रोजच असावा शिक्षकदिन.... 

वृषाली गोखले
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

वर्षातून एकदा येणारा शिक्षकदिन, फक्त त्याच दिवशी का साजरा करावा? हा शिक्षकदिन तर रोजच असावा. कारण दररोज उजाडलेली सकाळ आपल्याला दिवसभरातल्या अनुभवातून काही ना काही शिकवत असते. त्या अर्थाने आपण दर दिवशी काही ना काही नवं शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिकण्याची कृती कधी स्वतःहून नकळत होते; तर कधी आपण आवर्जून एखादी गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा साथ लाभते ती आपल्याला विविध टप्प्यावर भेटणाऱ्या शिक्षकांची आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुठला तरी एकच दिवस का असावा? म्हणून रोजच व्हावा शिक्षकदिन...

डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारांनुसार जो अहंकार नष्ट करतो तो अध्यापक होय. हा अंधकार कोणता तर अज्ञानाचा, अविद्येचा, अपरिपक्वतेचा की जो आज सर्वच क्षेत्रात दिसतो आहे; पण त्याची झळ विद्यार्थ्यांना; तसेच शिक्षकांना पोहोचते आहे. शिक्षक-विद्यार्थी हे परस्परावलंबी नातं या अविद्येच्या अंधकारात झाकोळून जातेय. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम खरं म्हणजे जीवनमूल्यं आणि जीवनकौशल्यं प्रदान करणारा असूनही हे नातं फुलण्यामध्ये, उमलण्यामध्ये अडथळे का, कोणते, कसे येत आहेत याचा विचार-चिंतन शिक्षण क्षेत्रातील सर्वांनीच करायचाय. 
आजचा विद्यार्थी साक्षेपी आहे, संवेदनशील आहे,

संघर्षमय जीवनपद्धतीनुसार स्वतःला मनाने-तनाने-धनाने तयार करतो आहे. विद्यार्थी ज्ञानाच्या महासागरात प्रवास करताना त्यांना दीपस्तंभ म्हणून कार्य करण्याची जबाबदारी अक्षरशः सर्वांचीच आहे. ग्रामीण असो; नाही तर शहरी, कुठलाही विद्यार्थी/विद्यार्थिनी परिपक्वतेच्या हिंदोळ्यावर विराजमान आहे. 

कार्यशाळा घेण्याच्या निमित्ताने विविध ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधता आला, शिक्षकांची मनोगतं समजली. समुपदेशन आणि मार्गदर्शन करताना जाणवलं की, विद्यार्थी आणि शिक्षक दोघेही उत्साही, ज्ञानप्रेरित, सहकार्याची भावना जागृत असलेले आहेत; पण दीपस्तंभाच्या शोधात असलेला मेधावान विद्यार्थी, अचूक आणि योग्य मार्गदर्शनापासून वंचित राहतो आहे. विचारवंत, ज्ञानाची खरी व्याख्या समजलेले आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण प्रमाणभूत मानणारे लोक एकत्र येऊन या वास्तवतेवर काम करू लागले, तर विद्यार्थ्यांच्या जीवनांत बराच कायापालट होईल. विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन तो हाच! त्यासाठी शिक्षकांकडून समाजाच्या, शाळेच्या, अखिल विश्वाच्या आणि समाजाकडून शिक्षकांच्या काही अपेक्षा आहेत. अपेक्षा रास्त आहेत. त्यासाठी शिक्षकांनी, शिक्षकांच्याच परस्पर बौद्धिक सामंजस्याने तयार केलेला नियोजनबद्ध अभ्यासक्रम होणे ही परिस्थितीची गरज आहे. 

शिक्षकांनी कसं बोलावं, कसं वागावं, किती बोलावं, काय बोलावं याबाबत चर्चा न करता शिक्षक-विद्यार्थी नातं कसं अतूट- अभंग राहील, या नात्यात प्रेम कसं टिकून राहील, जिव्हाळा-ममता व विद्यार्थ्यांविषयीची कळकळ, शालेय जीवनातील आणि प्रत्यक्ष जीवनातील त्यांचा सहभाग या सर्व गोष्टींविषयी विद्यार्थी जागृत कसा होईल, असे प्रयत्न शिक्षकांनी करावेत ही खरी गरज आहे. 

पाठ्यपुस्तकातील सगळा आशय विद्यार्थ्यांपर्यंत मनोरंजक आणि कलात्मक पद्धतीने पोहोचला पाहिजे, असंच कौशल्य अध्यापनात विकसित झालं पाहिजं. शिक्षक कार्यशाळेतील अनुभवानुसार, विद्यार्थी समुपदेशन प्रक्रियेतील निकषांनुसार आणि पालकांच्या सहभागाबद्दल केलेल्या पाहणीनुसार काही मुद्दे आपल्याला समजून घ्यायला हवेत. 

  1. समोरील विद्यार्थीवर्ग खूप माहिती मेंदूत साठवूनच तुमच्या समोर बसला आहे, हे ध्यानात घेऊन पाठ्यपुस्तकांतील अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करावे. 
  2. स्वतः उत्तम वाचक बनावे. आपापल्या शाळेत शिक्षकांसाठी काही स्पर्धा स्वयंस्फूर्तीने आयोजित कराव्यात. 
  3. स्वतःची (प्रत्येक शिक्षकाची) उपजत कल्पक बुद्धी, सर्जनशील (innovativeness) आणि सृजनशील (Creativity) प्रवृत्ती उत्तमोत्तम पुस्तकांचं वाचन करून जोपासावी. 
  4. गोष्टींचं सादरीकरण जाणीवपूर्वक सुंदर आणि सुबक करावं. ते म्हणजे भाषिक-वाचिक-मानसिक आणि शारीरिक सादरीकरण. कारण विद्यार्थी तुम्हाला सर्व बाजूंनी न्याहाळत असतात. तेव्हा भाषा-वाचा-विचार आणि शारीरिक बोली (Body language) यावर जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. 
  5. तुम्ही दीपस्तंभ आहातच. पण तुम्हाला तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन सतत मिळत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांशीही दर्शक या भूमिकेतून पाहणं हा नवीनच दृष्टिकोन विकसित केल्यास विद्यार्थी आणि तुम्ही हे नातं अधिक सुदृढ होण्यास मदत होईल. 
  6. शिक्षकदिन हा रोजच आहे, असं श्रद्धापूर्वक मनात ठसवलं तर विद्यार्थी-जीवन अधिक निरोगी बनविण्यात फक्त आणि फक्त तुमचं योगदान महत्त्वाचं ठरेल. 

साने गुरुजी, आचार्य अत्रे आणि इतरही काही मान्यवर शिक्षणतज्ज्ञांचं साहित्य अभ्यासलं म्हणजे तुमच्या लक्षात आपोआपच येईल की तुम्ही कुठेच कमी पडत नाही आहात. किंबहुना आजच्या शिक्षणप्रवाहात जास्तीत जास्त मानसिक आणि आर्थिक संघर्ष तुम्ही करत आहात. म्हणूनच तुमची आत्मप्रेरणा, आत्मिक बळ वाढवणं गरजेचं आहे. त्यातूनच ठसा उमटण्यासारखं मान्यताप्राप्त व्यक्तिमत्त्व घडतं. 
उदाहरणादाखल आजच्या शिक्षकदिनी ज्यांचं पुण्यस्मरण आपण करतो त्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे चरित्रचिंतन करण्याचा संकल्प करूया. पूर्वी डॉ. राधाकृष्णन यांनी ऑक्‍सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे अध्यापन केलं, ते अतिशय अतुलनीय होतं. इंग्लंडमध्ये त्यांनी भारतीय तत्त्वज्ञानाचा फार मोठा ठसा उमटवला. 
युरोप आणि अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय निमंत्रित व्याख्याते म्हणून बोलावून त्यांच्या ज्ञानाचा फार मोठा आनंद मिळवला आहे. त्यांच्या व्याख्यानांचे प्रसिद्ध झालेले ग्रंथ त्यांच्या प्रकांड पांडित्याची साक्ष देतात. An idealistic view of life (ऍन आयडियालिस्टीक व्ह्यू ऑफ लाईफ) आणि Hindu view of life (हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ) हे त्यांचे अमोल ग्रंथ पाश्‍चात्य जगतात शिरोधार्य मानले जातात. डॉ. राधाकृष्णन हे फार थोर शिक्षक होते आणि हाच मोठा सन्मान ते मानीत असत. 

5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस, तोच शिक्षकदिन म्हणून राष्ट्राने अंगीकृत केला आहे. माजी राष्ट्रपतींचं हे वार्षिक स्मरण निश्‍चित भूषणास्पद आहे. राजदूत असताना मॉस्कोहून मायदेशी परतताना, सहसा कोणाच्याही वाट्याला येऊ न शकलेली जोसेफ स्टालिनची भेट त्यांनी घेतली. अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने ते स्टालिनला भेटले. क्रूरकर्मा म्हणून समजला गेलेला स्टालिन त्यांना पाणावलेल्या डोळ्याने म्हणाला, मनुष्य आहे या जिव्हाळ्याने भेटलेली आपण पहिली व्यक्ती आहात. बाकीचे मला राक्षस मानतात. मीही 5 वर्षे धार्मिक शाळेत शिक्षण घेतलेलं आहे... साश्रूनयनाने स्टालिनने या महापुरुषाला निरोप दिला होता. भारतीय तत्त्वज्ञानाचा हा फार मोठा सात्विक पराक्रम डॉ. राधाकृष्णन यांनी आपल्या आचरणाने घडवला. 

भारतरत्न डॉ. राधाकृष्णन ही फार मोठी विभूती होती. त्यांचे चरित्रचिंतन हाच शिक्षण क्षेत्रातील सर्व लोकांचा स्वाध्याय व्हायला हवा. 

ज्याची त्याला पदवी इतरा न साजे | संसार उमजे आत्मसुख | 
आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी यावीण चावटी करू नका | 
वर्णियेल्या एका गुणनाम घोषे जातील रे दोष तुका म्हणे | 
या चरित्राने आमचे सर्व दोष जावोत ही मनोमन प्रार्थना! 

 

फक्त शिक्षकदिनानिमित्तच नाही; तर तुमच्या अध्यापनप्रक्रियेतील प्रत्येक क्षण मोलाचा आहे. हेच श्रद्धापूर्वक लक्षात ठेवलंत तर तुमच्यातील शक्ती जागृत होईल. शिक्षकदिनाच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना शुभेच्छा. 

(लेखिका शालेय समुपदेशक आणि मार्गदर्शक आहेत.)