आता लढा चौघे एकमेकांविरुद्ध..!

अमित गोळवलकर
मंगळवार, 31 जानेवारी 2017

पुणे शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकांसमोर लढणार आहेत. त्याच्या पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीत एकमेकांसमोर येतील. खरेतर या दोन्ही पक्षांच्या साठी ही घातक गोष्ट आहे. पण शेवटी निवडणुकीतला हट्ट तो हट्ट. मग त्यापुढे स्वतःचे हितही बाजूला पडते. 

पुणे शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकांसमोर लढणार आहेत. त्याच्या पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीत एकमेकांसमोर येतील. खरेतर या दोन्ही पक्षांच्या साठी ही घातक गोष्ट आहे. पण शेवटी निवडणुकीतला हट्ट तो हट्ट. मग त्यापुढे स्वतःचे हितही बाजूला पडते. 

सेना-भाजपची युती ही मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर तुटली. दुसऱ्या बाजुला आघाडीच्या चर्चांचे गुऱहाळ सुरु होते. पण आज त्यालाही विराम मिळाला. केवळ सात जागांसाठी आघाडीची चर्चा फिस्कटली. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतले सध्याचे संख्याबळ 51 आहे तर काँग्रेसचे संख्याबळ 28 आहे. त्याच आधारावर पुढचे वाटप होणे हे स्वाभाविक होते. पण काँग्रेसने 67 जागांचा आग्रह धरला होता, तर राष्ट्रवादीने काँग्रेसला 60 जागा देऊ केल्या होत्या. 

खरेतर दुमत होण्याला सुरुवात ही आघाडीच्या राज्यपातळीवरच्या नेत्यांमधील विसंवादापासूनच सुरु झाली होती. पुण्याची जबाबदारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राष्ट्रवादीला जो काही त्रास झाला, त्यावरुन राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीचे नेते कमालीचे नाराज आहेत. पुण्यात अजित पवार पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराच्या निवडणुकांची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण व अजित पवार यांच्यात संवाद होऊच शकला नसता. त्यामुळेच सर्व जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर होती. पण त्यांनाही आघाडी करण्यात यश आलेले नाही. 

खरेतर काँग्रेसची सध्याची अवस्था पाहता 60 जागा देखिल काँग्रेसला बोनसच होत्या. कारण गेल्या काही दिवसांत जे अंदाज वर्तविले जात आहेत, ते पाहता काँग्रेसला पुण्यात फार बरे दिवस उरलेले नाहीत, असेच दिसते आहे. एकतर पक्षाला पुण्यात म्हणावे तसे प्रबल नेतृत्व नाही. रमेश बागवे आपल्या परीने पक्षाचा गाडा हाकत असले तरीही त्याला मर्यादा आहेत. विश्वजित कदम यांनी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवली असली तरी जुन्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर त्यांना फारसे कुणी स्वीकारलेले नाही. 

पुण्यात सुरेश कलमाडी एकट्याच्या जीवावर पक्ष चालवत होते. आर्थिक ताकदीपासून सारी ताकद लावत होते. काँग्रेस म्हणजे कलमाडी असंच समीकरण त्यावेळी होते. पण आता ते पक्षात नाहीत. सत्ता गेल्यावर जी अवस्था होते तीच अवस्था कलमाडींची झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या मॅरेथाॅन स्पर्धेतूनही हेच दिसलं आहे. त्यामुळे निवडणूक लढवायची तर कुणाच्या जीवावर असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला तर त्यात नवल काही नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार आघाडीबाबत आग्रही होते. जाहीर झालेल्या अंदाजांनुसार पुण्यात दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस राहण्याची शक्यता आहे. जर आघाडी झाली तर पुन्हा गेल्या वेळचा प्रयोग करुन सत्ता कायम ठेवता आली तर पहावे, असाही विचार यामागे असावा. शिवाय नुकत्याच झालेल्या नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजपनं जी चमक दाखवली आहे, ती अन्य पक्षांच्या दृष्टीने सूचक आहे. महापालिका निवडणुकांमध्येही हेच चित्र दिसू शकते, अशीच शक्यता आहे. त्यामुळे आघाडीचा फायदा खरेतर दोन्ही पक्षांना मिळू शकला असता. पण तसे झालेले नाही. 

आघाडी नाकारत असताना दोन्ही पक्षांचे बहुदा आणखी एका मुद्याकडे दुर्लक्ष झाले असावे. नगरपालिका- नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्ये एमआयएमने आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही हा पक्ष आपले दोन आमदार निवडून आणू शकला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही हा पक्ष पुण्यात शिरकाव करेल, ही दाट शक्यता आहे. या शक्यतेला बळ देत आहेत ते भाजपचेच नेते. 

पुण्याचे काही प्रभाग मुस्लिम बहुल आहेत. शहराच्या मध्यवस्तीत मिश्र लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम मतांवर भिस्त होती. पण एमआयएमच्या मुलाखतींना झालेली गर्दी पाहता, अशा सर्व ठिकाणी एमआयएम आपले उमेदवार उभे करेल, हे निश्चित. त्यामुळे मुस्लिम मतांची विभागणी होईल तेवढी आपल्याला चांगली, अशी गणिते भाजपचे नेते बांधायला लागले आहेत. आजवर एमआयएमला बळ भाजपानेच दिले, या म्हणण्यात निश्चित तथ्य आहे. कारण पुढच्या काही दिवसांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभा ज्या भागात होणार आहेत, त्या जागा पाहता भाजपची खेळी लगेचच लक्षात येईल. त्यामुळे पूर्वीची मतांची गणिते यावेळी चालली नाहीत हे कदाचित निवडणुका झाल्यावरच अनेकांच्या लक्षात येईल. 

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीकडे शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष डोळे लावून बसले होते. कारण आघाडी झाली तर आपल्याला अनेक चांगले उमेदवार या पक्षांतून मिळतील, अशी या दोन्ही पक्षांची अटकळ होती. पण आता त्यालाही लगाम बसला आहे. मधल्या काळात भाजपाकडे ज्या वेगाने 'इनकमिंग' झाले तेवढे पुण्यात अन्य कुठल्याही पक्षात झालेले नाही. त्यामुळे आघाडी करुन आणखी फुटीला वाव कशाला द्या, असा विचार विशेषतः काँग्रेसनं केला असावा. 

एकूणच काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी निवडणुका यावेळी पुणेकरांना पहायला मिळतील. भाजपा पुण्यात अजूनही आघाडीवर दिसत आहे. मात्र, या पक्षाची पहिली यादीही अद्याप बाहेर आलेली नाही. त्यामुळे या पक्षातही तिकिटांवरुन कुरबुरी सुरु आहेत, हे उघड आहे. त्यामुळे पुढचे अंदाज बांधण्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाची वाट पहावी लागेल.