विज्ञानधर्मी, समाजशील बुद्धिमतीची जीवनगाथा

विज्ञानधर्मी, समाजशील बुद्धिमतीची जीवनगाथा

भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विज्ञानाच्या दोन शाखांमध्ये नोबेल पारितोषिक मिळवून जगद्विख्यात झालेल्या मेरी क्‍युरीचं जीवनचरित्र लिहिताना लेखक संजय कप्तान यांनी आपल्या लेखनामागच्या प्रेरणा आणि दृष्टिकोन या गोष्टी सुरवातीलाच मनोगतात स्पष्ट केल्या आहेत. त्यात त्यांनी जे लिहिलं आहे, ते नक्कीच विचार करायला लावणारं आहे. मेरीचं चरित्र लिहिताना तिच्या कार्यकर्तृत्वाचा काळ, तेव्हाचं वास्तव विचारात घेणं त्यांना आवश्‍यक वाटलं. त्या काळाच्या पार्श्वभूमीवर तिचं कार्य आणि त्याला लाभलेली जगन्मान्यता अधिकच झळाळून उठते. अशा या थोर विदुषीच्या कार्याचा आढावा घेताना विज्ञान क्षेत्रात तिनं घडवून आणलेली क्रांती लेखकाला जेवढी महत्त्वाची वाटते, तेवढंच या विदुषीमुळं समाजमनात, समाजाच्या विचारप्रक्रियेत घडून आलेलं स्थित्यंतरही त्यांना मोलाचं वाटतं आणि म्हणूनच त्याची खास नोंद त्यांना करावीशी वाटली. मेरी क्‍युरीसारख्या थोर स्त्रियांनीच स्त्रीला प्रतिष्ठा मिळवून दिली. पुरुषांच्या बरोबरीनं आपलं स्थान निर्माण केलं. कोणत्याही बाबतीत स्त्री पुरुषांच्या तुलनेत कमी नाही, हे तीक्ष्ण बुद्धीच्या मेरी क्‍युरीनं सिद्ध केलं. समाजाप्रतीचं तिचं हे योगदान लेखकाला अतिशय भावलं.

एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा मेरीच्या कार्यकर्तृत्वाचा काळ. रशियाच्या जुलमी सत्तेखाली पारतंत्र्यात पोलंड पिचत होता. पोलिश भाषेलाही बंदी होती. पुरुषप्रधान संस्कृतीमुळं स्त्रीशिक्षणाला महत्त्व नव्हतं. स्त्रियांना विज्ञानाच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं राज्यकर्त्यांचं आणि समाजधुरिणांचं धोरण होतं. साहजिकच विज्ञान क्षेत्रात प्रवेश होणंच अशक्‍यप्राय होतं. अशाही परिस्थितीत मेरीमध्ये विज्ञानाची मूल्यं रुजवण्याचं बहुमोल कार्य तिच्या वडिलांनी केलं. विज्ञान, गणित, संशोधन यांचा ध्यास घेणारी मेरी आणि तिच्यासारखाच तीव्र बुद्धिमत्तेचा विज्ञानप्रेमी, संशोधनाला वाहून घेतलेला तिचा उदारमतवादी सहचर ही जमेची बाजूही लेखकानं प्रभावीपणे मांडली आहे. स्त्रीसंशोधक म्हणून विज्ञानक्षेत्रात तिनं आपला स्वतंत्र ठसा उमटवला. नवीननवीन शोधांचा आयुष्यभर पाठपुरावा केला. आपलं संशोधन समाजोपयोगी व्हावं, यासाठी कष्टांची तमा न बाळगता अथक प्रयत्न ती करत राहिली. स्त्रीचं समाजातलं दुय्यम स्थान हटवून मेरीनं तिला स्वयंप्रज्ञेचं अधिष्ठान मिळवून दिलं. ध्येयपूर्तीसाठी मेरीनं आणि पिअरेनं वैयक्तिक लाभाची अपेक्षा न ठेवता आयुष्यभर अविश्रांत धडपड केली. पिअरेच्या जोडीनं पाहिलेल्या रेडियमच्या प्रयोगशाळेचं स्वप्न साकारण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतरही तिनं अमेरिकेचा दौरा केला. तिथं मिळवलेलं अर्थसाह्य आणि तिच्या वैज्ञानिक शोधांना मिळालेली जगन्मान्यता यामुळे तिची पुढची वाटचाल, जन्मभूमीसाठीचं योगदान या गोष्टी सुलभ झाल्या.

पोलंडला युद्धोत्तर मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर पोलंडच्या विकासासाठी प्रयत्न करण्याच्या तिच्या निर्धारातून तिचं देशप्रेम व्यक्त होतं. रुग्णसेवेसाठी उपयोगात आणण्याच्या दृष्टीनं तिने रेडिओलॉजी आणि क्ष-किरणांचा वापर केला. व्यापारी उपयोगासाठी रेडॉन वायूच्या संशोधनाचा प्रयोगही तिच्या सामाजिक व्यक्तिमत्त्वाच्या पैलूचंच दर्शन घडवतो. युद्धकाळातही रॉंटजेनच्या क्ष-किरणांचा वापर सैनिकांच्या जखमांचं नेमकं स्थान निश्‍चित करण्यासाठी होऊ शकेल, या विचारानंही त्याचं संशोधन वेगानं करण्यावर तिनं दिलेला भर आणि रेडिओलॉजिकल कार आणि स्थानकं यांच्या निर्मितीच्या प्रकल्पासाठी निधी गोळा करण्यासाठी तिनं केलेले प्रयत्न हे तिची विज्ञाननिष्ठा आणि सामाजिक निष्ठा यांच्यात असलेल्या अतूट नात्याचंच द्योतक आहेत. मेरीच्या आयुष्यातल्या प्रमुख घटना आणि त्यांचा काळ ठळकपणे अधोरेखित होण्यासाठी त्यांना वेगळ्या चौकटी दिल्यामुळं लेखकाचा हेतू चांगल्या प्रकारे साध्य झाला आहे.

विज्ञाननिष्ठ अशा या आदर्श जोडप्यानं आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्याची कशी काळजी घेतली किंवा लाभलेल्या अल्पकालीन वैवाहिक जीवनाचा आनंद कसा घेतला, यावरही लेखकानं प्रकाश टाकला आहे. "मेरी आणि पिअरे एकमेकांना पूरक होते. पती-पत्नींचं त्यांचं नातं घट्ट प्रेमाचं होतं. ते एकमेकांचे खरे सहायक आणि मित्र होते. संशोधन, विवेचन, मनन, चर्चा यांत कधीच खंड नसे. सायकलवरून स्वच्छंद फिरणं हा त्यांचा आनंद घेण्याचा आवडीचा उद्योग होता. रात्रीच्या जेवणानंतर दूरपर्यंत पायी फिरत प्रयोगाविषयी चर्चा करणं, हा सर्वांत आवडता छंद होता,' असं लेखकानं लिहिलं आहे.
करिअर करण्याच्या हव्यासापायी किंवा लहानमोठ्या चुकांमुळं कुटुंबं उद्‌वस्त झालेली पाहण्यात येतात. अशा वेळी एकमेकांना समजून घेणारं, परस्परांच्या गुणांचा आदर करणारं, ज्याचं श्रेय त्याला देणारं, एवढंच नाही, तर जोडीदाराच्या प्रगतीसाठी झटणारं क्‍युरी दांपत्य त्यामुळंच यशाची अत्युच्च पायरी गाठू शकलं, याविषयी संदेह राहत नाही. असा आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींचे कर्तृत्व त्यांच्यापुरतं कधीच सीमित राहत नाही. एकूणच समाजात रूढ असलेले अनिष्ट विचार दूर करण्याचं आणि त्याला उत्क्रांतीच्या दिशेनं वळवण्याचं सामर्थ्य निर्माण होतं आणि विचारांच्या परिवर्तनाचं मोठं काम घडून येतं. स्त्रीशिक्षणाविषयीची अनास्था दूर करण्याचं आणि स्त्रीचं स्थान उंचावण्याचं काम ज्या ज्या व्यक्तींमुळं झालं त्यामध्ये मेरी क्‍युरीचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल. "मेरी क्‍युरीचं चरित्र वाचून देशातल्या शेकडो नव्हे, हजारो बुद्धिमती, प्रतिभावान आणि कल्पनेचं देणं लाभलेल्या मुलींना काही तरी वेगळं करण्याची प्रेरणा मिळावी याचसाठी हा प्रयास. स्त्रीत्व हे कमकुवतपणाचं लक्षण नाही आणि पुरुषार्थ हा इतरांवर अन्याय करण्यात नाही हे समजून घेण्यासाठी हा प्रयत्न. जात-धर्म-वंश-लिंग-भाषा या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन सर्व माणसं समान आहेत हे केवळ सांगण्यासाठी नव्हे, तर आचरणात आणण्यासाठी मेरी क्‍युरीचं हे चरित्र लिहिलं,' असं लेखक कप्तान यांनी स्पष्ट केलं आहे.पुस्तक वाचून लेखकाचा हेतू साध्य होईल, याची खात्री वाटते.

पुस्तकाचं नाव :
मेरी क्‍युरी
लेखक : संजय कप्तान
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे  (०२०-२४४०५६७८)
पृष्ठं : १२८ /
मूल्य : १४० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com