घात करतो तो राग (डॉ. श्रुती पानसे)

dr shruti panse write article in saptarang
dr shruti panse write article in saptarang

रागाचं कारण प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळं असू शकतं; मात्र राग हा आतून आलेला असतो. तो मोठ्यांच्या मनात खराखुरा असतो, तसा छोट्यांच्याही मनात खराच असतो. रागाला बाजूला ठेवून शांत व्हायचं असतं; तसं आपलं आपल्याला होता येतं, हे मुलांना समजण्यासाठी आधी मोठ्यांना तेच करावं लागेल. राग आल्यावरही शांत कसं होता येतं याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल.

राग ही एक आदिम भावना आहे. कमी प्रमाणात असेल किंवा जास्त प्रमाणात असेल; राग प्रत्येकालाच येतो. आपल्यापैकी प्रत्येकाला राग ही भावना काय आहे, हे चांगलंच माहीत असतं. अगदी लहान मुलांनासुद्धा राग येतो. रागाच्या भरात मुलं जोरजोरात किंचाळतात. मुठी आवळतात. वर्षाची मुलं फरशीवर, भिंतीवर डोकं आपटून घेऊन राग व्यक्त करतात. जसजसं मोठं होऊ तसतसा राग कमी झाला पाहिजे. राग आला, तरी तो व्यक्त करण्याच्या पद्धती जास्त सुसंस्कृत झाल्या पाहिजेत. सार्वजनिक ठिकाणी, इतर लोकांमध्ये राग व्यक्त करताना शांतपणानं व्यक्त करता आला पाहिजे. हे प्रत्येक जण शिकतो. राग मनात दबून राहता कामा नये; तसंच रागाचा आगडोंब दुसऱ्यावर फुटत नाही ना, हेही पाहिलं पाहिजे.

पूर्वीच्या काळी कोपिष्ट वडील असायचे. ते आले, की घर चिडीचूप होऊन जायचं. संताप व्यक्त करणं ही बहुतेक ज्येष्ठ व्यक्तींची मक्तेदारी होती; पण आता सर्व वयाची माणसं खूप चिडचिड करतात. वास्तविक या रागभावनेचं नियोजन लहानपणापासून शिकवलं गेलं पाहिजे. कारण ही भावना माणसाला कुठंही भडकावते. त्यात आपली तार्किकतेची शक्ती पूर्ण नष्ट होऊन जाते. अगदी थोडक्‍यासाठी रागीट माणसांवर कसलेकसले शिक्के बसतात. त्यानं आजवर केलेल्या बऱ्या कामांवर पाणी पडतं. दुसरीकडं त्यानं ज्याला दुखावलेलं आहे, ती व्यक्ती हे जन्मात कधी विसरू शकत नाही. माणसं काहीही विसरतात; पण आपला इगो दुखावला गेला, तर ते विसरू शकत नाहीत.

रागाचा आपल्या आरोग्यावर घातक परिणाम होतो आणि आपल्या नात्यांसाठी मारकही ठरतो; पण हाच राग मुलांवर कसा परिणाम घडवून आणतो आणि राग आल्यावर काय करायचं हे त्यांनी कसं शिकायचं? अगदी लहान म्हणजे नुकत्याच चालू लागलेल्या मुलांनासुद्धा राग येतो आणि ते राग व्यक्तही करतात. वस्तूंची मोडतोड करून, जोरजोरात ओरडून, डोकं आपटून घेऊन अशा विविध प्रकारे राग आला आहे हे दाखवतात. इतक्‍या लहान मुलांना जेव्हा अशा अतिरेकी प्रकारे राग व्यक्त करावासा वाटतो, तेव्हा तो निश्‍चितच घरातल्या वातावरणाचा परिणाम असतो. त्या बाळानं जर जन्मापासून जोरजोरात भांडणं, आरडाओरडा हेच जन्मापासून ऐकलं असेल, तर बाळ नक्कीच चिडकं, आक्रस्ताळं होतं. समजा घरातली माणसं शांत असतील; पण घरातल्या टीव्हीवर भांडणांचे आवाज येत असतील, तरी असा परिणाम होतो. म्हणून टीव्हीवरची माणसं जेव्हा अद्वातद्वा भांडत असतात, तेव्हा आवाज घालवलेलाच बरा. त्यांच्यामुळं आपल्या घराची शांती कशाला भंग करून घ्या? या आवाजाचा परिणाम सगळ्यांच्याच मेंदूवर होतच असतो.

लहान मुलांनी घरातल्या मोठ्या माणसांना संतापलेलं, बिथरलेलं बघितलेलं असतं; पण जेव्हा मुलं असंच वागायला जातात, तेव्हा मोठ्यांना मुळीच चालत नाही. राग आला, की शांत व्हायचं. काही झालं तरी आपला शांतपणा सोडायचा नाही, असं कितीही बोललं तरी कसं कळणार? त्यांच्यासमोर आपण अगदी अशाच पद्धतीनं संताप व्यक्त केलेला असतो. मुलं तेच बघतात आणि सहीसही अनुकरण करतात. मोठ्या माणसांना वाटतं, की त्यांना राग येतो तेव्हा काही तरी खरोखरीचं आणि तार्किक कारण असतं. मुलांना राग येतो तो मात्र विनाकारणच. उगाच. असं का? आपला राग तेवढा खरा आणि मुलांचा राग खोटा? हा राग जमेल तशा आणि वाईट पद्धतीनं मोडून काढला जातो.

लहान मुलांना आलेला राग हासुद्धा खराखुरा असू शकतो. अगदी लहान मुलं वेळेवर खायला मिळालं, तरी राग व्यक्त करतात. त्यांच्याकडं दुर्लक्ष होतं आहे, असं वाटलं तरी चिडतात. आपल्या मनातल्या साध्यासुध्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत, तर अस्वस्थ होऊन शेवटी भोकाड पसरतात. याचं कारण त्यांच्याकडं भावना व्यक्त करण्यासाठी पुरेसे शब्द नसतात. त्यांना जे सांगायचं आहे ते सांगू शकत नाही, ही व्यथा फार मोठी असते.

यापेक्षा वरच्या वयोगटाच्या मुलांच्या बाबतीत अशीच अनेक कारणं असू शकतात. इतर माणसांच्या घरी जायची- शाळेची- बालवाडीची- रिक्षा/व्हॅन/बसची - पाळणाघराची- ग्राऊंडची, किंवा अगदी घरातल्या विशिष्ट खोलीची, घरात येणाऱ्या विशिष्ट पाहुण्याची- अशी कसलीही भीती वाटणं हेदेखील रागाचं कारण असू शकतं. भीती वाटते आहे, हे मुलं सहजी सांगू शकत नाहीत. ती रागातून व्यक्त होतात.
शाळेत जाणाऱ्या मुलांना बोलता येतं. भावना व्यक्त करता येतात. पुरेशी शब्दसंपत्तीही साठलेली असते; पण ती बोलत नाही. वर्गात- शाळेत कोणी अत्यंत क्षुल्लक कारणावरून चिडवत असेल, भीती दाखवत असेल, वस्तू पळवत असेल. शिक्षक- मुलं काही कारणानं हसत असतील, कमी लेखत असतील, तर मनात उगाचच अपराधीपणा, लाज; तसंच आपलं काही चुकतं आहे का, हा विचार असं काहीतरी येऊन मुलं मनातलं बोलत नाहीत. आपण आईबाबांना सांगितलं तर ते आपल्यालाच रागावतील, या एका कारणामुळं मुलं कुठंच मनमोकळी होत नाहीत. घरात शिस्तीचा अतिरेक असेल, तर हे घर त्यांना घरासारखं वाटत नाही. या सगळ्या विचित्र भावना राग- संताप- तुसडेपणा या मार्गांनी वाढत जातात.

रागाचं कारण प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळं असू शकतं; मात्र राग हा आतून आलेला असतो. तो मोठ्यांच्या मनात खराखुरा असतो, तसा छोट्यांच्याही मनात खराच असतो. रागाला बाजूला ठेवून शांत व्हायचं असतं; तसं आपलं आपल्याला होता येतं, हे मुलांना समजण्यासाठी आधी मोठ्यांना तेच करावं लागेल. राग आल्यावरही शांत कसं होता येतं याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल.

तुम्हाला राग कधी येतो याची कारणं शोधा. वरचे मुद्दे पुन्हा पाहिले, तर भूक, अस्वस्थता, भीती, असुरक्षितता ही राग येण्याची खरी कारणं असतात. राग दिसतो. या भावना दिसत नाहीत; पण या आणि अशाच भावना रागाच्या मुळाशी असतात. आपण रागावर उपाय शोधायला जातो. या उपायांचा काही काळ उपयोग होतो; पण पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. कारण आपण रागभावनेच्या मुळाशी जात नाही. खरं कारण शोधत नाही. ते शोधायला हवं. त्या मूळ कारणावर उपाययोजना करायला हवी. इतरांच्या तक्रारी करणं आणि कायम चिडचिड करत राहणं घातक आहे, हे आपल्याला माहीत आहे- मग ते कशासाठी करायचं? आपण जेव्हा इतरांवर संतापतो तेव्हा याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या शरीरावर- शरीरातल्या रक्तदाबावर होत असतो. खूप राग आला, की मेंदूतला रक्तप्रवाह भावनिक मेंदूकडं वळतो. हा भावनिक मेंदू तार्किक विचार करू शकत नाही. ती त्याची मर्यादा आहे. रागात असताना भान सुटतं ते यामुळंच. त्यामुळं आपला राग इतरांसाठी घातक ठरतोच; पण त्याहीपेक्षा आपल्या मानसिक-शारीरिक स्वास्थ्यासाठी जास्त घातक असतो. म्हणून राग पहिल्या टप्प्यात असताना त्याला आवरणं श्रेयस्कर!

मुलांना समजवून सांगताना...
- राग आल्यावर आपण काय बोलतो, काय करतो हे रागाच्या भरात आपल्यालाच समजत नाही आणि ही गोष्ट अजिबातच चांगली नाही, हे मुलांना सांगायला हरकत नाही.
- केवळ राग आल्यामुळं होत आलेलं काम बिघडतं. माणसं तुटतात. नात्यांमध्ये दरी वाढते, हातून चुका घडतात. नुकसान होतं. याची असंख्य उदाहरणं आपल्याकडं असतात. ती मुलांना मोकळेपणांना सांगा. मुलं लहान असतील, तर अशी उदाहरणं त्यांना पटतील अशा गोष्टींत गुंफून सांगा.
- एखादा रागावलेला माणूस कसा दिसतो, कसा बोलतो हे मुद्दाम बघा. तो कसा वागतोय आणि त्यानं खरं म्हणजे कसं वागायला पाहिजे, तो कसं वागला तर जास्त बरं होईल यावर सहज गप्पा मारा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com