आकृती-प्रतिकृती-प्रकृतीचं प्रतिबिंब (हेमंत जोशी)

हेमंत जोशी hemantjoshi023@gmail.com
रविवार, 22 एप्रिल 2018

अनेकदा चित्रात असे काही आकार असतात, जे ओळखीचे वाटतात; मात्र त्यांची रचना एकमेकांच्या बरोबरीनं का केलेली असते, त्याचं आकलन होत नाही. अनेकदा काही रचना अशा असतात, की आपल्याला त्यांत नुसतेच रंग, अनाकलनीय आकार दिसतात. मात्र, पाहणाऱ्याला त्यातून हळूहळू अनेक प्रतिमांचा भास होऊ लागतो. तिचा/त्याचा चित्राशी संवाद सुरू होऊ लागतो आणि एक क्षण तो विचारांचा डोलारा साफ कोसळून जातो. पुन्हा नवा शोध सुरू होतो. रंगांचे स्तर उतरत उतरत तो खोल जाऊ लागतो. अनेक जाणिवांचा स्पर्श त्याला होऊ लागतो. तो सगळ्या भवतालापासून कोसो दूर गेलेला असतो.

अनेकदा चित्रात असे काही आकार असतात, जे ओळखीचे वाटतात; मात्र त्यांची रचना एकमेकांच्या बरोबरीनं का केलेली असते, त्याचं आकलन होत नाही. अनेकदा काही रचना अशा असतात, की आपल्याला त्यांत नुसतेच रंग, अनाकलनीय आकार दिसतात. मात्र, पाहणाऱ्याला त्यातून हळूहळू अनेक प्रतिमांचा भास होऊ लागतो. तिचा/त्याचा चित्राशी संवाद सुरू होऊ लागतो आणि एक क्षण तो विचारांचा डोलारा साफ कोसळून जातो. पुन्हा नवा शोध सुरू होतो. रंगांचे स्तर उतरत उतरत तो खोल जाऊ लागतो. अनेक जाणिवांचा स्पर्श त्याला होऊ लागतो. तो सगळ्या भवतालापासून कोसो दूर गेलेला असतो. तरी निश्‍चित थांग त्याला लागत नाही; परंतु एका वेगळ्या अनुभवाची जाणीव मात्र त्याला मोहरून टाकते. तो अनुभव शब्दांत व्यक्त करणं कठीण असतं. हे सगळं काही क्षणांपुरतंही असू शकतं. प्रत्येक जण वेगवेगळ्या पातळीवरून वेगवेगळा अनुभव घेत असतो. प्रदर्शन पाहिल्यावर अनेक प्रतिमांशी, कल्पनांशी पाहणाऱ्याचा संवाद रंगतो. अनेक प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात उभे राहतात. माझ्या मते, चित्र हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर वगैरे नसतं! ती एक सहजसुंदर कृती आहे. तीत कधी आकृती, कधी प्रतिकृती तर कधी प्रकृती प्रतिबिंबित होत असते. झाडांना फळं, सुंदर सुंदर पानं-फुलं का? मोराच्या पिसाऱ्यात एवढे सुंदर रंग का? खळखळ वाहणाऱ्या नदीत गोड गाणं का? तर, या सगळ्या निसर्गाच्या सहजसुंदर कृती आहेत आणि त्यांतून सौंदर्यानंदाची
देवाण-घेवाण होत असते. देणारा देत जातोय, घेणाऱ्यानं घेत जावं! जोवर ही निर्मितीची फॅक्‍टरी 24 बाय 7 काम करतेय, तोपर्यंत नवनिर्मिती होत राहणार. चित्रकलेतलीसुद्धा!
कल्पनांची बीजं कुठल्याही रूपात दडलेली असतात आणि चित्रकाराच्या हातून त्या बीजांना कधी प्रत्यक्षरूप मिळेल काही सांगता येत नाही. चित्रकारासाठी कधी कधी अनेक दिवसांचा काळही ते घडण्यात जाऊ शकतो! काही चित्रं पूर्ण होण्यात अनेक महिनेसुद्धा जातात. तेवढा काळ त्या चित्रकाराला त्या विचारात गुंतून राहावं लागतं. या प्रक्रियेत एखादा रंग, एखादा पोत त्याला एखाद्या वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊ शकतो; हे म्हणजे रानात फिरताना काही फुलं किंवा एखादा रानसुगंध असं काही भुलवतो आणि मग भुलणारा रानभर भटकतो...भान विसरून!
चित्रविचाराच्या तळाशी असलेलं, नसलेलं, भासलेलं गूढ त्याला स्वस्थ बसू देत नाही. काही काळापुरता तो त्या पातळीपासून वर येतो आणि काहीतरी गवसेल या आशेनं पुन्हा त्यात बुडून जातो आणि एका नव्या चित्राची सुरवात होते. अनेकदा मी "जहॉंगीर' किंवा तशा अन्य आर्ट गॅलऱ्यांमध्ये पाहिलंय की तिथं "मुंबई दर्शन'ची बस येते. सगळ्या पर्यटक मंडळींना चित्रप्रदर्शनं पाहायला नेलं जातं. कुठल्या कुठल्या गावांतून ही माणसं येत असतात. सहज चक्कर टाकून पाचेक मिनिटांत प्रदर्शन पाहून जातात. मला वाटतं, शहरापासून लांब राहणाऱ्यांच्या त्या अनेकांमधल्या एकाच्या मनात जरी आपलं असं एखादं चित्र अशा प्रदर्शनांत लागावं ही इच्छा निर्माण झाली तर कदाचित एक चित्रकार घडवल्याचं श्रेय त्या प्रदर्शनाला लाभलेलं नसतं काय? हे स्वप्न त्याच्या जागेपणीच त्याच्या डोक्‍यात भिनवणं हेही नसे थोडके!
एखाद्याला गाता येत नसलं तरी तो गाणी ऐकतोच, त्यांचा आनंद घेतोच!
...तो क्रिकेट भले खेळला नसेल तरी मॅच बघून चर्चा करतोच!
...त्यानं कथा-कादंबऱ्या लिहिल्या नसतील; पण तो पुस्तक वाचतोच!
...मग चित्रातलं काही कळत नाही म्हणून चित्रप्रदर्शनांकडं पाठ फिरवणं कितपत योग्य?

Web Title: hemant joshi write article in saptarang