अनागोंदीपासून वाचवा मराठी

yasin-shaikh
yasin-shaikh

भाषा म्हणजे बोलणे. ते श्राव्य आहे; पण अल्पजीवी आहे. या ध्वनिरूप भाषेचे लेखन हे दृश्‍यरूप आहे, ते चिरकाल टिकू शकते. ही दोन्ही माध्यमे भिन्न आहेत. भाषेच्या लेखनासाठी स्वीकारलेली ही दृश्‍यचिन्हे आणि त्यातून सूचित होणारे ध्वनी यांचा परस्परसंबंध नसतो. समाजाने दिलेल्या मान्यतेमुळे, केवळ संकेताने या दृश्‍यचिन्हांना भाषेतील उच्चारांचे विशिष्ट रूप प्राप्त होते. ध्वनी समुच्चयातून शब्द, शब्दांच्या विशिष्ट रचनेतून वाक्‍यरचना सिद्ध होते. उदाहरणार्थ, ‘अ’, ‘क’ या लेखनातील वर्णांचा ‘अ’, ‘क’ या उच्चाराशी काहीच संबंध नसतो. त्याचप्रमाणे वर्णांच्या विशिष्ट समुच्चयाचा उदा. फूल, दूध, नदी, इ.चा त्या त्या वस्तूंशी काहीच संबंध नसतो.

आपण बोलतो त्या भाषेत भाषाशास्त्राच्या दृष्टीने सतत हळूहळू नकळत; पण निश्‍चितपणे बदल होत असतो. बोलणे बदलत असले, तरी त्याचे लेखन स्थिर असते आणि ते स्थिर असणे आवश्‍यकही आहे. कालांतराने लेखनातही भाषेत होणाऱ्या बदलाचे प्रतिबिंब पडते; पण ते धीम्या गतीने. बोलण्यातील सतत होणारे बदल लेखनातही स्वीकारलेच पाहिजेत, असा आग्रह धरून आपण लिखाण करू लागलो, तर एका पिढीचे लेखन आधीच्या किंवा नंतरच्या पिढ्यांनाही आकलन होणे कठीण होईल.

सरकार, शाळा आणि संस्थांच्या पातळीवर वेगवेगळे नियम पाळले जात असल्याने लिखाणात एकवाक्‍यता दिसून येत नाही. असे प्रत्येकाचे लेखनविषयक स्वातंत्र्य मान्य केले, तर कालांतराने लेखनव्यवहार हे परस्परसंवादाचे साधन न राहता अनागोंदी माजेल आणि लेखनाचे जे प्रयोजन आहे, तेच नष्ट होऊन जाईल. मराठी लेखनाची जी दुर्दशा होईल, त्या मराठीच्या अवस्थेची कल्पनाच करवत नाही.

एक मे १९६० रोजी मराठी राज्याची स्थापना झाली. मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रतिष्ठा सर्वमान्य झाली. मराठीच्या लेखनात एकसूत्रीपणा यावा, एकवाक्‍यता असावी आणि सर्वसामान्य मराठी माणसालाही मराठीचे लेखन बिनचूक करता यावे, या हेतूने महाराष्ट्र सरकारने मराठी साहित्य महामंडळ या संस्थेकडे लेखनविषयक नियम निश्‍चित करण्याचे काम सोपविले. १९६२मध्ये सिद्ध झालेल्या १४ नियमांत आणखी चार नियमांची भर घालून १९७२मध्ये एकूण १८ नियम मंडळाने सरकारकडे पाठविले. सरकारने या नियमांना मान्यता देऊन सर्व शिक्षणसंस्थांना, वर्तमानपत्रांना, प्रकाशकांना, सरकारी लेखनव्यवहार करणाऱ्या सर्वांना, मराठीचे लेखन करणाऱ्या सर्व जनतेला हे नियम स्वीकारून लेखन करणे आवश्‍यक आहे, असा आदेश दिला. आज ४८ वर्षांहून अधिक वर्षे झाली, या नियमांत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे मराठी लेखन करणाऱ्या प्रत्येकाने या नियमानुसार लेखन करणे आवश्‍यक आहे.

हे नियम मराठीच्या प्रमाण भाषेच्या संदर्भात आहेत. प्रमाणभाषा ही लेखनासाठी स्वीकारलेली आहे, हे महत्त्वाचे. लेखनातील प्रमाणभाषा जशीच्या तशी कोणीच बोलत नाही. औपचारिक लिखाणात, सरकारच्या लेखी व्यवहारात, शास्त्रीय-वैचारिक ग्रंथांत, वृत्तपत्रांतील वृत्तांतात ज्ञानभाषा म्हणून जेथे जेथे मराठी लेखनाचा वापर होतो, त्या त्या सर्व लेखनात प्रमाणभाषेचे लेखन करताना शासनमान्य नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.

प्रमाणभाषा ही सुशिक्षितांची, उच्चवर्णीयांची, शहरी भाषा आहे, असे समजून तिला विरोध करणाऱ्यांना सांगावेसे वाटते, की प्रमाणभाषा ही लेखनासाठी मान्य केलेली आहे. प्रमाणभाषा ही एक संकल्पना आहे. ती कुठल्याही वर्गाची भाषा नाही. केवळ मराठी लेखनातच नव्हे, तर सर्व जगभरातही लेखनासाठी त्या त्या भाषेची प्रमाणभाषाच वापरतात.

दुसरे असे, की कोणताही भाषाशास्त्रज्ञ बोलीभाषा या अशुद्ध आहेत, असे मानत नाही. भाषेत शुद्ध-अशुद्ध, उच्च-नीच असे काही नसते. मराठीच्या संदर्भात विचार केल्यास मराठीच्या पुणेरी, कोल्हापुरी, सोलापुरी, अहिराणी, वैदर्भी अशा किती तरी बोली आहेत. त्या अशुद्ध आहेत, असे कोणीही म्हणत नाही. भाषाशास्त्रात बोलीभाषांना कमी लेखलेले नाही. सारांश, मराठीशी आपली बांधिलकी असेल, प्रेम, आपुलकी असेल, तर लेखनात प्रमाणभाषेला व लेखनविषयक नियमांना विरोध करण्याची मुळीच आवश्‍यकता नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com