31 वर्षांनंतरही सुरुच आहेत आत्महत्या

Balaji Sutar writes about farmers suicide
Balaji Sutar writes about farmers suicide

कृषी संस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे, त्या या प्रदेशात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या.’ त्यापूर्वीच्या शे-पाचशे वर्षांत नोंदल्या न गेलेल्या आत्महत्यांचा आकडा कदाचित लाखात असेल, कदाचित कोटींत. त्यांच्या मरण्यामागची कारणेही हीच किंवा अशीच असणार. त्या शे-पाचशे वर्षांत झाली नव्हती, अशी एकच गोष्ट साहेबराव करपेंच्या आत्महत्येनंतर झाली, ती म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं मरणं ‘एका शेतकरी कुटुंबाची सामुदायिक आत्महत्या’ म्हणून नोंदलं गेलं. ही नोंद झाली आणि त्यानंतर मागची सलग एकतीस वर्षे या नोंदी होतच आहेत. 

साहेबराव शेषराव करपे. राहणार चिलगव्हाण, जिल्हा यवतमाळ. १९ मार्च १९८६ या दिवशी या माणसाने आत्महत्या केली. एकट्याने नव्हे, सबंध कुटुंबांसहित. ज्यांनी ‘भूदान’ चळवळ चालवली त्या विनोबांच्या पवनार आश्रमात जाऊन पत्नी, चार मुलांसहित सहा जीव ‘दान’ करून टाकले. या आत्महत्येला ३१ वर्षे पूर्ण होत आहेत. नापिकी आहे, दुष्काळ आहे, मी कर्ज फेडू शकत नाही, वीजबिल भरू शकत नाही, हातउसनी देणी देऊ शकत नाही, ही त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नोंदवलेली काही कारणे. काही न नोंदवलेली कारणेही असतील, ज्यांची आपण कल्पना करू शकतो. शब्दांमध्ये सगळंच नोंदवता यावं एवढी चतुराई मरू घातलेल्या कुणब्याकडे असती, तर अजून काय पाहिजे होतं? 

कृषी संस्कृती हाच जिथल्या जगण्याचा मुख्य आधार आहे, त्या या प्रदेशात अधिकृतपणे नोंदली गेलेली ही पहिली ‘शेतकरी आत्महत्या.’ त्यापूर्वीच्या शे-पाचशे वर्षात नोंदल्या न गेलेल्या आत्महत्यांचा आकडा कदाचित लाखात असेल, कदाचित कोटींत. त्यांच्या मरण्यामागची कारणेही हीच किंवा अशीच असणार. त्या शे-पाचशे वर्षात झाली नव्हती, अशी एकच गोष्ट साहेबराव करपेंच्या आत्महत्येनंतर झाली, ती म्हणजे त्यांच्या कुटुंबाचं मरणं ‘एका शेतकरी कुटुंबाची सामुदायिक आत्महत्या’ म्हणून नोंदलं गेलं. ही नोंद झाली आणि त्यानंतर मागची सलग एकतीस वर्षे या नोंदी होत गेल्या. लागोपाठ या नोंदी होत जाण्यातली विदारकता लक्षात घेऊन शेतकऱ्यांची किंवा शेतीची परिस्थिती सुधारावी यासाठी काय प्रयत्न झाले आणि त्यातून काय निष्पन्न झाले, याचा तपास केला तर हाती काहीही लागत नाही. 

पिढ्यानपिढ्यांचा अन्नदाता काही हजारांचं कर्ज फेडता येत नाही म्हणून जीव देतो आणि मग त्याच्या उरलेल्या कुटुंबाला लाखभराची रक्कम ‘मदत’ म्हणून दिली जाते. आम्ही पांढरपेशा व्यवस्थेतले लोक या व्यवस्थेसकट इतके बेईमान कसे झालो आहोत? थोडा उलटा प्रवास केला तर आपल्या सगळ्यांचेच वाडवडील शेतीतल्या मातीचा रंग जन्मजातपणे रक्तात घेऊन जन्मलो, वाढलो, जगलो असल्याचे आढळून येईल. ज्या भुईने जन्म दिलेल्या अन्नावर आपल्या पिढ्या पोसल्या त्याच भुईत ते अन्न जन्मण्यासाठी बीज पेरणारा वंश रानोमाळ सैरभैर होत असताना स्वत:ला ‘शेतकऱ्यांचे पुत्र’ किंवा ‘भूमिपुत्र’ असं म्हणवून घेणाऱ्या कुणालाच यातल्या वेदना तीव्रतेने भिडताना का दिसत नाहीयेत? भिडत असतील तर काही घडताना का दिसत नाहीये? माणूस मेल्यावरच त्याला मदत देण्याइतके बेशरम राज्यकर्ते निपजतात, त्यांचीही नाळ कुठेतरी भुईतच पुरलेली असते नं? की आभाळातल्या विमानात चांदवा म्हणून टांगून ठेवतात ती नाळ? 

बायको पोरांसोबत जीव देऊन टाकताना साहेबराव करपेंच्या मनात काय आणि किती दाटून आलेलं असेल? जिथं जन्मलो, ज्या भूमीत राबलो, घाम गाळला, त्याच भूमीत, त्याच गावात आपले सगळे आधार संपलेले आहेत, ज्याच्याकडे मन उकलावं, असा कुणीही आपल्या भवतालात नाही, या भूमीने आपल्याला मुळापासून उखडून मृत्यूच्या कडेलोटाप्रत आणून ठेवलेलं आहे आणि आपल्या सबंध वंशासह इथे आपण मरून जातो आहोत, हे मनात येऊन त्या भल्या कष्टाळू माणसाच्या मेंदूच्या चिंधड्या उडाल्या असतील आतल्या आत. माणसांनी गजबलेल्या या भवतालात कुणीच आपलं नाही, ही भावना केवढी जीवघेणी असेल? कडेलोटाच्या या नेमक्या क्षणी कुठे असतात आप्तस्वकीय, कुठे असतं सरकार? आपल्याशी रक्ताचं नातं सांगणारा एक माणूस इथे आत्मघात करून घेतो आहे, त्याला मरण्यापूर्वीच आधार द्यावा, ही इतकी साधी गोष्ट कुणालाच कशी सुचत नाही? 

मुर्दाड भवताल, कोरडी रखरखीत नोकरशाही आणि केवळ खुर्च्या मिळवण्याच्या, टिकवण्याच्या लालसेने बरबटलेली मनं मुखवट्याआड दडवून संभावितासारखे वावरणारे राजकारणी हे बळीवंशाच्या या आत्मघाती परंपरेचे उद्गाते, प्रणेते आहेत. या आत्महत्या नसतात, हत्या असतात व्यवस्थेने घडवलेल्या. अप्रत्यक्ष का होईना; लक्षावधींच्या मरणाला कारण होणाऱ्या या घटकांना कधी पश्चात्ताप तरी होताना दिसतो काय? कुणी जीव दिला की चार पुढा-यांच्या उपस्थितीत तहसीलदार स्तरावरचा अधिकारी जाऊन हजार चौकशा करून झाल्यावर त्या जिवाचं मोल लाख रुपयांच्या चेकने करतो, ही त्या मरणाची किंमत असते? 

काय मोल करते ही व्यवस्था एखाद्याच्या जगण्या-मरण्याचं? व्यवस्था म्हणते शेतकरी प्रेमप्रकरणातून आत्महत्या करतात; व्यवस्था म्हणते, त्यांना व्यसनं असतात, त्यातून ते कर्जबाजारी होतात, कुवत नसताना पोराबाळांच्या लग्नात ते अवाढव्य खर्च करतात; व्यवस्थेतलाच गोपाल शेट्टी नावाचा कुणी बिनडोक म्हणतो, आत्महत्या ही तर फॅशन झालीये. 

‘कृषिप्रधान देश’ असं या देशाला पिढ्यानपिढ्या म्हटलं जातं, इथले साठ टक्क्यांहून अधिक लोक शेती किंवा शेतीशी संबंधित रोजगारावर अवलंबून आहेत, त्याच या देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा पंधरा-सोळा टक्क्यांवर आहे. हे प्रमाण महाराष्ट्रात तर अवघ्या चारेक टक्क्यांवर असल्याचं सांगितलं जातं. शेती आणि समृद्धी यांच्या दरम्यानची भयानक दरी ही लहरी निसर्गाखालोखाल आपल्या राज्यकर्त्यांची देण आहे. ऋतुमानातल्या अत्यंत विषम बदलांमुळे शेती आतबट्ट्यात आली आहे तशीच ती स्वत:ला ‘शेतकऱ्यांचं लेकरू’ म्हणवून घेणाऱ्या राज्यकर्त्यांच्या अदूरदृष्टीमुळेही आलेली आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘कॅशलेस इकॉनॉमी’ वगैरे बिनबुडाच्या भानगडी अभिमानाने सांगणाऱ्या शासनव्यवस्थेला शेतीमध्ये काही दीर्घकालीन गुंतवणूक करावी, असे वाटत नाही. सिंचनातल्या भ्रष्टाचारामुळे आणि आपापल्या प्रदेशाच्या पोळीवर अवघं तूप ओढून घेण्याच्या लालसेपोटी पाण्याचं नियोजन नाही, असलेल्या साठ्यांचं योग्य वाटप नाही. इथले तीस टक्क्यांहून अधिक लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. कोरडवाहू शेतकऱ्यांची संख्या नव्वद टक्क्यांवर आहे. हेच शेतकरी बहुधा अल्पभूधारकही असतात. फार तर तीन-चार एकर जमीन असते. यांना बँका जवळ करत नाहीत. पावसाळा येण्यापूर्वी शेतीची मशागत करावी लागते. एखाद बरा पाऊस झाला की पेरणी करावी लागते. बियाणं, खतं, कीटकनाशकांसाठी अवाच्या सवा खर्च करावा लागतो. बँकांच्या सहकार्याअभावी सावकारांचे पाय धरून हा खर्च केला जातो. तो करून झाला की नेमका पाऊस गायब होतो. डोळ्यांदेखत वाळून जाणारी पिके, आजवरच्या खर्चाचे, कर्जाचे, व्याजाचे आकडे छाती दडपून टाकत राहतात. शिवाय दैनंदिन जगणं सोडून देता येणारं नसतं. दुखणीभानी असतात, लग्नकार्य असतात, आहेर-हुंडे असतात. यातून बोजा वाढतो, ताणही वाढतो. गावठी सावकारांच्या व्याजाचे दर महिन्याला पाच ते दहा म्हणजे वर्षाला साठ ते एकशेवीस टक्के एवढे असतात. या व्याजाचं कर्ज टाटा-बिर्लांनाही आत्महत्या करायला भाग पाडेल. 

एक फाटका माणूस, ज्याच्या भवतालात बहुसंख्येनं फाटकेच असतात, ज्याला अस्मानी-सुलतानी दोन्हींनी झोडलेलं असतं, मार्ग खुंटलेले असतात, उजेडाची तिरीपही सापडत नसते, तेव्हा तो गोठ्यातला कासरा काढतो. शिवारातल्या फांदीला बांधतो आणि गळ्यात फास अडकवून उडी मारतो. आणखी एक ‘शेतकरी आत्महत्या’ घडली असं म्हणत मुर्दाड प्रदर्शनाखातर पांढरपेशे हळहळतात, सरकार सातबारावरचा बोजा तपासतं आणि मरण जुनंपुराणं होऊन गेल्यावर कधीतरी नोटांचं एक बंडल उरलेल्यांच्या हवाली करतं. त्याने मेलेला जीव परत येत नाही, त्याने कोवळ्या पोरांच्या मस्तकावरचं हरवलेलं बापाचं छत्र पुन्हा सावली धरत नाही. व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी हातात रुमणेच घ्यावे, अशी अपेक्षा असते काय? १९ मार्चला साहेबराव करपेंच्या हौतात्म्याचं जळजळीत स्मरण म्हणून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करूयात? लढूयात पुन्हा एकदा? 
(लेखक ग्रामीण भवतालाची स्पंदनं टिपणारे साहित्यिक आहेत.) ९३२५०४७८८३

-----------------------------------------

या आत्महत्येवर लोककवी विठ्ठल वाघ यांनी त्याच महिन्यात ही वऱ्हाडी कविता लिहिली. त्याचदरम्यान अंजनगाव सुर्जी (जि. अमरावती) येथे झालेल्या आकाशवाणीच्या कविसंमेलनात त्यांनी तिचे पहिल्यांदा वाचन केले. खेड्यापाड्याची, शेतीमातीची पार्श्‍वभूमी असलेल्या सुशिक्षितांची शेती-शेतकऱ्यांप्रती उदासीनता हे या कवितेचे मध्यवर्ती सूत्र आहे. 
................................ 
साहेबराव पाटील 

असं काहून होत असीन? साहेबराव, असं काहून होत असीन? 
काहून माहे हात मलेच वाघाच्या पंजावानी दिसत असतीन? 
तुह्या रगतात न्हाल्यावानी माह्याच आंगावर येत असतीन? 
खरं म्हनजे साहेबराव तुया आत्महत्या केलीच नाही. 
आमीच तुहा खून केला.. तुहा अन्‌ तुह्या बायकोपोराईचाही. 
तू गेल्याची बातमी आली त्या वक्ती मी बियरवर ताव मारत होतो 
आळव्या हातानं बिर्यानी झोळत होतो! 
असाच तू कापसाच्या भावासाठी वारकऱ्याच्या भक्तिभावानं शेतकरी 
दिंडीत चालला होता. 
त्यावक्ती मी "महात्मा फुले' चौकात 
पानठेल्यावर चारमिनारचे झुरके घेत होतो 
हवेत धूर सोळत होतो. 
मनातल्या मनात तुही किव करत होतो. 
शिकतासवरता तुह्यापासून इतका दूर होत गेलो साहेबराव 
जसा मी तुह्या गावचाच नोतो. 
तसा तू अन्‌ मी, खरं म्हंजे एका गावाचा 
एका मातीचा, एकाच दांडापेंडाचा. 
तुही इटी माहा दांडू, माहा दांडू तुहा चेंडू... 
पुढे पुढे दिवस असे पालटत गेले 
अन्‌ आपुन दोघं झालो दोन चाकोल्यातले चाकं 
एकमेकाले कधीच भेटू न शकनारे 
मी अस्मान.. तू जमीन. 
तुहा लेका जलमताच जमिनीवर जसा जीवच जळला होता 
चौथीतई तू सारे विषय सोळून निबंध लेहेस- 
"भारत हा कृषिप्रधान देश आहे.' 
कृषी-तुह्या जीनगानीची एकमेव खुशी. 
वन्दे मातरम! सुजलाम सुफलाम!! मलयजशितलाम!! 
तुह्या गयातून ते कसं भिजभिज भिजून निंघे 
- पुढे तुह्या वावरातली ईहीर आटली 
तुह्या बायकोच्या डोयासारखीच खोल खोल... निर्जीव 
त्यातच पंपावरचं इलक्‍ट्ररीचं कनेक्‍शनई तोळल्या गेलं. 
अन्‌ मयातला दांड कोळ्‌ळाठन्‌ पळला-उदासवाना 
तुह्या उपासी लेकराईच्या तोंडावानी भकासवाना 
तुह्या जीनगानीसी, संसारासी समांतर तो दांड-कोळ्‌ळाठन्‌ उदास 
तुह्या पोलादी देहातला सानेगुरजीचा नाजूकसाजूक आत्मा 
उघळ्या डोयानं पाहू शकला नाही- 
-वावरातले सोकेल अगाईतं पाऊसपान्यावाचून 
-घरातले उपाशी लेकरं भाकरदान्यावाचून 
-लंकेची पाराबती कर्जापायी गहान टाकेल मंगयसूत्रावाचून 
म्हणून मंग वानीचा हुळ्‌ळा खुळताखेपी 
हिर्व्यांकच दान्यातून निंघनारं पांढरंफटक दूध पाहून 
कचरनारे तुहे हात 
आपल्याच आतळ्यातलं आतळं तोळून मोकये झाले. 
ताहा अंद्रेच्या अंद्रे तुया रगताचे आसू ढायले असतील 
ते जमिनीवर गयले असते ना साहेबराव 
तं त्याची एक रांगोई झाली असती रे! 
पन ते बरंच झालं. 
काहून का पाटील पांड्याईच्या खेटराले डोये नसतात रे राजा! 
ते आपल्या राजाची अंबारी पाठीवर वाहून नेन्यातच 
धन्य धन्य होत असतात. 
त्या हत्तीच्या पावलाले तुयासारख्या किंळ्यामुंग्याईची 
दादफिर्याद घेऊन चालत नसते रे! 
साहेबराव- तू त्या मुंगीसारखाच 
-अन्‌ या भक्कम सातपुळ्यासारखाई-तू कैलासावरचा महादेव! 
म्हनूनच तू ईख पचवू शकला...अन्‌ एकडावचा सुटला. 
पन तुह्या गावोगावच्या भाईबंदात 
हिंमत नसते रे एवढी...अभायाचं कायीज फाळून टाकनारी. 
म्हनून ते तुयासारखं असं एकदम मरन्यापक्षे 
रोज रोज थोळंथोळं मरत असतात. 
आपलं उपाशी पोट पाठीच्या नेटं उभं करत 
डेरपोट्याईले पोसत असतात. 
आपुन मातर थोळंथोळं रोजरोज मरत असतात. 
तुहं सरन पेटल्यावर मसनात एक म्हातारा सांगत होता म्हंतात- 
"आता कापूसजवारी पेरसान त लेकहो हराममौतीनं मरसान 
आता पेरा तासातासानं लोखंडी दगळी गोटे 
चारी मेरीनं बाभुईचे खम्मन काटे...' 
त्यारोजी साहेबराव 
मीही येनार होतो रे तुया मातीवर 
पन ऑफिसात आल्या नव्या साहेबाचं रिसेप्शन होतं रे त्यारोजी 
मी ताहा काय करत होतो हे माहा मलेही कयेत होतं 
पन म्हनूनच साहेबराव 
तू मले माफ करू नको-कधीच माफ करू नको 
साहेबराव!...
- विठ्ठल वाघ, अकोला 
................................................... 
"मातीचा झरतो डोळा' या कवितासंग्रहातून साभार 
(सौजन्य : हर्षवर्धन बोऱ्हाडे, सारांश प्रकाशन, नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com