कलेतलं भूमितत्त्व... (मंगेश नारायणराव काळे)

कलेतलं भूमितत्त्व... (मंगेश नारायणराव काळे)

अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते, तशीच ती तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते. भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी जमातींनी आपल्या आदिम प्रेरणेतून, संस्कारातून हा पट निर्माण केला आहे व परंपरेनुसार जपूनही ठेवला आहे.

भारतात सिंधू संस्कृतीचा किंवा लेखनकलेचा शोध लागण्यापूर्वीच्या प्रागैतिहासिक कालखंडातल्या पाश्‍चात्य संस्कृतीपासून (अश्‍मयुग) थेट आजच्या आधुनिक-उत्तराधुनिक शिल्प-चित्रकलेच्या विविध रूपांचा इतिहास पाहताना एक समान गोष्ट या मोठ्या अंतरायातल्या विविध टप्प्यांवर दिसून येते, ती म्हणजे या सगळ्या कलारूपांमध्ये दिसणारा भूमितत्त्वाचा आढळ. दृश्‍यकलेच्या इतिहासात, परंपरेत जी काही विविध कलारूपं निर्माण झाली, त्यामागं असणाऱ्या अनेक प्रेरणांमध्ये भूमितत्त्वाचं पडलेलं प्रतिबिंब ही बाब अतिशय महत्त्वाची राहिलेली आहे. काही प्रमाणात तर या भूमितत्त्वाच्या उपस्थितीमुळंच जगभरातल्या विविध प्रांतांतल्या समाज-संस्कृतींमध्ये कलारूपांची ओळख पटवता येणं, त्यांचं वेगळेपण अनुभवता येणं शक्‍य झालेलं आहे. उदाहरणादाखल वर्तमानातल्या भारतीय चित्र-शिल्पकलेच्या विविध रूपांची छाननी करायची झाल्यास लक्षात येतं, की फारच थोडे चित्रकार, शिल्पकार हे जागतिक पटावर भारतीयत्व अधोरेखित करताना दिसतात. याचं एकमेव कारण म्हणजे, आधुनिक-उत्तराधुनिकतेच्या ‘रॅट रेस’मध्ये समकालीन राहण्याच्या अट्टहासात कलावंतांना पडलेला आपल्या भूमितत्त्वाचा विसर. आज आपण जर जगभरातल्या विविध कलांचा इतिहास पडताळून पाहिला तर लक्षात येईल, की प्रत्येक कलेच्या परिघात देश-प्रदेश, समाज-संस्कृतीची, तिथल्या भवतालाची एक विशिष्ट मक्तेदारी राहिली आहे. संगीत-नाटक-नृत्य-साहित्य-चित्रकला-शिल्पकला यांच्या संदर्भात हे सोदाहरण सांगता येऊ शकेल.

अश्‍मयुगातली गुहाचित्रं-पाषाणचित्रं रेखाटणाऱ्या, रंगवणाऱ्या अनामिक निर्मिकांची कलारूपाकडं जाण्याची सुरवात कुतूहलातून नि व्यक्त होण्याच्या धडपडीतून झाली. आधुनिक-उत्तराधुनिक काळातल्या निर्मिकांच्या कलानिर्मितीमागं कुतूहल, व्यक्त होण्याची धडपड याबरोबरच इतरही पैलू आहेत. त्यात ‘सर्जनाची आस’ या घटकापासून ते ‘कलारूपा’ची किंवा कलाकृतीची निर्मिती, कलाबाजारातली क्रय-विक्रयमूल्य असलेली ‘कलावस्तू’ अशा अनेक बाबींचा समावेश होतो व त्यानुसार ही चढण किंवा उतरण दिसून येते व या सगळ्या प्रवासात भूमितत्त्वाची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली असल्याचंही दिसून येतं.

‘पृथ्वी पंचम्‌ भूतम्‌...’ म्हणजे पृथ्वी (भूमी) हे पंचमहाभूतांपैकी एक असं तत्त्व आहे, जे ‘जडत्वा’चा पुरस्कार करत नाही, तर ‘चैतन्या’चा पुरस्कार करतं. कोणत्याही कलेच्या निर्मितीसाठी आवश्‍यक असणाऱ्या ‘मातृ’त्वाचं वहन करणारी ही भूमी आहे नि ती जीवनदायिनी आहे म्हणजे निर्मितिप्रवण आहे. भारतीय धार्मिक, आध्यात्मिक परंपरेत ‘पंचमहाभूतं’ या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या पृथ्वीवर जे जे काही अस्तित्वात आलं आहे, ती प्रत्येक वस्तू, जीव-जंतू, पशू-पक्षी या सगळ्यांची निर्मिती या पाच तत्त्वांतून म्हणजे पृथ्वी (भूमी-Earth), आप (जल-Water), तेज (अग्नी- (Fire), वायू (मरुत-Wind), आकाश (व्योम, शून्य-Space) यांच्यापासून झालेली आहे. सृष्टिरचनेप्रमाणेच मानवी शरीराच्या ‘निर्मिती’तही याच पाच तत्त्वांचं अधिष्ठान असल्याचं समजण्यात येतं. अशा पंचमहाभूतांमधल्या ‘भूमी’ या तत्त्वाचा - दृश्‍यकलेच्या संदर्भातला विशेषतः चित्र-शिल्पकलेतला - विचार इथं अभिप्रेत आहे. याअनुषंगानं ‘सर्जन नि भवताल’ असा बंध कल्पून आपल्याला भूमितत्त्वाचं प्रयोजन तपासून पाहता येऊ शकेल. भवताल नि सर्जनाचा संबंध असतो नि तो आपल्याला सगळ्याच ललित कलांमध्ये विपुल प्रमाणात दिसून येतो. शिवाय, भूमितत्त्वाला भारतीय तत्त्वज्ञानात किंवा अन्य संस्कृतींमध्येसुद्धा ‘स्त्री’रूपात पाहिलं गेलं असल्यानं अशा ‘स्त्री’तत्त्वापासून निर्मित, प्रेरित, भारित कलारूपांची संगती आजवरच्या विविध टप्प्यांवरच्या कलारूपांशी लावता येते. यातलं लोकतत्त्व (Folk element) हे एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगता येईल. मानवी संस्कृतीत लिपीचा, भाषेचा शोध लागण्यापूर्वी संप्रेषणाचं कार्य हे प्रतिमा-प्रतीकांच्या आधारानं झालेलं दिसतं. विशेषत्वानं जेव्हा मानवाला ‘व्यक्त’ होण्याची गरज निर्माण झाली, तेव्हापासून किंवा कुतूहलातून, अंतःप्रेरणेतून निर्माण झालेल्या आद्य कलारूपांमध्येही ‘लोकतत्त्व’ हे केंद्र राहिलेलं दिसतं. प्रथा, चाली-रीती, रूढी-परंपरा, लोकजीवन, संस्कृती, श्रद्धा यांविषयीचं सूचन या प्रतिमा-प्रतीकांमधून अतिशय समर्पकपणे झालेलं असून, लोककला, लोकजीवन नि भूमी (भूप्रदेश) यांचं एक घट्ट नातं यामागं कार्यरत असतं. तिथला उपस्थित प्रत्येक घटक नव्यानं कल्पून, प्रक्षेपण करण्याचं काम लोककला (Folk art) करत असते नि काहीएक अर्थानं त्या त्या भूमीचं सांस्कृतिक प्रतिनिधित्वही करत असते.

इथं चित्र-शिल्पकलेच्या निर्मितीमागं भूमितत्त्वाचा आढळ, त्याची उत्पत्ती, प्रयोजन हे सगळं कलारूपांच्या साह्यानं शोधायचं असल्यानं - ‘कलानिर्मितीच्या ‘घडणी’मागं कलावंताचा भवताल उभा असतो’ - ही वर्तनवाद्यांची धारणा स्वीकारलेली आहे व त्याबरहुकूम भूमितत्त्वांचा शोध घ्यायचा आहे. माणूस हा त्याच्या भवतालापासून (भूप्रदेश, समाज, संस्कृती), बाह्यविश्‍वापासून अनिवार्यपणे नेहमीच आकार घेत असतो, असं वर्तनवादी मानतात. ‘मानवी सर्जनशीलता’ हे नेणिवेचं कार्य आहे. ‘आपल्या अतृप्त आकांक्षांना कलेद्वारे मूर्तरूप देऊन तो आपली तृप्ती शोधत असतो,’  ही सिग्मंड फ्रॉईडची धारणा स्किनर, वॅटसन आदी वर्तनवादी विद्वान स्वीकारत नाहीत. असं असलं तरी मानवी सर्जनशीलतेचा विचार अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेला दिसतो. म्हणजे फ्रॉइड-कार्ल युंग यांची ‘नेणीव’केंद्री धारणा किंवा मास्लो, एरिक फ्रॉम यांच्यासारख्या मानवतावादी विद्वानांनी वर्तवलेली ‘आत्मप्रचीती’ची धारणासुद्धा सर्जनप्रक्रियेत तितकीच महत्त्वाची आहे आणि त्याआधारे कलारूपांच्या सर्जनामागचं अपरिचित विश्व समजून घेता येणं शक्‍य आहे.
प्रागैतिहासिक मानवानं अशाश्‍वत, रानटी जीवनापासून थेट आजच्या अतिभौतिकवादी जीवनापर्यंतचा केलेला प्रवास हा जसा अनेक अवस्थांतरणांचा प्रवास आहे, तसाच तो एक कलासमाज म्हणून, मानवी जीवन आणि कला यांच्यातलं द्वैत म्हणून नि दोहोंमधली असोशी, तीव्रता, परस्परपूरकता दर्शवणारा म्हणूनही महत्त्वाचा आहे. या धडपडीतून अनेक भिन्न अशा संस्कृती-समाजांचा शोध लागला किंवा तत्कालीन समाज-संस्कृतींच्या जडणघडणीत कलेचा हस्तक्षेप ठळक होत गेला. एखाद्या भूभागातलं, प्रदेशातलं हवामान, तिथलं सामाजिक-राजकीय स्थित्यंतर, भौगोलिक परिस्थिती, निसर्गाचं वर्तन या सगळ्यांचं प्रतिबिंब मानवी जीवनाप्रमाणेच चित्र-शिल्प या कलांमध्येही पाहता येतं. कारण, कोणतीही कला ही ज्या प्रांतात निर्माण होत असते, तिथल्या भूमिवैशिष्ट्यांसह ती प्रकट होत असते. तिच्या निर्मितिप्रक्रियेत भवतालातले वेगवेगळे घटक प्रभाव टाकत असतात. शिवाय, सगळ्याच कला निसर्गाच्या सान्निध्यात निर्माण होत गेलेल्या असल्यानं त्यांचा मानवी जीवनाशी असलेला बंध हा अतिशय पुरातन स्वरूपाचा नि परस्परपूरक असा राहिलेला आहे.
***

दृश्‍यकलेच्या संदर्भात - नाईल नदीच्या काठावर वसलेला इजिप्तचा प्रदेश हे या भूमितत्त्वाच्या संबंधांतलं एक महत्त्वाचं नि पुरातन उदाहरण म्हणून सांगता येईल. इसवीसनपूर्व २६०० च्या सुमारास झालेली पिरॅमिड्‌सची निर्मिती नि या पिरॅमिड्‌सच्या आश्रयानं, निमित्तानं झालेली उत्कृष्ट अशा चित्र-शिल्पांची निर्मिती हा जसा कलेच्या परंपरेतला एक महत्त्वाचा दुवा आहे, तसंच ते पुरातन काळातल्या कारागीर-कलावंतांनी कलेच्या निर्मितीद्वारे केलेलं भूमितत्त्वाचं प्रक्षेपण म्हणूनही महत्त्वाचं आहे. मानवी संस्कृतीच्या एका कलासक्त पर्वाची नांदी असलेल्या या महाकाय पिरॅमिड्‌सच्या निर्मितीमागं मानवी कुतूहल, धार्मिक, आध्यात्मिक श्रद्धा, ‘आत्मा’ या संकल्पनेच्या अस्तित्वाचा स्वीकार नि ‘मरणोत्तरसुद्धा जीवन आहे’ ही धारणा आहे, या श्रद्धेमधूनच मानवी शरीराचं, आत्म्याचं जतन, स्वर्ग-नरक या संकल्पना मानवी समाजात स्वीकारल्या गेल्या. याच श्रद्धेतून ‘ममी’च्या स्वरूपात मानवी शरीर हजारो वर्षं सुरक्षित राहील, यासाठीचे प्रयत्न झाले. या ‘ममीज्‌’ सुरक्षित राहाव्यात म्हणून शवपेट्या, मृतांच्या ओळखीसाठी त्यावरची कलाकुसर, चित्रलिपीनं-मंत्रलिपीनं व्यापलेली दालनं, त्यातली चित्रं, शिल्पं नि या सगळ्यासाठी मृतांना, त्यांच्या आत्म्यांना स्वर्गात जाता येईल (ही श्रद्धा) असा सुकर रस्ता दाखवणाऱ्या अजस्र, अवाढव्य पिरॅमिड्‌सची निर्मिती झाली. मृत व्यक्तीच्या हुबेहूब प्रतिमा तयार केल्या म्हणजे तिला चिरंजीवित्व प्राप्त होतं, या श्रद्धेतून इतिहासातल्या पिरॅमिड्‌समधल्या शिल्पांच्या निर्मितीकडं पाहता येतं.  अत्यंत कठीण नि टिकाऊ अशा ग्रॅनाईटपासून इजिप्तमधल्या या शिल्पांची-मूर्तींची निर्मिती झाली. शिवाय, मृताच्या दैनंदिन जीवनातल्या प्रसंगांचं चित्रण करणारी चित्रं किंवा कोरीव शिल्पं (relic) चित्रित केली जात असत. ही शिल्पं, या मूर्ती, ‘ममीज्‌’सोबतच दफन केली जात असल्यानं मानवी संस्कृतीच्या इतिहासातलं एक पुरातन ‘कलापर्व’ आपल्याला उत्खननानंतर पाहता आलं. या ‘निर्मिती’चं प्रयोजन प्रत्यक्ष कलानिर्मिती म्हणून जरी नव्हतं तरी तत्कालीन कारागिरीचं नि आजच्या कलेचं पूर्वरूप म्हणूनही या निर्मितीकडं पाहता येतं नि त्यातलं भूमितत्त्वही अधोरेखित करता येतं. हेच पिरॅमिड्‌सच्या संदर्भातही म्हणता येईल. आकाशाला भिडू पाहणाऱ्या, सुळक्‍यासारख्या, वरवर जाणाऱ्या, निमुळत्या होत होत आकाशात विलीन झालेल्या महाकाय त्रिकोणी आकाराच्या निर्मितीमागं वास्तुकलेच्या नव्या रूपाचा शोध नसला तरी - मृताम्याला स्वर्गात (परलोकात) पोचणं सुकर व्हावं, ही धारणा या पिरॅमिड्‌सच्या आकारामागं, रचनेमागं असलेली दिसते. पिरॅमिड्‌सचे भव्य, महाकाय आकार नि चौफेर पसरलेली वाळू ही दृश्‍यात्मकता आजच्या वास्तुकलेसाठी आदर्शवतच नव्हे, तर प्रेरणास्वरूपही राहिलेली दिसते. इजिप्शियन कलेचा इतिहास हा या भव्य पिरॅमिड्‌सशिवाय पूर्ण होत नाही. कारण चित्र, शिल्प, भाषेची लिपीबद्ध ‘कलारूप’ निर्मिती हे या पिरॅमिड्‌सचं वैशिष्ट्य. पिरॅमिड्‌सच्या आतल्या भागांत असलेली असंख्य दालनं, त्यांत असलेली शिल्पं, रंगीत चित्रं, लिपीबद्ध मंत्र म्हणजे तत्कालीन ‘भूमी’तत्त्वाचा दमदार पुरावा म्हणता येईल. चित्र-शिल्पकलेप्रमाणेच इजिप्शियन कलाकुसरही तिथल्या भूमितत्त्वाच्या उच्च अभिव्यक्तीसाठी ओळखली जाते. सन १९२२ मध्ये जेव्हा तुतनखामेनच्या थडग्याचा शोध लागला नि त्यात सापडलेल्या संपूर्ण सोन्यानं मढवलेल्या शवपेटीवरची कलाकुसर, नक्षीकाम जगाला दिसली, तेव्हा इजिप्शियन कारागिरांच्या कौशल्याची ओळख पटली.
***

इजिप्शियन कलेप्रमाणेच ग्रीक कला हा पाश्‍चात्य कलेच्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पाही भूमितत्त्वाच्या संदर्भातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून पाहता येईल. ग्रीक कलाशैलीचा जेवढा जास्त प्रभाव पाश्‍चात्य कलाजगतावर किंवा जगभरातल्या कलाविश्वावर पडला आहे, तेवढा प्रभाव क्वचितच दुसऱ्या कोणत्या काळाचा, शैलीचा पडला असावा. ग्रीक कलेचं एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या कालखंडातली जी काही कलानिर्मिती होती/आहे (चित्र, शिल्प) ती ‘कल्पिता’ला ठाम नकार देणारी आहे.

मानवी देह जसा आहे, तसाच रंगवण्यात, घडवण्यात तत्कालीन कारागिरांनी, कलावंतांनी धन्यता मानली. जगभरातल्या जादूई विश्वाचं म्हणजे मानव-प्राणी, मानव-पक्षी संकररूपांचा आविष्कार किंवा अशक्‍यप्राय कल्पितांमधून रचली जाणारी कोणतीही कृती या निर्मितीत दिसत नाही. दुसरा एक लक्षात येणारा भाग म्हणजे शिल्पकलेच्या नि वास्तुकलेच्या तुलनेत ग्रीक कलेत चित्रकला दुय्यम स्थानावर दिसते. तत्कालीन ॲपेलस (Apelles), झेक्‍सिस (Zeuxis), पॉलिनॉटस (Polygnotus) या महत्त्वाच्या चित्रकारांची चित्रं कालौघात नष्ट झाल्यानं तर हा अभाव विशेषत्वानं जाणवतो. मात्र, भूमितत्त्वाचा विचार करता ग्रीक कलेनं आपल्या भवतालासोबत मानवी देहालाही भूमितत्त्वाशी जोडून घेतलेलं दिसून येतं. शिवाय, ग्रीक कलेचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे ग्रीक कलेपूर्वीच्या कलानिर्मितीमागं जसा धर्म, अध्यात्म, राज-समाजसत्ता, यातुविद्या आदी बाबींचा रेटा दिसून येतो किंवा या सगळ्याचा एक मोठा प्रभाव पाहता येतो, तसा कोणताही प्रभाव ग्रीक कलेनं स्वीकारलेला दिसत नाही. या सगळ्या जोखडातून मुक्तता करून घेऊन अतिशय वास्तवदर्शी निर्मिती हे या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणता येईल.
***

अश्‍मयुगीन कलेपासून सुरू झालेला दृश्‍यकलेचा हा प्रवास इजिप्शियन कला, ग्रीक कला व त्यानंतरच्या एत्रस्कन कला (इसवीसनपूर्व ८००), रोमन कला (इसवीसनपूर्व ३१ ते ३९३), ख्रिश्‍चन व बायझेन्टाइन कला (इसवीसन १०० ते १४५३) असा थेट प्रबोधनकाळापर्यंत (इसवीसन १४०० ते १६००) विस्तारत गेलेला दिसतो. पंधराव्या शतकात पाश्‍चात्य जगात झालेल्या वैचारिक क्रांतीमुळं (Renaissance) तोपर्यंतच्या ज्या काही कला व विद्या होत्या, त्यांचं खऱ्या अर्थानं पुनरुज्जीवन झालं ते याच कालखंडात. पुढच्या बरोक कला कालखंडात (इसवीसन १६०० ते १८०० कलेकडं ‘कला’ म्हणून पाहण्याची प्रवृत्ती स्थिरावून रॉयल अकादमी (इंग्लंड) व फ्रेंच अकादमी (फ्रान्स) यांसारख्या प्रत्यक्ष कलाशिक्षण देणाऱ्या संस्थांची सुरवात झाली. या आजवरच्या कलाइतिहासाची उजळणी करण्याचं प्रयोजन एवढ्याचसाठी, की प्रत्येक वळणावर कलारूपांमध्ये भूमितत्त्वाचं प्रतिबिंब कसकसं पडलं आहे, हे समजून घेता यावं. भारतीय दृश्‍यकलेचा पुरातन, प्राचीन प्रवाससुद्धा पाश्‍चात्य कलाप्रवासाप्रमाणेच धर्म, अध्यात्म, राजकीय-सामाजिक सत्ता, यातुविद्या अशा अनेक बाबींच्या प्रभावातूनच झालेला दिसतो.

कलेतलं भूमितत्त्व ही संकल्पना इथं कशी व कोणत्या आधारानं उभी केली आहे, हे आपल्याला काही तथ्यांच्या आधारे तपासून पाहता येईल. भूमितत्त्वाचा मुख्य आधार हा निर्मिकाचं, कारागिराचं, कलावंताचं त्याच्या भूमीशी असलेलं नातं हा राहिला आहे. कल्पना-संभावना-विकल्प यांचा शोध हे मानवी ‘सर्जना’तले मुख्य घटक आहेत. नावीन्य ही सर्जनशीलतेची मुख्य अट आहे नि ‘अर्थपूर्णता’ ही दुसरी. अर्थपूर्णता आणि नावीन्य असलेल्या निर्मितीशिवाय सर्जनशीलतेचं वर्तुळ पूर्णत्वास जाणार नाही. कालसापेक्ष नि अवकाशसापेक्ष कलांमध्ये ‘सर्जन’ हे जसं ‘नेणिवे’च्या परिघात घडतं, तसंच ते भवतालाच्या परिघातही घडत असतं. इथं भूमितत्त्वाचा जो काही प्रभाव निर्मिक-कलावंत यांच्या मनावर होतो, त्याच्या आधारे नि प्रत्यक्ष भूमितत्त्वाचं प्रतिनिधित्व करणारे जे घटक कलेच्या निर्मितीसाठी पोषक ठरतात, ते अशा दोघांच्या एकत्रित प्रभावातून भूमितत्त्व कलारूपात आपलं स्थान निर्माण करत असतं.
दुसऱ्या बाजूनं, आत्माविष्कार किंवा स्वानंद या घटना जरी कलानिर्मितीसोबत शेवटपर्यंत कार्यरत असलेल्या दिसत असल्या, तरी हाच केवळ कलानिर्मितीचा मुख्य हेतू असणार नाही. प्रत्येक कलेच्या तत्कालीन समाज-संस्कृतीमधल्या स्थानानुसार, महत्तेनुसार त्या कलेचा स्वीकार, निर्मिती, आकलनाची प्रक्रिया घडत असते नि या सगळ्या प्रक्रियेत भूमितत्त्वाचा मोठा सहभाग आपल्याला दिसून येतो. (आधुनिक-उत्तराधुनिक दृश्‍यकलेच्या संदर्भात आत्माविष्काराची गरज आजही तितकीच निकडीची असली तरी प्रकटीकरणाचा सोस, प्रसिद्धी, पैसा, बाजार (Market) अशा घटकांचा जोर वाढलेला असल्यानं दृश्‍यकलेत भूमितत्त्व काहीसं दुय्यम स्थानी गेलेलं दिसतं).

भूमितत्त्वाचं भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून अजिंठ्याच्या चित्रांचा उल्लेख करता येईल. सातवाहन नि वाकाटककालीन समाज-संस्कृतीचा, तत्कालीन भवतालाचा आरसा असलेल्या अजिंठ्याच्या लेण्यातली (क्रमांक १, २, १६, १७) रंगीत चित्रं ही या दोन्ही समाज-संस्कृतींचं समर्पक चित्रण करणारी आहेत. महायान लेण्यातल्या या चित्रांमधून त्या कालखंडातल्या चाली-रीती, रूढी-परंपरांप्रमाणेच तिथल्या वास्तू, बाजार, वेशभूषा, केशरचना, नित्योपयोगी वस्तू, वाद्य, वाहनं, आयुधं, राजचिन्हं दर्शवणारी वास्तव प्रतिमा-प्रतीकं पाहता येतात. अजिंठाकला ही जशी भारतीय कलाइतिहासातलं एक महत्त्वाचं कलापर्व म्हणून विचारात घ्यावी लागते किंवा तिच्या ‘कथन’शैलीसाठी ओळखली जाते तशीच ती, तीमधल्या भूमितत्त्वासाठीसुद्धा विचारात घ्यावी लागते.

भारतीय कलेतलं भूमितत्त्वासाठीचं दुसरं समर्पक उदाहरण म्हणून आदिवासी कलेचा उल्लेख करता येईल. भारतातल्या आदिवासी जमातींनी आपल्या आदिम प्रेरणेतून, संस्कारातून हा पट निर्माण केला आहे व परंपरेनुसार जपूनही ठेवला आहे. आदिवासी चित्रकलेतलं आदिमतत्त्व हे जसं आदिवासी संस्कृतीचं, तीमधल्या भूमितत्त्वाचं वहन करणारं आहे, तसंच ते भारतीय दृश्‍यकलेतल्या एका वैशिष्ट्यपूर्ण कलानिर्मितीची स्वतंत्र ओळख, अस्तित्व जपणारंही आहे. बिहारमधली ‘मधुबनी,’ छोटा उदेपूर इथल्या भिलाला, राठवा नि नायक अनुसूचित जाती-जमातींची ‘देव पिठोरा शैली,’ पश्‍चिम बंगालमधली ‘कालीघाट पटचित्रं,’ शाहुपुरा, भिलवाडा, चित्तोड, उदेपूर, नाथद्वारा इथली ‘पाबुजी चित्रं’ किंवा जोशी, छीपा चित्रकारांची ‘पड’चित्रं, उत्तर प्रदेशातल्या मथुरा-वृंदावनची ‘बहुरंगी चित्रं’ किंवा उडिशामधली ‘सौरा’चित्रं, महाराष्ट्राच्या आदिवासी पाड्यांमधली ‘वारली’ चित्रं अशी जी काही आदिवासी जाती-जमातींनी जगवलेली, टिकवलेली विविध कलारूपं आहेत, चित्रशैली आहेत, या सगळ्यांमध्ये आढळणारं भूमितत्त्व अतिशय ठळक स्वरूपाचं आहे नि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या निर्मितीसाठीच्या ‘प्रेरणा’ त्यांच्या मर्यादित अवकाशामुळं त्यांच्या भवतालावर जास्त विसंबून राहिलेल्या आहेत. त्यांच्या भवतालात प्रतिबिंबित होणारा, त्यांना खुणावणारा प्रत्येक घटक विविध प्रतिमा-प्रतीकांच्या साह्यानं ते आपल्या निर्मितीत सामावून घेत असतात. लोककलांच्या संदर्भात हे भवतालाचं घनिष्ठत्व जवळजवळ प्रत्येक कलेत आपल्याला अनुभवता येतं. त्यामुळं ‘कलेतल्या भूमितत्त्वा’चा मागोवा घेत असताना असंही म्हणता येईल, की लोककलेत नि लोककलेनं प्रभावित झालेल्या आधुनिक कलारूपांमध्ये भूमितत्त्वाची उपस्थिती केंद्रीय असते. जेव्हा जेव्हा चित्रकलेसारख्या दृश्‍यकलेतून भूमितत्त्वाचा संकोच होताना जाणवतो तेव्हा तेव्हा लक्षात येतं, की या सदरहू निर्मितीच्या प्रेरणा त्या कलावंताच्या, निर्मिकाच्या भूमीपेक्षा बाहेरच्या, ‘परक्‍या’ भूमीवर जास्त बेतलेल्या आहेत. आधुनिकतेच्या प्रवेशानंतर एका वळणावर भारतातल्या या भूमितत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या अनेक आदिवासी कला, शैली, रूपांकडं आपलं लक्ष गेलं आहे. आधुनिकतेच्या आगमनासोबत आलेल्या कलाबाजारात काहीएक अर्थानं या आदिवासी कलारूपांना उत्तेजन दिलेलं दिसत असलं तरी शहरी, नागरी ‘तत्त्वा’च्या आघातानं, कलाबाजाराच्या रेट्यानं या कलेत भूमितत्त्व दुय्यम होत जाऊन कारागिरीला महत्त्व आलेलं दिसतं. मात्र, भारतीय आधुनिक कलेतल्या काही महत्त्वाच्या चित्रकारांनी या ‘लोक’जाणिवेकडं, तीमधल्या ‘भूमी’तत्त्वाकडं आपल्या निर्मितीसाठीची ‘प्रेरणा’ म्हणून पाहिल्यानं भूमितत्त्वाचा आढळ भारतीय आधुनिक कलेत मोठ्या प्रमाणावर दाखवून देता येऊ शकतो. नंदलाल बोस, रामकिंकर बैज, जेमिनी रॉय, गणेश पाईन, ए. रामचंद्रन, प्रोकाश करमाकर, लालूप्रसाद शॉ, जोगेन चौधरी, के. जी. सुब्रह्मण्यम, अमित अंबालाल, माधवी पारेख, मनजित बाबा अशा कितीतरी महत्त्वाच्या व ज्येष्ठ चित्रकारांनी हे ‘भूमी’तत्त्व आपल्या प्रयोगधर्मी निर्मितीतून पुनःपुन्हा नव्यानं साकारलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com