स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा संदेश देणाऱ्या 'त्या' दोघी!

मधु मिलिंद निमकर
सोमवार, 17 एप्रिल 2017

प्रत्येक व्यक्तीच्या मनातील एका कप्प्यात काहीतरी करण्याची जिद्द असते. बऱ्याचदा जगण्याच्या व्यापात या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. पण काही माणसं जिद्दीने पेटून उठतात. त्यासाठी आवश्‍यक त्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेतात आणि ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मनापासून धडपड करतात. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडणाऱ्या दोन मुलींच्या भेटीचा प्रसंग लेखिकेने मांडला आहे.

मिटिंग संपल्यावर बाहेर पडत असतांना डॉक्‍टर रत्ना समोर आल्या. नुकतीच ओळख झाल्याने काहीतरी बोलावं या विचाराने मी त्यांच्या दिशेने चालत गेले आणि त्यांच्या समोर जाऊन उभी राहिले. स्पीरिच्युअल गोष्टींवर त्यांचा जबरदस्त विश्वास असल्याने त्यांच्या प्रत्येक गोष्टींचा संदर्भ मला त्या विषयाकडे ओढून घेऊन जात होता. मित्रांच्या ओळखीने आमंत्रित केलेल्या डॉक्‍टर रत्ना फेसरीड उत्तम करतात अशी ख्याती मी आधीच ऐकली होती.

निरोप घेताना त्या म्हणाल्या, "मी काल स्वतःला विचारलं मी ह्या कार्यक्रमाला जाऊ का? तर मला आतून उत्तर आलं, तुला जावंच लागेल हे माहित आहे तर विचार का करतेस?' स्वतःची ओळख सांगताना देखील त्या म्हणाल्या, "मला चटकन आठवलं.. माणसाच्या डोळ्यात बघून मी ओळखते ही व्यक्ती माझं काम करेल का नाही...' मी हसले आणि पुढे चालत राहिले. कदाचित मुद्दाम, परंतु बरेचदा चुकून आपण काही लोकांना भेटायला संकोचतो. समोरच्याची भेटायची इच्छा जितकी तीव्र तितका आपला संकोच नको तरी वाढतो.

दीड महिना असाच एकीचा फोन वेध घेत होता. काय करावे सुचत नव्हतं. मी तिला टाळतही नव्हते आणि भेटायची संधी देखील मिळत नव्हती. आदल्या दिवशी मुंबई रेल्वेचा दोन-अडीच तासाचा प्रवास करून भेटायला तयार झालेल्या प्राजक्ताला मीच एवढा त्रास घेऊन येऊ नकोस म्हटलं होतं. तिची जिद्द आणि धडपड मला त्यावेळीच जाणवलेली. कसंही करून हिला लवकरात लवकर भेटायचं हा विचार करूनच मी तिला भेटायला बोलावलं.

"येतेस का प्राजक्ता. तू येईपर्यंत माझी मिटिंग आटपेल!', तिने यावेळी देखील शब्द पडू दिला नाही. ती काय करते, घरी कोण आहे, कशी दिसते मला काहीही माहित नव्हतं. तासाभराने मी मिटिंग संपवून फोन केला, "अगं, कुठे पोहोचलीस..' उत्तर आले. "सॉरी मॅडम, ट्रेन वाटेत वीस मिनिटं अडकली आहे.' सुमारे पाऊण तासाने ती स्टेशनवर उतरली. रस्ता क्रॉस करून समोर मी तिला दिसेन ह्याची मला खात्री होती. परंतु झालं भलतचं. ती स्टेशनच्याविरुद्ध दिशेला गेली. फोन केल्यावर रस्ता शोधत तिने रस्त्याचं दुसरं टोक गाठलं आहे हे समजलं. "तुम्ही सांगितलं ते ठिकाण इथे कुणाला माहित नाही. आम्ही विचारलं पण ठिकाण मिळत नाही आहे', असं बोलून तिने एका माणसाच्या हातात बोलायला फोन दिला.

दहा मिनिटांत ऑफिसला पोहोचतोय, एक मिटिंग आहे, असं कळवून आता आणखी चाळीस मिनिटं होऊन गेली होती. "अगं बाई कसं होणार हिचं...!', पटकन मनात विचार येऊन गेले आणि समोर दोन तरुणी एकमेकींकडे बघून हसत माझ्यापुढे येऊन उभ्या राहिल्या. ह्या कोण हा प्रश्न विचारायच्या आधी त्या एकमेकींना काहीतरी खुणावत होत्या ह्याकडे माझं लक्ष वेधून गेलं. "मधु मॅडम..' शब्द उच्चारल्यावर मी त्यांचं वाक्‍य पूर्ण होऊ न देताच म्हटलं, "मला कसं ओळखलं एवढ्या चटकन तुम्ही?' माझ्या तोंडातून आश्‍चर्याचे उद्‌गार बाहेर पडले. त्यावर दोघी एकमेकींकडे बघून मिश्‍कील हसत म्हणाल्या, "ती ना मॅडम माणसं ओळखायची आमची गंमत आहे. आम्ही माणसं चटकन ओळखतो.' माझं कुतूहल आणखीन वाढलं. "आम्ही चेहरा बघून नाही, डोळे बघून माणसं ओळखतो..! मी रोज तुमचा डीपी बघत असते. मी राखीला म्हणाले हे डोळे बघ, तुला त्यांना ओळखणं अवघड जाणार नाही.', आम्ही तिघी हसत ऑफिसच्या दिशेने निघालो.

जिद्दीने तीन तास प्रवास करून मला भेटणाऱ्या ह्या दोन मुलींविषयी मला देखील तितकेच कुतूहल होते. दोघींची लग्न झालेली, घरी मुलांना झोपवून, शेजारच्यांना लक्ष ठेवायला सांगून त्या मला भेटायला एवढी धडपड करून आलेल्या. कदाचित मी त्यांच्या इतकं करू शकले नसते, काय सांगावं! बेताचं शिक्षण, परंतु लवकर लग्न झालेल्या घरंदाज मुली स्वतःची ओळख निर्माण व्हावी म्हणून विश्वासाने मार्ग चालत होत्या. त्यांच्या आत्मविश्वासाने मी देखील प्रभावित झाले. त्यांच्या आवडीनिवडी आणि मर्यादा ओळखून मी त्यांना मार्गदर्शन केले. दीड तास गप्पा मारल्यावरही कुणालाच उठावेसे वाटत नव्हते.

"तुमच्या मर्यादा, सामर्थ्य आणि घरच्यांचं पाठबळ ह्या गोष्टी तुम्ही ओळखून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व सहज आणि सोप्पं जाईल. आपण लवकरच कामाला लागू', असं सांगून मी मिटिंग संपवली. ऑफिसची वेळ संपून लोकं घरी निघून गेलेली. परंतु त्यांचा पाय निघत नव्हता. "मॅडम, तुम्ही फक्त आमच्या बरोबर राहा. मला माझ्या गावाला जाऊन व्यवसाय सुरु करायचा आहे. गावाला माझी गरज आहे. तिथे लोकांची परिस्थिती खूप वाईट आहे. परंतु त्यांची तरीही काही तक्रार नसते', तिच्या डोळ्यात पाणी चमकले. "तुझा आदर्श देऊन आपण लोकांना दिशा देऊया.....!', असा मी तिला विश्वास दिला. तिच्या डोळ्यात मला स्वत:ची ओळख निर्माण करण्याची जिद्द दिसत होती. मला तिच्या घरी वाट बघणाऱ्या मुलांची काळजी वाटत होती. त्यानंतर लवकरच मिटिंग संपवून आम्ही तिघी आपापल्या घरी जायला निघालो. मला वाटेत काही पुस्तकं खरेदी करायची होती म्हणून मी विचार करत उभी राहिले. परंतु त्या दोघींनी मला त्यांच्या बरोबर रिक्षात घातले. "तुमचं पुस्तक स्टेशनला नक्की मिळेल', प्राजक्ताचा हा प्रस्ताव मला देखील मान्य झाला.

आता निरोप घ्यायची वेळ आली.....मी पाठ फिरवणार इतक्‍यात ती म्हणाली, "मॅडम, एक बोलू का?' मी थांबले आणि तिच्याकडे बघत राहिले. "तुमचे डोळे खूप छान आहेत..!', असं म्हणून आम्ही तिघींनी जोरजोरात हसलो आणि एकमेकींचा निरोप घेतला. माझी पाठ फिरते न फिरते तोच त्या दोघी धावत स्टेशनच्या दिशेने ट्रेन चुकवायची नाही म्हणून दृष्टीआड झाल्या.

परिस्थिती कितीही वाईट असेल, तरीही आपण स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न कमी पडू द्यायचे नाहीत, हा संदेशच जणू त्या मुली देत होत्या. मला विश्‍वास आहे त्या नक्कीच यशस्वी होतील.

(लेखिका समाजसेविका आहेत)