पर्जन्यवेध (डॉ. रंजन केळकर)

dr ranjan kelkar write monsoon article in saptarang
dr ranjan kelkar write monsoon article in saptarang

यंदा देशभरात मॉन्सून सरासरीच्या 97 टक्के बरसेल, अशी "आनंदवार्ता' हवामानशास्त्र विभागानं नुकताच जाहीर केली. या अंदाजाकडं नेमकं कसं बघायचं, हे अंदाज अचूक ठरण्याचं किंवा चुकण्याचं प्रमाण किती असतं, त्याचं महत्त्व किती आणि सर्वसामान्यांनी, शेतकऱ्यांनी कोणती तयारी करायची, कोणती खबरदारी घ्यायची आदी सर्व गोष्टींबाबत विवेचन.

आगामी मॉन्सूनचा पाऊस समाधानकारक राहील, असा दीर्घ अवधी अंदाज हवामानशास्त्र विभागानं नुकताच व्यक्त केला आणि भारतीय जनतेच्या मनातली एक चिंता दूर झाली. मॉन्सून दर वर्षी येतो खरा; पण प्रत्येक वेळी तो जणू एक नवा अवतार धारण करून येतो आणि म्हणून मॉन्सूनविषयीची उत्सुकता कधी न संपणारी आहे. तो वेळेवर येईल की उशिरा, शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचं संकट तर ओढवणार नाही ना, एखादं चक्रीवादळ निर्माण होऊन मॉन्सून भलतीकडंच तर जाणार नाही ना, यंदा दुष्काळ तर पडणार नाही ना, अशा नाना शंका लोकांच्या मनात येत राहतात. त्याशिवाय, एल्‌ निनो काय म्हणतोय, हा एक नवीनच प्रश्न लोक आता विचारू लागले आहेत. खरं तर, मॉन्सूनविषयी आपलं सामान्यज्ञान एकसारखं वाढत असलं, तरी त्याविषयी अजूनही आपण किती अज्ञानी आहोत याची जाणीवही निसर्ग आपल्याला सतत करून देत असतो.

मॉडेल्सच्या आधारावरचा अंदाज
या वर्षी मॉन्सूनचं पर्जन्यमान सरासरीच्या 97 टक्के राहील, हे हवामानशास्त्र विभागानं सांगितलं ते मॉडेल्सच्या आधारावर. हल्ली मॉडेल हा शब्द हवामानशास्त्रीय परिभाषेचा एक अविभाज्य भाग झाला आहे. जणू मॉडेल काय म्हणत आहे हे ते आधी बघतात आणि मग ते लोकांशी बोलतात. मॉडेल म्हणजे प्रतिकृती. आपल्याला स्वतःचं घर बांधायचं असतं, तेव्हा आपण आधी आर्किटेक्‍टकडं जातो. आपल्या मनातली स्वप्नं ओळखून आर्किटेक्‍ट एक मॉडेल बनवतो. ते बहुदा एक कागदी चित्र असतं किंवा कागदाचंच बनवलेलं असतं. त्यावरून आपलं घर प्रत्यक्षात कसं दिसेल, याची आपल्याला काहीशी कल्पना येते. अगदी याच प्रकारे आगामी मॉन्सून कसा असेल, याची कल्पना करण्यासाठी हवामानशास्त्रज्ञ मॉडेलचा आधार घेतात; पण पृथ्वीभोवतीचं वातावरण हे अनेक वायूंचं एक अदृश्‍य मिश्रण आहे. त्याचं कागदी मॉडेल बनवता येत नाही. हवामानशास्त्रज्ञ वातावरणाची प्रतिकृती तयार करतात ती समीकरणं वापरून. ही समीकरणं वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही गतीक समीकरणं असतात. त्यांना वातावरणाच्या सद्यःस्थितीची काटेकोर माहिती पुरवली जाते आणि ती समीकरणं सोडवून दोन-तीन महिन्यानंतर काय होईल, हे शोधून काढलं जातं. सांख्यिक समीकरणं वेगळी असतात. त्यात मागच्या पन्नास-साठ वर्षांत मॉन्सूनची वागणूक कशी होती हे विचारात घेतलं जातं आणि आजवरची परिस्थिती पाहून आगामी हंगामात मॉन्सून कसा वागेल, याचा वेध घेतला जातो. मात्र, शेवटी कोणतंही मॉडेल वापरलं, तरी ते वास्तवाची बरोबरी कधीच करू शकत नाही. मॉडेल आणि वास्तव यांत थोडा तरी फरक राहतोच.

हवामानशास्त्रज्ञ मॉडेल्सचा उपयोग करतात, तेव्हा ते टक्केवारीची भाषा बोलतात. पाऊस सरासरीपेक्षा इतके टक्के कमी राहील किंवा इतके टक्के जास्त असेल, अशा प्रकारचे अंदाज ते देत असतात. सर्वसामान्य लोकांनाही रोजच्या जीवनात तुलना करणं आवडतं. "कालच्यापेक्षा आज मी बरा आहे,' असं एखादा आजारी माणूस म्हणतो, किंवा "गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचं पीक चांगलं आहे,' असं शेतकरी म्हणतो. मात्र, हवामानशास्त्रज्ञ टक्केवारी वापरतात त्यामागं आणखी एक कारण आहे. हे कारण म्हणजे भारतात मॉन्सूनच्या पावसाचं प्रमाण जागोजागी निराळं आहे. मॉन्सूनचा सरासरी पाऊस मेघालयात काही ठिकाणी एक हजार सेंटिमीटर, कोकणात अडीचशे सेंटिमीटर, तर राजस्थानात पन्नास सेंटिमीटर असा पडतो. म्हणून चांगल्या किंवा विपरीत मॉन्सूनच्या व्याख्या खूप सापेक्ष असू शकतात. भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांवरचं पावसाचं प्रमाण सेंटिमीटरमध्ये न सांगता ते टक्केवारीत सांगणं अधिक सोयीचं आणि अर्थपूर्ण ठरतं.

पूर्वानुमानाचे टप्पे
नैर्ऋत्य मॉन्सूनचं दीर्घकालीन पूर्वानुमान हवामानशास्त्र विभागाकडून दोन टप्प्यांत केलं जातं. एप्रिलमध्ये पहिलं आणि जूनच्या मध्यावर दुसरं. नुकतंच जाहीर झालेलं पूर्वानुमान पहिल्या टप्प्याचं होतं. त्यात मॉन्सूनचं संभाव्य पर्जन्यमान सरासरीच्या तुलनेत 97 टक्के राहील, हा एकच आकडा दिला गेला. जूनच्या पूर्वानुमानात देशाच्या चार विविध प्रदेशांत पाऊस कसा असेल आणि जून ते सप्टेंबरदरम्यानच्या चार महिन्यांत तो कसा राहील, याचं विवरण देण्यात येईल. त्याशिवाय मे महिन्याच्या मध्यावर एक पूर्वानुमान दिलं जाईल- जे मॉन्सूनच्या केरळमधल्या आगमनाच्या तारखेविषयी असेल.

मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचं पाच विविध श्रेणींमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्या टक्केवारीवर आधारित आहेत. मॉन्सूनचं पर्जन्यमान सरासरीच्या शंभर टक्के असलं, तरच ते चांगलं असेल असं नाही. ते सरासरीच्या 96 ते 104 टक्के असलं, तरी ते सामान्य असल्याचं म्हटलं जातं. 90 ते 96 टक्के या श्रेणीला "सामान्याहून कमी' असं गणलं जातं. 104 ते 110 टक्के या श्रेणीला सामान्याहून अधिक असं गणलं जातं. 110 टक्‍क्‍यांहून अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी आणि 90 टक्‍क्‍यांहून कमी पाऊस म्हणजे अनावृष्टी. यंदाचा पाऊस 97 टक्के असेल, याचा अर्थ तो सामान्य श्रेणीतला असेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय
मॉन्सून हा भारतीयांसाठी फार जिव्हाळ्याचा आहे. कारण आपल्या पाण्याच्या गरजा भागवणारा तो एकमेव स्रोत आहे आणि तरीही मॉन्सून भारतापुरता मर्यादित आहे, असं आपण समजू नये. त्याचे सहसंबंध जगभर पसरलेले आहेत. हे सहसंबंध ओळखायचे नवनवीन प्रयत्न हवामानशास्त्रज्ञ करत असतात. मॉन्सूनचा संबंध संपूर्ण युरेशियन खंडाच्या हवामानाशी आहे, त्यावर होणाऱ्या हिमपाताशी आहे. मॉन्सूनचा संबंध हिंद महासागरावर होणाऱ्या तापमानाच्या चढ-उताराशी आहे. आपल्यापासून खूप दूरवर असलेल्या प्रशांत महासागराच्या तापमानाशीसुद्धा मॉन्सूनचा संबंध आहे. यालाच आपण एल्‌ निनो आणि ला नीना या स्पॅनिश भाषेतल्या नावांनी ओळखतो.
दक्षिण अमेरिकेत पेरू देशाच्या पश्‍चिमेकडचा प्रशांत महासागर कधी कधी तापू लागतो, ज्याला एल्‌ निनो हे स्पॅनिश नाव आहे. त्याचा भारतावरच्या मॉन्सूनच्या पर्जन्यमानावर विपरीत परिणाम होत असल्याचा इतिहास आहे. म्हणून एल्‌ निनो भारतासाठी धोक्‍याचा कंदील मानला जातो. त्याउलट ला निना निर्माण होणं म्हणजे प्रशांत महासागर सरासरीपेक्षा थंड होणं. ला नीना निर्माण झाल्यास आपला मॉन्सून चांगला असतो, असा अनुभव आहे. म्हणून मॉन्सूनचं दीर्घकालीन पूर्वानुमान देताना एल्‌ निनो आणि ला निना यांची परिस्थिती काय आहे, हे विचारात घेतलं जातं. आता एल्‌ निनो आणि ला नीना या दोन-तीन वर्षांत एकदा उद्‌भवणाऱ्या घटना आहेत. मॉन्सून मात्र दर वर्षी नियमितपणे येतो. या वर्षी एल्‌ निनो आणि ला निना या दोन्ही प्रक्रिया तटस्थ आहेत. त्यामुळं मॉन्सूनवर त्यांचा प्रभाव नाही. मॉन्सून जणू आपलं भवितव्य ठरवायला मोकळा आहे. या वर्षीचा मॉन्सून सामान्य ठरेल, अशी आपल्याला आशा करायला हरकत नाही.

वैज्ञानिक आणि तांत्रिक मर्यादा
मॉन्सूनच्या दीर्घअवधी पूर्वानुमानाच्या संदर्भात आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे अशा पूर्वानुमानाच्या अचूकतेला काही वैज्ञानिक आणि तांत्रिक मर्यादा असतात. मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या 97 टक्के पडेल, असं भाकीत केलं जातं, तेव्हा तो नेमका 97 टक्केच पडेल, अशी कोणी खात्री देऊ शकत नाही. त्यात "चूकभूल देणे-घेणे' हा एक भाग असतो, ज्याला वैज्ञानिक भाषेत "मॉडेल एरर' म्हणतात. हवामानशास्त्रज्ञ सध्या जे मॉडेल वापरत आहेत, त्याची "मॉडेल एरर' अधिक-उणे पाच टक्के आहे. म्हणजे यंदाच्या मॉन्सूनचा पाऊस 97 टक्के पडण्याची आशा असली, तरी तो सरासरीच्या 92 टक्के असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही गोष्ट मनात बाळगण्यात सुज्ञता आहे. अजून मॉन्सूनच्या आगमनाला दीड महिना आहे. तोवर उन्हाळा जाणवणार आहे. तो नेहमीपेक्षा अधिक तीव्रतेनं जाणवेल, असंही भाकीत केलं जात आहे. म्हणून मध्यंतरीच्या काळात आपण हवामानाविषयी सजग राहणं आवश्‍यक आहे.

अंदाजाची "ओळख' आणि खबरदारी
"कोसळत्या धारा, थैमान वारा, बिजलीची नक्षी अंबरात, कधी तू, रिमझिम झरणारी बरसात'... अशी रोमॅंटिक गाणी ऐकायला आणि बघायला छान वाटतात; पण "वीज पडून राज्यात सात शेतकऱ्यांचा मृत्यू' असे मथळे वाचायला मिळतात, तेव्हा मात्र आपल्या स्वप्नांच्या दुनियेतून आपण पुन्हा वास्तवात परततो. अशा प्रकारच्या बातम्या हल्ली वरचेवर येत राहतात, ही एक चिंतेची बाब आहे. गेल्याच रविवारी म्हणजे 15 एप्रिल रोजी राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसानं हजेरी लावली. त्या वेळी वीज कोसळल्यामुळं यवतमाळ जिल्ह्यात चार, सोलापूर जिल्ह्यात दोन, आणि लातूर जिल्ह्यात एक अशा एकूण सात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी होती. दुपारी चारच्या सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील वेणी बुद्रुक नावाच्या एका लहानशा खेड्यात पाऊस पडत असताना काही जण झाडाखाली थांबले होते. त्या झाडावर वीज कोसळली, तेव्हा चार जणांचा तिथंच मृत्यू झाला आणि चार गंभीर जखमी झाले.

एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रावर बहुतेक ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी येतात, ज्यात क्वचित हलक्‍याशा गाराही पडतात. त्यांना पूर्वी "वळवाचा पाऊस' असं म्हणायचे; पण आता त्याला "अवकाळी पाऊस' हे चुकीचं नाव मिळालं आहे. नाव चुकीचं आहे- कारण हा पाऊस म्हणजे निसर्गाचा कोप नसतो, त्यात दुर्दैवाचं लक्षण नसतं आणि तो अनपेक्षितही नसतो. त्याचं उचित पूर्वानुमानही हवामानशास्त्र विभागाकडून वेळोवेळी दिलं जात असतं.

आकाशातले बहुतेक ढग त्रासदायक नसतात. विपरीत हवामानाचा किंवा संकटाचा संकेत देणारा एकमेव ढग म्हणजे "क्‍युम्युलोनिम्बस' किंवा "सीबी.' हा एक अल्पकाळ टिकणारा; पण विनाश घडवणारा ढग आहे. तो सुरवातीस लहान दिसला, तरी काही मिनिटांतच तो एखाद्या उंच मनोऱ्यासारखा वाढतो आणि त्याचं वरचं टोक जमिनीपासून बारा-तेरा किलोमीटरपर्यंत किंवा त्याहूनही वरपर्यंत पोचतं. "सीबी' ढग इतका दाट असतो, की तो सूर्यप्रकाश परिवर्तित करतो आणि म्हणून तो दुरून पांढराशुभ्र दिसतो; पण त्याच्या अगदी खाली असलेल्या व्यक्तीला तो काळाकुट्ट दिसतो आणि आभाळ अगदी भरून आल्यासारखं वाटतं. "सीबी' हा एक वादळी मेघ असतो. तो जवळ असेल, तर त्यातून मेघगर्जना ऐकू येते आणि त्यातला विजेचा लखलखाट आकाशात दूरपर्यंत दिसतो. जमिनीवर वीज कोसळते ती याच ढगातून, म्हणून तो ओळखायला आपण शिकलं पाहिजे.

आकाशात वादळी मेघातून आधी वीज चमकताना दिसते आणि थोड्या वेळानंतर गडगडाट ऐकू येतो, याचं कारण म्हणजे प्रकाशाच्या गतीच्या तुलनेनं ध्वनीच्या प्रवासाची गती अत्यंत कमी असते. वीज चमकल्यानंतर किती उशिरानं गडगडाट झाला, यावरून वादळी मेघ आपल्यापासून किती दूर आहे याचा अंदाज बांधता येतो. हा विलंब जितका कमी तितका वादळी मेघ आपल्याजवळ आहे, असं समजून स्वतःच्या बचावासाठी उपाय करणं अतिशय महत्त्वाचं असतं. वादळी मेघाच्या शिरोभागी धन विद्युतभार जमतो, तर त्याच्या तळाशी ऋण विद्युत भारजमा होतो. हवेची विद्युतवाहक म्हणून पुरेशी क्षमता नसल्यामुळं वादळी मेघाच्या तळाखाली असलेल्या सर्व गोष्टींवर धन भार जमा होतो आणि तो त्या परिसरातील सर्वाधिक उंचीच्या वस्तूवर केंद्रित होतो. शेवटी ही वीज ढगातून जमिनीवर कोसळते.

शहरांत वीज पडण्याच्या घटना क्वचितच घडतात- कारण शहरांतल्या बहुतेक उंच इमारतींवर विद्युतवाहक बसवलेले असतात. खेड्यांत मात्र तशी व्यवस्था केलेली नसते. मुसळधार पावसापासून स्वतःला वाचवायला लोक एखाद्या झाडाखाली आश्रय घेतात. ते झाड त्याच्या परिसरातलं सर्वांत उंच झाड असेल, तर त्यावर वीज कोसळते आणि त्याखाली उभ्या असलेल्या लोकांच्या जीवावर बेततं. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वीज कोसळणार असल्याची पूर्वसूचना का मिळू शकत नाही, असा प्रश्न विचारला जाणं साहजिक आहे. त्याचं उत्तर हे आहे, की या वादळी मेघाचं आयुष्यमान फक्त एका तासाभराचं असते. तेवढ्यात तो उपग्रहाच्या किंवा रडारच्या दृष्टिक्षेपात येणं, तो किती वाढू शकेल याविषयी अंदाज बांधणं, कोणत्या ठिकाणी त्यातून वीज कोसळेल याची शक्‍यता वर्तवणं, त्या ठिकाणच्या जनतेला ती माहिती पोचवणं, आणि तिथं आपत्कालीन परिस्थितीचा सामना करायची यंत्रणा सज्ज करणं आदी सगळी प्रक्रिया एका तासाभराच्या अवधीत पूर्ण करणं ही गोष्ट निदान सध्या तरी कठीण आहे. म्हणून खेड्यांतल्या आणि गावांतल्या लोकांनी- आणि विशेषतः शेतात, उघड्यावर काम करणाऱ्यांनी, वादळी मेघाची लक्षणं ओळखायला आणि त्यापासून सावधान राहायला शिकलं पाहिजे. आकाशात अशा स्वरूपाचा ढग वाढत असताना दिसला, त्यातून मोठा गडगडाट ऐकू येऊ लागला, विजेचा लखलखाट दिसू लागला, तर शेतकऱ्यांनी शेतात काम करत राहू नये आणि फार उशीर होण्याआधी तिथून पळ काढणं हिताचं ठरेल. पावसात भिजून ओलेचिंब होणं परवडलं; पण उंच झाडाखाली आश्रय घेणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com