क्षण मुक्ततेचा (डॉ. प्रशांत पाटील)

dr prashant patil
dr prashant patil

पुरुषसत्ताक पद्धतीवर नेमकेपणानं भाष्य करणारी आणि स्त्रीच्या मुक्ततेचा एक क्षण अधोरेखित करणारी "ज्यूस' ही शॉर्टफिल्म अतिशय उत्तम आहे. "मसान' या चित्रपटामुळं प्रसिद्धीच्या झोतात आलेले नीरज घेवन यांनी दिग्दर्शित केलेली ही शॉर्टफिल्म. समाजव्यवस्थेवर अतिशय तरलपणे भाष्य करणाऱ्या या शॉर्टफिल्मविषयी...

पुरुषसत्ताक पद्धती आपल्या भारतीय समाजमनावर किती खोलवर रुजली आहे, हे आपण सर्वच जाणतो. पेप्सी या जगातील दोन क्रमांकाच्या शीतपेयं बनवणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी जेव्हा त्या पदावर पोचल्या, तेव्हा त्या अमेरिकेतील आपल्या घरी पोचल्या आणि त्यांच्या आईनं दरवाजा उघडला. आईला त्यांनी अत्यानंदानं सांगितलं, की मी आज कंपनीची मुख्य अधिकारी झाले, त्यावर त्यांची आई म्हणाली ः ""ते सर्व ठीक आहे, आता तुझा नवरा येईलच इतक्‍यात. त्याला काय लागेल ते बघ.'' नूयी यांच्यासारख्या मातब्बर स्त्रीबाबत घडलेली, सर्वाधिक प्रगत अमेरिकेत घडलेली ही घटना स्वतः त्यांनी सांगितली होती, तेव्हा मीदेखील अचंबित झालो होतो. "ज्यूस' ही शॉर्टफिल्म बघताना ही घटना आठवली म्हणून ती मुद्दामहून प्रथम सांगितली.

"ज्यूस' या शॉर्टची सुरवातच मुळी हिलरी क्‍लिंटन या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिकन अध्यक्षपदाची निवडणूक पराभूत झाल्या आहेत, या बातमीनं होते. एका घरात फॅमिली गेटटुगेदर चालू आहे. सगळे पुरुष हॉलमध्ये जमलेले आहेत, ते हास्यविनोद करत आहेत, राजकारणाबद्दल, ऑफिसमधल्या राजकारणावर चर्चा सुरू आहे. ब्रिजेशसिंग (मनीष प्रकाश चौधरी) हे यजमान असून मित्रांसोबत ड्रिंक घेत आहेत. मंजूसिंग (शेफाली शहा) ही त्यांची पत्नी तिथं खाल्लेल्या चिकनच्या प्लेट्‌स साफ करून स्वयंपाकघरात निघाली आहे. तेवढ्यात एक मित्र आपल्या गर्भवती पत्नीसोबत येतो. ""तिला आत घेऊन जा, ती काही नवीन खायला बनवायला शिकली आहे. ते जरा बघा,'' सांगतो. पत्नी नोकरी करणारी असली, तरी पतीच्या लेखी तिची किंमत तिच्या हातच्या चवीवरून जोखली जाते.

उन्हाळ्याचे दिवस आहेत. पुरुषमंडळी बसली आहेत त्या बैठकीच्या खोलीत कूलर आहे. त्यात पाणी भरण्याचं कामदेखील मंजू करते. सर्व स्त्रिया मात्र छोट्याशा स्वयंपाकघरात दाटीवाटीनं उभं राहून बाहेर काय हवं नको ते बनवण्यात, त्याची तयारी करण्यात मग्न आहेत आणि त्यांना आपापसात गप्पा मारण्यात समाधान मानावं लागत आहे. ती गर्भवती महिला ""आता मूल झाल्यावर नोकरी सोडावी लागेल,'' असं म्हणते, तेव्हा ""ये कौनसी किताब में लिखा है, की या तो नोकरी करो या बच्चे पालो, दोनों काम एकसाथ नही कर सकते,'' असं उत्तर येतं. आत फॅन चालू होत नाही. मंजू पतीला टेबलफॅन चालू करून द्या म्हणून सांगते, तर तो त्याकडं दुर्लक्ष करत हास्यविनोद करत बसला आहे. मंजू शेवटी तो स्वतः चालू करायचा प्रयत्न करते, परंतु तो बंद पडतो. आतापर्यंत शांत राहणारी मंजू इथं फक्त एक संवाद म्हणते ः ""डायपर बदलना हो तो वो भी हमेही करना पडेगा ना? लोगोंके हातसे तो रिमोट छूट जायेंगे.'' जणू प्रत्येकाच्या घरातलाच हा संवाद चालू आहे इतका तो परिणाम साधून जातो. सर्व स्त्रिया एकाच खोलीत असल्या, तरी नोकर असलेल्या परबतीयाला वेगळ्या ग्लासातून चहा दिला जातो, म्हणजे इथंही भेद आहेच.

या चौदा मिनिटांच्या शॉर्टफिल्ममध्ये अनेक प्रतलांवर कहाणी चालू आहे. मुलांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून त्यांना एका खोलीत अडकवून ठेवलं आहे. चार मुलगे आणि एक मुलगी आहे. इथंही ती मुलगी जेव्हा व्हिडिओ गेम खेळू पाहते, तेव्हा मुलगा तिला ""हा गेम माझा आहे,'' म्हणून शांत करतो. एक आई या मुलीला ""सर्व मुलांना जेवायला वाढ,'' म्हणून सांगते आणि मुलगे खेळत राहतात. अगदी लहानपणापासूनच मुलगी दुय्यम आणि मुलगा श्रेष्ठ अशी एकंदर वागणूक स्त्रियाच देताना दिसतात, तेव्हा काही प्रश्न अप्रत्यक्षरित्या विचारले आहेत, असं वाटत राहतं. मुलं बाहेरच्या खोलीत जाऊ पाहतात, तेव्हा पती ""अगं, यांना सांभाळ आणि काही खायला बनवून दे,'' अशी फर्माईश करत राहतो. संपूर्ण कहाणीत तो जागेवरून उठतदेखील नाही. फक्त आणि फक्त ऑर्डर देत राहतो. ती मात्र सतत काहींना काही काम करीत आहे.
छोट्याशा स्वयंपाकघरात अनेक स्त्रिया उकाड्यानं हैराण आपल्या पदरानंच घाम पुसत वारा घेत काम करत उभ्याच आहेत. गॅस चेंबरसारखं तिथलं वातावरण झालंय. हळूहळू ताण वाढतच आहे. तो अगदी असह्य होण्यापर्यंत जातो. पती सतत काही तरी मागतोय, ""मंजू मंजू'' म्हणून हाक मारतोय. ही आता आतून खदखदत आहे. गॅसवर काही बनवत असलेली ती सरळ तो बंद करते आणि फ्रिजमधून ज्यूस काढून ग्लासात घेते. सरळ खुर्ची ओढत पुरुष बसलेल्या हॉलमध्ये येते. स्त्रिया "काय झालं,' म्हणून बघतात; मात्र आपल्या स्वयंपाकघराच्या दारातून त्या काही ती "वेस' ओलांडत नाहीत, की तिच्यामागोमाग तिला पाठिंबा म्हणून बाहेरदेखील येत नाहीत. इतका वेळ चाललेला गोंधळ, आवाज एकदम शांत होतो. ती कूलरसमोर खुर्ची टाकून बसते, निःश्‍वास सोडते. हळूच ज्यूस पीत पतीच्या डोळ्याला डोळा भिडवते.

शेफाली छाया-शहा मंजूच्या भूमिकेत बाहेरून शांत ते आतून खदखदत जात कडेलोट झाल्यावर शेवटची ठाम निर्णायक भूमिका घेणारी कृती यात होत जाणारा बदल अत्यंत सहज आपल्यापर्यंत पोचवते. या अभिनेत्रीनं सातत्यानं अप्रतिम भूमिका केल्या आहेत; परंतु त्याचं पाहिजे तेवढं मोल केलं गेलं नाही, याची खंत वाटते. बाकीच्या भूमिकांतदेखील सर्वांनीच कमाल केली आहे. शॉर्टफिल्ममध्ये नावाजलेले, मातब्बर कलाकार आहेत. मनीष चौधरी (पती), किरण खोजे (परबतीया), श्रीधर दुबे (शुक्‍लाजी) यात उल्लेखनीय.

"मसान' चित्रपट केल्यानंतर नीरज घेवन या मराठी दिग्दर्शकानं बऱ्याच काळानं ही शॉर्टफिल्म बनवली होती. (नीरज हे हैदराबाद इथं वाढले आहेत. आई-वडील मराठी.) नीरज यांचं सर्वाधिक कौतुक करावं लागेल- कारण अत्यंत साध्या आणि रोजच्या जीवनात घडणाऱ्या घटना घेऊन ही कथा मांडली आहे. स्त्रियांना घरात आणि जगात कसं वागवलं जातं, हे ध्वनी आणि दृश्‍य यांचा वापर करत, स्त्री आणि पुरुष यांचं भिन्न वातावरण दाखवत त्यांनी दाखवलं आहे. कथा नीरज घेवन आणि रंजन चांडेल यांनी लिहिलेली असल्याने, नायिका आपली स्त्री-पुरुष समानतेची भूमिका दाखवण्यासाठी काही दारूचा ग्लास वगैरे पीत नाही. ती फक्त शांत, बेदरकारपणे बसते आणि चौकट न मोडता नुसत्या साध्या ज्यूस पिण्याच्या कृतीनं एक भक्कम आणि गंभीर परिणाम करणारं आपलं म्हणणं अधोरेखित करते.

सिलवेस्टर फॉंसेका यांचं छायाचित्रण विषयाला अनुसरून वातावरण दाखवतं. संपूर्ण फिल्ममध्ये वापरलेला एक गडद डार्क रंग जणू पात्रांची मनोवस्था दाखवतो आणि तिथलं वातावरण अधोरेखित करतो. नितीन बैद यांचं संकलन कथा प्रवाही ठेवण्यात मदत करतं. अलोकनंदा दासगुप्ता यांचं संगीत अतिशय समर्पक.

फार काही न बोलता, नुसत्या कृतीतून दिग्दर्शक आणि कलाकारांनी जी काही कमाल केली आहे, ती जरूर अनुभवायला हवी. शेवटच्या दृश्‍यात पत्नी आपल्या डोळ्यांनी बोलते आणि पती ते डोळ्यांनी ऐकतो, हे आपल्याला जाणवतं तेव्हा आपण मनातून दाद दिल्याशिवाय राहू शकत नाही. 2018 च्या बेस्ट शॉर्ट फिल्मसाठीचं (फिक्‍शन) फिल्मफेअर आणि शॉर्टफिल्ममध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं फिल्मफेअर शेफाली शहा यांना या शॉर्टफिल्मसाठी मिळालं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com