वारसाजतनाचा अनोखा आविष्कार (राम पराडकर)

वारसाजतनाचं उत्तम उदाहरण असलेलं ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथलं ‘पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन’.
वारसाजतनाचं उत्तम उदाहरण असलेलं ऑस्ट्रेलियातल्या सिडनी इथलं ‘पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन’.

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं एक अनोखं गार्डन आहे. वारसाजतनाचं उत्तम उदाहरण म्हणून त्याच्याकडं पाहिलं जातं. त्याचं नाव पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन. जुन्या-नव्याचा सुयोग्य मेळ घालत तयार करण्यात आलेल्या या गार्डनसाठी वास्तुरचनाकारानं आपलं सगळं कौशल्य पणाला लावलेलं पाहताना जाणवतं. एक समृद्ध अनुभव देणाऱ्या या गार्डनविषयी...

काही काळापूर्वी मी ऑस्ट्रेलियाला जाऊन आलो. एके दिवशी सिडनीच्या पॅडिंग्टन या गजबजलेल्या उपनगरात माझी मुलगी प्राजक्ता साने मला घेऊन गेली. ऑक्‍सफर्ड स्ट्रीट हा तिथला हमरस्ता. दुतर्फा चकचकीत, पॉश दुकानं आणि माणसांची भरपूर वर्दळ असलेला हा भाग. जवळच गाडी लावून आम्ही तिथं पोचलो. निमित्त होतं पॅडिंग्टन रिझर्व्हायर गार्डन बघणं! हे गार्डन म्हणजे जुना वारसा जपण्याचं अप्रतिम उदाहरण. 

हे गार्डन जमिनीखाली (संकन गार्डन) आहे; त्यामुळं इथं पार्क असावं हे जवळ जाईपर्यंत लक्षातही येत नाही. आजूबाजूला बरीच मोकळी जागा आहे. तिथं पोचल्या पोचल्या मी वरच्या पातळीवरून खाली डोकावलो आणि पाहता क्षणीच सुखद धक्का बसला, एखादी नवलाईची गोष्ट प्रथमच बघताना जसा धक्का बसतो तसा. पडक्‍या वास्तुसमूहाच्या पार्श्‍वभूमीवर एक आधुनिक गार्डन मला दिसलं. याचं वैशिष्ट्य असं, की दोन्ही (गार्डन आणि वास्तुसमूह) एकमेकांना पूरक होते. जुनाट वास्तुपरिसरामुळं गार्डनला उठाव मिळत होता, तर सुंदर, हिरव्यागार गार्डनमुळं त्या पडक्‍या वास्तूला एक वेगळीच शोभा आली होती. खालच्या हिरवळीच्या पट्ट्यावर दोन-चार लहान मुलं खेळत होती. त्यांचे लाल-पिवळे कपडे हिरवळीवर विशेष उठून दिसत होते. पलीकडं त्यांच्या आया गप्पा मारत बसल्या होत्या. आणखीही काही माणसं वावरत होती. मला ते दृश्‍य खूप भावलं. हृद्य वाटलं!

जुन्या टाकीचा इतिहास 
नंतर प्राजक्तानं थोडी माहिती सांगायला सुरवात केली. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी इथं पाण्याची मोठी टाकी होती. जमिनीखाली. साधारण तीस-बत्तीस वर्षं ती कार्यरत होती. पुढं या भागाचा पाणीपुरवठा दुसरीकडून व्हायला लागला. त्यामुळं ही टाकी काही काळ दुर्लक्षित अवस्थेत होती. नंतर बराच काळ तिचा वापर ‘पार्किंगसाठी गराज’ म्हणू केला जाऊ लागला. नंतर स्लॅबचा काही भाग पडला. मग तिथं काही वर्षं पेट्रोल पंप सुरू होता. जिथं पेट्रोल भरलं जायचं तिथं आजही एक छोटासा, कमी उंचीचा क्राँक्रिटचा चौथरा दिसतो.

पेट्रोल पंपाची खूण म्हणून तो तसाच ठेवण्यात आलेला आहे. प्राजक्तानं मला तो दाखवला. हा ऑक्‍सफर्ड रस्त्याजवळच्या फूटपाथलगत आहे. त्याच्याच बरोबर मागं रेलिंग लेव्हलला लांबलचक पाट्या दिसतात. त्यांत या रिर्झव्हॉयरचा संपूर्ण इतिहास छायाचित्रांसह ग्रथित करून ठेवलेला आहे.

मला सिडनीकरांचं खूप कौतुक वाटलं. सिडनीत कुठंही जा, तिथं तुम्हाला त्या जागेचा इत्थंभूत इतिहास पाहायला मिळतो. या इतिहासाच्या पाट्यासुद्धा अतिशय आकर्षक आणि देखण्या आहेत.

तिथून आम्ही पुढं गेलो. प्राजक्ता म्हणाली - ‘‘आपण हे वरचं गार्डन आधी पाहून घेऊ या.’’ जुन्या मूळच्या टाकीची जी स्लॅब शाबूत राहिली आहे, तिच्यावरच हे वरचं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे. पाच-सहा पायऱ्या चढून आम्ही वरच्या पार्कमध्ये पोचलो. तिथल्या बहुतांश भागावर लॉन आहे. अगदी हिरवीगार! एवढा मोठा सलग हिरवळीचा पट्टा पाहून मनही हिरवंगार होऊन जातं. मागच्या बाजूला आधुनिक रो हाउसिंगची इमारत आहे. त्यांच्या बाल्कन्या गार्डनच्या दिशेनं तोंड करून आहेत. बाल्कनीमध्येही एक माणूस आधुनिक खुर्चीत वाचत बसलेला दिसला. या वास्तूत राहणारी मंडळी खरोखर भाग्यवान म्हटली पाहिजेत. कारण, त्यांना या गार्डनचा देखावा सतत दिसत राहतो. इथंही एक काँक्रिटचा कट्टा बसण्यासाठी आहे. त्यावर आरामात पाय पसरून एक माणूस आपल्याच तंद्रीत पुस्तक वाचत बसला होता. शिवाय, मोक्‍याच्या जागी दोन-चार आरामखुर्च्या मांडून ठेवलेल्या होत्या. दोन-तीन खालच्या गार्डनकडं तोंड करून ठेवलेल्या, तर दोन-तीन ऑक्‍सफर्ड स्ट्रीटच्या फूटपाथकडं तोंड करून. बसण्यासाठी या जागा किती सुंदर आहेत! पण त्यासाठी भरपूर निवांत वेळ पाहिजे. सिडनीकरांकडं तो फारसा नसावा. एकुणात शुकशुकाट पाहून तसंच वाटत होतं. कदाचित शनिवारी-रविवारी इथं थोडीफार गर्दी होत असेल. आम्ही आडवारी गेलो होतो.

जुन्या-नव्याचा संगम 
इथं अत्याधुनिक आणि वेधक असा एक पूल आहे. तो वरच्या पातळीवर असल्यानं पहिल्यांदा तोच दिसतो. खरं तर नजरेत भरतो. वरच्या गार्डनवर आल्यावर तर पहिलं लक्ष त्यानंच वेधलं. हा संपूर्ण पूल स्टीलचा आहे आणि त्यावर स्टीलचंच अनोखं ग्रिल आहे. त्याला छिद्रं छिद्रं आहेत. त्यांतून प्रकाशाचे कवडसे पडत असतात आणि सतत बदलत असतात. या ग्रिलची जी महिरप (कॅनॉपी) आहे, तीही ‘जॅक आर्च’ पद्धतीची आहे. मूळच्या जुन्या टाकीची स्लॅब ही जुन्या ‘जॅक आर्च’ पद्धतीचीच असल्यानं वास्तुकारानं हीही तशीच केली. त्यावरून चालताना मजा येत होती. खाली मूळच्या टाकीचे जतन केलेले जुनाट अवशेष दिसत होते आणि त्याभोवतालचं आधुनिक गार्डनही दिसत होतं. असा हा जुन्या-नव्याचा मनोज्ञ संगम होता. तो कुठंही खटकत नव्हता. सुरवातीला म्हटलं तसं, नवीन गोष्टींनी जुन्या गोष्टींना उजाळा मिळत होता, तर जुन्यामुळं नवीन गोष्टींना उठाव मिळत होता.

आम्ही पुलावरून थेट पलीकडं पोचलो आणि तिथल्या जिन्यानं खाली आलो. खाली आल्यावर चौकासारखा ‘फील’ आला, पूर्वीच्या घरांना मध्यभागी मोठे चौक असायचे तसा. या चौकाच्या मध्यभागी एक भिंत आहे. अगदी जुनाट आणि कमानी-कमानी असलेली, थोडीशी पडकी वाटणारी; पण ती त्यांनी तशीच जतन केलेली आहे. या भिंतीनं याचे दोन भाग झाले आहेत. पहिल्या भागात मध्यभागी हिरवळ आहे. डाव्या बाजूला वर स्लॅब असलेला व्हरांडा आहे. खाली त्यामुळं सावली आहे. तिथं एक म्हातारं जोडपं बसलेलं होतं. बाजूला रिकाम्या खुर्च्याही होत्या. मधल्या हिरवळीत तरुण महिला आपल्या लहानग्यांना खेळवत होत्या. मुलं जेमतेम तीन-चार वर्षांचीच असतील; पण त्यांच्या बाललीलांमुळं तो आसमंत जिवंत झाला होता. तिथल्या शांत आणि निवांत वातावरणात चैतन्य भरल्यासारखं वाटत होतं. त्यामुळं ते पाहताना खूप मजा येत होती. भिंतीच्या पलीकडच्या भागात एक छोटासा उथळ तलाव होता. पूर्वीच्या काळी इथं पाण्याची टाकी होती. बहुधा तिची आठवण जतन करण्यासाठी या तलावाची योजना केलेली असावी. त्याच्या मध्यभागी स्टीलचे चार खांब होते. त्यांना काँक्रिटचा ‘बेस’ही होता; किंबहुना तिथल्या सर्वच कॉलमना तो तसा होता. कमानीकमानींची भिंत आणि हे कॉलम यांनी एक छोटीशी स्लॅब तोललेली होती. ती स्लॅबही अर्थात ‘जॅक आर्च’ वीटकामाचीच होती आणि वरच्या बाजूला तीवर भरगच्च झुडपं लावलेली दिसत होती. त्यातली काही वरून खाली येत लोंबत होती. तलावाच्या अवतीभवतीसुद्धा भरपूर झाडं-झुडपं लावलेली होती. वरच्या पातळीच्या फूटपाथवरून पाहताना भरगच्च झुडपांची स्लॅब एखाद्या अधांतरी तरंगत्या बेटासारखी दिसत होती. या मधल्या चौकाच्या कडेकडेनं चारी बाजूंना काँक्रिटच्या पांढऱ्याशुभ्र फळ्यांनी एक डेक केलेलं होतं. थोडसं फूटपाथसारखं ६’’ उंच. काही ठिकाणी बदल म्हणून असेल; लाकडी डेकही होते.

वरच्या पातळीवर जिथं लॉन लावलेली होती, तिथं खाली मूळचाच मोठा हॉल होता. ‘जॅक आर्च’च्या अरुंद ‘स्पॅन’मुळं बरेच कॉलम जवळ जवळ होते. त्यांची पातळीदेखील बाहेरच्या चौक गार्डनपेक्षा खाली होती. निरनिराळ्या प्रदर्शनासाठी या हॉलचा वापर होतो. विशेषतः चित्रांच्या आणि फोटोग्राफीच्या प्रदर्शनांसाठी. आम्ही होतो तेव्हा एका तरुणीची मॉडेल फोटोग्राफी तिथं सुरू होती. खरंच, मॉडेल फोटोग्राफीसाठी इतकी सुंदर आणि योग्य जागा क्वचितच कुठं आढळेल. समोरच्या मॉडेल फोटोग्राफीपासून प्रेरणा घेऊन प्राजक्‍तानंही निरनिराळ्या पोझेस देऊन फोटो काढून घेतले. दोघांनाही मजा आली. मला फोटो काढण्यात आणि तिला पोझेस देण्यात. आमचे दीड-दोन तास अगदी मजेत आणि आनंदात गेले.लक्षात राहील असा आनंदाचा ठेवा घेऊन आम्ही समाधानानं परत फिरलो. 

अशी वारसाजतनाची कामं वास्तुकाराच्या दृष्टीनं अतिशय आव्हानात्मक असतात. त्यातून काही नवीन गोष्टींची योजना करायची वेळ आली की वास्तुकार द्विधा मनःस्थितीत सापडू शकतो. इथं जिना आणि लहान मुलांची बाबागाडी नेण्यासाठी उतरत्या ‘रॅम्प’ची आवश्‍यकता होती. या प्राथमिक गरजा होत्या. आता असा जिना जुन्या ‘सेटिंग’ला साजेसा म्हणून जुन्याच पद्धतीनं करायचा की जुन्या ‘सेटिंग’ला कुठंही खटकणार नाही असा नवीन पद्धतीनं करायचा? इथं वास्तुकारानं आधुनिक, आजच्या काळाला सुसंगत अशा जिन्याची आणि ‘रॅम्प’ची योजना केलेली आहे. कुठंही खटकणार नाही अशा पद्धतीनं ती केलेली आहे आणि म्हणून ती कल्पनातीत यशस्वी झाली आहे. लोकांना हे गार्डन अतिशय आवडलं आणि वास्तुकारांनादेखील! त्यामुळं या गार्डनला स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरचे अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले असल्याचं कळलं. हे यश अर्थातच वास्तुकाराचं होतं.
अशी अप्रतिम रचना करणाऱ्या वास्तुकाराचं नाव आहे टॉम्किन झुलाइका!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com