भाषेच्या भाष्य रेषा!

डॉ. शुभदा खिरवडकर
शुक्रवार, 31 मार्च 2017

मुलांमध्ये त्यांच्या वाढीसमवेत होत जाणाऱ्या भाषाविकासाचा धांडोळा घेताना अनेकांनी अभ्यासपूर्ण पण रंजक प्रयोग केलेत; मग ते प्रयोग चिंपांझी, ओरांग उटानसारख्या प्राण्यांवर असोत की नवजात अर्भकांवर वा स्वमग्न मुलांवर.
या प्रयोगातून भाषेची भाषा कशी जनुकांत दडलेली असते, तिच्यावर वातावरणाचा कसा परिणाम होतो, ती संवादाचे प्रभावी माध्यम कशी बनते, तिच्या विकासात येणारे अडथळे कोणते, याबाबत भरपूर माहिती समोर आली..

स्वमग्न (autistic) मुलांचा मुख्य प्रश्न असा असतो की, ते ना डोळ्यांनी कुणाशी बोलत ना शब्दांनी. इतरांशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधू न शकल्याने त्यांच्या समाजाशी आंतरक्रियाच बंद होतात. तरीही जेव्हा अशी मुलं पुढे मोठी झाल्यावर आपले भाषेविषयीचे अनुभव सांगतात तेव्हा लक्षात येतं की प्रत्येक विचाराचं काहीतरी शब्दरूप त्यांच्याही मनात तयार होत असतं.
काही शास्त्रज्ञांनी तर आपले विचार म्हणजे स्वतःशी भाषेतून केलेला मूक संवादच असतो असं म्हटलंय.

हार्वर्ड विद्यापीठाचे प्रसिद्ध उत्क्रांती मानसतज्ज्ञ, भाषातज्ज्ञ डॉ. स्टीवन पिंकेर यांनी मुलांच्या डोळ्याने होणारे विषयाचे आकलन आणि भाषा, आकारांची आणि अक्षरांची ओळख, त्यांचे वर्गीकरण, साम्य आणि फरक त्यानुसार नजरेने होणारे ज्ञान याचा संबंध लहान मुलांच्या भाषा विकास, भाषेतील शब्द आणि व्याकरण यांचा मज्जासंस्थेशी असणारा संबंध कसा असतो, अशा अनेक पैलूंनी भाषा या संकल्पनेचा अभ्यास केलाय. लहान वयातील मेंदू हा जास्त ग्रहणशील आणि हवा तसा "वाकू' शकणारा (neuroplastic brain) असतो. त्यामुळं तो अनेक भाषा विनासायास, पटापट शिकू शकतो किंबहुना चिन्हांच्या माध्यमातून (शब्द, अंक) जग समजून घ्यायला आसुसलेला असतो, सज्ज असतो.

त्यांनी दाखवून दिलंय की अनादी काळापासून मानवाची भाषाप्रभुत्व येण्यासाठीची अखंड धडपड सुरू आहे! ती त्याने भीमबेटकासारख्या गुफा चित्रातून, मोहेंजोदारोच्या चित्रलिपीतून किंवा उत्खननात सापडलेल्या विविध शिलालेखातून पुरेशी व्यक्तही केलीय. आजकाल तर माहितीची देवघेव करणारी अनेक उत्कृष्ट अत्याधुनिक साधनं उपलब्ध आहेत आणि नावीन्यपूर्ण पद्धतींनी त्यांचा वापरही होतोय; पण अजूनही या सगळ्या आदानप्रदानात भाषेचं आपल्या जीवनातील स्थान अबाधित आहे.
"शाळेत असताना भाषा या विषयाला गणित, विज्ञान या विषयाच्या तुलनेत आपण खूप कमी लेखत असू; पण आता जाणवतं की उत्तम भाषा येणं हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रांत किती महत्त्वाचं आहे!' एका डॉक्‍टर मैत्रिणीने दिलेली ही कबुली किती बोलकी आहे!
"या हृदयीचे त्या हृदयी' शब्दांच्या माध्यमातून पोहोचवणं एवढीच भाषेची महती नसून तिच्या अनेकांगी सौंदर्याचा जाणतेपणाने आस्वाद घेत एक वेगळाच आनंद लुटायला शिकणं हेही केवढं आवश्‍यक आहे!

हे होण्यासाठी आपल्या मुलांच्या भाषा विकासात त्यांचं घर आणि शाळा हे दोघेही खूप काही करू शकतात. मुलांचा भाषाविकास साध्य करताना चार गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो - श्रवण, संभाषण, वाचन आणि लेखन. त्यातले श्रवणकौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना छोट्या छोट्या दोन किंवा तीन शब्दांत सूचना देणं, छोट्या गोष्टी सांगणं किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच क्रियाकृती करवून घेता येतात. बडबड गीतं, गोष्टी, किस्से यांतून शब्द, अर्थ, त्यांचे नाद, लय, गेयता यांचा आनंद घ्यायला मूल शिकू लागतं. त्याला भरपूर प्रोत्साहन मिळायला हवं. शाळेत जाणं सुरू झाल्यावर शाळेत शिकवल्या जाणाऱ्या कृतिकवितांची (action- songs) भर पडते. इंग्रजी माध्यमाची शाळा असेल तर या कवितांचे बरेचसे अर्थ मुलांना कळत नसतात. हातवारे करून, शरीराच्या माध्यमातून किंवा त्यांचा अर्थ मातृभाषेतून मुलांना सहज समजावून सांगता येईल. त्याने शब्दओळख, भाषेचा तालासाठी, ठेक्‍यासाठी, गेयतेसाठी कसा वापर होतो हे मुलांना कळेल. मराठी भाषा तर उत्कृष्ट अशा असंख्य बालकवितांनी समृद्ध आहे. मुलांचे श्रवण आणि संभाषणकौशल्य विकसित करण्यासाठी त्यांचा भरपूर उपयोग करता येतो. खूपसे सण साजरे होत असतात. त्यानिमित्ताने अनेक गाणी आणि गोष्टी यांची रेलचेल असते. त्यांचाही वापर करता येईल.

बालकवितांच्या खजिन्याचा वापर केला तर अलिबाबाची गुहाच उघडली जाते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, इंदिरा संत, सरिता पदकी, माधुरी पुरंदरे यांच्या बालकवितांचा आधार घेतला तर मुलांची भाषा, कितीतरी अधिक पटींनी वाढते.
इंदिरा संतांच्या "अंगतपंगत'मधल्या बालगीतांविषयी कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलंय की, "इंदिराबाईंच्या कविता मुलांना आपल्यासाठी मुद्दाम लिहिलेली नव्हे, तर आपल्याच मनात उद्भवलेली कविता आहे असं वाटेल. "पिशी मावशी', "सशाचे कान', "परीचा पडला दगडावर पाय', "खुर्ची म्हणाली टेबलाला', "भुतावळ' किती नावं घ्यावीत?

मराठी बालकवितांचं दालन इतकं समृद्ध आहे की, कुसुमाग्रजांचं म्हणणं या प्रत्येक कवितेच्या बाबतीत खरं वाटतं! अशा मराठी, इंग्रजी, हिंदी कवितांची ओळख करून देत, मुलांना अत्यंत आनंददायी अनुभव शाळाशाळांतून देण्याचा एक अनोखा उपक्रम मी नुकताच अनुभवला आहे. अशा कार्यक्रमांची वारंवारिता वाढायला हवी.
शरीराची स्वच्छता शिकवताना, बाहुलीची आंघोळ करताना सरिता पदकी यांच्या "गुटर्रगूं गुटर्रगूं' अंघोळीचे स्तोत्र - "ओम्‌ अंघोळ कराय नम:, कपडे काढाय नम:' म्हटलं की एका दिवसात सारं तोंडपाठ होतं. हात कसे धुवायला हवेत याचं उत्तम प्रशिक्षण गाण गात, एकेका पायरीने दाखवता येतं.
मुलांचे वाढदिवस, सहली, सफरी असे छोटेखानी कार्यक्रम असतात तेव्हा "कोडं घालणं' या अजून एका भाषाविकासाच्या टप्प्यावर मुलांना आपण नेऊ शकतो. "ओळखा पाहू मी कोण?', " देवाजीची करणी नि नारळात पाणी' किंवा "उंच मान फत्ताडे पाय, रेतीतून डुगु डुगु जाय' अशा प्रकारची कोडी सोडविण्यात त्यांना भाषिक गंमत तर आहेच; पण विचारांनाही चालना आहे.

मुलांबरोबर पुस्तक वाचन हाही एक आनंदाचे निधान असलेला आणि वाचनक्षमता वाढवायला आवर्जून करायला हवा असा कार्यक्रम! जे वाचतो त्याचा अर्थ समजून यायला मात्र सचित्र पुस्तकं (comics) सुद्धा हवीत. वाचन, लेखन या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रिया आहेत. त्यामुळे त्यांचा सराव, त्यांना द्यावा लागणारा पुरेसा वेळ हे केवळ मुलांना शाळेत घालून होणार नाही. त्यासाठी विनोबा म्हणतात त्याप्रमाणे शाळेत घर आणि घरात शाळा यायला हवी. लेखनासाठी मुलांच्या मनगटाच्या, बोटांच्या स्नायूंना सज्ज करायला रांगोळी, रेती, माती यांच्याशी मुलांचं नातं बांधायला हवं. ओवणे, निवडणे, मळणे, कापणे, चुरगाळणे, गोळा करणे या हातांच्या छोट्या स्नायूंना चालना देणाऱ्या (fine motor skills) अनेक कृती मुलांबरोबर करता येतात. रविवारी, सुटीच्या दिवशी, जेवणाच्या टेबलावर मिळून बोलण्याच्या, मजा करण्याच्या, करून बघण्याच्या कितीतरी गोष्टी भाषाविकासाचा पाया बनतात. चला तर मग, आपापल्या सर्जनशीलतेला दौडवू या... भाषेच्या भाष्यरेषा ओळखू या!
(मो : 9823075200, ई-मेल: shubha.khirwadkar@gmail.com)

Web Title: dr shubhada khirwadkar writes on children's language issues