एक होते भित्रे पाणी 

Narendra Modi Supporters
Narendra Modi Supporters

शिवसेना आणि भाजपविषयी थोडा वेगळा विचार करू. हे दोन्ही पक्ष सर्वांत जुने मित्र. आता युतीत बेबनाव असला तरी खांद्याला खांदा लावून ते एकत्र लढलेच होते ना ? युतीचे नेते एकत्रितपणे कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचा उद्धार करीत होते ना ? आज जर तीच शिवसेना तुमच्यावर (भाजप) टीका करू लागली तर तिळपापड होण्याचे कारण आहे. 
 
एक होते भित्रे पाणी 
ते मेले नि दगड झाले! 
दुसरे ह्या धक्‍क्‍याने 
घाबरून दगड झाले! 
तिसरे ह्या धक्‍क्‍याचे वर्णन करू लागले 
नि कुणा दगडाच्या रोखून पाहण्याने दगड झाले! 
एक कवी वाचला 
संवेदनेला भ्याला 
इतके दगड! 
तो तर मोजता मोजता दगड झाला ! 

सुरजित पातर यांची ही एक सुंदर (चिनार प्रकाशन) कविता. पातर यांचे एक कवी मित्र पाश यांची खलिस्तानवाद्यांनी हत्या केल्यानंतरची त्यांनी ही कविता काही वर्षापूर्वी लिहिली होती.

आदल्या दिवशी ही कविता वाचण्यात आली. दुसऱ्यादिवशी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ई-सकाळवर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर दुरुगकर अनिल यांनी एक प्रतिक्रिया दिली. ती अशी "या उद्धवजींना संपूर्ण महाराष्ट्र एकट्याच्या जिवावर काबीज करता आला नाही आणि निघाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चाबूक ओढायला. सलग पंधरा वर्षे मुंबईची सत्ता हातात देऊन सुद्धा यांना मुंबई क्‍लीन ठेवता येत नाही की मराठी माणसाचा प्रश्न सोडवता येत नाही. तरीही न चुकता मोदी यांच्यावर टीका करायला हे मागे पुढे पाहत नाहीत. आता खरी वेळ आली आहे ती सर्व शिवसैनिकांनी विचार करण्याची. शिवसैनिकांनी एवढी साथ देऊनही यांना महाराष्ट्रावर एक हाती सत्ता मिळवता आली नाही आणि निघाले मोदी यांच्यावर चाबूक ओढायला.'' 

एक कविता आणि प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी. त्यामध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे हम करे सो कायदा ! आज देशभरातील मोदी भक्त इतके का उन्मत्त झाले आहेत. त्यांच्या डोक्‍यात कोणते भूत शिरले आहे हेच कळत नाही. आज केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आहे. दोन्हीकडील सत्तेत शिवसेना सहभागी आहे. तरीही ती भाजपवर आणि विशेषत: मोदींवर जे ओरखडे ओढायचे ते ओढतेच. उद्धव ठाकरे हे ही गंमत करतात. ते मोदींवर टीका करतात आणि इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातगळा घालतात. जर टीका करायची तर कुणालाच सोडू नका ना ? द्या ना थेट आव्हान. ही लुटूपुटूची लढाई कशासाठी खेळता. भाजप मुंबईत युती करणार नाही. हे कळल्याने ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. म्हणूनच ते चाबूक ओढण्याची भाषा करतात.

नुसता चाबूक हातात घेतला की बैल घाबरतात असे नाही तर बैलगाडीला ते व्यवस्थित चालत नसतील तर आसूड ओडावाच लागतो हे त्यांनी उद्धव यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उद्धव काय किंवा राज ठाकरे काय ? कॉंग्रेस किंवा इतर विरोधी पक्ष काय ? जे जे मोदी सरकारवर टीका करतात त्यांना देशविरोधी किंवा खलनायक ठरविले जात आहे. भारताच्या लोकशाहीचा आपण डंका जगभर पिटतो (अर्थात बाळासाहेबांना अशी दळभद्री लोकशाही मान्य नव्हती). त्याच लोकशाहीत मत व्यक्त करण्याचा विचार कोणालाच नाही का ? जे विरोधात आहेत ते मोदी काय किंवा फडणवीस काय ? यांची काय आरती ओवाळत बसावे की काय ? हेच कळत नाही. नाही पटत मोदींची मत किंवा निर्णय असा देशातील कोणताही नागरिक म्हणू शकतो की नाही ? त्याचा हा मूलभूत अधिकार आहे की नाही ?

एकीकडे हेच भाजप-संघवाले इंदिरा गांधींच्या आणिबाणीविरोधात आक्रोश करतात. त्यांना खलनायक ठरवितात आणि हेच मोदीभक्त पंतप्रधानांवर कोणी टीका केली त्याच्यावर तुटून पडतात ही अप्रत्यक्षरीत्या आणीबाणी नाही का ? आज सोशल मीडियावर जर तुम्ही मोदींविरोधात "ब्र' जरी काढला तर शिव्याशापांच्या माळ गळ्यात पडतात. जर तुम्ही मोदींवर स्तुतिसुमने उधळली तर तुमच्या गळ्यात हार पडतात. तुम्हाला डोक्‍यावर घेतले जाते. तुम्ही देशभक्त असल्याची सर्टिफिकेट मिळते. याचा अर्थ मोदींवर कोणी काही बोलूच नये असा होत नाही. खरेतर विरोधी मतांचा आदर करतानाच चांगल्या गोष्टीचा किंवा देशहिताचा निर्णय असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. केवळ शिव्याशाप देऊन काहीच हाती लागणार नाही. अशापद्धतीने होत राहिल्यास उलट मोदींच्या प्रतिमेचे हनन होईल. 

सत्ता काय आज आहे उद्या नाही. आणखी पाच वर्षांनी सत्ता येणारच. आम्ही आयुष्यभर सत्तेवर राहू असे समजण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीस्वातंत्र्यांचा आदर प्रत्येकाने केलाच पाहिजे. पण दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही..विरोधकांचे काम विरोधकांना करून द्यावे. सरकारने आपली भूमिका जनतेच्या दरबारात मांडण्याची गरज आहे. आज मोदी खरेच चांगले काम करीत आहेत हे देशातील 70 टक्के लोकांना वाटते. त्यामुळे विरोधक कितीही ओरडले तरी त्याचा काही फरक पडत नाही हे मोदीभक्तांनी लक्षात घेण्याची गरज आहे. 

इतर सर्व पक्षांचे सोडून देऊ. शिवसेना आणि भाजपविषयी थोडा वेगळा विचार करू. हे दोन्ही पक्ष सर्वांत जुने मित्र. आता युतीत बेबनाव असला तरी खांद्याला खांदा लावून ते एकत्र लढलेच होते ना ? युतीचे नेते एकत्रितपणे कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचा उद्धार करीत होते ना ? आज जर तीच शिवसेना तुमच्यावर टीका करू लागली तर तिळपापड होण्याचे कारण आहे. की उद्धवनाही बोलून देणार नाही. टीका करू देणार नाही. आज उद्धव यांनी भाजपवरील टीकेची धार अधिक तीव्र केली आहे. कदाचित ती अधिक तीव्र होत जाईल. पुढे सामना आणखी रंगात येणार आहे. अनेक नेते, पत्रकार किंवा कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीने जर मोदींवर टीका केली तर त्याला सळो की पळो करून सोडण्याचे काम सध्या सुरू आहे.ते थांबले पाहिजे. अन्यथा प्रत्येक मोदीविरोधक दररोज दगड बनत जातील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com