...आणि सावली पोरकी झाली! (शिवकुमार)

...आणि सावली पोरकी झाली! (शिवकुमार)

भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय महत्त्वाचं म्हणजे, ते अतिशय 'पेशन्ट लिसनर' होते. अगदी गावातून आलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून ते दिल्लीत अटलजींबरोबर काम करणाऱ्या मोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांचं म्हणणं ते तेवढ्याच आत्मीयतेनं ऐकून घेत असत. 'बोलण्यासाठी वाणी हवी आणि गप्प राहण्यासाठी विवेक हवा,' हे त्यांचं वाक्‍य माझ्या मनावर कोरलं गेलं आहे. जनसंघाच्या व नंतर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका नियमित होत असत तेव्हा अटलजी ते संपूर्ण दोन दिवस केवळ भाषणं ऐकत असत व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समारोपाचं भाषण करत. असा नेता मी तरी पाहिलेला नाही. अटलजी 'अटल' होते व त्यांची वैशिष्ट्यं इतरांमध्ये शोधण्याचा प्रयत्न कुणी करू नये, कुणी त्यांची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नये, असं मला वाटतं! 

अटलजी गेली 11 वर्षं आजारी होते. नंतर त्यांचं बोलणंही बंद झालं होतं. मात्र, डोळ्यांतून ते जे बोलायचे तो भाव मला अखेरपर्यंत समजत असे. एखाद्या दिवशी अटलजी रागावलेले असतील तर मी त्यांची मानसकन्या नमिता यांना तसं सांगत असे. लालकृष्ण अडवानी, डॉ. मनमोहन सिंग, सोनिया गांधी, प्रणव मुखर्जी, राजनाथसिंह आदी नेते त्यांना भेटायला वाढदिवशी नियमित येत असत. कधी कधी यांपैकी कुणी आलं व अटलजींचा मूड नसला की पाहुण्यांसमोर आम्ही मिठाई ठेवत असू. त्याबरोबर अटलजींच्या डोळ्यात चमक येत असे! 

- मी बालपणापासूनच संघस्वयंसेवक. जयपूरला असल्यापासूनच 'पांचजन्य' व 'राजधर्म' आमच्या घरी नियमित येत असत व त्यांतलं अटलजींचं लेखन मी वाचत असे. वकील झाल्यावर 1967 मध्ये सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी मी दिल्लीत आलो. तिथं वकिली करण्यासाठी एक परीक्षा असते, ती मी उत्तीर्ण झालो. दिल्लीत साहजिकच झंडेवालांचं 'केशवकुंज' हे आमचं घरच होतं. त्या काळी गणेशीलाल नावाचे प्रख्यात वकील दिल्लीत होते. वीर सावरकर यांचा खटला त्यांनी यशस्वीपणे लढवला होता. त्यांच्याकडं मी व एन. एम. घटाटे यांनी उमेदवारीला सुरवात केली आणि एक दिवस अपघातानंच '30, राजेंद्रप्रसाद रोड' इथं माझं जाणं झालं... 'हे अटलबिहारी वाजपेयी यांचं निवासस्थान' असं मला सांगण्यात आलं. पहिल्यांदा मी तिथं गेलो तेव्हा अटलजीच समोर आले. 'कुठून आलात? काय करता?' अशी चौकशी त्यांनी केली. पहिल्याच भेटीत मी त्यांचा भक्त बनलो! ता. 11 फेब्रुवारी 1968 रोजी दीनदयाळ उपाध्याय यांची हत्या झाली. त्यापूर्वी जनसंघाचेच दुसरे अध्यक्ष धर्मवीर यांचीही निवडणुकीत हत्या झाली. जनसंघाचे पहिले अध्यक्ष श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांचाही श्रीनगरच्या तुरुंगात गूढरीत्या मृत्यू झाला. जेव्हा अटलजी जनसंघाचे अध्यक्ष झाले, तेव्हा माझ्या मनात सारखं येत असे की जनसंघाच्या अध्यक्षांवर काही तरी 'कालप्रकोप' आहे; त्यामुळं अटलजींबरोबर कुणीतरी सदैव राहणं अत्यावश्‍यक आहे. मी त्यांना माझी ही इच्छा बोलून दाखवली तेव्हा त्यांनी सुरवातीला माझा प्रस्ताव धुडकावून लावला. ते म्हणाले ः 'भाई, मेरे प्राण कौन हरन करेगा ?' -मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा ते तयार झाले; पण म्हणाले ः ''शिवकुमारजी, तुम्ही वकिली करत आहात. तुम्ही कुटुंबवत्सल आहात. मी व माझा पक्ष तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही.'' त्यावर ''अटलजी, मी एक पैसाही न घेता सर्वतोपरी तुमची सेवा करेन; पण मला कृपया 'नाही' म्हणू नका'' असं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर मी अटलजींशी जोडला गेलो तो कायमचाच. ता. तीन ऑगस्ट 1969 ते 16 ऑगस्ट 2018 पर्यंत ही साथसोबत होती. या काळात '1, फिरोजशहा रोड', '7, सफदरजंग रस्ता', '6, रायसीना रोड', '7, रेसकोर्स रोड' व '6, कृष्ण मेनन मार्ग' अशी अटलजींची निवासस्थानं बदलत गेली; मात्र मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो, हे माझं भाग्य. 

अटलजींची काव्यप्रतिभा हिमालयाच्या कुशीत बहरून येत असे. मनाली हे त्यांचं अत्यंत आवडतं ठिकाण. संसदीय धावपळीतही ते मनालीला जाण्यासाठी वेळ काढतच. रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद, जुनी गाणी, मराठी नाटकं, संत मीराबाईची पदं हे त्यांचे 'वीकपॉईंट' होते. लता मंगेशकर यांच्यावर त्यांचं पितृवत्‌ प्रेम होतं. 

अटलजींची संसदीय कारकीर्द हा स्वतंत्र लेखनाचा विषय आहे. पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहणारी अटलजींची संसदीय भाषणं म्हणजे वक्तृत्वाचा वस्तुपाठ आहे. पंडित नेहरू ते डॉ. मनमोहनसिंग या सर्व पंतप्रधानांशी त्यांचा स्नेहबंध कायमच राहिला. अमृतसरमध्ये सुवर्णमंदिरात लष्कर घुसवण्याआधी इंदिराजींनी त्यांना फोन केला तेव्हा अटलजींनी त्यांना स्पष्टपणे, 'असं करू नका, हा श्रद्धेचा विषय आहे' असं सांगितलं होतं व 'सुवर्णमंदिरातल्या तळ्यात वीजप्रवाह सोडून पाहा,' अशीही सूचना केली होती. मात्र, ती मान्य केली गेली नाही व नंतर इंदिराजींची हत्या झाली. इंदिराजींची हत्या झाली त्या दिवशी ( ता 31 ऑक्‍टोबर 1984) दुःखानं व्याकुळ झालेले अटलजी मी पाहिले आहेत. 

'अटलजींचे संघाशी संबंध ताणलेले राहिले,' असं म्हटलं जातं. मात्र, मला त्यात तथ्य वाटत नाही. गोळवलकर गुरुजींचे तर अटलजी लाडकेच होते; पण अटलजींच्या सत्ताकाळातही रज्जूभैयांपासून ते सुदर्शन यांच्यापर्यंतच्या सरसंघचालकांशी त्यांचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्णच राहिले. 

एकदा रज्जूभैया अटलजींना म्हणाले ः ''अडवानी उपपंप्रधान होण्यास तयार आहेत.'' त्यावर क्षणाचाही विलंब न लावता अटलजी म्हणाले होते ः ''अच्छा? लो, बना दिया उन को उपप्रधानमंत्री!'' भारतीय मजदूर संघानं तर वाजपेयी सरकारविरुद्ध मोहीमच उघडली होती; पण दत्तोपंत ठेंगडी भेटले की अटलजी व त्यांच्यात इतक्‍या मनस्वी गप्पा होत, इतका हास्यविनोद चाले की 'मजदूर संघाच्या सभेत आग ओकणारे हेच का दत्तोपंत,' असा संभ्रम मला पडत असे. रामरथयात्रेच्या योजनेला अटलजी सुरवातीला फारसे अनुकूल नव्हते. मात्र, लालूप्रसाद यादव यांनी अडवानी यांना रथयात्रेदरम्यान बिहारमध्ये अटक करताच दिल्लीत विश्वनाथ प्रतापसिंह सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा अटलजींनीच केली. 

अटलजींचं राजकीय आकलन जबरदस्त होतं. सन 2004 मध्ये ते लखनौमधून निवडणुकीला उभे होते व देशाची जबाबदारी असल्यानं तिथं त्यांना प्रचारासाठी दोनच दिवस येता आलं होतं. प्रमोद महाजन यांच्याबरोबर लखनौमध्ये आल्या आल्या त्यांनी मला राजभवनावर बोलावून घेतलं व विचारलं ः ''शिवकुमारजी, क्‍या हाल है?'' मी म्हटलं ः ''अटलजी, तुम्हीच जिंकणार.'' ते उत्तरले ः ''मी तर जिंकेन; पण आपलं सरकार काही येत नाही. पुन्हा आपण सरकार स्थापन करू शकू, असं मला वाटत नाही.'' -मी म्हटलं ः ''अटलजी, तुमच्याशिवाय आहेच कोण?'' तेव्हा ते शांतपणे म्हणाले ः ''शिवकुमारजी, जनता नावाची जी एक महाशक्ती आहे ना, ती फार अनाकलनीय असते. ही जनता आपला विचार माईकवर सांगत नाही; पण मतपेटीतून असा झटका देते की बस्स!'' सन 1974 मध्ये अटलजी पराभूत झाले होते. सायंकाळी ते रायसीना रस्त्यावरच्या निवासस्थानी येताच समोरच्या प्रेस क्‍लबमधल्या पत्रकारांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. एकानं प्रश्‍न केला ः ''जनसंघाला काय भवितव्य आहे?'' अटलजी हसत म्हणाले ः ''जनसंघाला उज्ज्वल भवितव्य आहे. कारण, जो जितक्‍या उंचीवर असतो तो तेवढाच खाली येतो व जो खाली असतो, तो तेवढ्याच उंचीवर जातो, हा निसर्गाचा नियमच आहे. तुम्ही, मी आणि या ब्रह्मांडातला कुणीही निसर्गनियमांच्या बाहेर नाही.'' अटलजींचं हे वाक्‍य कोणत्याही काळात मननीय आहे, असं मला वाटतं. 

अटलजी पंतप्रधान झाले तेव्हा लोकांना भेटण्यासंदर्भात मात्र त्यांच्यावर मर्यादा आल्या. 

राजशिष्टाचाराची सुरक्षाव्यवस्था त्यांना प्रचंड जाचक वाटत असे. ते चिडून म्हणत ः 'भाई, ये प्रोटोकॉल की बेडियों ने मुझे जकड लिया है।' लाल किल्ल्यावरच्या एका भाषणानंतर मी त्यांना म्हटलं ः ''आज तुमचं भाषण तितकंसं चांगलं झालं नाही.'' त्यावर ते म्हणाले ः ''क्‍या करें! उस शीशे की दीवार ने मेरे शब्दों को ही बॉंध लिया था!'' सन 2001-02 मध्ये त्यांच्यावर गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली; पण नंतर कामाच्या ताणामुळं आवश्‍यक ती फिजिओथेरपी करणं जमलं नाही व त्यांना याचा मोठा फटका बसला. त्यांचं फिरणं हळूहळू बंद होत गेलं. 

'प्रकृती अधिकच खालावल्यामुळं अटलजींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,' असा फोन मला 

11 जुलै रोजी आला. मी तातडीनं एम्स रुग्णालयात धाव घेतली. डॉक्‍टर गुलेरिया यांना भेटलो. 'प्रकृती निश्‍चितच सुधारेल,' असा दिलासा त्यांनी दिला...पण 16 ऑगस्टला दुपारनंतर अतिदक्षता विभागाच्या कॉरिडॉरमध्ये डॉक्‍टरमंडळींची धावपळ वाढली व आम्हाला कसल्या तरी अपशकुनाची चाहूल लागली. सायंकाळी चारच्या सुमारास डॉ. गुलेरिया म्हणाले ः ''शिवकुमारजी, तुम्ही आत जाऊन या.'' धीर एकवटून मी आत गेलो. चादर बाजूला केली आणि निश्‍चलपणे पहुडलेल्या अटलजींच्या थंडगार पायांवर डोकं ठेवलं. त्यानंतर तासाभरातच अटलजींनी या जगाचा निरोप घेतला. एका 'अटलयुगा'चा अस्त झाला. शिवकुमार नावाची ही सावली पोरकी झाली...कायमची! 

(शब्दांकन ः मंगेश वैशंपायन) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com