'सौंदर्य आणि अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते'

Griha Lakshmi Magzines.jpg
Griha Lakshmi Magzines.jpg

आपल्याकडे सरकारकडून प्रत्येक आरोग्य केंद्रात बाळांसाठी आईचे दूध बाळासाठी सर्वोत्तम आहार आहे अशा जाहिराती आपण पाहतो. हे सगळं असताना महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करताना असुरक्षित व अस्वस्थ वाटते या विषयावर आपल्याकडे चर्चा होत नाही. परंतु त्याच्याविषयी कोणी भूमिका घेऊन जनजागृती करत असेल तर चार चौघे त्या विरोधात उभे राहतात. अशीच घटना केरळमध्ये गेल्या मार्च महिन्यात घडली. ‘मातांनो केरळवासीयांना सांगा, कृपया रोखून पाहून नका आम्हाला स्तनपान करू द्या’ अशा ओळींसह ‘गृहलक्ष्मी’ मासिकाच्या मुखपृष्ठावरील फोटोने सर्वांचच लक्ष वेधलं होतं.  ज्यानंतर या मासिकावर अनेकांनीच आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं. किंबहुना न्यायालयात या मासिकाविरोधात एक याचिकाही दाखल करण्यात आली. पण, आता मात्र केरळ उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

 हे छायाचित्र प्रकाशित झाल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला होता. तसेच हे छायाचित्र कामुक असून, धार्मिक आणि सांप्रदायिक भावना दुखावणारे असल्याचे आरोप करण्यात आले होते. या छायाचित्राविरोधात केरळमधील कोल्लमच्या सीजेएम कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. तसेच गृहलक्ष्मी या मासिकाविरोधात पॉक्सो कायदा आणि जुवेलनाइल जस्टिस अॅक्टच्या कलम 45 आणि महिला अश्लीलता प्रतिनिधित्व अधिनियम 1986 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही याचिका दाखल करणारे वकील विनोद मॅथ्यू यांनी म्हटले होते की, हे छायाचित्र खूप कामूक असून, महिलांना कमीपणा दाखवणारे आहे. तसेच ख्रिश्चन महिलेने मंगळसूत्र आणि कुंकू लावण्यालाही आक्षेप घेण्यात आला होता.   

'गृहलक्ष्मी' या मल्ल्याळम मॅगझिनच्या कव्हर पेजवर स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोला आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्याला केरळ हायकोर्टाने चपराक लगावली आहे. 'सौंदर्य आणि अश्लीलता ही पाहणाऱ्याच्या नजरेत असते' असं सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.'एकासाठी जे आक्षेपार्ह आहे, ते दुसऱ्यासाठी कलात्मक असू शकतं. एखाद्या व्यक्तीला जे अश्लील वाटतं, त्यात दुसऱ्याला सौंदर्य दिसू शकतं. शेवटी सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या नजरेत असतं' असं सांगत जस्टिस अँटनी डॉमिनिक, दामा शेषाद्री नायडू यांच्या खंडपीठाने फेलिक्स एमए यांची याचिका फेटाळून लावली.'मॅगझिनच्या कव्हर पेजवर असलेल्या स्तनपान करणाऱ्या मॉडेलच्या फोटोमध्ये काहीही बिभत्स किंवा आक्षेपार्ह नाही. राजा रवी वर्मांसारख्या कलाकारांच्या चित्रांकडे आम्ही ज्या नजरेने पाहतो, त्याच नजरेने आम्ही या फोटोकडे पाहिलं. जसं पाहणाऱ्याच्या नजरेत सौंदर्य असतं, तशीच अश्लीलताही असते' असं निरीक्षण खंडपीठाने नोंदवलं. 

'गृहलक्ष्मी’ या मासिकाच्या मुखपृष्ठावर गिलू जोसेफ ही मॉडेल झळकली होती. ज्यात काहीच गैर नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली होती. "स्तनपान हे एका आईला मिळालेलं वरदान आहे. जर एखादी महिला आपल्या बाळाला दूध पाजत असेल तर त्यात लाज वाटण्याची गोष्ट नाही. या गोष्टीकडे लैंगिकदृष्ट्या पाहणं चुकीचं आहे. हे अयोग्य आहे, असा विचार तुम्ही का करता? जर तुम्ही तुमच्या बाळाला सार्वजनिक ठिकाणी दूध पाजत असाल तर कोणता देव तुमच्यावर नाराज होईल?" असं गिलूने फेब्रुवारीत दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. या फोटोमुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला होता. स्तनपानाचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मॉडेलला घेण्याची काय गरज होती? विशेष म्हणजे तिच्या कडेवरचं बाळही तिचं नाही, मग या फोटोशूटचा उद्देश नेमका काय? असे सवाल उपस्थित करण्यात आले होते.

खरं तर भारतात पहिल्यांदाच 'गृहलक्ष्मी’ या मासिकाने हा फोटो कव्हर पेज म्हणून वापरला होता. जगात या अगोदर अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या 'टाईम' मासिकाने स्तनपानाविषयी कव्हर पेज फोटो वापरला होता. त्यामध्ये एक महिलेला आपल्या तीन वर्षाच्या मुलाला दूध पाजताना दाखविले आहे. हे कव्हर पेज प्रसिद्ध झाल्यानंतर प्रचंड वादविवाद झाले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी स्तनपान आणि मुलांचे पालनपोषण करण्याचा मुद्दा चर्चेत आला. गेल्यावर्षी इंग्लंडमध्ये एका म्युझियममध्ये एका महिलेने आपल्या एका वर्षाच्या बाळाला दूध पाजण्यासाठी थोडा ड्रेस ओपन केल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांनी तिला तिथे स्तनपान करण्यास विरोध केला. त्यानंतर ही गोष्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्यानंतर या गोष्टीला पाठिंबा मिळत गेला. 

विकसित देशांमध्ये कुठेही स्तनपान करणे हा महिलेचा मूलभूत अधिकार आहे. भारतातमध्ये अजून तरी असा कायदा अस्तित्वात नाही. हा विषय गंभीर आहे. यावर चर्चा झाली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी महिलांना स्तनपान करताना असुरक्षित वाटू नये असे वातावरण समाजात तयार करणे गरजेचे आहे. परुषांनीही या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला तर एक सशक्त समाज व्यवस्था निर्माण करू शकतो.      


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com