नावीन्यपूर्ण प्रयोग गायनात पाहिजेतच (मंजिरी आलेगावकर)

manjiri aalegaonkar write article in saptarang
manjiri aalegaonkar write article in saptarang

बंदिशी या सुंदर बंगल्याप्रमाणे असतात. बंगले उत्तम पद्धतीनं बांधून झाल्यावर आतमध्ये सुशोभीकरण करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. गायन अथवा वादन करताना कलाकाराचं आधी भान हरपून गेलं, तर मग श्रोत्यांचं भान हरपतं आणि श्रोत्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडून तो संगीतात रमतो.

"पंचमातल्या स्वरलहरींनी मोहुन मी गेले
कोकिळे, स्वर कुठुनी आणिले ?
स्वरसुमनांच्या अर्पुनि माला, युगे युगे ही केली सेवा
कंठि लाभला अमूल्य ठेवा, रसिकां तोषविले ।।

ही कविता नूमवि शाळेत अगदी लहान वयात सुरात म्हणताना शाळेतल्या शिक्षकांकडून मला कौतुकाची पहिली थाप मिळाली. घराबाहेर मला मिळालेली ही पहिली प्रेरणा म्हणायला हरकत नाही. पाढेसुद्धा लयीच्या झोकात म्हणायला मला आवडायचं, त्यात उरकणं हा भाग नसे. माझे वडील (भालचंद्र नीलकंठ कर्वे) हे स्वतः गायक असल्यानं त्यांनी माझ्या गायनातला सुरेलपणा प्रथम हेरला. आम्ही भावंडं वडिलांना पपा म्हणायचो. माझी आजी पेटी वाजवून गायची; त्यामुळं पपांकडं गाणं आलं होतं. रामकृष्णबुवा वझे, हरिभाऊ घांग्रेकर, दिनकरबुवा फाटक, नवनीत पटेल हे पपांचे गुरू. मास्टर कृष्णरावांचाही सहवास त्यांना लाभला होता. पपांनी सातव्या वर्षी "सरस्वती सिनेटोन'च्या "भक्त प्रल्हाद' चित्रपटात काम केलं होतं. त्या काळी अभिनेत्याला गायन येणं बंधनकारक असे. चित्रपटातल्या लोकांनी पपांचं "भालचंद्र'ऐवजी "मोहन' या नावानं दुसरं बारसं केलं. त्यामुळं सांगीतिक क्षेत्रात पपा "मोहन' या नावानं परिचित आहेत. आमचा पिढीजात गिरणीव्यवसाय होता. सन 1922 मध्ये माझ्या आजोबांनी (नीलकंठ श्रीधर कर्वे) तो सुरू केला होता. सन 1955 मध्ये आजोबा वारले तेव्हा पपा 30 वर्षांचे होते. आमच्या गिरणीत शिकेकाई, हळद, मिरची, मसाले, साबूदाणा, शिंगाडा असं सगळं काही दळून मिळायचं; एवढंच नव्हे तर राखुंडी, उदबत्या तयार करणारी मंडळी कोळसासुद्धा दळण्यासाठी आमच्या गिरणीत आणत असत. आजोबांच्या पश्‍चात पपांनी "गिरणी' आणि "गाणं' या विरुद्ध गोष्टी उत्तम सांभाळल्या. "संगीत-अलंकार' परीक्षेत ते प्रथम क्रमांकानं उत्तीर्ण झाले होते.

माझ्या हातात प्रथम तानपुरा दिला तो पपांनीच. पपांनी स्वर जुळवून दिलेला तानपुरा मी वाजवत असे. पपांनी स्वतः डग्गा वाजवून मला छोट्या छोट्या बंदिशी शिकवायला सुरवात केली होती. तबल्यामध्ये पपांपुढं आदर्श होता तो लालजी गोखले यांचा. पपा मला थेट गायकी शिकवू लागले. ते जसं शिकवत तशी मी गायला लागले. रागाचा कायदा, आरोह, अवरोह, वर्ज्य स्वर असं संगीताचं व्याकरण असतं, हे त्या वेळी मला माहीत नव्हतं. लहान मूल जसं कर्ता, कर्म, क्रियापद हे भाषेचं व्याकरण न शिकता बोलू लागतं तसंच काहीसं माझं झालं! मी तालात गायची; परंतु तालाचं व्याकरणसुद्धा मला माहीत नव्हतं. थोडक्‍यात, पपांनी मला शास्त्रीय संगीतातली परिभाषा प्रथम शिकवली. शाळेत वेलिंगकर सर आम्हाला गाणं शिकवत असत. प्रार्थना, पसायदान याबरोबरच शाळेच्या विविध कार्यक्रमांत मी गायचीच. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी पपांनी मला आकाशवाणीवर "बालोद्यान' कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी नेलं होतं. मी वरील पद्धतीनं शिकलेला "मालकंस' तिथं गायले. त्या वेळी कार्यक्रम-अधिकारी म्हणून गोपीनाथ तळवलकर आणि नेमीनाथ उपाध्ये (हरबा) होते. पाचवीसाठी मी हुजूरपागा शाळेत दाखल झाले. गांधर्व महाविद्यालयात माझं सांगीतिक शिक्षण सुरू झालं. तिथं मला (कै) लीलाताई ठाकूर आणि (कै) रामचंद्र मोडक हे गाणं शिकवायचे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ते सहजसुंदर शिकवायचे. "आलाप-ताना पाठ करायच्या नाहीत, बंदिश पाठ करा; परंतु बंदिशीचा विस्तार पाठ करायचा नाही,' हे तत्त्व मोडकसरांनी मला शिकवलं.

मी आठवीत असताना (कै) नवनीत पटेल उर्फ बापूजी यांच्याकडं गायन शिकायला सुरवात केली. कोणत्याही क्षेत्रात गुरू चांगला लाभणं हे भाग्याच लक्षण मानलं जातं आणि संगीत ही तर गुरुमुखी विद्या आहे. बापूजी प्रसिद्धिपराङ्‌मुख होते. अनेक बुजुर्ग कलाकारांरोबर त्यांचा ऋणानुबंध होता. ते मूळचे औरंगाबादचे. त्यांच्या औरंगाबादच्या वाड्यात विनायकबुवा पटवर्धन, मधुसूदन भावे, रविशंकर, विलायत खॉं यांच्यासारखे नामवंत कलाकार राहून आणि गाऊन गेले होते. बापूजींनी केवळ आनंदासाठी आकाशवाणी केंद्रावर तबलावादक म्हणून नोकरी केली. संगीताच्या नानाविध माध्यमांत बापूजी पारंगत होते. तबला आणि हार्मोनिअमबरोबरच जलतरंग, पट्टीतरंग, सतार, पखवाज ते उत्तम वाजवत असत. गाता गळा नसल्यानं ते जरी मैफलीचे गायक म्हणून प्रसिद्धी पावले नसले, तरी गायकीचं तंत्र त्यांना विलक्षण अवगत होतं. ते पुण्यात आल्यावर त्यांच्याकडं अनेक जण शिकायला यायचे. पपाही त्यांच्याकडं शिकले, याचा उल्लेख वरती आला आहेच. त्यांची शिकवण्याची पद्धत निराळी होती. स्वतः गायक म्हणून प्रसिद्ध नसले तरी कोणता रियाज केला म्हणजे काय साध्य होऊ शकतं, याचं त्यांना अचूक ज्ञान होतं. कुणाच्या गळ्याला काय शोभून दिसेल, त्याची गायकी कशामुळं खुलेल हे जाणून ते मार्ग दाखवत. ते स्वतः बंदिश-रचनाकार होते. ज्या वेळी शाळेला सुटी असायची त्या वेळी ते आमच्या घरी येऊन मला शिकवायचे. बापूजींनी मला "यमन', "भूप' यांसारख्या रागांबरोबरच "कलावती', "जनसंमोहिनी', "चंपाकली', "शुद्ध वराळी', "विजयनागरी' हे राग शिकवले. आणि ते त्यांच्या बंदिशींमधून अधिक समजत गेले. बंदिशींमधला नखरा, डौल ही एक त्यांची खासियत होती. बंदिशींच्या स्थायी-अंतऱ्यामधल्या तिहाया आणि बंदिशींची मांडणी हे तर बापूजींच्या बंदिशींचं वैशिष्ट्यच होतं. त्यांचं मन नवनीत या त्यांच्या नावाला साजेसंच मऊ-मृदू-मवाळ होतं आणि शिकवणंसुद्धा त्यांच्या आडनावासारखं शिष्याला "पटेल' असंच होतं.

मी वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर एमए (संगीत) झाले. सन 1979 मध्ये आकाशवाणीची "बी+' दर्जाची कलाकार बनले. सन 1981मध्ये पंडित वामनराव देशपांडे (काका) मला गुरू म्हणून लाभले. हे माझ्या सांगीतिक वाटचालीतलं महत्त्वाचं वळण ठरलं. हा योग एका छोट्या कार्यक्रमातून जुळून आला. भारती निवास सोसायटीच्या हॉलमध्ये "बालगंधर्व रसिक मंडळा'चा हा कार्यक्रम होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष छोटा गंधर्व होते, तर प्रमुख पाहुणे होते वामनराव देशपांडे. "ए री आज भईलवा, सुखवा मोरे जिया की - सुन सुन पिया की बातें' ही किशोरी आमोणकर यांची "भूप' रागातली परंपरागत बंदिश मी गायले व एक नाट्यगीत म्हटलं. प्रमुख पाहुणे या नात्यानं बोलताना वामनराव तेव्हा म्हणाले ः "ही मुलगी नाट्यगीत बरं गायली; पण तिचं सगळं लक्ष शास्त्रीय संगीतात आहे, असं मला जाणवलं. तिनं ते वाढवावं.' याच वाक्‍याचा धागा पकडून नंतर मी त्यांना भेटले व विचारलं ः ""आपण मला शास्त्रीय संगीत शिकवाल का? '' त्यांनी मला दोन महिन्यांनंतर यायला सांगितलं. ते त्या वेळी मुंबईला होते. ते सीए असल्यानं ऑडिटचं काम करायचे. ते आणि बाटलीबॉय हे पार्टनर होते (ज्यांची पुस्तकं वाणिज्य शाखेला होती).

सुरेश देशपांडे यांनी त्यांची आठवण सांगताना म्हटलं ः "काकांच्या हिशेबतपासणीच्या भूमिकेतसुद्धा उच्च प्रकारची व्यावसायिक नीतिमत्ता होती. "प्रामाणिक आणि परखड व्यक्तिमत्त्व' असा त्यांचा नामवंत कंपन्यांमध्ये लौकिक होता. या गुणामुळं त्यांच्या जिवाला धोका निर्माण होण्याचा प्रसंगही त्यांच्यावर गुदरला होता; परंतु ते डगमगले नाहीत'. पुढं दोन महिन्यांनी ते निवृत्त होऊन पुण्यात आले. मित्रमंडळ कॉलनीत "छंदोवती' (श्रुतींपैकी एक नाव) बंगल्यात ते राहायचे. त्यांच्याकडं जाण्याआधी मी त्यांची व्याख्यानं ऐकली होती. पुस्तकं वाचली होती; परंतु त्यांचा आवाज ऐकला नव्हता. त्यांचं शिकवणं कसं असेल याची मला खूपच उत्सुकता होती.

पहिल्या दिवशी गुरूपुढं, म्हणजे वामनकाकांसमोर गायला बसल्यानंतर, काय झालं माहीत नाही; पण मला काहीच सुचेना. गाण्यासंदर्भातलं आधीचं सगळं काही पुसूनच गेलं जणू काही.

मला नीट गाताच येईना. गुरुजींनी धीर दिला. ते म्हणाले ः ""काही काळजी करू नकोस. उद्यापासून ये.'' दुसऱ्या दिवशीपासून माझी तालीम सुरू झाली. काकांनी मला "सावनी कल्याण' राग शिकवायला घेतला. त्यांचं आवाज लावण्याचं तंत्र वेगळं होतं. मी थोडी नाकात गायची. काकांनी प्रथम माझा आवाज सहजसुंदर, स्वच्छ व मोकळा लावण्यासाठी मेहनत घेतली. "रेकून, ताणून, आवळून अजिबात गायचं नाही,' असा त्यांचा दंडकच होता. "माझ्याबरोबर ज्योत्स्ना चोळकर आणि लता गोडसे याही गाणं शिकायला यायच्या. "आपण जसं सहजसुंदर बोलतो, त्याप्रमाणे गायचं', असं त्यांनी सुरवातीलाच सांगितलं. "शुद्ध आकारानं गायचं,' असं त्यांचं मत होतं. स्वर लावताना विनाकारण स्वरावर अनुस्वार देऊन गायलेलं त्यांना आवडायचं नाही. आधी गळ्यातली अडगळ काढून टाकायला त्यांनी शिकवलं. उदाहरणार्थ ः "आपला गळा फिरतो म्हणून विनाकारण फिरवायचा नाही...तानबाजी म्हणजे गायन नव्हे... तान म्हणजे चमत्कृती असते, ती अधूनमधून गायनातल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी चमकून जावी... कमीत कमी स्वरांमध्ये शांतपणे आलापीनं राग उभा राहिला पाहिजे...रागातल्या सर्व स्वरांना एकदम हात घालायचा नाही...' काकांकडं आवाज आकारात लावण्यापासून ते बंदिश म्हणजे काय, ती मांडणं म्हणजे काय, ताल-लय, सूक्ष्म लय, नादोच्चार, स्वरोच्चार, सांगीतिक विचार, विराम बोलतो म्हणजे काय या सगळ्या गोष्टींचं आकलन होत गेलं. "कुमार-गायकी'चा अभ्यास करण्यासाठीसुद्धा त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. माझ्या कित्येक मैफलींना ते अगदी कौतुकानं आवर्जून उपस्थित राहायचे. ग्वाल्हेर-गायकी हीसुद्धा आकाराची आहे; परंतु बंदिशमांडणीत फरक आहे. जयपूर-गायकी नागमोडी आहे, ती सरळ नाही. आग्रा-गायकीमधले लयकारीचे पॅटर्न मला खूप भावले. या कारणानं मी बबनराव हळदणकर यांचं मार्गदर्शन घेतलं. कुमार गंधर्वांच्या गायकीचं दर्शन मला पपांनी उत्तमरीत्या घडवलं आणि "चलंत' रागांबरोबर अनवट रागसुद्धा सहजसुंदर कसे गायचे, हे तंत्रही शिकवलं. सन 2003 पासून मी आप्पा कानेटकर (मधुसूदन शंकर कानेटकर. म्हणजे ज्येष्ठ नाटककार दिवंगत वसंत कानेटकर यांचे बंधू) यांच्याकडं मी चार वर्षं शिकले. लगेच लोक मला विचारायला लागले ः "वामनरावांकडून तुम्ही जयपूर-गायकी शिकल्यानंतर तुम्ही आता आप्पांकडं वेगळं काय शिकता?' मग मी सांगायची ः "एखादा रस्ता रोजच्या जाण्यानं परिचित असतो. असं असलं तरी कित्येक गोष्टी अनवधानानं पाहायच्या राहून गेलेल्या असतात. त्या राहिलेल्या गोष्टी पाहण्याची नजर आप्पांनी मला दिली'. आप्पा हे भुर्जी खॉं यांचे शिष्य होते. सन 2007 मध्ये त्यांचं निधन झालं. या सर्वांच्या एकत्रित परिणामानं मिळून माझ्या गायकीत एका नवीन शैलीचं संयुग निर्माण झालं. सन 2008 मध्ये मी ऑल इंडिया रेडिओची "टॉप ग्रेड आर्टिस्ट' झाले. याचं सगळं श्रेय अर्थातच माझ्या सर्व गुरूंना आहे. वामनरावांची जडणघडण विचारात घेणंदेखील मला महत्त्वाचं वाटतं. मी त्यांच्याकडं 10 वर्षं शिकले. सुरेशबाबू माने यांच्याकडं ते बरीच वर्षं गायन शिकले होते. गोविंदराव टेंबे यांचे ते मानसपुत्र म्हणून ओळखले जात. ज्या वेळी उस्ताद नथ्थन खॉं (संगीतसम्राट अल्लादिया खॉं यांचे पुतणे) यांच्याकडून त्यांनी गंडा बांधला, त्या वेळी आपलं घर स्वरांनी पवित्र व्हावं म्हणून अल्लादिया खॉं यांना थोडा वेळ घरी गाण्याची विनंती वामनकाकांनी केली होती.

सध्या मी कुमुदिनी काटदरे आणि डॉ. अरुण द्रविड यांच्याकडून मार्गदर्शन घेतं आहे. बंदिशी या सुंदर बंगल्याप्रमाणे असतात. बंगले उत्तम पद्धतीनं बांधून झाल्यावर आतमध्ये सुशोभीकरण करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. गायन अथवा वादन करताना कलाकाराचं आधी भान हरपून गेलं, तर मग श्रोत्यांचं भान हरपतं आणि श्रोत्याला सगळ्या गोष्टींचा विसर पडून तो संगीतात रमतो. "मी "नंद' हा राग गाणार आहे,' असं मी एका मैफलीत सुरवातीला जाहीर केलं.

यावर श्रोत्यांकडून कोणताच प्रतिसाद आला नाही. कारण, हा राग मी जिथं गाणार होते, तिथल्या श्रोत्यांना हा राग परिचितच नव्हता. मग मी नंद रागात असलेल्या "तू जहॉं जहॉं चलेगा, मेरा साया साथ हो गा' या हिंदी गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या आणि त्यानंतर "नंद' राग गायले. सगळ्या श्रोत्यांचे चेहरे लागलीच फुलले व ते नंद रागात या गाण्याच्या आधारे रमले! जिथं शक्‍य आहे, तिथं मी भजन गातानासुद्धा त्याचा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी अर्थात आधी मलासुद्धा मेहनत घ्यावी लागते. शेवटी शास्त्रीय संगीत ही रागांच्या नियमाच्या चौकटीत सादरीकरण करण्याची कला आहे. त्यात पांडित्य, लालित्य आणि रंजकता असलीच पाहिजे. बुजुर्गांनी शास्त्रीय संगीताच्या प्रत्येक नियमावर खूप अभ्यास व चिंतन केलेलं आहे. मात्र, नावीन्यपूर्ण कल्पना व प्रयोग जरूर असावेत.

कोणत्याही स्त्रीच्या जीवनात लग्न ही महत्त्वाची घटना असते. सासरचे लोक प्रेरणा, प्रोत्साहन देणारे असतील तर तिची प्रगती होत राहते. माझ्या सासरकडून मला नेहमीच प्रोत्साहन मिळालं. पती, सासू, मुली या सगळ्यांनीच खूप सहकार्य केल्यानं मी गाण्यात काही करू शकले.

वामनकाकांचा आशीर्वाद...
सन 1991 मध्ये टीव्हीचं दूरदर्शन हे एकमेव चॅनल होतं. दूरदर्शनवर भक्ती बर्वे-इनामदार यांच्याकडून माझ्या कार्यक्रमाची आधी घोषणा झालेली असायची; परंतु काही ना काही कारणानं प्रत्यक्षात कार्यक्रम प्रसारित होत नसे. मात्र, 30 जानेवारी 1991 ला तो प्रसारित झाला. तो पाहिल्यावर "तुमच्या शिष्येचा कार्यक्रम उत्तम झाला' असं अनेक मान्यवरांनी वामनराव देशपांडे यांना सांगितलं. त्या वेळी वामनकाका अंथरुणाला खिळलेले होते. मी त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते सगळी शक्ती एकवटून मला म्हणाले ः ""आज तुझ्या यशानं मला फार आनंद झाला.'' या आशीर्वादाच्या स्मरणानं मला आजही प्रेरणा मिळते.

(शब्दांकन ः रवींद्र मिराशी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com