आई-बाबाचं ‘अपग्रेडेशन’ (डॉ. श्रुती पानसे)

डॉ. श्रुती पानसे drshrutipanse@gmail.com
रविवार, 14 जानेवारी 2018

आपल्या गोड- निरागस मुलांच्या वाढीचा ‘टीनएज’ टप्पा आईबाबांना हलवून सोडतो. कधीकधी हादरवून टाकतो. तुम्ही याआधीच्या वाढीच्या टप्प्यावर काय आणि कशी जोपासना केली आहे यावर आणि यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणून जन्मापासून बारा-तेरा वर्ष वयापर्यंतच्या वाटचालीत आई - बाबा आणि मूल हा ‘त्रिकोन’ पक्का आहे ना याची खात्री करून घ्या आणि नसेल तर आधी कामाला लागा. या स्मार्ट मुलांशी वागणाऱ्या पालकांचं काळीज प्रेमळ असायलाच हवं; पण त्यात स्मार्टनेसही हवा.

आपल्या गोड- निरागस मुलांच्या वाढीचा ‘टीनएज’ टप्पा आईबाबांना हलवून सोडतो. कधीकधी हादरवून टाकतो. तुम्ही याआधीच्या वाढीच्या टप्प्यावर काय आणि कशी जोपासना केली आहे यावर आणि यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणून जन्मापासून बारा-तेरा वर्ष वयापर्यंतच्या वाटचालीत आई - बाबा आणि मूल हा ‘त्रिकोन’ पक्का आहे ना याची खात्री करून घ्या आणि नसेल तर आधी कामाला लागा. या स्मार्ट मुलांशी वागणाऱ्या पालकांचं काळीज प्रेमळ असायलाच हवं; पण त्यात स्मार्टनेसही हवा.

आईबाबा आणि मूल या नात्याचा पाया स्थिर असतो, असंच मानलं जातं. मात्र, असं असलं तरी त्यात अनेकदा तरंग उठत असतात. कधी हे तरंग अलोट प्रेमाचे असतात, एकमेकांना वाटणाऱ्या परस्परांविषयीच्या अभिमानाचे असतात, तर कधी हतबलतेचेही असतात. जसजशी मुलं मोठी होतील तसतसं आईबाबांनी स्वत:त डोकावण्याची गरज आहे. स्वत:ला ‘अपग्रेड’ करत राहण्याची गरज आहे. मुलांच्या वाढीचे टप्पे लक्षात घेऊन स्वत:त बदल करायला हवेत.

वाढीचे टप्पे : विचार मानसिकतेचा
मूल लहान असतं तेव्हा प्रत्येक गोष्टीत धडपड चालू असते. ‘मी माझ्या हाताने करणार/ तू नको’, ‘मी माझे बूट घालणार/ तू नाही घालायचे,’ असं बोलणं आपल्याला नेहमीच ऐकू असतं. कधीकधी या वादावादीत मुलं जिंकतात, तर कधी आईबाबा जिंकतात. आईबाबा म्हणत असतात ः ‘मला मदत करू देत’, ‘तुला नाही जमणार’ किंवा ‘तू गोंधळ घालून ठेवशील’,  ‘उशीर होतोय हां, मीच करणार.’ दोन ते चार या वयाच्या दरम्यान मुलांना प्रत्येक गोष्ट स्वत:ची स्वत: करायची असते. स्वत:चे कपडे स्वत: घालणं, हातानं जेवणं, रस्त्यावरून हात न धरता चालणं असं बरंच. आईबाबांना मात्र मुलांची ही सगळी कामं पटापटा आणि सराईतपणे हातावेगळी करायची सवय झालेली असते, त्यामुळं ‘मी भरवते/ भरवतो, तू जेव’ हेच आपल्याला सोपं वाटत असतं. मुलांना रस्त्यावरून सुटं चालायचं असतं; पण आपण ते करू देत नाही, कारण आपल्याला त्यांची सुरक्षितता महत्त्वाची असते आणि मुलांना त्यातल्या धोक्‍याची जाणीवही नसते..

आठ- नऊ वर्षांचे झाल्यावर सायकल शिकल्यावर मुलांना आपली आपण सायकल घेऊन रस्त्यावर जायचं असतं. मात्र, शहरी भागांत, वाहतुकीच्या रस्त्यांवर सायकलवरून एकटं सोडायला आईबाबांचा धीर होत नाही. मात्र, मूल आपला हट्ट सोडत नाही. मग आईबाबा कधी चालत, तर कधी आपली गाडी घेऊन त्यांच्या पाठीमागं जातात. कारण काळजी घेणं हे आईबाबांचं प्रथम कर्तव्यच असतं. मुलांच्या वाढीचे असे अनेक लहानमोठे टप्पे असतात. काही टप्पे अगदी अलगद सहजतेनं ओलांडले जातात, तर काही टप्पे गाठताना बरीचशी कुरकुर होते. अशा अनेक टप्प्यांबद्दल बोलावं तितकं थोडं. आईबाबांचा स्वभाव कसा आहे यावर या वाढीच्या टप्प्यात कशी कुरकुर होणार आणि ती कुरकुर कशी मिटणार, हे अवलंबून असतं. समजा, मुलाला किंवा मुलीला गिर्यारोहणाला जायचं असतं. कधी बाबा हळवा असतो आणि आई साहसी असते. मुलांना बाहेरच्या जगाचे अनुभव आलेच पाहिजेत, असं म्हणून ती खंबीरपणे पाठीशी उभी राहते आणि बाबा काळजी करत राहतो. तर कधी ‘काय ही एवढ्यातेवढ्यावरून काळजी करत बसते. या वयात असल्या शिबिरांना जाणार नाही, तर कधी जाणार?’ असं बाबा म्हणतो आणि मुलांना पाठवतो, की मुलं खूश!

‘पेरेंट्‌स सायकॉलॉजी’ : मुलांच्या नजरेतून
वयाच्या तीन वर्षांपर्यंत आईचा स्टोल जराही न सोडणारं आणि तिची हक्काची मांडी हेच आपलं राजसिंहासन असल्याच्या थाटात गुर्मीत वावरणारं हे छोटुकलं हळूहळू तिच्याकडून आपल्या सगळ्या मागण्या मान्य करून घ्यायला शिकतं. काही घरांत आई कडक असते आणि बाबा मुलांचं ऐकणारा असतो. अशा वेळी दोघांपैकी नक्की कोणावर राज्य गाजवायचं हे सर्वच्या सर्व मुला-मुलींना नीट कळतं. कोणाकडं, कशा, कधी मागण्या केल्या म्हणजे आपल्या मनासारखं होईल, हा ‘पेरेंट्‌स सायकॉलॉजी’चा अभ्यास मुलांचा कधीच तयार असतो, साधारणपणे तिसरी-चौथीत इतिहास-भूगोल शिकतानाच या अभ्यासाची ‘पदवी’ मुलं घेतात.

जसजशी ती नववी-दहावीपर्यंत पोचतात, तसंतसं ‘पेरेंट्‌स सायकॉलॉजी’तलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन मुलं ‘पीचडी’चा अभ्यास सुरू करतात आणि त्याच वेळी कनवाळू पालक मात्र आपलं मूल अजून छोटंच आहे असं समजत असतात. अशा प्रकारे स्वत:च्या बुद्धीच्या आणि अस्सल अनुभवांच्या जोरावर आपलं छोटुकलं वयाच्या दहा-बारा वर्षापर्यंत अख्ख्या घरादारावरच राज्य गाजवायला सुरवात करतं. आईबाबांना मुलांच्या शारीरिक-बौद्धिक विकासाचे टप्पे लक्षात येतात, कारण त्यासाठी ते खरोखरच खूप मेहनत करत असतात; पण हे मानसिक विकासाचे टप्पे कधीकधी लक्षात येत नाहीत. तेराच्या आसपास मूल टीनएजमध्ये पदार्पण करतं झालं, की अधेमधे वादळाचे तडाखेही बसायला लागतात. टीनएजला वादळी काळ असं म्हटलं जातं, म्हणून इथं ‘वादळ’ हा शब्द वापरला आहे आणि वादळ हे तडाखे देण्यासाठीच असतं.

...पण वादळ हे केवळ काही काळापुरतंच असतं. ते जसं सुरू होतं तसं ते शमतंही, आपलं आपण. त्याप्रमाणं वयाचं वादळही आपोआप शमतं. मात्र होतं काय, की मुलांच्या या वादळात घरातल्या सगळ्यांच्या नौका आपला मार्ग सोडतात. त्या विस्कटतात. उसळतात. भिरभिरतात. हेलकावे खातात. यातून मोठीमोठी गलबतंही सुटत नाहीत, तर छोट्या नावांचं काय होत असेल!!! बहुतांशी छोट्या नावांना वाटतं, आता संपलं सारं! आतापर्यंत वाहत आणलेली नाव आता बुडणार की काय? पण तसं होत नाही. वादळ येणार आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्याची तीव्रता किती असेल, हे आपल्याला समजा आधी माहिती नाही असं गृहीत धरू. कदाचित वादळ येणारही नाही किंवा अगदी हलक्‍या स्वरूपाचं असेल, मात्र आजकालचं बेभरवशाचं हवामान बघता काळजी घेणं हे केव्हाही चांगलंच!

‘वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो,’ या मूळ इंग्लिश म्हणीनुसार, काळजी घेणं आवश्‍यक आहे....आणि अशी काळजी कधी घ्यायची? अर्थातच वादळ सुरू झाल्यावर नाही. ऐन वादळात नाव रेटायची ठरवली तर काय होईल हे वेगळं सांगायला नकोच! म्हणून काळजी ही नेहमी शांत वातावरण असतानाच घ्यायची असते आणि जितकी आधीपासून घेऊ तेवढं चांगलंच!  गेल्या काही वर्षांत शेकडो पालकांशी बोलल्यानंतर आणि त्यांचे अनुभव ऐकल्यावर लक्षात आलेल्या अनेक गोष्टींपैकी महत्त्वाची एक गोष्ट आज पालककट्ट्यावर सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपल्या गोड- गोंडस- निरागस मुलांच्या वाढीचा हा टीनएज टप्पा आईबाबांना हलवून सोडतो. कधीकधी हादरवून टाकतो. ‘पेरेंट्‌स सायकॉलॉजी’मध्ये ‘पीएचडी’ केलेल्या या मुलांना आईबाबा तर नीट माहीत असतातच; पण त्यांचे वीक पॉइंट्‌ससुद्धा!
तुम्ही याआधीच्या वाढीच्या टप्प्यावर काय आणि कशी जोपासना केली आहे यावर आणि यावरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणून शून्य ते तेरा या वयात आई- बाबा आणि मूल हा ‘त्रिकोन’ पक्का आहे ना याची खात्री करून घ्या आणि नसेल तर आधी कामाला लागा. या स्मार्ट मुलांशी वागणाऱ्या आईचं (आजकाल बाबाचंही!) काळीज निरूपा रॉय यांच्यासारखं प्रेमळ असायलाच हवं (आणि ते असतंच!); पण स्मार्टनेस मात्र आपल्या रिमा यांनी पडद्यावर साकारलेल्या स्मार्ट आईसारखा असायला हवा. म्हणजे आपली नौका शानदारपणे वादळातून सुखरूपपणे पार पडेल.

Web Title: dr shruti panse write article in saptarang