रस-भावपूर्ण रागसंगीताचा आनंद घ्यायचाय अन्‌ द्यायचाय... (मधुवंती देव)

रस-भावपूर्ण  रागसंगीताचा आनंद घ्यायचाय अन्‌ द्यायचाय... (मधुवंती देव)

आपल्या तणावपूर्ण जीवनात, जनात आणि मनातही शांतता नाही. भारतीय शास्त्रीय संगीतात ही शांतता देण्याची ताकद आहे, असं किशोरीताई म्हणत. त्यांच्या आदेशानुसार, श्रोत्यांच्या हृदयाला, मनाला शांतता देणाऱ्या रस-भावपूर्ण रागसंगीताचा आनंद श्रोत्यांना द्यायचा आहे. मैफलीत गाण्यांतूनही आणि पुढील पिढीला शिकवण्यातूनही...

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या महासागरात आपलं योगदान देणाऱ्या कलाकारांच्या कलाप्रवासावर आधारित अशा या सदरात माझ्या सांगीतिक प्रवासावर लिहिताना, मी मागं वळून पाहिलं आणि माझ्या भाग्याचा मलाच हेवा वाटायला लागला. मराठवाड्यात अंबेजोगाईला सुरू झालेला हा प्रवास किती किती महत्त्वाची वळणं घेतो आहे याची जाणीव झाली. एका महत्त्वाच्या वळणावर गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांकडं शिकायची सुवर्णसंधी मला मिळाली. माझे अनेक गुरू...त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, विद्या, सुरांचं आध्यात्मिक अधिष्ठान, त्यांचा आशीर्वाद हीच माझ्या पुढच्या प्रवासासाठीची शिदोरी आहे.

मुळात ‘गाणं हेच माझं जीवन आहे, मला आयुष्यात गायिका व्हायचं आहे,’ हे कळायला मला जरा वेळच लागला. आई-वडिलांची गाण्याची आवड एवढी जबरदस्त की ‘माझं नाव एखाद्या रागाचं ठेवायचं’ असं ठरवून त्यांनी माझं नाव ‘मधुवंती’ ठेवलं. माझे पहिले गुरू माझे वडील. त्यांचा सहवास मला केवळ आठच वर्षं मिळाला. त्यानंतर आईनं मला गायिका होण्याच्या दृष्टीनं गाणं शिकवायचा ध्यास घेतला. प्रथम भारत गायन समाज, नंतर अंबेजोगाईला जुक्कलकर, देगलूरकर आणि पुण्यात गंगाधरबुवा पिंपळखरे गुरुजी यांच्याकडं शिकायला पाठवलं; पण गाण्याशी माझी भावनिक गुंतवणूक मला माझ्या अठराव्या वर्षी कळली आणि मग बीएस्सीनंतर संगीतात एमए होण्यासाठी मी पुण्याला एसएनडीटी विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथं ‘गानहिरा’ पारितोषिकही मिळवलं.

मात्र, संगीतात एमए होण्याचा फायदा एवढाच झाला, की आपल्याला काहीच गाणं येत नाही याची जाणीव झाली!

जिथं माझं गाणं वाढेल अशा घरीच लग्न करून जाण्याचा माझा हट्ट आईनं पुरवला आणि मी ‘साने’ची ‘देव’ झाले. लग्नानंतर सासरे राजाभाऊ देव (दादा) आणि नणंद अलकाताई मारुलकर यांची घरातच तालीम मिळू लागली आणि खऱ्या अर्थानं घराणेदार गायकी म्हणजे काय ते कळू लागलं.

दादांनी मला किराणा घराण्याचं वैशिष्ट्य असलेली आलापी, ग्वाल्हेर घराण्याचे बेहेलावे आणि दोन्ही घराण्यांच्या तालमीबरोबरच जयपूर घराण्याचं वैशिष्ट्य असलेला आकार, सर्पाकृती वळणं असलेली आलापी, कसदार बंदिशी, बारीक कशिदाकामाच्या आणि फ्रीहॅंड रांगोळीच्या रंग-रेषेच्या ताना शिकवल्या आणि या सगळ्याचा प्रस्तुतीकरणात कसा वापर करायचा तेही शिकवलं. ‘यमन’, ‘भूप’, ‘तोडी’ यांसारख्या रागांबरोबरच ‘अभोगी’, ‘नंद’ आणि ‘नटकेदार’, ‘नायकी कानडा’ यांसारखे रागही शिकवले.
‘इतर कोणत्याही विषयापेक्षा कलेचा शिकण्याचा, अभ्यासाचा काळ मोठा. मात्र, साधनेत सातत्य राखून या प्रवासाची मजा घेतली तर तो अतिशय आनंददायी ठरतो’ ही दादांची शिकवणूक!

अलकाताईंच्या मागं अनेक कार्यक्रमांत साथ करताना, श्रोत्यांची वाहवा घेताना मैफलीचं गणित समजलं. त्यांच्यामागं शास्त्रीय संगीताच्या मैफलीत गाण्याचा आणि त्यांच्याबरोबर ‘प्रेमांजली,’ ‘मधुघट,’ ‘पुरबिया’ यांसारख्या नावीन्यपूर्ण कार्यक्रमांमधूनही गाण्याचा अनुभव अद्भुत होता. या अनुभवांचा फायदा मला आज अनेक मैफलींमध्ये गाताना होतो. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायला लागल्यापासून जयपूर घराण्याच्या नावाचा एक प्रकारचा दबदबा जाणवला होता. दादांनी आणि अलकाताईंनी या गायकीशी माझी ओळख करून दिली होतीच; पण त्या घराण्यात माझा इतका खोलवर शिरकाव होईल असं वाटलं नव्हतं.

माझ्या संगीतप्रवासाच्या एका वळणावर मला मधुसूदन कानेटकर (आप्पा) गुरू म्हणून लाभले आणि त्यांनी या गायकीचं सतरंगी अंतरंग दाखवलं. ‘जौन बहार’, ‘बसंत बहार’ यांसारखे अनेक जोडराग, ‘बहादुरी तोडी’, ‘कौसी कानडा’, ‘खोकर’ यांसारखे अनवट राग, त्यांचं आपापसातलं जवळचं आणि दूरत्वाचं नातं, त्यांचा खोलवर अभ्यास करण्याची दृष्टी त्यांनी मला दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यातला आनंद शिकवला. शिकण्यातला, शिकवण्यातला, ऐकण्यातला, रियाजातला, साधनेतला, अभ्यासातला, प्रस्तुतीकरणातला...सगळ्यातला आनंद घ्यायला आणि द्यायला शिकवलं! आप्पांनी मला आवाजसाधनेचं महत्त्वही शिकवलं, जे कळल्यामुळंच मी आप्पांचे शिष्य, माझे गुरुबंधू राजेंद्र मणेरीकर यांच्याकडं आवाजसाधना शिकायला जायला लागले. वयाच्या नव्वदीपर्यंत विद्यासंपादन करणाऱ्या, आप्पांच्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या सहवासातून मला खूप काही शिकायला मिळालं. सतत शिकण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या आयुष्यातली वडिलांची उणीव भरून निघाली.

किशोरीताईंच्या रूपानं एक सुखकर वादळ माझ्या आयुष्यात आणखी एक वळण घेऊन आलं! त्यांनी मला माझ्यापासून कधी उचललं आणि आपल्या कवेत घेतलं, मलाच कळलं नाही! आत्तापर्यंत ताईंची मैफल ऐकताना अनेक स्वरवाटा कानांवरून कधी विजेसारख्या चमकून, कधी समुद्राच्या भरतीच्या लाटांसारख्या, तर कधी ताईंच्या आवडत्या पारिजातकाच्या मंद सुवासासारख्या मन प्रसन्न करून गेल्या होत्या...आणि त्यांनी आम्हीच काय, सगळं जग वेडावलं होतं, वेडावलं आहे... आत्तापर्यंत सुरक्षित अशा चोखाळलेल्या स्वरवाटेवरून जाणारी मी, त्यांचं बोट धरून आडवळणाच्या, असुरक्षित वाटणाऱ्या स्वरवाटांवरून फिरू लागले. ताईंकडं शिकायला मिळालं हे माझं मोठं भाग्य, ज्यासाठी मी माझाच हेवा करावा!

आवाजसाधना, प्रचलित-अप्रचलित राग यांबरोबरच ताईंनी माझा हात धरून मला रागांच्या कडेकपारीत, आडबाजूला लपलेल्या आगळ्या स्वरप्रवाहांचं दर्शन घडवलं. त्यांचा शोध घेण्याची हिंमत आणि दृष्टी दिली. ‘भूप’, ‘हंसध्वनी’, ‘रागेश्री’ काय किंवा ‘मालीगौरा’, ‘मीरामल्हार’ काय...प्रत्येक राग, त्यातला प्रत्येक स्वरसमूह, प्रत्येक स्वर यांचा खोलात शिरून, सूत सूत वेगळं करून त्यांचा अभ्यास शिकवला. एका रागाच्या वेगवेगळ्या रूपांचं दर्शन घडवताना त्यांनी, विश्‍वरूपदर्शन काय असतं, याचा अनुभव दिला.
या सगळ्यांनी मला हे असं इतकं भरभरून दिलं...मला एक चांगली गायिका होण्यासाठी तर शिकवलंच; शिवाय माझ्यातली अभ्यासू वृत्ती जोपासली. असं असलं तरीही खूप काही शिकायचं राहून गेल्याची जाणीव मनात सतत आहे. या जाणिवेतूनच मी कुमुदिनीताई काटदरे यांच्याकडं शिकते आहे. जयपूरच्या ‘भूपनट’, ‘रायसा कानडा’ यांसारख्या अनेक अनवट रागांबरोबरच ‘हिंडोल’, ‘जोग’, तसंच परज...त्यातल्या अनेक बंदिशी, त्यांची तालातली बांधणी, वैशिष्ट्यपूर्ण बोल बनवण्याच्या अनेक खुबी...त्यांच्या जादूगाराच्या पोतडीत काय काय आणि किती किती आहे, याचा अंदाज बांधता येत नाही. जिथं जिथं, ज्यांच्याकडून जमेल त्यांच्याकडून चांगलं शिकण्याच्या भुकेमुळं कुमुदिनीताईंनी जो खजिना जमवला आहे, त्याची मोजदाद करता येणार नाही.

या सगळ्या गुरूंचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं, की कुणीच मला माझी आधी शिकलेली गायकी बदलायला सांगितली नाही. ‘आहे ते चांगलं आहे, त्यात माझं मिसळ’ असंच सांगितलं. प्रत्येक मैफलीत, प्रत्येक सूर लावताना या प्रत्येक गुरूच्या आठवणीत मी तल्लीन होते. शिष्या, गायिका, संगीतसाधक, अभ्यासक या भूमिकांबरोबरच आता मी आणखी एका भूमिकेत शिरले आहे. माझ्यासारख्या काही संगीतवेड्यांच्या गुरूची भूमिका...आप्पांकडं शिकत असतानाच, त्यांच्या प्रेरणेनं मी शिकवायला सुरवात केली. माझ्या गुरूंनी मला जे अनमोल शिकवलं आहे, त्याचं महत्त्व जाणणाऱ्या आणि शिकण्याची भूक असणाऱ्या मोजक्‍या काही शिष्यांना शिकवताना सध्या मी एकाच वेळी गुरू आणि शिष्य अशा दोन्ही भूमिका वठवत आहे! एक गायिका म्हणून स्वतःला घडवतानाच कुणाला, कधी, काय आणि कसं शिकवावं यासंबंधीही ताईंनी, आप्पांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शनाची आठवण माझ्या मनात सतत आहेच! माझं ‘गुरुपण’ आनंददायी असण्याचं श्रेय माझ्या शिष्यांना नक्कीच द्यावं लागेल.

माझी आई, माझे गुरू, माझे पती प्रफुल्ल, माझी सून कमी आणि लेकच जास्त असलेली अर्पिता, माझे शिष्य यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तीनं माझा हा सांगीतिक प्रवास आनंददायी केला आहे. ती व्यक्ती म्हणजे माझा मुलगा निनाद. तो माझा गुरुबंधू, सहाध्यायी आणि मित्रही आहे. त्याच्याबरोबरच्या सतत होणाऱ्या सांगीतिक चर्चांमध्ये आम्हाला आमच्या ‘आई-मुलगा’ या नात्याचा विसर पडतो. प्रत्येक मैफलीत काय गायचं ते आम्ही मिळूनच ठरवतो. शिकताना माझ्याबरोबर तो नसता तर माझा हा आनंददायी प्रवास एवढा सुखकर झाला असता का, असा प्रश्‍न मला नेहमी पडतो.

वसंत ऋतूचं वर्णन असलेल्या बंदिशी आणि उपशास्त्रीय रचनांवर आधारित ‘बसंतरंग’, गुरू किशोरीताईंच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय रचनांवर आधारित ‘अवघा रंग’, वसंत आणि वर्षा ऋतू यांचं वर्णन असलेल्या बंदिशींवर आणि उपशास्त्रीय रचनांवर आधारित ‘रंग ऋतूंचे,’ वर्षा ऋतूचं वर्णन असलेल्या बंदिशींवर आणि उपशास्त्रीय रचनांवर आधारित ‘ऋत सावन की,’ गुरू कुमुदिनीताईंच्या बंदिशींवर आणि उपशास्त्रीय रचनांवर आधारित ‘गुरुपदवंदन,’ असे अनेक आगळे, विशेष कार्यक्रम करताना प्रत्येक सुरागणिक एकेका गुरूची आठवण मी मनात जागवते. माझे सगळे गुरू उत्तम ‘वाग्येयकार’ असल्यामुळं त्यांच्या रचनांवर आधारित एक विशेष कार्यक्रम करण्याचं सध्या मनात घोळत आहे.

आपल्या तणावपूर्ण जीवनात, जनात आणि मनातही शांतता नाही. भारतीय शास्त्रीय संगीतात ही शांतता देण्याची ताकद आहे, असं किशोरीताई म्हणत. त्यांच्या आदेशानुसार, श्रोत्यांच्या हृदयाला, मनाला शांतता देणाऱ्या रस-भावपूर्ण रागसंगीताचा आनंद श्रोत्यांना द्यायचा आहे. मैफलीत गाण्यांतूनही आणि पुढील पिढीला शिकवण्यातूनही...

‘लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर स्मृती समारोह’, ‘सूरश्री केसरबाई केरकर स्मृती समारोह, गोवा’, ‘देवल क्‍लब, कोल्हापूर’, ‘गानवर्धन’, ‘पुलोत्सव, पुणे’ या आणि अशा अनेक मैफलींमध्ये या शांतिरसाचा अनुभव श्रोत्यांना देण्याचा प्रयत्न मी केला...करत राहणार आहे. पल्ला खूप मोठा आहे. मिळालेली विद्या माझ्यात मुरवणं हे समुद्रमंथनातून अमृत काढण्यासारखं आहे आणि अमृत क्षितिजापलीकडं आहे, याची जाणीव आहे.

शिकलेल्या सगळ्या रसायनातून माझी गाण्याची स्वतंत्र शैली, व्यक्तिमत्त्व व्हायला पाहिजे, याची जाणीव आणि जबाबदारी माझ्या सगळ्या गुरूंनी माझ्यावर टाकली आहे. ‘जयपूर घराण्याची गायिका’ अशी जरी आज माझी ओळख असली, तरी माझ्या गुरूंनी आणखी एक महत्त्वाचा मार्ग मला दाखवला आहे व तो म्हणजे घराण्यांच्या पलीकडं जाण्याचा! आणि तरीही, आपली परंपरा जपण्याचा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com