माणसं अशी का वागतात? (डॉ. नंदू मुलमुले)

माणसं अशी का वागतात? (डॉ. नंदू मुलमुले)

सर्वसामान्य माणसं जशी वागतात, तशी का वागतात याचा शोध घेणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. सत्ता माणसात बदल घडवते. त्याच्या मानसिकतेत बदल घडवते. ती निरंकुश असेल, तर स्वामित्वाच्या जाणिवेनं माणसाचा दमनकारी चेहरा प्रभावी व्हायला वेळ लागत नाही. या गोष्टींचाच अभ्यास करण्यासाठी प्रा. फिलिप झिंबार्डो या मानसतज्ज्ञानं ‘स्टॅन्फर्ड प्रिझन एक्‍स्पिरिमेंट’ नावाचा एक आगळावेगळा प्रयोग घडवून आणला. मंगळवारी (ता. दहा ऑक्‍टोबर) असलेल्या जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त या प्रयोगाविषयी माहिती.  

काही वर्षांपूर्वी एका मनोविकार परिषदेसाठी मी बर्लिनला गेलो होतो. परिषद हे दुय्यम कारण, मुख्य उत्कंठा होती जर्मनी भेटीची. फक्‍त सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी ज्या देशानं एक प्रचंड नरसंहार मूकपणे पाहिला, नव्हे घडवून आणला, तो सर्वसामान्य जर्मनांचा देश कसा असेल याची उत्कंठा! बर्लिनहून जवळच असलेली एक छोटी छळछावणी पाहिली, ती पाहूनही अंगावर काटा आला. हिटलरनं अशा चाळीस हजार छळछावण्या उभारल्या होत्या. मनात विचार आला, हा सर्व नरहसंहार पाहणारा जर्मन माणूस अलिप्तपणे हे सगळं का पाहत राहिला? हिटलर विकृत असेल; पण सर्वसामान्य जर्मन माणूस विकृत नव्हता. कुटुंबवत्सल, संवेदनशील, कलाप्रेमी, सुबुद्ध होता. त्यानं या क्रूर खेळात कसा भाग घेतला? 

या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला प्रा. फिलिप झिंबार्डो या एका मानसतज्ज्ञानं. सर्वसामान्य माणसं जशी वागतात, तशी का वागतात याचा शोध घेणारं शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. हाती सत्ता, मालकी आली, की माणसं कशी वागतात, हा त्याच्या संशोधनाचा विषय. तुरुंगात कैद्यांच्या जीवनाची मालकी हातात आल्यावर ते कसं वागतात? ते क्रूर होतात का? अशी सर्वंकष सत्ता हाती आल्यावर ते सत्तेचा न्याय्य विनिमय करतात की गैरवापर करतात, क्रूर होतात? त्यांच्या क्रौर्याची मर्यादा कोणती? आणि जे गुलाम होतात, कैदी होतात त्यांच्या वागणुकीत काय बदल होतो? ते बंड करतात की सगळं निमूटपणे सहन करतात? माणसांच्या वागणुकीमागं आनुवंशिक स्वभावाचा भाग किती आणि भोवतालच्या परिस्थितीचा भाग किती?....या सगळ्या प्रश्‍नांचा घेण्याचा हा प्रयत्न होता. १९७१मध्ये त्यानं यासाठी जो प्रयोग केला, तो जगाच्या विचारसरणीला कलाटणी देणारा ठरला. ‘द स्टॅनफर्ड प्रिझन एक्‍स्पिरिमेंट’ या नावानं तो आजही ओळखला जातो. काय होतं त्या प्रयोगाचं स्वरूप?

झिंबार्डो हा कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतला मानसतज्ज्ञ. त्यानं या प्रयोगासाठी विद्यापीठाच्या तळमजल्यावर एक तुरुंगाचा सेटच उभारला. हा अगदी खराखुरा वाटावा असा सेट होता. प्रयोगासाठी एकूण पंचाहत्तर स्वयंसेवकांपैकी मानसिकदृष्ट्या सक्षम असलेले चोवीस विद्यार्थी निवडण्यात आले. त्यातल्या काहींना तुरुंगरक्षक आणि इतरांना कैद्याच्या भूमिका देण्यात आल्या. सर्व प्रयोग खराखुरा वाटावा यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली. पोलिसांनी कैदी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून ‘अटक’ केली. खऱ्या कैद्यांसारखीच त्यांची नियमित तपासणी करून ताब्यात घेतलं. त्यांच्या अंगठ्यांचे ठसे, छायाचित्रं घेण्यात आली. त्यांची कुठलीही वैयक्तिक ओळख राहू नये, म्हणून कैद्यांचे ढगळ कपडे, नंबर देण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना गार्डची भूमिका दिली होती, त्यांनीही तुरुंगातल्या गार्डचा ड्रेस परिधान केला. कुठली वैयक्तिक ओळख राहू नये यासाठी त्यांना काळे चष्मे देण्यात आले. हातात वेताची छडी देण्यात आली; मात्र त्याचा कुठलाही शारीर वापर करू नये अशी सूचनाही होतीच.

यानंतर जे निदर्शनास आलं, ते भयचकित करणारं होतं! काही वेळातच रक्षक आणि कैदी आपापल्या भूमिकेत शिरले. रक्षक झालेल्या स्वयंसेवकांनी ‘कैद्यां’वर मालकी गाजवायला सुरवात केली. त्यांचा अपमान करणं, मानसिक छळ करणं, त्यांना घालून-पाडून बोलणं सुरू केलं. काही दिवसांतच कैद्यांना विवस्त्र करून लादीवर झोपवणं, बादलीत प्रातर्विधी करायला लावणे, अंधाऱ्या कपाटात बंद करणं अशा क्रूर शिक्षा रक्षक करू लागले.
आणि कैदी?...त्यांच्यातला बदल तर अधिकच चकित करणारा होता. ते आपोआपच या दमनकारी वागणुकीच्या आधीन होऊन गेले. निमूटपणे अत्याचार सहन करू लागले. एवढंच नव्हे, तर रक्षकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांना इतर कैद्यांच्या कागाळ्या सांगून आपलं भलं करण्याचा प्रयत्न करू लागले!
निष्कर्षांतून उलगडला स्वभाव

या प्रयोगाच्या ‘भयंकर स्वरूपा’वर काही तज्ज्ञांनी आक्षेप घेतल्यानं तो सहा दिवसांतच थांबवण्यात आला; मात्र जे निष्कर्ष हाती आले, ते मानवी स्वभावावर पुरेसा प्रकाश टाकणारे होते. रक्षकाची भूमिका दिलेले स्वयंसेवक ही खरं तर प्रत्यक्षात सर्वसामान्य, कुटुंबवत्सल, संवेदनशील माणसं होती. त्यांनी आधी कुठल्याही प्रकारे अत्याचारी वृत्ती दाखवण्याचा प्रकार घडला नव्हता; मात्र कैद्यांवर सर्वंकष सत्ता गाजवण्याचा अधिकार हाती आल्याबरोबर ते क्रूर झाले. अत्याचारी झाले. त्यांच्या संवेदना बोथट झाल्या. मुख्य म्हणजे ही आपल्याला दिलेली भूमिका आहे, आपलं कर्तव्य आहे अशी धारणा स्वीकारून ते दमनकारी झाले. आपल्या मूळ मानवीयेतला, सारासार विचारशक्‍तीला विसरून गेले. कैद्यांवर आपली मालकी स्थापित करण्यात मग्न झाले. सर्वंकष अधिसत्तेची भयावह बाजू दर्शवू लागले.

हिटलरच्या नाझी सेनेत सहभागी झालेले सारे लोक सरसकट सैतानी वृत्तीचे नव्हते. त्यातले अनेक कुटुंबवत्सल, विचारशील, सहृदयी होते. त्यांना पत्नी, मुलंबाळं, आप्तस्नेही होते. त्यातले काही कवी असतील, चित्रकार असतील, लेखक असतील. एरवी सामान्यपणे ते हसतखिदळत असतील, मित्रमंडळीत मिसळत असतील! मात्र सत्तेची, अधिकाराची विकृत चटक लागल्याबरोबर त्यांच्यातला सैतान जागृत झाला. आपण एका सत्तापीठाचे पाईक आहोत, आपण फक्‍त आज्ञा पाळतो आहोत, ही समजूत एकदा करून घेतली, की माणसाच्या सद्‌सद्विवेकबुद्धीची टोचणी कमी होऊन जाते. त्याची वैयक्‍तिक ओळख मिटून जाते. तो त्या दमनकारी यंत्रणेतला फक्‍त एक खिळा होऊन जातो.

अतिरेकी कृत्यांमध्येही हीच मानसिकता दिसते. अतिरेकी कृत्यं करणारे लोक एरवी सर्वसामान्य माणसंच असतात. एकटा माणूस कुठलंही अतिरेकी कृत्य करायला घाबरतो. अनोळखी माणसांना मारण्याची हिंमत त्याच्यात कुठून येणार? ती येते समूहात सामील झाल्यानं. दंगलीच्या वेळी, एरवी आयुष्यात कुत्र्यालादेखील घाबरणारे, दोनचार दगड कुणाला लागतील याची पर्वा न करता भिरकावून देतात. समूहात सहभागी झाल्यानं कृत्याची जाबाबदारी विभागली जाते. धर्माच्या आणाभाका घातल्यानं तर ते एरवी क्रूर भासणारं कृत्यही उदात्त होऊन जातं. 

जगण्याची आणि मरण्या-मारण्याची प्रेरणा
मनोविकारशास्त्राचा उद्‌गाता सिग्मंड फ्रॉईड यांच्या म्हणण्यानुसार, माणूस जन्माला येतो तो मुळी दोन प्रेरणा घेऊन. जगण्याची आणि मरण्या-मारण्याची. जगण्याच्या प्रेरणेतून सर्जनशीलतेचा, विविध कलांचा उगम होतो, तर मरण्या-मारण्याच्या प्रेरणेतून क्रौर्याचा. ज्याच्यात मरण-प्रेरणा अधिक तो विध्वंसक. बेदरकार जीवन जगणं, धोक्‍यात जीव घालणं, स्वविघातक कृत्यं करणं ही सर्व मरण-प्रेरणेची लक्षणं. मात्र, अशा विध्वंसक प्रेरणा तीव्र नसणारी सर्वसामान्य माणसंही अधिसत्तेच्या प्राप्तीनं अत्याचारी होतात, हे स्टॅन्फर्डच्या प्रयोगानं दाखवून दिलं.
या प्रयोगाची दुसरी बाजू तेवढीच मनोज्ञ. एकदा जेत्यांची सत्ता मान्य केली, की माणसं मनानं गुलाम होऊन जातात. हतबल होतात. सत्तेपुढं चटकन हार स्वीकारतात. एवढंच नव्हे, तर कालांतरानं त्यांचेच गोडवे गाऊ लागतात. इंग्रजांपेक्षा दसपट संख्येनं असलेल्या भारतीयांनी एकशेनव्वद वर्ष गुलामगिरी पत्करली. आणीबाणीत अनेकांनी आणीबाणीचे गोडवे गायला सुरुवात केली. सर्वसामान्य जर्मन माणूस हिटलरचे गोडवेच गात होता, अप्रत्यक्षपणे त्याच्या क्रौर्यात सामील होता.

प्रा. फिलिप झिंबार्डो यांनी केलेल्या प्रयोगाला आज ४६ वर्षं उलटली आहेत. हाच प्रयोग २००२मध्ये बीबीसीवर पुन्हा करण्यात आला. मूळ प्रयोगातल्या भयावह आशयाची आठवण करून देण्यासाठी. सत्ता माणसात बदल घडवते. त्याच्या मानसिकतेत बदल घडवते. ती निरंकुश असेल, तर स्वामित्वाच्या जाणिवेनं माणसाचा दमनकारी चेहरा प्रभावी व्हायला वेळ लागत नाही. अशा नेतृत्वाखालच्या अनुयायांमध्ये ही स्वामित्वाची, निरंकुशतेची अहंभावी वृत्ती पसरायला क्षणमात्रही लागत नाही. अशावेळी त्यांच्या हातून घडणाऱ्या क्रौर्याच्या कृत्याची जबाबदारी समूहामध्ये विभागली जाते आणि क्रूर वृत्तीचा गुणाकार होतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमत्त अशा वातावरणात सारासार विवेकबुद्धी शाबूत ठेवणाऱ्यांच्या संख्येची बेरीज होवो आणि निरोगी मानसिकतेचा प्रसार होवो हीच इच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com