प्रगल्भ पत्रकारितेचा आदर्श (डॉ. सदानंद मोरे)

 प्रगल्भ पत्रकारितेचा आदर्श (डॉ. सदानंद मोरे)

इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर भगवंतराव पाळेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर इथं अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. बाबासाहेबांच्या या भाषणात (भावी) स्वराज्याच्या राज्यघटनेची बीजं असल्याचं ओळखणारा आणि तसं सूचितही करणारा पाळेकर हा पहिला पत्रकार होय. कोणत्याही पत्रकारानं आदर्श म्हणून पुढे ठेवावा, असा हा निःपक्ष आणि प्रगल्भ पत्रकार होता.

‘जागृती’ साप्ताहिकाचे पहिले दोन अंक भगवंतराव पाळेकर यांनी बडोद्यातल्या आर्यसुधारक छापखान्यातून घेतले; पण लवकरच अशा प्रकारचं ‘आउटसोर्सिंग’ आतबट्ट्याचं ठरेल हे त्यांच्या लक्षात आलं. पत्र आर्थिक दृष्टीनं चांगलं चालायचं असेल, निदान तोटा होऊ द्यायचा नसेल, तर स्वतःच्या मालकीचा छापखाना हवा असंही त्यांना वाटू लागलं. पण अवघं सहाशे रुपयांचं भांडवल जवळ असलेले पाळेकर नवा छापखाना कसा उभारू शकणार होते?
अशा वेळी पाळेकरांना यंदेशेठ यांची आठवण झाली आणि त्यांनी तडक मुंबईला जाणारी गाडी पकडली. यंदे यांना एकशे पंचवीस रुपये देऊन त्यांनी त्यांच्याकडून जुन्या पायका टाइपच्या पाच-सहा केसी खरेदी केल्या. आपल्या छापखान्यात खिळे जुळवायचं काम करणारा तरुण स्वतःचं वृत्तपत्र काढतोय, ही दामोदरराव यंदे यांच्यासाठीही कौतुकाचीच गोष्ट होती.
त्यानंतर पाळेकर यांनी कधी मागं वळून पाहिलंच नाही.

‘जागृती’चं मुख्य धोरण बहुजन समाजात; विशेषतः मराठ्यांमध्ये शिक्षणाविषयक जागृती निर्माण करण्याचं होतं आणि तोच त्यांचा हेतू होता. तथापि, तेव्हा देशात अशी एक निर्णायक घटना घडली, की त्यामुळं पाळेकरांना आपल्या लेखनाची व्याप्ती वाढवून सामाजिक आणि राजकीय विषयांना स्पर्श करणं भाग पडलं. ती घटना म्हणजे माँटेग्यू आणि चेम्सफर्ड किंवा माँटफर्ड समितीची स्थापना.

भारतीय प्रजेला कमी-अधिक प्रमाणात राजकीय हक्क घ्यायची प्रक्रिया १९०९च्या दरम्यान मोर्लेमिंटो समितीपासून सुरू झाली आणि त्या समितीच्या शिफारशींनुसार कारवाईसुद्धा झाली. दरम्यान, पहिल्या महायुद्धात भारतीय प्रजेनं इंग्लंडची ज्या प्रकारे पाठराखण केली, ती पाहता तिच्या मागण्यांचा अधिक सहानुभूतीनं विचार करून तिला अधिक राजकीय अधिकार द्यावेत, असं ब्रिटिश सरकारलाही वाटू लागलं. नव्या राजकीय सुधारणांचा आराखडा करण्यासाठी व्हाइसरॉय चेम्सफर्ड आणि भारतमंत्री माँटेग्यू यांची समिती नियुक्त करण्यात आली.

ही समिती भारतीयांना अधिक राजकीय सुधारणा देण्यास उत्सुक आहे, हे लक्षात आल्यावर विशेषतः ब्राह्मणेतरांच्या गोटात अस्वस्थता पसरली. काँग्रेसच्या मागण्यांनुसार भारतीय नागरिकांनी मतदान करून आपले प्रतिनिधी कौन्सिल म्हणजे विधिमंडळात पाठवायचे असतील तर मतदानाचा हक्क हाच मुळी शिक्षण आणि करभरणी या कसोट्यांवर ठरणार होता. त्यामुळे शिक्षण आणि आर्थिक प्राप्ती यामध्ये मागास असलेल्या ब्राह्मणेतरांना कौन्सिलमध्ये स्थान मिळणार नाही, हे उघड होतं. आता कौन्सिलमध्ये निवडून जाणाऱ्या ब्राह्मण प्रतिनिधींच्या हाती सत्ता जाऊन ब्रिटिशांऐवजी तेच कारभार करणार असतील, तर बहुजनांचं काही खरं नाही, या भीतीनंही त्यांना पछाडलं होतं. अशा वेळी ‘या राजकीय सुधारणांची अथवा हक्कांची आम्हाला गरज नाही. ब्रिटिशांच्या संरक्षक छत्राखालीच पूर्ववत नांदणं आम्ही पसंत करतो,’ असा विचार ब्राह्मणेतरांमध्ये पसरू लागला.

‘ब्राह्मणेतरांची ही पराभूत मनोवृत्ती बरोबर नाही. स्वराज्य सर्वांनाच हवं. ब्राह्मणांच्या भीतीने स्वराज्य नाकारणं हे आत्मघातकी आहे. निदान ज्यांच्या पूर्वजांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्याचं साम्राज्य करून अटकेपार घोडे दौडवले, त्या मराठ्यांना तरी हे मुळीच शोभत नाही,’ अशी स्पष्ट भूमिका विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतली. उद्या खरोखर स्वराज्य मिळालं आणि त्यात उच्चवर्णीयांची दडपशाही सुरू झाली तर त्यांचा बंदोबस्त कसा करायचा ते तेव्हाचं तेव्हा पाहू, असा आत्मविश्‍वास शिंदे यांच्याकडे होता.

ही भूमिका घेतल्यामुळं शिंदे एकटे पडले असल्यास नवल नाही. अशा वेळी पाळेकर शिंदे यांच्या मदतीला धावले. त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत आणि समर्थन करणारा ‘मराठ्यांच्या राजकीय आकांक्षा’ हा अग्रलेख ‘जागृती’च्या २४ नोव्हेंबर १९१७ या दिवशी लिहिला. पुण्यातली जातवार राजकीय प्रतिनिधित्व मागणाऱ्यांना पालेकरांची भूमिका पसंत पडली नाही. त्यांच्यातल्या अनेकांनी त्यांच्याकडं पोस्टानं पाठवलेले ‘जागृती’चे अंक बडोद्याला परत पाठवले.
सामाजिक सुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य या दोन गोष्टींमध्ये परस्परविरोध न मानता त्या दोन्हींसाठी एकाच वेळी चळवळ करायला हवी, ही भूमिका त्या काळात घेणारे विठ्ठल रामजी शिंदे हे एकमेव नेते होते. पाळेकरांना त्यांचा हा विचार मान्य असल्यामुळे ते आपल्या पत्राच्या माध्यमातून त्याचा प्रसार व पाठराखण करत राहिले. त्यांच्या मते समाजसुधारणेला विरोध करून केवळ राजकीय सुधारणांचं घोडं पुढं दामटणारे टिळकपक्षीय जहाल ब्राह्मण आणि राजकीय सुधारणांना विरोध करणारे ब्राह्मणेतर एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. ‘दुटप्पीपणाचे दोन मासले’ या अग्रलेखातून पाळेकरांनी या दोन्ही पक्षांच्या उणिवा आणि मर्यादा दाखवून दिल्या. (१ डिसेंबर १९१७) ‘ब्राह्मणांविषयी द्वेष व अविश्‍वास यांनी अंध झाल्यामुळेच आणि ब्राह्मणांविषयी निष्कारण भीती बाळगल्यामुळेच वरील प्रकारचा विसंगतपणा सदरील बंधू दाखवीत आहेत,’ अशी संबंधित ब्राह्मणेतरांची संभावना करून ‘जागृती’च्या धोरणाचा उच्चार करताना पाळेकर म्हणतात - ‘सामाजिक, राजकीय, धार्मिक, औद्योगिक सर्व बाबतींत प्रगती पाहिजे. आणि त्यातील कोणत्याही एका शाखेतील प्रगतीच्या आड जे कोणी येतील, ते देशाचे शत्रू समजले जातील. अशा प्रकारच्या लोकांच्या कुटील धोरणांचे, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, आविष्करण करणे हे ‘जागृती’ला आपले कर्तव्य वाटते.’

इकडे शिंदे यांनीही लोकमान्य टिळकांनी केलेल्या स्वराज्याच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात शनवारवाड्यावर बहुजनांची सभा भरवली आणि तिच्यात खुद्द टिळकांना ब्राह्मणांचा प्रतिनिधी आणि प्रवक्ता म्हणून भाषण करायला लावलं. ‘मराठ्यांच्या राजकीय आकांक्षा’ या लेखातून पाळेकरांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. इतकंच नव्हे, तर बेळगाव येथे बॅ. रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या अखिल भारतीय मराठा राजकीय परिषदेस शिंदे यांनी लखनौ काँग्रेसमध्ये संमत झालेल्या ठरावाला पाठिंबा व्यक्त करणारा ठराव मांडला, तेव्हा त्याला अनुमोदन देण्याचं काम केलं. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदेविरोधकांनी पुण्यात मुंबई इलाखा मराठा परिषद भरवून आपला विरोध व्यक्त केला. त्यावर ‘बेळगावच्या परिषदेला सवत कशाला?’ असा सणसणीत अग्रलेख पाळेकरांनी लिहिला. चिडलेल्या विरोधकांनी पुण्यात ‘जागृती’च्या अंकाची होळी केली. आपल्या विचारांवर ठाम असलेल्या पाळेकरांनी या प्रकारामुळे अस्वस्थ न होता ‘कागद जळाला म्हणून विचारांची राखरांगोळी थोडीच होते?’ असा सूचक आणि खोचक सवाल केला.

आपली भूमिका ही महाराष्ट्रातल्या टिळकपक्षीय आणि ब्राह्मणेतर या दोघांच्या भूमिकांहून वेगळी आहे, असा पाळेकरांचा दावा होता. ‘एका बाबतीत प्रगती प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला प्रतिगामित्व दाखवायचे हे महाराष्ट्रातील पक्षभेदाचे विशिष्ट लक्षण. त्यापासून आम्ही शक्‍य तितक्‍या दूर,’ असं ते स्पष्ट करतात. अर्थात त्यामुळं आपण दोन्ही प्रकारच्या जहालांना अप्रिय ठरले आहोत हे ते जाणून होते, आणि ही किंमत चुकवायचीही त्यांची तयारी होती. ‘जागरूक’कार वा. रा. कोठारी यांनी त्यांना तसा इशाराही दिला होता. तरीही, ‘ज्या कोणा ब्राह्मणांस आमची राजकीय व धार्मिक मते आवडत नसतील, त्यांनी आमच्यावर खुशाल रागवावे! फार काय, पण दुर्वासाप्रमाणे प्रक्षुब्ध होऊन आम्हाला भयंकर शापही द्यावा. आम्हाला त्याची मुळीच पर्वा नाही. तथापि, अनुदार ब्राह्मणेतरांची खुशामत करण्याचीही आमची इच्छा नाही... मग कित्येक माथेफिरू एकांगी लोकांचा आमचेवर रोष झाला तरी आम्हाला विषाद वाटणार नाही. आम्ही यातील कोणतीही एक बाजू धरून एकाच पक्षास सर्व बाजूंनी पाठिंबा दिला असता तर आमच्या पत्राच्या ग्राहकांची संख्या वाढली असती, हे खोटे नाही. परंतु, आमची मनोदेवता तसे करू देत नाही. याला आमचा नाइलाज आहे,’ असं पाळेकरांनी स्पष्ट शब्दांत बजावलं.

विठ्ठल रामजी शिंदे यांना आणि पर्यायानं आणि अनुषंगानं भगवंतराव पाळेकर यांना त्यांच्या प्रामाणिक भूमिकेमुळं एकाच वेळी अनेक विरोधकांना तोंड द्यावं लागत होतं. टिळकांच्या स्वराज्याच्या मागणीला पाठिंबा देणं हा एक अपराध त्यांनी केला होताच; पण स्वराज्याच्या रोखानं कायदेमंडळात काही जागा भारतीयांना द्यायच्या असं ठरलं, तेव्हा जातवार प्रतिनिधित्वाचा प्रश्‍न उपस्थित झाला. शिंदे यांनी त्याला विरोध केला. मुळात मतदार होण्यासाठी घातलेल्या शैक्षणिक व आर्थिक पातळीच्या मर्यादा इतक्‍या खाली आणाव्यात, असं शिंदे यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मतदारांची संख्या वाढून सर्व जाती-जमातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात कायदेमंडळात पुरेसं प्रतिनिधित्व मिळणं शक्‍य होईल, असा त्यांचा विचार होता.

अर्थात हे झालं शिंदे यांचं सर्वसाधारण धोरण. मात्र, या धोरणाला ते अपवाद करायला तयार होते. तो म्हणजे अस्पृश्‍यांचा. अस्पृश्‍यांसाठी त्यांनी जातवार राखीव प्रतिनिधित्वाची मागणी केली होती. हा त्यांचा दुसरा अपराध म्हणावा लागतो. त्यामुळं चिडून जाऊन, शिंदे ज्या प्रार्थना समाजाचं कार्य करायचे त्यांच्याच ‘सुबोध पत्रिका’ मुखपत्रानं शिंदे यांच्यावर टीका केली. ‘सुबोध पत्रिका’कारांना उत्तर देताना पाळेकरांनी ‘जागृती’च्या १५ फेब्रुवारी १९१९च्या अंकातल्या स्फुटात शिंदे यांच्या भाषणातला मजकूर उधृत केला. शिंदे म्हणाले होते, ‘मी राष्ट्रेक्‍याचा भक्त आहे व म्हणूनच जातवार प्रतिनिधींच्या तत्त्वाच्या विरुद्ध आहे. परंतु, सामाजिक अन्यायाने सर्वथैव जिरवल्या गेलेल्या अस्पृश्‍य वर्गासंबंधाने मात्र नाइलाजास्तव मला अशी मागणी करणे भाग आहे, की एक तर समाजाने या वर्गाच्या अस्पृश्‍यतेस फाटा द्यावा, नाही तर या वर्गास जातवार प्रतिनिधींचे हक्क तरी मिळतील.’
पाळेकर विचारतात, ‘आता या म्हणण्यात वावगे ते काय? ‘आई जेऊ घालिना आणि बाप भीक मागू देईना’ अशा स्थितीत सापडलेल्या हिंदमातेच्या अस्पृश्‍य लेकरांसंबंधी धर्म अथवा समाजसेवा यांस ज्यांनी वाहून घेतले आहे, अशा संस्थांनी व व्यक्तींनी तरी रा. शिंद्यांच्या अस्पृश्‍यकारुण्यास हसण्याची निष्ठूरता तरी धारण करू नये एवढीच आमची विनंती आहे.’

माँटेग्यूच्या नव्या सुधारणांप्रमाणे १९२०मध्ये पहिली निवडणूक पार पडली. निवडणुकीत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली. त्यांनी बहुजन पक्ष नामक पक्षाची स्थापनाही केली. हा पक्ष जातीय आधारावर चालणारा नसून, आर्थिक हितसंबंधांवर आधारित होता. पाळेकरांनी शिंदे यांच्या पक्षाला आणि उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यांचा प्रचार केला. निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला. तो व्हायचाच होता. काळाच्या एवढा पुढं पाहू शकणारा माणूस कोणालाच परवडण्यासारखा नव्हता.

दरम्यान, साऊथबरो कमिशनपुढं शिंदे यांनी दिलेल्या साक्षीमुळं डॉ. आंबेडकर आणि विठ्ठलराव शिंदे यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. इतकंच नव्हे, तर शिंदे यांनी अस्पृश्‍यांसाठी ‘निराश्रित साहायकारी मंडळी’च्या माध्यमातून केलेलं कार्य नजरेआड केले जाऊन त्यांनीच ती संस्था सोडावी अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. तथापि, ना शिंदे यांनी आपलं अस्पृश्‍योद्धाराचं कार्य सोडलं- ना पाळेकरांनी शिंदे यांची पाठराखण करणं!
इतर ब्राह्मणेतर पत्रं आणि ‘जागृती’ यांच्यामधला फरक दाखवायचा असेल, तर पाळेकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या चळवळी यांच्या सतत केलेल्या पाठराखणीचा उल्लेख करणं पुरेसं ठरेल! बाबासाहेबांनी कौन्सिलमध्ये केलेल्या भाषणांच्या बातम्या छापण्यात ‘जागृती’ आघाडीवर होतं. बाबासाहेबांनी कौन्सिलमध्ये मांडलेल्या ठरावांचा पालेकरांनी ‘जागृती’मधून सतत पुरस्कार केलेला आढळून येतो. बाबासाहेबांच्या नेतृत्वाची, वक्तृत्वाची आणि त्यांच्या गुणांची प्रशंसा करताना पाळेकरांनी काहीही हातचं राखून ठेवलं नाही. कौन्सिलमधल्या ब्राह्मणेतर सभासदांच्या कामगिरीचं मूल्यमापन बाबासाहेबांच्या कामगिरीच्या तुलनेत करून ब्राह्मणेतर सभासद आंबेडकरांची बरोबरी करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी बाबासाहेबांची अनुकरण करण्याची आवश्‍यकता असल्याचं सुनावण्यास पाळेकर कधीच कचरले नाहीत. काही काळ त्यांनी ‘जागृती’मधून अस्पृश्‍यांसाठी पुरवणीवजा खास विभाग चालवला होता.
बाबासाहेबांनी महाड येथे केलेल्या जलसत्याग्रहाच्या वेळीही पाळेकरांनी त्यांची बाजू घेतली होती. या प्रसंगी ब्राह्मणेतरांनी सनातनी ब्राह्मणांना व गुजरांना बळी पडू नये, असा इशाराही त्यांनी दिला. १९३०च्या ऑगस्ट महिन्यात नागपूर येथे अखिल भारतीय अस्पृश्‍य वर्गाची काँग्रेस डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. या परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणाची पालेकरांनी ‘जागृती’मधून (१६/८/१९३०) केलेली समीक्षा फार महत्त्वाची आहे. बाबासाहेबांच्या या भाषणात (भावी) स्वराज्याच्या राज्यघटनेची बीजं असल्याचं ओळखणारा आणि तसं सूचितही करणारा पाळेकर हा पहिला पत्रकार होय. ‘‘डॉ. आंबेडकरांनी धारवाडी काटा हातात घेऊन स्वराज्य-घटनेचा विचार केला आहे,’’ हे त्यांचं वाक्‍य या संदर्भात महत्त्वाचं आहे.

१९२९-३०च्या दरम्यान पुण्यात पर्वतीवरचं मंदिर आणि नाशिकमध्ये काळाराम मंदिर यांमध्ये अस्पृश्‍यांना प्रवेश मिळावा, म्हणून मोठे सत्याग्रह झाले. दोन्ही वेळी पाळेकरांनी सत्याग्रहींना पाठिंबा देऊन सत्याग्रहविरोधक सनातन्यांवर कडक टीका केली. नाशिक सत्याग्रहाला विरोध करणाऱ्यांची संभावना त्यांनी ‘नाशिकचे ब्रह्मसमंध’ अशी केली (८ मार्च १९३०) या प्रसंगी नाशिकच्या ब्राह्मणेतर पक्षाच्या वंडेकर, थोरात यांच्यासारख्या पुढाऱ्यांनी सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी पुढं सरसावलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘सत्यशोधक समाजाचे नावाजलेले वक्ते या वेळी नाशिकला गेले पाहिजेत आणि त्यांनी स्थानिक ब्राह्मणेतरांची मने अस्पृश्‍यांच्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी वळविली पाहिजेत,’’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केले. (१२ एप्रिल १९३०).

ब्राह्मणेतर चळवळीकडे पाहण्याचा अभ्यासकांचा दृष्टिकोन बऱ्यापैकी पूर्वग्रहदूषित असतो. चळवळीत जसे दिनकरराव जवळकर यांच्यासारखे अतिजहाल लोक होऊन गेले, तसे भगवंतराव पाळेकरांसारखे समंजस समन्वयाची कास धरणारेही होते. ‘ब्राह्मण ब्राह्मणेतर भेद चिरकाल राहावा अशी आमची इच्छा नाही,’ असं त्यांनीच स्पष्ट केलं होतं.

चळवळीचा मुद्दा बाजूला ठेऊ. कोणत्याही पत्रकारानं आदर्श म्हणून पुढे ठेवावा, असा हा निःपक्ष आणि प्रगल्भ पत्रकार होता हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com