रोजचं जगणं सुकर, सुखकर होण्यासाठी... (आश्विनी देशपांडे)

रोजचं जगणं सुकर, सुखकर होण्यासाठी... (आश्विनी देशपांडे)

सार्वजनिक स्वच्छतागृहापासून ते कामाच्या ठिकाणच्या बसायच्या खुर्चीपर्यंत आणि युनिव्हर्सल चार्जरपासून ते पासवर्ड निर्माण करण्याच्या पद्धतीपर्यंत अनेक बाबतींत डिझाइनच्या संदर्भातून सुयोग्य ते बदल होण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे. या बाबींशिवाय दैनंदिन वापराच्या इतरही अशा कितीतरी बाबी असतात, की ज्यांच्यात रचना-मांडणीच्या दृष्टिकोनातून काही छोटे-मोठे बदल घडवून आणले, तर रोजचं जगणं सुकर आणि सुखकर होऊ शकतं.

अनेक वस्तू, संदेश, संकेतस्थळं आणि अनुभव यांच्यावर डिझाइनची छाप पडून त्यांच्यात सुधारणा होत राहतीलच; पण शेकडो नव्या-जुन्या गोष्टी अशाही आहेत, की ज्यांच्यात सर्वांगीण बदल होण्याची आवश्‍यकता आहे. कधी ‘आता सवयीचं झालं’ म्हणून तर कधी we are like that only असं म्हणून या वस्तू किंवा अनुभव नवा विचार करून डिझाइन करता येण्याची शक्‍यता चर्चेत येतच नाही. वापरणाऱ्या व्यक्तीसाठी सोईस्कर काय ठरेल, असा विचार केला जात नाही. डिझायनर म्हणून मला जर कुणी विचारलं, की ‘दैनंदिन आयुष्यात वारंवार वापरल्या जाणाऱ्या कोणत्या गोष्टी तुम्हाला नव्यानं डिझाइन कराव्याशा वाटतात?’ तर एक मोठीच यादी तयार होईल. ती यादी आज अंशतः इथं मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या वस्तू, योजना किंवा अनुभव सध्या कार्यरत आहेतच, काही प्रमाणात उपयुक्तही आहेत; पण त्यांच्या संपर्कात, त्यांचा वापर करताना थोड्याफार प्रमाणात तडजोड करावी लागते. ती तडजोड डिझाइनच्या साह्यानं दूर करता येईल का, हाच विचार ही यादी तयार करताना केला आहे.

१) सार्वजनिक स्वच्छतागृह : मी दर आठवड्यात एकदा तरी पुणे-मुंबई प्रवास गाडीनं करते. रोज लाखो प्रवासी या महामार्गानं प्रवास करतात. एका अंदाजानुसार रोज दीड कोटी रुपयांचा टोल वसूल केला जातो. मात्र, या सबंध महामार्गावर साफ, कोरडी, दुुर्गंध न येणारी, व्यवस्थित ठेवलेली स्वच्छतागृहं नाहीत. इतक्‍या सुप्रसिद्ध आणि महत्त्वाच्या मार्गावर ही स्थिती, तर इतर जागी काय असेल याची कल्पनाही करू नये. जवळजवळ सगळीच सार्वजनिक स्वच्छतागृहं वाईट स्थितीत का असतात? समस्येचा खोल विचार केला तर यावर तंत्रज्ञान, मानसशास्त्र आणि डिझाइन या बाबी एकत्र आणून कायमस्वरूपी उपाय नक्कीच निघेल.

२) खुर्ची : आजकाल प्रत्येक व्यवसायात बहुतेक व्यक्ती संगणकासमोर बसून आठ ते १० तास काम करतात. म्हणजे दिवसाचा ३० ते ४० टक्के वेळ कामाच्या खुर्चीतच जात असतो. प्रत्येकाच्या उंचीनुसार, वजनानुसार किंवा सवयीनुसार बसण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. या पद्धतींच्या गरजेनुसार चाकं असलेली, उंची कमी-जास्त करता येणारी, सहज वळवता येईल अशी, हात ठेवण्याची जागा वर-खाली करता येईल अशी, उशी असलेली, मान ठेवण्याचा कोन बदलता येणारी अशी खुर्ची हळूहळू विकसित तर झाली आहे; पण तरीसुद्धा पाठीच्या मणक्‍याच्या आजारांचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे. तेव्हा एक रास्त किमतीची आणि अतिशय आरामदायी खुर्ची डिझाइन होणं ही काळाची गरज आहे.

३) छत्री : ज्यांच्या आयुष्यात तुफान पावसात छत्री उघडताना ती एकदाही उलटी झाली नसेल, त्यांनी खराखुरा पाऊस पाहिलाच नाही असं म्हणावं लागेल! तेव्हा कितीही छोटी आणि नीटनेटकेपणानं बंद होणारी असली, तरी छत्री ही काही भरवशाची वस्तू नाही. निदान आज ज्या स्वरूपात ती बनवली आणि वापरली जाते, त्या स्वरूपात वापरणाऱ्याला ती छत्री धो धो पावसात कोरडी ठेवेलच, याची काही खात्री नाही. १०० टक्के कोरडं ठेवण्याची हमी देणारी छत्री डिझाइन व्हायला हवी.

४) सार्वत्रिक (Universal) चार्जर : दरवर्षी जगात सुमारे ५० दशलक्ष मेट्रिक टन इलेक्‍ट्रॉनिक कचरा तयार होतो. जुने लॅपटॉप, कॉम्प्युटर्स, मोबाईल फोन, स्पीकर्स, हेडफोन्स, वायर्स, चार्जर्स...अगणित ई-वेस्ट आपल्याला वेढून टाकतंय. एका व्यक्तीकडं जर फोन, लॅपटॉप, ई-नोटपॅड, ई-रीडर, वायरलेस स्पीकर आणि गेमिंग कन्सोल एवढी उपकरणं असतील, तर तेवढेच चार्जरही त्याच्या जोडीला आवश्‍यक असतात. जर विजेचे प्लग सार्वत्रिक, परिमाणित आहेत तर मग चार्जर वेगवेगळे कशासाठी? एवढंच नव्हे तर, एक फोन कंपनी दोन वेगळ्या मॉडेल्ससाठी किंवा एकाच मॉडेलच्या दोन आवृत्त्यांसाठी वेगवेगळे चार्जर बनवतात. हा अपव्यय थांबणं गरजेचं आहे आणि ते शक्‍यही असणारच.

५) प्रवासात न्यायचे खाद्यपदार्थ : मी पुष्कळ प्रवास करत असल्यामुळं कदाचित ही समस्या मला मोठी वाटत असावी. पूर्वी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये ‘भूकलाडू’, ‘तहानलाडू’ या संकल्पना असायच्या. मला नेहमी कुतूहल असायचं, की हे नेमके कोणते पदार्थ असतील? आता असं वाटतंय की ताजे, पौष्टिक, प्रदूषित न होणारे, आरोग्यवर्धक, उत्साहवर्धक आणि चविष्ट असलेले, सुटसुटीतपणे बाळगता आणि खाता येण्यासारखे खाद्यपदार्थ ही काळाची गरज आहे. जीवरसायनशास्त्रज्ञ, शेफ आणि डिझायनर्स मिळून ही समस्या उत्तमरीत्या सोडवू शकतील.

६) माईक : तुम्ही कोणत्याही सार्वजनिक सभेला अथवा मैफलीला हजेरी लावली असेल, तर माईकवर बोटांनी टिचकी मारून तो सुरू आहे की नाही, कितपत मोठ्यानं आवाज येतोय अशी पडताळणी झालेली नक्कीच पाहिली असेल. आजकाल कॉर्डलेस माईक असतात आणि त्यांच्यात असलेली बॅटरी संपली तर ते अचानक बंदही पडतात. आज तंत्रज्ञान इतकं प्रगत आहे, तर ही टिचकी मारून खात्री करण्याची साशंक स्थिती सुधारता नाही का येणार? मायक्रोफोनची सुधारित आवृत्ती नक्कीच हवी. शिवाय, विषय सोडून बोलणाऱ्या वक्‍त्यापुढचा माईक आपोआप बंद पडावा, अशीही सोय झाली तर उत्तमच!

७) गॅस सिलिंडर : तारखा, वार, कुटुंबाचा आकार, स्वयंपाकाच्या सवयी या सगळ्या गोष्टींचा हिशेब पक्का असला तरी सिलिंडरमधला गॅस कोणत्या क्षणी संपणार याचा कुठलाही अंदाज लावणं अशक्‍य असतं. डिझाइनच्या आणि विज्ञानाच्या छोट्याशा मदतीनं घरात नियमित येणारा हा पेचप्रसंग सोडवता येऊ शकेल. मोठ्या शहरांमध्ये आता पाइपद्वारे गॅस मिळतो; पण छोट्या शहरांत, गावांत कोट्यवधी घरांमध्ये सिलिंडरच आहेत आणि ते अनपेक्षितरीत्या संपतातच. तेव्हा उपाय हवाच.
८) पावत्या, बिलं : हस्ताक्षरातल्या पावत्या आता दुर्मिळ झाल्या आहेत आणि त्यांची जागा स्वयंचलित प्रिंटरद्वारे छापलेल्या पावत्यांनी घेतली आहे. ते योग्यही आहे. कारण, योग्य टॅक्‍ससकट बेरीज करण्याचं काम मशिनद्वारे सहज होऊन जातं; पण या पावत्यांवर तारीख, आयटम नंबर, किंमत, बेरीज, टॅक्‍स, गोळाबेरीज, दुकानाचा नोंदणीक्रमांक, पिनकोड अशा अनेक आकड्यांचं जंजाळ असतं. शिवाय रोख रक्कम दिली असेल, तर परत किती रक्कम द्यावी लागली, याची एक अजून भर. ही पावती थर्मल पेपरवर छापली जात असल्यामुळं काही दिवसांतच तिच्यावरची अक्षरं अस्पष्ट होतात. त्यामुळं एकंदरीत या संपूर्ण प्रक्रियेचा पुनर्विचार होणं आवश्‍यक आहे. त्यात पावतीचा उद्देश लक्षात घेऊन त्यामागची यंत्रणा आणि उपयुक्तता बदलली जाण्यावर भर असावा.

९) पासवर्डस : मोबाईल फोन वापरायचा असो, फेसबुक अपडेट असो, खरेदी करायची असो अथवा एटीएमद्वारे पैसे काढायचे असोत; परवलीचे शब्द किंवा क्रमांक दिल्याशिवाय सगळे व्यवहार बंद. पुन्हा प्रत्येक ठिकाणी पासवर्ड ठरवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या. कुठं आठ अक्षरी, कुठं दोन आकडे, कुठं हायफनचं चिन्ह घालून, कुठं जन्मतारीख चालत नाही, तर कुठं केवळ पाच आकडेच चालतात. या गुंतागुंतीमुळं एकच पासवर्ड सगळीकडं वापरणंही अशक्‍य. याला पर्याय म्हणजे आता अनेक उपकरणांमध्ये बोटाचे ठसे हाही एक मार्ग ठेवलेला असतो किंवा आपल्या आवाजात बोलूनही काही यंत्रं कार्यरत करता येतात. यातही असं वाटतं की हा प्रवास तंत्रज्ञानाच्या विकासाप्रमाणे सुरू आहे; पण वापरणाऱ्या भिन्न प्रकारच्या व्यक्तींना नेमकं काय सोईस्कर होईल, याचा विचार बऱ्याच वेळा मागं पडलेला जाणवतो, म्हणूनच वैचारिक डिझाइनच्या हस्तक्षेपाची इथं गरज वाटते.  

तशी ही यादी खूपच लांबलचक आहे. त्यात अनावश्‍यक बटणं असलेले रिमोट कंट्रोल, सैल कपडे किंवा साडी अडकू शकणाऱ्या दुचाकी गाड्या, असुरक्षित खेळणी, ट्रॅफिक सिग्नल, अतिशय किचकट, भरमसाठ आणि अनावश्‍यक माहिती देणारे आणि भरायला लावणारे वेगवेगळे फॉर्म्स, टोचणारे बूट अशा अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. संधी मिळाली तर या आणि अशाच आयुष्य सुखकर करू शकणाऱ्या इतरही गोष्टींवर डिझाइनचा सकारात्मक प्रभाव पडू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com