'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)

avit bagale
avit bagale

"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या "तारिणी' या नौकेनं विश्‍वप्रदक्षिणा पूर्ण केली. तब्बल साडेसात महिने चाललेली आणि अनेक वैशिष्ट्यांचा समावेश असलेली ही आगळीवेगळी मोहीम. ती नेमकी कशी होती, प्रवासात कोणते अडथळे आले, कोणते अनुभव मिळाले, या मोहिमेचं वैशिष्ट्य काय आदी गोष्टींचा वेध.

अथांग पसरलेला सागर, क्षितिजाचा पत्ता नाही. जलसफर कधी संपणार हे सांगता येत नाही. सोबतीला केवळ दूरवर पसरलेला महासागर एके महासागर, सहा जणींत मिळून संवाद तो किती साधायचा हा प्रश्‍न. अशा वातावरणात तब्बल साडेसात महिने वावरणं केवळ अशक्‍य असं वाटू शकतं; मात्र या अशा वातावरणावर मनोधैर्यानं मात करत नौदलाच्या सहा साहसी महिला अधिकाऱ्यांनी विक्रम केला. केवळ महिलांनीच शिडाच्या नौकेतून जगाला गवसणी घालण्याचा हा विक्रम. गोव्यातून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरवात झालेल्या या त्यांच्या जगप्रवासाची समाप्तीही गोव्यातच नुकतीच (ता.21 मे) झाली. नौकेचं सुकाणू मॉरिशसजवळ नादुरुस्त झाल्यानं या सांगतेला महिनाभराचा विलंब झाला, तरी जग सागरी मार्गानं पादाक्रांत केलं हा आनंद या महिला अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरून तसूभरही कमी झालेला नव्हता. "नाविका सागर परिक्रमा' असं या मोहिमेचं नाव. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती; तसंच लेफ्टनंट एस. विजयादेवी, बी. ऐश्वर्या आणि पायल गुप्ता या अधिकाऱ्यांचा या मोहिमेत सहभाग होता.

या साऱ्याची बीजं कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे याच्या सागरी परिक्रमेत आहेत. दोंदे यांनी एकट्यानं जागतिक जलसफर केली. त्यांनी निसर्गाची कडवी आव्हानं पेलली आणि त्यांच्यावर मात करत "एकट्यानं जलसफर करणारा पहिला भारतीय' या विक्रमावर आपलं नाव कोरलं. त्याच वेळी महिलांनी असा विक्रम केलेला नसल्याचं समोर आलं. सरकारी पातळीवर नौदलाच्या महिला अधिकाऱ्यांना या मोहिमेवर पाठवण्याचा कार्यक्रम आकाराला आला आणि "नाविका सागरी परिक्रमे'चा जन्म झाला. दोंदे यांनी या महिलांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि सुरवातीचं प्रशिक्षणही दिलं. या मोहिमेसाठी मानसिकदृष्ट्या कणखर अशा महिला अधिकाऱ्यांचा शोध महत्त्वाचा होता. एरवीच्या जीवनात सागराशी संपर्क न आलेल्या; पण नौदल अधिकारी म्हणून दर्यावर्दीपणाची आवड जोपासणाऱ्या सहा अधिकाऱ्यांना निवडण्यात आलं. त्यांना खडतर असं प्रशिक्षण देण्यात आलं. हे करण्यासाठी नौदलानं निवड केली ती नौकानयनात आशियाई स्पर्धेत रौप्यपदक मिळवणारे कॅप्टन अतुल सिन्हा यांची. त्यांनी सुरवातीला या नौकेतून या महिला अधिकाऱ्यांना विशाखापट्टणम ते गोवा अशी पहिली सफर करायला लावली. चेन्नई, कोची, कारवारमार्गे ही जलसफर केल्यावर या महिलांना आपण एकट्यानं जलप्रवास करू शकतो, याचा आत्मविश्‍वास आला. भारत ते मॉरिशस आणि परत असा जलप्रवास त्यांनी 2016 आणि 2017 मध्ये केला. गोवा ते केपटाऊन आणि परत असा जलप्रवास केल्यावर "होय आम्ही जग प्रवास करण्यासाठी सिद्ध आहोत,' अशी भावना बळकट झाली आणि त्यांनी ती मोहीम आनंदानं स्वीकारलीही. याचदरम्यान केप टाऊन ते रिओ या नौकानयन स्पर्धेतही हा चमू कॅप्टन सिन्हा यांच्यासह सहभागी झाला होता. "म्हादई' आणि "तारिणी' या दोन्ही शिडाच्या नौकांवरून वीस हजार सागरी मैलाचा प्रवास या चमूनं मोहिमेवर निघण्याआधी केला होता. यावरून त्यांची तयारी किती होती याची कल्पना येऊ शकेल.

या साऱ्या तयारीनिशी या मोहिमेची गोव्यातून सुरवात झाली होती. या तयारीमुळं येणाऱ्या आव्हानांची कल्पनाही या चमूला आली. दरम्यानच्या काळात जागतिक पातळीवरच्या काही नौकानयन स्पर्धांतही या चमूनं "तारिणी' नौकेसह भाग घेतला. त्यामुळं "तारिणी' आणि या महिला अधिकारी यांचं एक पक्कं समीकरण आकाराला आलं. एवढं सगळं झाल्यावर ही आगळीवेगळी मोहीम सुरू झाली. यामुळं महिलांना साहस करण्यासाठी आणखी एक क्षेत्र या निमित्तानं खुलं झालं.

अशी होती जलसफर
"तारिणी' या शिडाच्या नौकेतून या महिला अधिकाऱ्यांनी तब्बल 21 हजार 600 सागरी मैलांचा प्रवास केला. त्यांनी फ्रेमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिट्टलेटन (न्यूझिलंड), पोर्ट स्टेनले (फाल्कलॅंड), केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) आणि मॉरिशस इथं थांबे घेतले. या प्रवासात त्यांनी पाच देशांना भेटी दिल्या, सहा खंड पार केले, तीन महासागर ओलांडले. पृथ्वीची तीन निमुळती भूशिरं पार केली, तर विषृववृत्त दोन वेळा पार केले. या मोहिमेमध्ये सागरी पर्यावरणाचा अभ्यास आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यामुळं सागरी पाण्याचे नमुने त्यांनी गोळा केले. जलसफरीतल्या ऊर्जेची सारी गरज त्यांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांतून भागवली हे जास्त महत्त्वाचं.

पहिला मुक्काम फ्रेमेंटल
गोव्यातून सुरू झालेल्या या सागरी मोहिमेचा पहिला मुक्काम ऑस्ट्रेलियातल्या फ्रेमेंटल इथं होता. तिथं पोचण्यासाठी 44 दिवसांचा प्रवास या चमूनं केला. 23 ऑक्‍टोबर 2017 रोजी ही नौका फ्रेमेंटल इथं पोचली. तिथून पुढचा प्रवास 5 नोव्हेंबरला सुरू करण्यापूर्वी "तारिणी'च्या चमूनं पश्‍चिम ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर केरी सॅंडर्सन, उपमहापौर इन्ग्रीड वाल्थम आदींच्या सदिच्छा भेटी घेतल्या. पाठीच्या मणक्‍यांवर प्रभावी उपचार करणारे ऍलन मॅकेसीम यांनाही त्यांना भेटता आलं. गेल्या वर्षीचा "ऑस्ट्रेलियन ऑफ इयर' हा पुरस्कार मिळवणारे हे वैद्यकीय तज्ज्ञ. नौकानयनाविषयी जागृती करण्यासाठी- विशेषतः विद्यार्थ्यांसोबतच्या संवादावर या चमूचा भर होता.

फ्रेमेंटल इथून निघालेल्या या नौकेनं 10 नोव्हेंबरला केपलिवून ओलांडलं. जागतिक परिक्रमा केली असं मानण्यासाठी किमान तीन "केप' ओलांडणं गरजेचं असतं. अनेक निकषांपैकी तो एक निकष आहे, त्यामुळं पहिला टप्पा पार केल्याचा आनंद चमूच्या चेहऱ्यावर 10 नोव्हेंबरला होता. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण पश्‍चिम किनारपट्टीवर असलेलं हे निमुळतं टोक ओलांडून नंतर नौकेनं पूर्वेकडं प्रवास सुरू केला. दक्षिण तास्मानियापर्यंत ही नौका पोचायला पुढचे 24 दिवस लागले. ताशी 25 किलोमीटर वेगानं वाहणारं वारे मिळाल्यानं नौका 29 नोव्हेंबर रोजी लिटेल्टन बंदरात (न्यूझिलंड) विसावू शकली. तिथून 12 डिसेंबरला त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला.

"तारीख रेषा' पार
पृथ्वीचं पूर्व आणि पश्‍चिम गोलार्धात विभाजन करणारी "आंतरराष्ट्रीय तारीख रेषा' "तारिणी'नं 15 डिसेंबरला ओलांडली. लंडनलगतच्या ग्रीनविचजवळ ही रेषा आहे. त्यानंतरचा नौकेचा प्रवास मात्र खडतर होता. प्रशांत महासागरात खराब हवामान आणि वादळी वाऱ्यांचा सामना या सहा साहसी महिला नौदल अधिकाऱ्यांना करावा लागला. अफाट महासागरात ठिपक्‍याएवढी ही नौका फेकली जाते की काय अशी परिस्थिती अनेक वेळा उद्‌भवली; मात्र वाऱ्याच्या दिशेचं व्यवस्थापन करून त्यांनी वेळ निभावून नेली. प्रशांत महासागरात ही नौका 41 दिवस होती. अत्यंत थंड असं हवामान असलेल्या या भागात ताशी साठ किलोमीटर वेगानं वारे वाहत होते. जोडीला सहा मीटरपर्यंत उसळणाऱ्या लाटा होत्या. मात्र, समुद्रदुर्गांनी त्यावर मात केली.
नौकेनं 19 जानेवारीला केपहॉर्न ओलांडलं. "केपहॉर्न' हे तियरा दे फिगो आर्चिपिलागो बेटाच्या जवळ आहे. दक्षिण अमेरिकेत हा भाग येतो. प्रशांत आणि अटलांटिक महासागरांचं मिलन इथंच होते. तिथून पुढं प्रवास करत नौका 22 जानेवारीला पोर्ट स्टॅन्ले (फाल्कलॅंड बेटं) इथं पोचली. या मुक्कामात "तारिणी'वर गव्हर्नर निंगेल फिलिप्स आणि त्यांच्या पत्नी एमा फिलिप्स यांनी भेट दिली. हॉकीचा संघ आणि स्थानिकांनीही नौकेला भेट देऊन पाहणी केली. "तारिणी'वरच्या चमूनं दरम्यानच्या काळात ब्रिटिश सैन्याशीही संवाद साधला. शाळांना आणि महिला संघटनांच्या कार्यालयांना भेटी दिल्या. तिथून आफ्रिकेच्या दिशेनं 4 फेब्रुवारीला त्यांनी प्रवास सुरू केला.

परतीचा प्रवास
"तारिणी' 2 मार्च रोजी दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनला पोचली. तिथं मोठी देखभाल, दुरूस्ती करण्यात आली. या दरम्यान केपटाऊनच्या महापौर पॅट्रीसिया डे लिली आणि प्रत्येक महासागरात सर्वांत जास्त अंतर पोहण्याचा विक्रम केलेले लेविस पुग यांच्याशी महिला अधिकाऱ्यांनी संवाद साधला. स्थानिक रेडिओवरच्या कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या आणि पत्रकारांशीही वार्तालाप केला. तिथून 14 मार्चला परतीचा प्रवास सुरू करून दोन दिवसांतच "केप ऑफ गुड होप' त्यांनी ओलांडलं.
नौकेची जलसफर केपटाऊनपर्यंत सुरळीत झाली होती. तिथून पुढं निघाल्यावर मात्र काही दिवसांतच खराब वातावरण आणि खवळलेला समुद्र यांचा सामना त्यांना करावा लागला. याचा फटका सुकाणू यंत्रणेला बसला. मात्र आपत्कालीन परिस्थितीत काय करायचं याचं प्रशिक्षण आधीच झालेलं असल्यानं नौका हाकण्यासाठी अनोख्या पद्धतीचा अवलंब करत या महिला अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत नौका मॉरिशसकडं वळवली. पूर्वीच्या नियोजित मार्गात मॉरिशसचा थांबा नव्हता; मात्र सुकाणू दुरूस्तीसाठी त्यांनी थांबा घेण्याचं ठरवलं. मॉरिशसच्या पोर्ट लुईसमध्ये 18 एप्रिलला नौकेनं नांगर टाकला. तिथून 26 एप्रिलला त्यांनी गोव्याकडं प्रयाण सुरू केलं; पण वाटेत वाऱ्याची साथ न मिळाल्यानं त्यांचा प्रवास लांबला. अखेरीस 20 मे रोजी नौका गोव्यात पोचली.

पंतप्रधानांची घेतली भेट
"आयएनएसव्ही तारिणी' या नौकेवरून यशस्वीपणे विश्वप्रदक्षिणा करणाऱ्या भारतीय नौदलातल्या या सहा अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधानांशी झालेल्या संवादादरम्यान या अधिकाऱ्यांनी आपल्या मोहिमेशी संबंधित विविध पैलू, मोहिमेची तयारी, प्रशिक्षण आणि मोहिमेदरम्यान आलेल्या अनुभवांबाबत पंतप्रधानांना माहिती दिली. या मोहिमेबद्दल पंतप्रधानांनी या महिला अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. या अधिकाऱ्यांनी आपल्या प्रवासाचे अनोखे अनुभव शब्दबद्ध करून इतरांपर्यंत पोचवावेत, असं मोदी यांनी आवर्जून सांगितलं.

लक्ष्य एकटीनं गवसणी घालण्याचं
"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेची मोठी चर्चा सुरू असली, तरी त्यात सहा महिला नौदल अधिकारी सहभागी झाल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीला आता एकटीनं जागतिक जलसफर करण्याचं स्वप्न खुणावू लागलं आहे. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांची या चमूनं भेट घेतली. त्यावेळी झालेल्या चर्चेत त्यांनी हे स्वप्न बोलून दाखवलं. त्यांचेच या क्षेत्रातले गुरू कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे यांच्या यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचं त्यांचं ध्येय आहे. निसर्गावर मात करून ही जलसफर यशस्वीपणे पूर्ण करणं तसं अवघड आहे; पण या यशस्वी सागरी दौऱ्यामुळं ते यश पादाक्रांत करणं बाकी आहे, याची जाणीव या महिला अधिकाऱ्यांना झाली हेही नसे थोडके!

स्वप्न साकार झालं ः एस. विजयादेवी
लेफ्टनंट एस. विजयादेवी या मणिपूरच्या. नौदलाच्या सेवेत येईपर्यंत सागराचा तसा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. ""तब्बल आठ महिने आम्ही सागरात होतो, हे आता खरंच स्वप्नवत वाटत आहे,'' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ""सेवा निवड मंडळानं सुरवातीला भोपाळ इथं मुलाखतीसाठी बोलावलं, तेव्हा माझी आई मला या मोहिमेसाठी पाठवायला तयार नव्हती. मात्र, ही संधी घ्यावी असं मला वाटत होतं. मी ती घेतली आणि माझा निर्णय योग्य होता, हे आज सिद्ध झालं,'' असं त्या सांगत होत्या. त्या म्हणाल्या ः ""निसर्गाचं आव्हान मोठं होतं. कुठं जराही वारा नसायचा, तर कुठं सोसाट्याचा. वाऱ्याचा वेग कधी कमी-जास्त होईल, हे सांगता यायचं नाही. उसळणाऱ्या मोठ्या लाटांशी अनेकदा सामना करावा लागला. एकदा तर सुकाणूवरची सहकारी वाहून जाते की काय अशी परिस्थिती होती; मात्र ती त्यातून बचावली. तेव्हा नौकेच्या आत असलेल्या सहकारी एकमेकींना आपटल्या. नौकेत पाणी शिरल्यानं कपडे भिजले. साहित्य अस्ताव्यस्त पडलं. कपडे सुकवण्यासाठी अन्य पर्याय नव्हता, त्यामुळं स्टोव्ह पेटवावा लागला. या मोहिमेदरम्यान घरापासून दूर राहिल्याचं भावनिकदृष्ट्या कसोटीचा काळ होता; मात्र त्या भावना आम्ही जाणवू दिल्या नाहीत. कर्तव्याला आधी प्राधान्य दिलं.''

नव्वद तासांची झुंज
"तारिणी' नौका प्रशांत महासागरात मार्गक्रमण करत असताना एके ठिकाणी वाऱ्याचा वेग कमालीचा वाढला. ताशी 120 किलोमीटर वेगानं वारे वाहू लागले. त्यामुळं तब्बल ऐंशी मीटरपर्यंत उंच अशा लाटा उसळू लागल्या. या लाटांवर हेलकावे खात राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची परिस्थितीत इंच इंच नौका पुढं नेण्याचा प्रयत्न या चमूनं सुरू ठेवला. तो खडतर टप्पा ओलांडायला तब्बल नव्वद तास लागले, यावरून ती परिस्थिती किती कठीण होती, हे लक्षात येते.

अविस्मरणीय 194 दिवस
सहा अधिकाऱ्यांच्या या चमूच्या मनात मोहिमेचे 194 दिवस कायम घर करून राहणार आहेत. गोव्यातून संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी 10 सप्टेंबर 2017 रोजी या मोहिमेस सुरवात करून दिली होती. त्यावेळी पणजीलगतच्या वेरे या गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही उपस्थित होते. आता 21 मे रोजी संरक्षणमंत्र्यांनीच या चमूचं स्वागत केलं. आता या चमूला विश्रांतीच्या कालावधीसाठी कुटुंबीयांकडं जाण्याची मुभा मिळाली असली, तरी ते 194 दिवस आगामी काळात त्यांच्या चर्चेतले विषय असतील, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

"म्हादई' आणि "तारिणी'
"म्हादई' आणि "तारिणी' या शिडाच्या नौकांतलं साम्य म्हणजे दोन्ही नौकांनी जगसफर पूर्ण केली आहे. दुसरं म्हणजे या दोन्ही नौकांची बांधणी गोव्यातल्या दिवाडी या बेटावर असलेल्या "ऍक्वारीयस शिपयार्ड'मध्ये झाली आहे. "म्हादई'ची बांधणी कमांडर (निवृत्त) दिलीप दोंदे यांच्या दैनंदिन पाहणीखाली झाली होती. "तारिणी'ची बांधणी करताना "म्हादई'च्या बांधणीचा अनुभव गाठीशी असल्यानं शिपयार्डनं ते आव्हान पेललं. खास प्रकारचे लाकूड आणि फायबरग्लास वापरून या नौकांची बांधणी करण्यात आली आहे. "तारिणी'वर उपग्रह संदेशवहन यंत्रणा असल्यानं तिच्यावरचा चमू सतत नौदलाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्कात होता. 65 फूट लांब आणि 25 फूट उंच अशी ही नौका आहे.

"नारी शक्ती पुरस्कार'
देशातल्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी म्हणून या मोहिमेची संकल्पना आकाराला आली होती. मोहिमेच्या सांगतेनंतर महिला अधिकाऱ्यांचा यथोचित गौरव झाला. केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते गेल्या वर्षीचा "नारी शक्ती पुरस्कार' या महिला अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com