नव्याची हवा (आश्विनी देशपांडे)

नव्याची हवा (आश्विनी देशपांडे)

‘अनुकरण ही एक प्रकारची प्रशंसा असते,’ असं मानलं तरी या स्पर्धेत जेव्हा सगळ्याच स्पर्धकांनी ‘सिम्फनी’चं अनुकरण करायला सुरवात केली, तेव्हा डिझाइन टीमनं कायम ‘एक कदम आगे’ हे धोरण ठेवलं. नावीन्याचा ध्यास घेत केलेल्या अथक्‌ वाटचालीमुळं ‘सिम्फनी’ ही कंपनी मधल्या काळातले मोठे धक्के पेलूनही आज जगात ‘नंबर १ कूलर कंपनी’ मानली जाते. या कंपनीची भारतात केलेली डिझाइन तब्बल ६० देशांत अव्वल क्रमांकावर पोचली आहेत.

‘मेक इन इंडिया’ हा भारताच्या आर्थिक विकासाला चालना देणारा कार्यक्रम जरी दोनच वर्षांपूर्वी सुरू झालेला असला, तरी भारतात अनेक उद्योग आणि संस्था अतिशय उमेदीनं वर्षानुवर्षं उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनात कार्यरत आहेत.
कौतुकाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे, यातले काही उद्योग केवळ ‘मेक इन इंडिया’ वर समाधानी राहिले नाहीत. भारतात असे काही द्रष्टे उद्योजक आहेत, ज्यांनी भारताच्या गरजा लक्षात घेऊन भारतातच ‘डिझाइन अँड मेक इन इंडिया’ या तत्त्वाचा मार्ग २५-३० वर्षांपूर्वी धरला. भारतीय हवामान, राहणीमान, कौटुंबिक संस्कृती/वातावरण, वीज व पाणी यांची मर्यादित प्रमाणात उपलब्धता या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ज्यांनी आपली उत्पादनं विकसित केली, ते उद्योग आणि उद्योजक आज जागतिक पातळीवर गेले आहेत, यात नवल अजिबात नाही.
अशाच्या एका डिझाइनची परिपूर्ण साथ घेत जागतिक पातळीवर अव्वल स्थानी पोचलेल्या उत्पादनाची आणि ब्रॅंडची गोष्ट आजच्या लेखात.

सन १९८९-९० मध्ये, म्हणजे आमच्या कंपनीच्या अगदी सुरवातीच्या काळात, स्वतः आर्किटेक्‍ट असलेल्या आणि सौंदर्यदृष्टीसोबतच उपयुक्तता आणि कार्यक्षमतेबाबतही जागरूक असलेल्या अचल बकेरी या होतकरू उद्योजकाबरोबर आमची गाठ पडली. वडिलांच्या बांधकामव्यवसायात लक्ष घालताना गृहसजावटीतल्या काही गोष्टी त्यांना खटकायच्या.

अहमदाबादच्या शुष्क उन्हाळ्यात वापरले जाणारे अवजड, गंजक्‍या पत्र्याचे डेझर्ट कूलर त्यांच्या सुसंगती शोधणाऱ्या दृष्टीला विशोभित वाटायचे. मग त्यांनी त्यावर पर्याय शोधायला सुरवात केली. पत्र्याऐवजी प्लॅस्टिक वापरून मोठ्या प्रमाणात कारखान्यात तयार होतील अशा कूलरचा विचार त्यांनी त्या काळात केला. हे एक धाडसी पाऊल होतं. या एका कल्पनेचाच पुढं वटवृक्ष होईल, अशी खात्री कुणीच देऊ शकत नव्हतं; पण या धाडसात त्यांना साथ देण्याची संधी आमच्या टीमनं मिळवली. एअर कंडिशनरपेक्षा कित्येक पटींनी स्वस्त आणि विजेचा कमी वापर असणारी ही उपकरणं डिझाइन करणं म्हणजे पर्यावरणानुकूल निर्मितीवर विश्वास ठेवणाऱ्या टीमला पर्वणीच होती. पत्रा न वापरल्यामुळं गंजण्याची काळजी तर गेलीच; पण वजन, रंग, आकार या सगळ्याचा गोष्टी सुकर होतील, हा नवीन विचार या ‘प्रॉडक्‍ट’मध्ये समाविष्ट करण्यात आला.

सन १९९० च्या दशकात डिझाइन केलेली ‘सुमो’ आणि ‘हाय-कूल’ ही मॉडेल अतिशय लोकप्रिय झाली. ‘सिम्फनी’ हा ब्रॅंड चांगल्यापैकी नामांकित झाला. आणि त्याबरोबर त्या वेळी सुप्रसिद्ध असलेल्या विजेची घरगुती वापराची उपकरणं तयार करणाऱ्या अनेक कंपन्या कूलर बनवायला पुढं आल्या. ‘अनुकरण ही एक प्रकारची प्रशंसा असते,’ असं मानलं तरी या स्पर्धेत जेव्हा सगळ्याच स्पर्धकांनी ‘सिम्फनी’चं अनुकरण करायला सुरुवात केली, तेव्हा डिझाइन टीमनं कायम ‘एक कदम आगे’ हे धोरण ठेवलं.
दर वर्षी जास्तीत जास्त लक्ष हे ज्या व्यक्ती ही उत्पादनं वापरतात, त्यांच्यावर केंद्रित करून डिझाईन टीम काहीतरी नावीन्यपूर्ण करण्यात मग्न होत राहिली. केवळ तांत्रिकदृष्ट्या शक्‍य आहेत म्हणून भरमसाट; पण फारसे उपयुक्त नसलेले फीचर्स देण्यात कधीच अर्थ नसतो. मात्र, मोजकं आणि प्रॉडक्‍ट वापरण्याच्या पद्धतीत आणि उपयुक्ततेत आश्‍चर्यकारक बदल करणारं एखादंच महत्त्वाचं फीचर जर जोडलं, तर तो कूलर स्पर्धेला केव्हाच मागं टाकून घराघरांत जाऊन बसतो, असं आमचा अनेक वर्षांचा अनुभव सांगतो. मात्र, हे छोटे छोटे वाढीव बदल करतानाच नवीन आणि स्वतंत्र विचार करून डिझाइन करणं महत्त्वाचं असतं, तसंच जेव्हा एखादी डिझाइन-पार्टनरशिप २५ वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वी झालेली असते, तेव्हा पुढची उद्दिष्टंही एकत्रितपणे ठरवली जातात. अशी उल्लेखनीय दीर्घकालीन वाटचाल भारतीय डिझाइनच्या मोजक्‍याच इतिहासात अगदीच विरळा.

डिझाइनच्या यशासाठी एक वारंवार केली जाणारी गोष्ट म्हणजे, आपण डिझाइन केलेले कूलर जेव्हा एखाद्या घरात जातात, तेव्हा ते कशा पद्धतीनं वापरले जातात, कुठं ठेवले जातात, हे प्रत्यक्ष जाऊन पाहणं, निरीक्षण करून काही नवीन शिकणं आणि त्या सगळ्याचा उपयोग आगामी आवृत्तीत सुधारणा करण्यासाठी वापरणं.
चार-पाच वर्षांपूर्वी अशीच एक डिझाइन टीम सजग होऊन निरीक्षण करत असताना त्या टीमला काही गोष्टी प्रामुख्यानं जाणवल्या. आपण डिझाइन केलेले कूलर कितीही चांगले दिसत असले, तरी उन्हाळ्याचे तीन-चार महिने संपल्यावर त्या कूलरची ‘अडचण’च होते. मग कुठं बाल्कनीतच ठेवा, कुठं कोपऱ्यातच सरकवून टाका किंवा चक्क घड्या केलेल्या कपड्यांचा ढीगच त्याच्यावर ठेवा असे प्रकार दिसतात. तोपर्यंत याबाबत कुणीच तक्रार न केल्यामुळं कूलरचा आकार किंवा फूटप्रिंटबद्दल स्वत्रंतपणे विचार केला गेलेला नव्हता. सहजपणे हलवता येण्यासाठी चाकं, सुलभपणे वापरता येण्यासाठी वरच्या भागात मांडलेलं कंट्रोलपॅड , विशिष्ट वेळ सुरू राहून आपोआप बंद होण्यासाठी टायमर, बर्फ टाकण्यासाठी सोईचा कप्पा अशा नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त फीचरनं परिपूर्ण असलेले कूलर वर्षातले आठ-नऊ महिने अडचण होऊन बसतात, हे डिझाइन टीमला पचलं नाही. मग टीमनं स्वतःच स्वतःला एक मोठं आव्हान दिलं! कामगिरीमध्ये कुठलीही तडजोड न करता केवळ एक फूट बाय एक फूट या छोट्याशा क्षेत्रफळात मावेल, असा एअर कूलर डिझाइन करण्याचं आव्हान!
शहरातली लोकसंख्या वाढल्यामुळं पसरट, बसकी घरं जाऊन अनेकमजली उंच इमारती आल्या. कदाचित यापासूनच स्फूर्ती घेत आमच्या या असामान्य डिझाइन टीमनं काही महिन्यांतच असा स्मार्ट, उंच आणि हवा आल्हाददायक करण्याची उत्कृष्ट कामगिरी करणारा ‘डायट’ नावाचा कूलर प्रत्यक्षात आणला. क्षेत्रफळ? एक चौरस फूट! एकच नाहीतर तब्बल तीन वेगवेगळ्या क्षमतेचे कूलर या आव्हानापोटी डिझाईन केले गेले. ही झाली ‘डायट’ची कहाणी. व्यावसायिकदृष्ट्या अतिशय यशस्वी झालेली ही रेंज उत्तम, नावीन्यपूर्ण डिझाइनसाठी  २०१३ मध्ये ‘इंडिया डिझाइन मार्क’ही मिळवून गेली.

आता हे आव्हान पेलल्यावर डिझाइन टीमनं अधिक साहसी आव्हान स्वीकारायचं ठरवलं. एक म्हणजे, व्यापली जाणारी जमिनीवरची जागा आणि दुसरं म्हणजे समोर कूलर ठेवल्यामुळं वाया जाणारी खिडकी...नवीन आव्हान असं, की जमीन आणि खिडक्‍या या दोहोंना मुक्त करून थेट भिंतीवर लावता येईल, असा कूलर डिझाईन करता येईल का...? याचं उत्तर म्हणजे जगातला पहिला वॉल-माउंटेड कूलर ‘क्‍लाउड’! हा कूलर दिसायला तर सफाईदार आहेच; पण वापरायलाही सोपा आणि कामगिरीतही अर्थातच कोणतीही तडजोड नाही. कार्यक्षमता उत्तम. याही प्रॉडक्‍टला नावीन्यपूर्ण डिझाइनसाठी २०१७ मध्ये ‘इंडिया डिझाईन मार्क’ प्रदान करण्यात आला.
अशा प्रकारच्या अथक्‌ वाटचालीमुळं ‘सिम्फनी’ ही कंपनी मधल्या काळातले मोठे धक्के पेलूनही आज जगात नंबर १ कूलर कंपनी मानली जाते. भारतात केलेली डिझाइन तब्बल ६० देशांत अव्वल क्रमांकावर पोचली आहेत.

सातत्यानं डिझाइनची कास धरल्यास प्रत्येक उत्पादनाची एक वेगळी ओळख घडवता येते आणि व्यावसायिक यशही मिळतं, याचं हे एक भारतातलं दुर्मिळ; पण भविष्याकाळात ज्याचा आदर्श ठेवावा, असं उदाहरण आहे. म्हणून उद्योजकांसाठी खास संदेश ः Design and make in India! आणि बाकी सगळ्यांनाही एक विनंती ः कोणतीही  वस्तू निवडताना ती भारतीय हवामानासाठी आणि राहणीमानासाठी डिझाइन केलेली आहे ना, हे जरूर पडताळून पाहा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com