जगाला भावलीत. एकतर शेकडो वर्षे ब्राह्मण, दुसाध किंवा कायस्थ समूहातल्या केवळ महिलाच ही चित्रे काढत आल्या आहेत अन्‌ मूळ रंगांचाच वापर हा आणखी विशेष आहे. 
 

Web Title: why we are not celebrate women's history month