स्त्रीच्या सामर्थ्याचा धांडोळा

स्त्रीच्या सामर्थ्याचा धांडोळा

कोणत्याही देशाची परिस्थिती तिथल्या स्त्रीकडं पाहिल्यास लगेच कळते, असं म्हणतात. भारतात शिक्षण आणि आर्थिक सबलीकरणाच्या प्रयत्नांमुळं महिलांनी प्रगती केली, तरी अद्याप आपल्या देशाच्या अनेक कोपऱ्यांत अठरावं आणि एकोणिसावं शतक मुकेपणानं जगणारं विशाल स्त्रीजगत अस्तित्वात आहे. स्त्री नागरिक आहे हा विचार स्त्रीवादी चळवळींनी रुजवला. स्त्रीला पुरुषांइतकेच अधिकार मिळाले पाहिजेत, या विचारासाठी जगभर चळवळी झाल्या आणि होत आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात स्त्रियांमध्ये स्त्रियांच्या संदर्भात सामाजिक कार्य करण्याची इच्छा विकसित झाली. वैयक्तिक प्रयत्न करण्यापेक्षा एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून काही काम करावे, ही महत्त्वाची जाणीव झाली. त्यातूनच स्त्री-परिषदांचं आयोजन सुरू झालं.

स्त्री-परिषदांचा स्वत-चा इतिहास असल्याचं डॉ. स्वाती कर्वे यांना जाणवलं आणि त्यातूनच ‘स्त्री-परिषदांचा इतिहास’ हे पुस्तक साकारलं. या संशोधन ग्रंथात लेखिकेनं दीड शतकातल्या स्त्री-जीवनाचा धांडोळा घेतला आहे. साधारणपणे १८५० ते १९०४, १९०४ ते १९२७, १९२७ ते १९५०, १९५० ते १९७५ आणि१९७५ ते २००० अशा पाच टप्प्यांत त्यांनी स्त्री-परिषदांचा इतिहास मांडला आहे.

या इतिहासाचा मागोवा १८५०पासून घेण्याची कारणमीमांसा लेखिकेनं विशद केली आहे. स्त्रियांच्या दृष्टीनं अनेक महत्त्वाच्या घटना १८५०च्या आसपास घडल्या आहेत. लोकहितवादींची ‘प्रभाकर’मधून प्रसिद्ध झालेली शतपत्रं. १८४८मध्ये पुण्यात भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी स्त्रियांसाठी सुरू केलेली पहिली शाळा, सावित्रीबाई फुले यांनी अध्यापनाबरोबर स्त्रियांसाठी सुरू केलेलं सामाजिक कार्य, सावित्रीबाईंच्या ‘महिला सेवा मंडळा’तर्फे १४ जानेवारी १९५२ रोजी स्त्रियांसाठी आयोजित करण्यात आलेला तिळगूळ समारंभ अशा अनेक घटनांचा उल्लेख त्यांनी केला आहे.

पुढं पंडिता रमाबाईंचं महाराष्ट्रातलं आगमन, डॉ. आनंदीबाई जोशी यांनी अमेरिकेतून वैद्यकीय पदवी घेऊन येणं, रखमाबाई राऊत यांनी अजाणत्या वयात झालेला विवाह नाकारून कोर्ट-खटल्याला धैर्याने तोंड देणं इत्यादी घटना वातावरणातील ताण-विरोध कमी करत होत्या आणि पहिली अखिल भारतीय महिला परिषद १९२७ रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली. १९३१ ते १९५० या साधारण २० वर्षांमध्ये महाराष्ट्रात पस्तीसहून जास्त स्वतंत्र परिषदांचं आयोजन करण्यात आलं. कर्वे म्हणतात, ‘एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध असा जवळजवळ एक शतकाचा कालखंड हा स्त्री-सुधारणा आणि स्त्री-संघटना या दोन्ही दृष्टींनी फार महत्त्वाचा आहे. आत्मभान जागृत झालेल्या स्त्रियांना स्त्री-परिषदांच्या निमित्ताने एकत्र येऊन आपले प्रश्‍न विविध अंगांनी समजून घेण्यासाठी आणि ते समाजासमोर मांडण्यासाठी एक कणखर आणि विस्तृत व्यासपीठ मिळालंच; पण संघटनात्मक कार्याची पायाभरणी करीत स्त्री-सुधारणांना गतिमान करण्याचं सामर्थ्यही मिळालं.’
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातल्या स्त्री-परिषदा आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या स्त्री-परिषदांच्या गुणात्मक बाजूंबरोबरच परिषदांचं सामाजिक वातावरणात वजन निर्माण न होण्याची सूक्ष्म निरीक्षणंही लेखिकेनं उपसंहारातून व्यक्त केली आहेत. दलित आणि मुस्लिम स्त्रिया मुख्य प्रवाहातल्या चळवळींपासून अजूनही दूर आहेत, याबद्दलही लेखिकेनं निरीक्षणं नोंदवली आहेत. अत्यंत परिश्रमपूर्वक घेतलेला हा स्त्री-परिषदांचा मागोवा, स्त्री-प्रश्‍नांच्या आणि एकूणच स्त्री-जीवनाच्या संदर्भात आजही मौलिक ठरणारा आहे.

पुस्तकाचं नाव - स्त्री-परिषदांचा इतिहास
लेखिका - डॉ. स्वाती कर्वे
प्रकाशक - अभिजित प्रकाशन, पुणे
    (०२०-२४४९७७४८)
पृष्ठं - २८० / मूल्य - ३०० रुपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com