गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले..!

शेखर नानजकर
बुधवार, 17 मे 2017

काळ्याकुट्ट आभाळातून माळावर धार लागल्यागत पाऊस कोसळत राहिला. सुरुवातीला माळावरच्या मातीनं अधाशासारखं पाणी पिऊन घेतलं. मग हळूहळू माळावर पाणी साचू लागलं. त्यात जंगलातून येणारे ओहोळ भर घालू लागले. अंधारलेलं जंगल अधाशासारखं पाणी अंगावर घेत राहिलं...

प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक शेखर नानजकर यांनी "वळीव' या विषयावर लिहिलेल्या प्रदीर्घ लेखाचा हा तिसरा व अंतिम भाग - 

संध्याकाळ.....

वळीव कोसळू लागला होता. पाऊस सुरू होण्याच्या आधी काळेकुट्ट ढग खूपच ताकदवान वाटत होते. प्रत्येक ढगाचं वेगळं अस्तित्व जाणवत होतं. पण पाऊस सुरू झाला तसं त्यांचं वेगळं अस्तित्व संपलं. एक काळा पडदा पांघरला आहे असं वाटू लागलं. पावसाचा पहिला जोर जबरदस्त होता. धारा ओताव्यात तसं आभाळातून पाणी कोसळत होतं. एक एक थेंब करवंदा एवढा होता. त्या मारानं झाडं पार वाकली. फांद्यांवर बसलेल्या वानरांची आणि शेकरांची तारांबळ उडाली. ज्यानं त्यानं फांदी घट्ट पकडून ठेवली होती. लेकुरवाळ्या वानरींची त्रेधा उडाली. पोटाशी गच्च धरून बसलेलं लेकरू सांभाळत त्या स्वतःलाही सांभाळू लागल्या. लेकरांचा पहिलाच पाऊस! आईच्या कडेवर बसून ती पाऊस पाहू लागली. आधीच उत्सुकतेनं जगाकडं पाहणारे त्यांचे डोळे अजूनच लुकलुकत राहिले. मधूनच जोराचा वारा जंगलात घुसत होता. झाडं वाऱ्यानं घुसळली जात होती. पावसाच्या माऱ्यानं लवत होती. वानरं झाडांना घट्ट पकडून जीव मुठीत धरून बसली होती. मधूनच वीज आभाळ फाडत जायची. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजानं जंगलं हादरून जायचं. आई लेकराला अजूनच घट्ट पकडून धरायची....

पाऊस धो धो कोसळत होता. झाडांचा अडथळाच नसल्यासारखा जमिनीवर आपटत होता. पाचोळ्यात त्याचा मोठा आवाज होत होता. ओढ्याशेजारच्या उंबरापाशी सांबराचं एक कुटुंब उभं होतं. पावसानं गच्च भिजलं होतं. खरंतर सांबरं मनातून खूप आनंदली होती. अंगावर कोसळणारा पाऊस खाली मान घालून झेलत होती. मधे मधे एक एक जण आपलं अंग फडफडावीत होता. त्याचे पांढरे तुषार उधळत होते. नर मधे मधे शिंगं हलवत होता. त्याची शिंगं कडक वाळली असली, तरी अजून गळून पडायची होती. एक पिल्लू पण होतं. महिनाभराचं असेल. त्यानंही पहिलाच पाऊस पहिला होता. थोडसं घाबरून ते आईच्या पोटाखाली शिरण्याचा प्रयत्न करत होतं. मधे मधे विजा कडाडत होत्या. पावसाच्या आणि त्यांच्या आवाजात काहीच ऐकू येत नव्हतं. नराला तीच काळजी होती. बिबट्या कुठूनसा आला तर समजणार नव्हतं! भेकरालाही तीच काळजी होती. पण आवाजाचा वेध घेत, भिजत भिजत ते जमेल तसं चरत होतं. अस्वलाला ती काळजी नव्हती. उन्हाच्या दिवसात, आधीच काळं असलेले दाट आणि लांब केस वागवत त्यानं उन्हाचे दिवस ढकलले होते. त्याला खूप गरम झालं होतं. आता अंगावर कोसळणाऱ्या धारा त्याला सुखावत होत्या. पावसानं तोही चिंब भिजला होता. मधे मधे अंग फडफडवत होता. एवढा पाऊस पडत होता तरी त्याचं फिरणं थांबलं नव्हतं. हे फळांचे दिवस होते. वाऱ्यापावसानं झाडबुडाला फळांचे सडे पडले होते. उंबर, लिंबोण्या, जांभळं, आंबे, काहीही चाललं असतं. खरंतर मधमाश्‍यांची पोळी मधानं भरली होती. तसं ते झाडावर उंचपर्यंत चढून पोळी पळवण्यात तरबेज होतं. पण आत्ता झाडावर चढणं धोकादायक होतं. झाडं निसरडी झाली असतील. पाऊस अंगावर घेत अस्वल नुसतंच भटकत राहिलं.

गव्यांना आनंद झाला होता. थंडीत त्यांनी डोंगर उतरायला सुरुवात केली होती. पाणी कमी झालं तसं ते खाली खाली सरकत आले होते. आता सपाटीवर उतरले होते. जवळपास एकच पाणवठा शिल्लक होता. डोंगराच्या माथ्यावरची टोपली कारवी कधीच वाळून गेलेली होती. डोंगरउतारावरच्या जंगलातली कारवी सुद्धा वाळून काटक्‍या झाली होती. सपाटीवरच्या जंगलात थोडी हिरवाई शिल्लक होती. गवे तिथेच दिवस घालवत होते. पाऊस अंगावर घेत, पाऊस पडतच नसल्यागत गवे चरत होते. पाण्याच्या थेंबांनी त्यांची काळी कातडी थरथरत होती. बिबट्याला तसंही पाणी अंगावर घ्यायला फारसं आवडत नाही. पाऊस सुरु झाला तसा तो कपारीत शिरून बसला होता. त्याला पाणी लागत नव्हतं. पुढच्या पंज्यांवर हनुवटी टेकवून बसला होता. आपल्या कावेबाज डोळ्यांनी मधे मधे पावसाचा अंदाज घेत होता.

बिळातले प्राणी बाहेर पडलेच नाहीत. ऊदमांजरं बिळातल्या बिळातच घुटमळत राहिली. साळिंदरं बिळाच्या तोंडाशी येऊन अंदाज घेत राहिली. सापाचं मात्र अवघड झालं. ते दुपारचे गारव्याला बसले होते, त्या बिळात, सापट्यात पाणी शिरलं. त्यांना बाहेर पडावंच लागलं. इतक्‍या पावसात पक्ष्यांना उडणं अवघड जाणार होतं. सगळे पक्षी फांद्यांवर बसून राहिले. धुवाधार पावसात भिजत राहिले. मधे मधे पंख फडफडवत, चोचांनी पिसं साफ करत राहिले. अंग फुलवून बसून राहिले. त्यांच्या चोचीवरून पाण्याचे थेंब ठिबकत राहिले.

काळ्याकुट्ट आभाळातून माळावर धार लागल्यागत पाऊस कोसळत राहिला. सुरुवातीला माळावरच्या मातीनं अधाशासारखं पाणी पिऊन घेतलं. मग हळूहळू माळावर पाणी साचू लागलं. त्यात जंगलातून येणारे ओहोळ भर घालू लागले. माळ पाण्यानं तुडूंब भरला. ओढ्यालाही हळूहळू पाणी आलं. बराच वेळ पाऊस कोसळत राहिला. अंधारलेलं जंगल अधाशासारखं पाणी अंगावर घेत राहिलं...

मग उगवतीला आभाळ फाटलं. ढग वेगळे वेगळे दिसू लागले. प्रकाश वाढला. पावसाचा जोर कमी होऊ लागला. फाटलेल्या आभाळात ढगांचे रंग सोनेरी होऊ लागले. सगळ्या जंगलावर सोनेरी प्रकाश पसरला. पक्षांनी पंख फडफडवले. सांबरांनी अंग झटकलं. वानरांना असं काहीच करता आलं नाही. ती भिजलेलीच फांद्यांवर बसून राहिली. आणि खडकांच्या फटीतून फवारा उडाल्यासारख्या पंखांच्या मुंग्या हवेत उधळल्या. कोट्यवधीच्या संख्येनं जंगलात पसरल्या, त्यांच्या मागे वेडे राघू पळाले. जमेल तितक्‍या पंखांच्या मुंग्या चोचीनं टिपू लागले. शेंड्यावर बसलेले कोतवाल गिरक्‍या घेत पंखांच्या मुंग्या मटकावू लागले. किडे खाणाऱ्या पक्ष्यांची चंगळ झाली. रानमांजरं, खवलेमांजरंही त्यात सामील झाली. सगळ्यांनाच ऐती मेजवानी झाली. जमिनीतल्या फटीतून पाणी आत शिरलं. खोलवर गेलं. छोट्या छोट्या किड्यांनी, जमिनीत, झाडांच्या सालीत, खडकांच्या बेचक्‍यात, पानांच्या खाली अंडी घातली होती. त्यांना पाणी लागलं. अंड्यात हालचाली होऊ लागल्या. जीव वळवळू लागले. मातीत गवताच्या बिया होत्या. त्या जीव धरू लागल्या. पाऊसकाळ जवळ आल्याची द्वाही जंगलात फिरली. जो तो तयारीला लागला. पाऊस अजून कमी झाला. थेंब थेंब पडत राहिला. सोनेरी प्रकाशानं वातावरण भरून गेलं. ऊदमांजरं, मुंगसं बिळाबाहेर पडली. वानरं रात्रीसाठी झाडं शोधू लागली. बिबट्यानं कपार सोडली. पाणी चुकवत चुकवत तो शिकारीच्या शोधात निघाला. सांबरं, भेकरं, गवे पुन्हा चरू लागले.

हळूहळू ढगांमधला सोनेरी रंग मंदावू लागला. फिक्का दिसू लागला. त्यातली जादू संपू लागली. अंधार पडू लागला. पण आता जंगल आनंदलं होतं. पाणवठे पुन्हा भरले होते. पाऊस येईपर्यंत, अजून पंधरावीस दिवस पाण्याची चिंता नव्हती. आभाळ निवळलं. अंधार पडला. हवेत गारवा पसरला. रात्र पडली. रातकीड्यानीं ताल धरला. रातवे त्यांना साथ देऊ लागले. आपला प्रकाश दाखवत काजवे उडू लागले. एखाद्या झाडावर गोळा होऊ लागले. त्यांच्या माद्यांच्या शेपट्या चमकू लागल्या. त्या पाहून काजवे अजूनच जोरात चमकू लागले. मीलनाची चढाओढ सुरु झाली. आभाळात चांदणंही चमकू लागलं होतं. अजूनही कोपऱ्या कोपऱ्यात ढग होतेच. कुठं कुठं वीजाही चमकत होत्या. अजूनही मधे मधे पानांवरून पाचोळ्यात थेंब पडल्याचा आवाज होत होता. पण खूप दिवसांनी गारवा अनुभवताना जंगल सुखावलं होतं. पुढचे दोन तीन दिवस असाच पाऊस पडत राहीला. दिवसा ऊन पडायचं. जाम उकडायचं. रात्रीचा पाऊस पडायचा. आणि मग एका दिवस पाऊस गायब झाला. पण आता जंगलाला चिंता नव्हती. पाऊस येईपर्यंत पाणी पुरणार होतं.

...जमिनीखालाच्या जळवांना, गोगलगाईंना, पैशांना, गोमांना, अंड्यातल्या जीवांना, बुरश्‍यांना, भूछत्रांना, निरनिराळ्या बियांना संदेश पोहोचला होता. तयारी करा, पाऊसकाळ येतोय....!

(समाप्त)

Web Title: article regarding forest and wildlife