दुक्‍कल! (प्रवीण टोकेकर)

Pravin-Tokekar
Pravin-Tokekar

साहेबाच्या देशात लॅंकेशर परगण्यानजीक कम्ब्रिया भागात एक चिमुकलं बाजारपेठेचं गाव आहे. नाव आहे ओल्वरस्टन. तिथल्या एका चिरेबंदी जुन्या घरावर निळी पाटी लागलेली दिसते ः ‘स्टॅन लॉरेल यांचा जन्म १६ जून १८९० रोजी येथे झाला.’

ग्लासगोतल्या ब्रिटानिया संगीत सभागाराच्या जुन्या इमारतीच्या भिंतीवर अशीच एक निळी पाटी दिसते ः ‘स्टॅन लॉरेल (१८९०-१९६५) यांनी येथे काम केले.’’

ओल्वरस्टन गावातल्याच सुविख्यात कोरोनेशन सभागाराच्या प्रांगणात स्टॅन लॉरेल आणि त्याचा जोडीदार ओलिव्हर हार्डी या जोडगोळीचे दोन पूर्णाकृती पुतळे आहेत.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात काही चाहते या ठिकाणी जमतात. बहुतेक आता वार्धक्‍याकडं झुकलेले आहेत. येतात, हसून-खेळून लॉरेल-हार्डीच्या आठवणी आळवतात. एक कृतज्ञतेचा सलाम ठोकतात आणि आपापल्या आरामखुर्च्यांकडं परत जातात.

लॉरेल अँड हार्डी. ही जोडगोळी माहीत नसलेला गेल्या शतकात बहुधा कुणी नसावा. असलाच तर निदान माणूस नसावा! विसाव्या शतकाच्या प्रारंभाला दोन दूरस्थ ठिकाणी हे दोघं आपापल्या आयुष्यात पहिली पावलं टाकत होते. स्टॅन लॉरेलची धडपड इंग्लंडात चाललेली आणि तिकडं अमेरिकेत जॉर्जियात नॉर्वेल हार्डी नावाचं वांड पोरगं शाळेच्या कटकटीतून पळ कसा काढावा, या खटपटीत वाढत होतं. हार्लेमच्या वस्तीत वाढलेला हाच नॉर्वेल पुढं ऑलिव्हर हार्डी म्हणून जगप्रसिद्ध झाला, तेव्हा त्याच्या खांद्यावर स्टॅन लॉरेल नावाच्या सवंगड्याचा हात होता, जो आयुष्यभर टिकला. पडद्यावर आणि पडद्याबाहेरही.

या जोडगोळीवर पुढं काही चरित्रं प्रसिद्ध झाली. त्यातलं जॉन मॅकाबे लिखित ‘लॉरेल अँड हार्डी स्टोरी’ हे चरित्र सगळ्यात नावाजलं गेलं. मोठ्ठं काम करून ठेवणाऱ्या माणसाचं चरित्र सजवून नंतर त्याचा चरित्रपट घडवणं हा हॉलिवूडचा स्वभावच आहे. मात्र, तसं लॉरेल-हार्डीच्या बाबतीत कां झालं नसावं, असं वाटत असतानाच दूर एखाद्या सभागारातून हास्याचा खळखळाट ऐकू यावा, तशी एक सुखद बातमी आली. ...येतंय! लॉरेल-हार्डीचं बायोपिक येऊ घातलंय, याच ऑक्‍टोबरात. त्याचं नाव आहे - ‘स्टॅन अँड ऑली’. हा चित्रपट प्रकाशनाच्या तयारीत आहे आणि येत्या ऑस्करसोहळ्यात कदाचित भाव खाऊन जाईल, असा वठलाय म्हणे. त्यात स्टॅनची भूमिका ब्रिटिश विनोदकार स्टीव्ह कूगन करतोय, तर ऑली हार्डी साकारलाय, जॉन सी. रायली या आघाडीच्या अभिनेत्यानं. निव्वळ या बातमीनं एका मनानं दुसऱ्या मनाला टाळी दिली आणि नजरेसमोर खूप वर्षांनी जाड्या-रड्याची जोडी लांबट चेहरा करून उभीच राहिली. आता?

टट्‌ट टॅट्‌ट टॅट्‌ट टॅट...टटट टटट टटट...टॅट्‌ट...टॅट्‌ट टॅट...असं मार्चिंग साँगचं पिपाटणं वाजू लागलं की सावरून बसायचं. आता पुढं अर्धा-पाऊण घंटा मरेस्तोवर हसायचं याची मानसिक तयारी व्हायची. उदाहरणार्थ ः समोर एक बेक्‍कार दृश्‍य चालू आहे. एका बारक्‍या पोराला चड्‌डी चढवायची भयानक कामगिरी जाड्या ऊर्फ ऑलिव्हर हार्डी याच्यावर ओढवली आहे. रड्या ऊर्फ स्टॅन लॉरेल उभ्या चेहऱ्यानं त्याला काही आयडिया सुचवतोय... पुढं जे काही घडतं त्याला तोड नसते 
किंवा...
हार्डीला आजकाल जादू येते. त्याला तो ‘व्हाइट मॅजिक’ म्हणतो. म्हणजे हाताची सैलसर उभी मूठ धरून त्यात खोटा खोटा तंबाकू भरतो. जणू काही ऐटीत पाइपची तजवीज करून राहिलाय. पाइप भरून झाला की दुसऱ्या हाताचा अंगठा मुठीत धरून भस्सकन काढतो. त्याला लायटरसारखी ज्योत पेटते. हार्डीचं पाइप ओढणं बघून लांब्या तोंडाचा रड्या ऊर्फ लॉरेल एकाच वेळी खजील होत असूयेनं पेटतो. आपल्या अंगठ्याला ज्योत पेटली पाह्यजेल राव! मुठीत अंगठा धरून तोसुद्धा ‘लायटर’ पेटवण्याचा ट्राय करतो. डोंबल...काहीही होत नाही. एकदा मात्र खरंच भस्सकन अंगठ्याला ज्योत पेटते. ओय, ओय! म्हणत तो हात झटकतो. 
किंवा...
एक भलामोठा पियानो जिन्यावरून वर चढवायची कामगिरी या जोडगोळीवर आली आहे. भलतंच अवघड प्रकरण! कानाची पाळी खाजवणारा लॉरेल आणि स्वत:च्याच गाढवपणामुळं चिडचीड करणारा हार्डी...त्या पियानोची हमाली पोटात दुखायला लावणारी होते...

Well, here’s another nice mess you’ve gotten me into! संतापलेल्या जाड्या ऊर्फ ऑलिव्हर हार्डीच्या मुखातून हे वाक्‍य आलं की थिएटर दणाणून जातं. इथून पुढं धम्माल बघायला मिळणार हे पब्लिकला अचूक कळतं. या परवलीच्या वाक्‍याचं आणि लॉरेल-हार्डी चित्रपटांचं अतूट नातं आहे. ब्रिटिश राजकारणात तर हा कित्येक दशकं नियमित वापरला जाणारा मुहावरा झाला होता. आपल्या टूथब्रशी मिशा जमतील तितक्‍या फुलारून हार्डीनं हे वाक्‍य लॉरेलला ऐकवलं की बस्स. बन गई बात.

तसे तर अनेक संवाद या जोडगोळीनं इंग्लिश भाषेला वाक्‍प्रचारांसारखे बहाल केले आहेत. त्याचं मराठीकरण करणं केवळ अशक्‍य आहे. उदाहरणार्थ :
You can lead a horse to water but a pencil must be led.
I was dreaming I was awake but I woke up and found meself asleep.
A lot of weather we’ve been having lately.
उत्तरादाखल स्वत:च्याच कानाची पाळी किंवा केस ओढण्याची लॉरेलची बावळट लकब असो किंवा बाई बघितली की डोक्‍यावरची गोल हॅट किंचित वर करून बघणारा हार्डी असो. त्यांच्या आचरट मूर्खपणामुळं खुदकन हसू फुटतं. विसंगतांची ही संगत विलक्षण लोभस आहे. 
* * *
आर्थर स्टॅनली जेफरसन या आंतर्बाह्य ब्रिटिश सद्‌गृहस्थाला नॉर्वेल ऊर्फ ऑलिव्हर हार्डी भेटला नसता तर चित्र काहीच्या काहीच बदललेलं दिसलं असतं. लॅंकेशरच्या सद्भिरुचीनं भारलेल्या नाट्यवर्तुळात स्टॅनचा जीव हमखास रमला असता. त्याचे वडील रंगकर्मी होतेच. बिशप ऑकलंड गावातल्या एका नाट्यगृहाचे ते व्यवस्थापक होते. आई मार्गरेट मेटकाफ हीसुद्धा स्थानिक कलावंतवर्तुळात अभिनेत्री म्हणून माहितीची होती. थोडक्‍यात ग्रीसपेंटच्या वासातच स्टॅनचं बालपण गेलं. घरात नाटक मुरलेलं होतं. स्टॅन बुद्धीनं चांगला होता. शाळेतलं शिक्षण त्याचं आज्जी-आजोबांकडे राहूनच झालं. पुढं तो आई-वडिलांबरोबर ग्लासगोत आला. 

म्युझिक हॉल नावाचा प्रकार तेव्हा प्रचलित होता. म्युझिक हॉल म्हणजे आत्ता आपण ज्याला ‘व्हरायटी एंटरटेन्मेंट’ किंवा ‘रंगारंग’ कार्यक्रम म्हणतो तसं. नृत्य, नाटुकलं, किस्सेबाजी, गाणी-बजावणी, वाद्यवृंद (कंगव्यानं गाणी वाजवणं किंवा शिट्टीवर ऑपेरागीतं आळवणं समाविष्ट!) असल्या कडबोळ्यांचा हा ‘गजरा’ तेव्हा लोकप्रिय होता. पहिल्या महायुद्धानंतर म्युझिक हॉल मागं पडलं. त्याची जागा ‘व्हरायटी’नं घेतली. डॅन लेनो हा म्युझिक हॉल कलावंत म्हणून नावाजलेला होता. त्याच्या पथकात स्टॅन जाऊ लागला. सन १९१० मध्ये फ्रेड कार्नोच्या म्युझिक हॉल पथकात त्यानं जागा मिळवली, तेव्हा तो जेमतेम पौगंडावस्थेत आला होता. कलाकारी दाखवायला त्यानं सुरवात केलेली होती. फ्रेड कार्नोचं पथक दौऱ्यावर जात असे. गावोगाव तमाशे करत हिंडणं हे तिथंही होतंच. कार्नोच्या पथकात एक कलाकार असा होता की त्याच्याभोवती सारं पथक फिरायचं. अवलिया कलाकार होता तो. त्याचं नाव होतं चार्ल्स चॅप्लिन!

चॅप्लिनचं बदकासारखं चालणं, अजागळ ध्यान, स्लॅपस्टिक कॉमेडीच्या हमखास हशे फोडणाऱ्या जागा हे सारं कार्नोच्या पथकात जमून आलं. खुद्द कार्नो स्लॅपस्टिक विनोदाचा सम्राट होता. चार्लीचा बदली म्हणून स्टॅनची योजना कार्नोनं केली होती. काही कारणानं एखादा खेळ चार्लीला जमणार नसेल, तेव्हा स्टॅन जेफरसनचं ध्यान उभं राहत असे. त्याला ‘अंडरस्टडी’ म्हणायचं. 

कार्नोच्या पथकानं ऐन पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचा दौरा केला. सैन्यात भरती होण्याचा अर्जही तेव्हा स्टॅन जेफरसननं केला होता; पण त्याला बोलावणं आलं नाही. त्याच्या अर्जात ‘राष्ट्रीयत्व : अज्ञात आणि वैगुण्य : बहिरेपण’ असं नमूद केलेलं होतं.

अमेरिकेत त्याला एक नवोदित अभिनेता भेटला. मित्रच झाला तसा. त्याचं नाव ऑलिव्हर हार्डी. त्याच्यासोबत स्टॅननं ‘द लकी डॉग’ नावाचा एक विनोदी लघुपट केला; पण ते तेवढंच. अमेरिकेत त्याला मे डालबर्ग भेटली. मे डालबर्ग ही ऑस्ट्रेलियन होती. चांगली नर्तकी आणि अभिनेत्रीही. ‘तुझं जेफरसन हे नाव अगदी अनलकी आहे...स्टॅन लॉरेल म्हण स्वत:ला’’ असं तिनं सांगितलं. प्रेमात पडलेल्या स्टॅननं पडत्या फळाची आज्ञा स्वीकारली. तिथून पुढे तो स्टॅन लॉरेल झाला.

स्टॅन लॉरेलला त्यानंतर बरेच मूकपट मिळाले. हातात थोडासा पैका खेळू लागला. मे डालबर्गनं जणू त्याच्या आयुष्याचा ताबा घेतला होता; पण ते प्रकरण चार-पाच वर्षंच टिकलं. सन १९२४-२५ मध्ये हाल रोश स्टुडिओसाठी स्टॅन लघुपटदिग्दर्शनही करू लागला. स्क्रिप्ट लिहू लागला. तिथं त्याला ऑलिव्हर हार्डी पुन्हा भेटला. एक-दोन लघुपटांत या दोघांची केमिस्ट्री पब्लिकला आवडतीये, हे स्टुडिओचा आणखी एक दिग्दर्शक लिओ मॅक्‌केरी याच्या लक्षात आलं. 

लॉरेल अँड हार्डी चित्रपटांचा इथून जो सिलसिला सुरू झाला तो थेट १९५१ मध्ये संपला.
* * *
नॉर्वेलचा जन्म हार्लेमचा. अमेरिकेतलं जॉर्जिया. त्याच्या घरात मात्र नाटक, गाणी-बजावणी औषधालासुद्धा नव्हती. नॉर्वेलचे वडील ऑलिव्हर लष्करात होते. घरची कापसाची थोडीफार शेती होती. युद्धबिद्ध संपल्यावर ऑलिव्हर कापसाच्या हिशेबांच्या वह्यांशी झट्या घेत असत. नॉर्वेलची आई मात्र स्कॉटिश वंशाची होती. हार्लेममध्ये तिचं वारसाहक्‍कानं मिळालेलं घर होतं. तिथंच  नॉर्वेलचा जन्म झाला. 

नॉर्वेल जन्माला आला, त्यानंतर वर्षभरातच ऑलिव्हर हार्डी यांचं निधन झालं. पाच मुलांना घेऊन नॉर्वेलची आई कशी जगली असेल ते तिचं तिलाच माहीत. नॉर्वेलला शाळेत, शिक्षणात रसच नव्हता. तो शाळेतून पळून यायचा. त्याला गाणं, अभिनय यांची गोडी असल्याचं बघून त्याच्या हताश आईनं त्याला शेवटी अटलांटामधल्या एका जर्मन शिक्षकाची शिकवणी लावली. पडत-धडपडत गाणं-अभिनय शिकू पाहणाऱ्या नॉर्वेलला १९१० मध्ये अचानक सूर गवसला. अटलांटाच्या अल्काझार थिएटर ग्रुपमध्ये आठवड्याला साडेतीन डॉलर्स इतक्‍या मानधनावर तो गायला जायचा. इथंच त्यानं आपलं नाव बदलून ‘ऑलिव्हर एन. हार्डी’ असं सुटसुटीत केलं. 

इंग्लंडमध्ये म्युझिक हॉलची चलती होती, तेव्हा अमेरिकेत ‘कॅबरे’ आणि ‘वॉडेविल’ हे प्रकार प्रचलित होते. साधारण प्रकार ‘रंगारंग’ कार्यक्रमांचाच. ‘कॅबरे’ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हेलनटाइप नाच येतो; पण पूर्वीच्या काळी कॅबरे म्हणजे नाच, गाणी, बजावणी, चुटकुले अशी भेळ असायची. फरक इतकाच की कॅबरे बव्हंशी पब, रेस्तरां, नाइटक्‍लब अशा ठिकाणी मद्याचे घुटके घेत बघायची पद्धत होती. हेलनछापाची नृत्यं अर्थात त्या ठिकाणी अल्पावधीतच आलीच. वॉडेविल हा फ्रेंच प्रकार ‘म्युझिक हॉल’ किंवा ‘व्हरायटी’सारखाच असायचा. अशा ठिकाणी ऑलिव्हर हार्डी आपली रोजीरोटी कमावत होता.

त्याच सुमाराला आलेल्या मूक चलच्चित्रांनी ऑलिव्हर खुळावला. त्यानं तातडीनं फ्लोरिडातलं जॅक्‍सनव्हिल गाठून इथं काही करता येतं का ते पाहिलं. जमलं की! लुबिन स्टुडिओसोबत त्यानं ‘आऊटविटिंग डॅडी’ नावाचं एक चलच्चित्र बनवलं. तो सुमार १९१४ चा. तिथला एक इटालियन केशकर्तन कारागीर त्याला लाडानं बेब अशी हाक मारायचा. तेच लोकप्रिय झालं - बेब हार्डी! सहा फूट एक इंच उंचीचा तीनशे पौंडी बेब!

छोट्या-मोठ्या फिल्म्स बनवत पुढल्या काही काळातच तो लॉस एंजलिसला आला. तिथं ‘द लकी डॉग’ हा चित्रपट बनवताना त्याला एक ब्रिटिश कलाकार भेटला. त्याचं नाव स्टॅन लॉरेल असं होतं. स्टॅनपेक्षा बेब हार्डी दोनेक वर्षांनी लहानच होता. दोघांची जोडी जमली. जमली ती जमलीच.
* * *
‘बॅटल ऑफ द सेंच्युरी’, ‘शुड मॅरिड मेन गो होम?’,‘टू टार्स’, ‘अनअकस्टम्ड्‌ ॲज वी आर’, ‘ब्रॅट्‌स’ असे भारी भारी धम्माल सिनेमे यायला लागले. लॉरेल अँड हार्डी ही अगदी लव्हेबल जोडी होऊन बसली. पैकी ‘ब्रॅट्‌स’मध्ये तर या जोडगोळीनं अफाट प्रकार केला होता. दोघा बापांची दोन आत्रंगी पोरं असा मामला. त्यात त्या लहान पोरांच्या भूमिकाही या जोडीनंच केल्या. त्यासाठी चित्रकरणाच्या वेळी मोठ्या आकाराचं फर्निचर वापरण्यात आलं. ‘ब्रॅट्‌स’नं धमाल उडवली. सन १९३५ मधल्या त्यांच्या ‘द म्युझिक बॉक्‍स’ला चक्‍क ऑस्कर मिळालं. 

स्टॅन लॉरेल आणि बेब हार्डी ही नावं आता घराघरात पोचली होती. सन १९३९ मध्ये हार्डीनं आपलं पहिलं लग्न मोडलं आणि व्हर्जिनिया ल्युसिल जोन्स हिच्याशी तो विवाहबद्ध झाला. 

त्या काळातले त्यांचे कितीतरी चित्रपट नष्ट झाले आहेत. काही अजूनही जतन केलेले आहेत. कालांतरानं त्यांनी स्टेज शो करायला सुरवात केली. तेही गाजू लागले. सन १९४७ च्या सुमारास त्या दोघांनी संयुक्‍त संस्थानांची एक मोहीम काढली. ही मोहीम हा त्यांच्या कारकीर्दीतला एक लखलखता अध्याय आहे. जेमतेम दीड महिन्याची मोहीम; पण चाहत्यांच्या गर्दीनं त्यांना अक्षरश: गुदमरवून टाकलं. सन १९५१ मध्ये या दोघांनी ‘अटोल के’ नावाचा एक चित्रपट एकत्र केला. तो विशेष गाजला नाही. त्यानंतर त्यांनी रुपेरी पडद्याच्या कारकीर्दीला पूर्णविरामच दिला. 

याच मोहिमेवर आधारित चित्रपट आता येऊ घातलाय, त्याचं नाव - स्टॅन अँड ऑली.
* * *
ता. ७ ऑगस्ट १९५७ रोजी ऑली हार्डी निवर्तले. पक्षाघात, हृदयविकारानं ते काही वर्षं आजारीच होते. ते गेले तेव्हा स्टॅन लॉरेल त्यांच्या घरी इंग्लंडात होते. आपल्या सवंगड्याला निरोप द्यायला नाही जाऊ शकले ते. म्हणाले ः ‘‘बेब समजून घेईल मला...’’

ऑली गेल्यानंतर स्टॅन लॉरेलनं आपलीही कारकीर्द सपशेल थांबवली. एकाही स्टेज शो, लघुपटात काम केलं नाही. आल्या-गेल्याला भेटायचे. गप्पा मारायचे. बस्टर कीटन, डिक व्हॅन डाइकसारखे सितारे त्यांना भेटायला यायचे. घराशेजारी त्यांच्या वृद्ध मित्रांचा एक कंपू होता. त्यांच्यासोबत सकाळच्या फेरीला जायचे. कुणीही फोन करायचं की बसले हे महाशय गप्पा मारत. ‘‘परवा एक राँग नंबर आला होता...तासभर बोललो!’’ असं ते उभा चेहरा करून सांगायचे. त्यांच्या चाहत्यांनी ‘सन्स ऑफ द डेझर्ट’ (हा एक लॉरेल-हार्डी चित्रपटच होता...) नावाचा एक ‘लॉरेल-हार्डी फॅन क्‍लब’ स्थापला. त्याचं घोषवाक्‍य स्टॅन लॉरेल यांनी बसल्याजागी लिहून दिलं होतं : ‘‘टू माइंड्‌स, विदाऊट अ सिंगल थॉट!’’ हाच फॅन क्‍लब हल्ली त्यांची जन्मदिन-स्मरणदिन वगैरे साजरी करतो.

ऑली काय, स्टॅन काय...यांनी शेकड्यानं चित्रपट केले. अफाट लोकप्रियता कमावली; पण ते पैसा मात्र राखून ठेवू शकले नाहीत. ऑलीला तर शेवटच्या आजारात वैद्यकीय खर्चासाठी राहतं घर विकावं लागलं. स्टॅनची अवस्थाही फार चांगली नव्हती. त्यांच्या उरल्यासुरल्या चित्रपटांचे हक्‍क काही सुहृदांनी भांडूनतंडून त्यांच्या नावे करून दिले म्हणून थोडीफार रक्‍कम त्यांच्या हाताशी राहिली. एरवी त्यांचीही अवस्था बिकटच होती. 

आयुष्याच्या संध्याकाळी ते त्यांच्या घरी बसून फक्‍त संहिता लिहीत बसत. ती संहिताही लॉरेल अँड हार्डीची असे. ‘आता ऑली नाही तर दोघांचं स्क्रिप्ट लिहून काय करणार,’ असं विचारलं तर हरवलेल्या डोळ्यांनी ते म्हणायचे ः ‘‘दुसरं काही सुचतच नाही मला काही...काय करू’’?

सन १९६५ च्या फेब्रुवारी महिन्यात स्टॅन लॉरेल वयाच्या ७४ व्या वर्षी गेले. डिक व्हॅन डाइकनं त्याच्या मृत्युलेखात म्हटलं होतं ः ‘‘ ‘स्टॅन म्हणायचे की उभ्या चेहऱ्याचा माणूस माझ्या अंत्ययात्रेत दिसला तर मी त्याच्याशी मुळीच बोलणार नाही!’ आपण शक्‍यतो हसरा चेहरा ठेवू या...ते बोलतील!’’
जगण्याच्या धामधुमीत प्रत्येकाला आपला एक सेफ कोपरा शोधून ठेवावा लागतो. कधीकधी सगळ्याचाच वीट येतो. नको त्या गोष्टींनी जीव उबगून जातो. विनाकारण डोकं फिरतं. तोंड कडू पडतं. मन दु:खानं असं काही काळवंडून जातं की कितीही घासलं तरी ती काजळी जाता जात नाही.

आम्लपित्ताचे कढ घशात घेऊन दिवस काढणं आणखीच जड जातं. अशा वेळी तो कोपरा कामाला येतो. तिथं जाऊन बसावं. गप्प. पाय मुडपून. गुडघ्याला मिठी घालून हनुवटी ठेवून सुरक्षित बसावं. आपला मूड खुलवणाऱ्या काही ठेवणीतल्या गोष्टी मनातल्या एका कप्प्यात ठेवलेल्याच असतात. त्या हळूच्‌कन बाहेर काढाव्यात. एकेक न्याहाळून ठेवून द्याव्यात पुन्हा जागच्या जागी. या उद्योगात ती काळीकुट्ट काजळी धुतली जाते आणि मन लख्ख होतं. चकचकीत मनानं पुन्हा जगण्याला भिडावं.

...जाड्या आणि रड्या ही दुक्‍कल अशीच मनाच्या कुशीतली एक नायाब चीज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com