मार्ग एकला (प्रवीण टोकेकर)

रविवार, 6 ऑगस्ट 2017

‘रोड टू पर्डिशन’ हा सिनेमा एव्हाना अनेकांच्या हृदयीचा ठेवा बनून गेला आहे. हा चित्रपट बघण्यासाठी आपणही एका खुर्चीत बसावं...दुसऱ्या खुर्चीत बाप किंवा मुलगा/मुलगी असावा/असावी...तोंडातून एकही शब्द उचकटू नये. टक लावून समोरच्या प्रतिमांचा खेळ बघावा. ‘रोड टू पर्डिशन’ हा एक संस्कार आहे. एक समृद्ध करणारा अनुभव...
 

आपल्या चपला पोराच्या पायाला आल्या तरी ठीक; पण आपलं नशीब त्याच्या वाट्याला येऊ नये, असं काही ‘बाप’लोकांना वाटत असतं. इथवर येईयेईतोवर दमछाक झाली. घाम झिरपून शर्टाची कॉलर फाटली. खिशा तर फाटका होताच, पायताणाच्याही चिंध्या झाल्या. पोरा, तुझी चाल राजागत पडावी, म्हणून धडपडलो. पुढचं तू आणि तुझं नशीब...आपल्या खडूस, चिडक्‍या बापाच्या मनात हे असले करुणार्द्र विचार झगडा करत असतात, हे त्या वाढाळू वयातल्या पोराच्या गावीही नसतं. आपला बाप हा काही बरोबर माणूस नाही. त्या अमक्‍याचे बाबा शाळेत त्याला सोडायला-आणायला स्कूटर घेऊन येतात. त्याचे लाड तर करतातच, आपण सोबत असलो, तर एखादी प्रेमळ टप्पल आपल्यालाही भेटते. आपला बाप कधी शाळेत आला तर बाई किंवा सरांशी हसून-खेळून बोलतही नाही. मान खाली घालून ऐकतो नुसता. ‘ओके’, ‘अच्छा’, ‘तुम्ही म्हणाल तसं...’ याच्यापलीकडं त्याचं गाडं जात नाही. इंग्लिश बोलताना तर त्याची फेफेच उडते. घरी मात्र एवढ्या-तेवढ्यावरून राडा. थोडं काही झालं की याचा हात चालायला लागतो. एक दिवस उगारलेला हात वरच्या वर पकडून ठेवीन. 

आपला काटेरी बाप आतल्या आत काय भोगतोय आणि हे पोरगं बाहेरच्या बाहेर काय बघतंय, काही ताळमेळ नाही; पण एक क्षण असा लख्ख येतो की तोच खडूस बाप पोरासारखा निरागस वाटू लागतो. वाटतं, त्याला जवळ घ्यावं. पिकल्या, विरळ केसांचं त्याचं ते दमगीर डोकं छातीवर घ्यावं. त्याला थोपटावं. म्हणावं, मी आहे ना...कमॉन...पण हे वाटायला लागेपर्यंत वाट खूप दूर गेलेली असते.

आपले बाप सहसा गॅंगस्टर असत नाहीत. त्यांच्या कमरेला घोडा लटकत नसतो आणि पब्लिक त्याला अजिबात टरकत नसतं. इलिनॉयमधल्या मायकेल सुलिवान ज्युनिअरची ही कहाणी मात्र तशी आहे. त्याचा बाप गॅंगस्टर होता; पण शेवटी बाप होता. आता ही कहाणी मायकेल सुलिवान ज्युनिअरची आहे की त्याच्या बापाची? की दोघांची? की अमेरिकेत फोफावणाऱ्या गुन्हेगारी जगताची? की आपल्याच नात्यागोत्याची? बघून ठरवा.

‘रोड टू पर्डिशन’ हा सन २००२ मध्ये आलेला चित्रपट प्रत्येक बापाला आणि थोडीफार समजूत फुटलेल्या पोरांना हळवं करून गेला. अजूनही करतो. हा चित्रपट विस्मरणात जाणं केवळ अशक्‍य आहे. अल्झायमर झाला तरी यातल्या काळजाचा ठाव घेणाऱ्या काही चौकटी स्मरणात शिल्लक राहतील. 

* * *

ही कहाणी आहे मायकेल सुलिवान सीनिअर आणि मायकेल सुलिवान ज्युनिअर या बाप-लेकांची. इलिनॉयमध्ये त्यांचं एक मोठं घर आहे. घरेलू टाइपची संसारी बायको ॲनी, मायकेल आणि पीटर अशी दोन मुलं आणि स्वत: कर्ता पुरुष मायकेल सुलिवान. हा बापही चारचौघांसारखाच. घरात फारसं बोलत नाही. काहीही विचारलं तरी ‘हं हं...हूं हूं’ पलीकडं संभाषण जात नाही. आई त्याला दबकून असते. पोरंही दूर दूरच असतात. त्याच्या कमरेला एक पिस्तूल कायम असतं आणि त्याच्या खोलीत जायची परवानगी कुणालाही नाही. आपला बाप नेमकं काय करतो? माहीत नाही. ते वर्षं होतं १९३१. पहिलं महायुद्ध संपलेलं होतं. जगभर मंदीची भयावह लाट होती. बेकारांचे लोंढे रस्त्यावर फिरत होते. त्या काळात अमेरिकेत कडकडीत दारूबंदी लागू झाली होती. म्हंजे अर्थ तोच : दारू मिळत होती; पण ती काळ्या बाजारात. केस कापणाऱ्या सलूनच्या पाठीमागं सर्रास टेबलं टाकली जात. नंतर तसे छुपे बारही सुरू झाले. त्यांना ‘स्पीकईझी’ म्हटलं जायचं. पैसा खेळायचा तो या काळ्या बाजारात. अभावाचं राज्य सुरू झालं की गुन्हेगारीची चेटकी आपले कारनामे दाखवायला सुरवात करते. इथंही तसंच झालं. अमेरिकेचं अधोविश्‍व फोफावलं. त्यातलं एक आघाडीचं नाव जॉन रूनी. हा आयरिश-अमेरिकन डॉन होता. त्याचे लागेबांधे थेट शिकागोवर राज्य करणाऱ्या कुप्रसिद्ध अल्‌ कपोनशी होते. 

रूनीनं पाळलेल्या एका अनाथ पोरानं त्याला आयुष्यभर साथ दिली, तो हा मायकेल सुलिवान सीनिअर. रूनीचे त्याच्यावर उपकारच होते. पोरकं पोर त्यानं आपलं म्हणून सांभाळलं. लग्न लावून दिलं. घर दिलं. गाडी रुळावर आणली. त्या बदल्यात सुलिवान त्याच्या वसुलीची, सुपारी वाजवण्याची कामं करत असे. रूनीला आणखी एक पोरगा होताच. तो रक्‍ताचा. कॉनर त्याचं नाव. सर्व स्टोऱ्यांमध्ये असतो तसा हा सख्खा मुलगा नालायक होता आणि सुलिवान ऊर्फ मानलेला मुलगा गुणी होता. कॉनरला सुलिवानचा दबदबा आवडत नसे. आश्रित लेकाचा. मिजास किती? आमच्या तुकड्यांवर जगतो; पण बाप त्याचंच ऐकणार, ही त्याची तक्रार. जॉन रूनीला पियानो आवडायचा. धड वाजवता येत नव्हता; पण आवडायचा. एका गॅंगमेंबराच्या श्रद्धांजलीला त्यानं आणि सुलिवाननं मिळून छान वाजवला. हे बाप-लेक मानलेले नाहीत, सख्खेच असावेत, असं वाटावं. कॉनरच्या डोक्‍यात तिडीक गेली. एक दिवस याला नाही ढगात पाठवला तर...

कॉनरनं एक दिवस टोळीतल्याच एकाला उडवलं. डोकं गरम झालं, घातली गोळी. सुलिवानच्या समोर हे घडलं. वाईट भाग म्हणजे, त्याच्या गाडीच्या डिकीत दडून असलेल्या सुलिवानच्या १२ वर्षांच्या पोरानंही हे बघितलं. इतके दिवस सुलिवाननं आपलं गुन्हेगारी जग घराच्या उंबरठ्याच्या आत आणलं नव्हतं. पोराच्या आत्रंगपणामुळं ते आलं. 

‘‘तुझं पोरगं कुठं बडबडणार नाही ना?’’ कॉनरनं विचारलं.

‘‘तो माझा मुलगा आहे, कॉनर!’’

‘‘ ओके. तेवढं मला पुरेसं आहे; पण काळजी घे,’’ कॉनर तोंडदेखलं म्हणाला.

* * *

विनाकारण केलेल्या या हत्येनंतर रूनीनं आपल्या रक्‍ताच्या पोराला भर बैठकीत जाम झापलं. ‘‘डोक्‍यात गेला तो...म्हणून घडलं. सॉरी!’’ कॉनर बेपर्वाईनं म्हणाला.

‘‘आपलाच माणूस उडवलास? तू काय केलंयस माहितीये तुला?’’ रूनीनं विचारलं.

‘‘सॉरी म्हटलं ना...’’

‘‘ट्राय अगेन!’’

‘‘पाहिजे तर मी माफी मागतो, बास?’’

‘‘ट्राय अगेन!’’ टेबलावर दाणकन हात आपटत रूनी ओरडला.

‘‘ आय अपोलोजाइज...’’ कॉनरनं पडेल आवाजात माफी मागितली.

* * *
प्रकरण तिथंच संपलं नाही; किंबहुना तिथून ते सुरू झालं. एक दिवस कॉनरनं सुलिवानला चिठ्‌ठी दिली. त्या ‘स्पीकईझी’वाल्या अमक्‍याला भेट. पैसे थकलेत. नाही दिले तर काय करायचं तुला माहीतच आहे. मला बापानं घरात नजरकैदेत ठेवलंय, नाहीतर मीच गेलो असतो...

सुलिवानला खटकलं; पण तरीही तो गेला. स्पीकईझीवाल्याला भेटला. चिठ्‌ठी दिली. चिठ्‌ठीत लिहिलं होतं. : ‘‘सुलिवानला उडव. सगळे पैसे फिटले असं समज!’’ पण त्यानं टेबलावरचं पिस्तूल उचलण्याआधीच सुलिवाननं झाडलेली गोळी त्याच्या डोक्‍यात शिरली होती. सुलिवान या प्रकारानं हादरला. आपण आणि आपलं साक्षीदार पोरगं खतऱ्यात आहे, हे त्यानं ओळखलं. घाईघाईनं तो घरी आला, तोवर उशीर झाला होता. बायको सारा आणि धाकटा पीटर रक्‍ताच्या थारोळ्यात पडले होते आणि थोरला माईक सुलिवान ज्युनिअर अंधारात शांत बसून होता. सुलिवाननं वेळ न दवडता रातोरात गाडी काढली. पोराला घेतलं आणि तो निघाला. घराच्या अंगणातल्या बर्फात लहानग्या माईकची सायकल त्याच्या बालपणासारखीच मोडून पडली.

बाप-लेक मोटारीनं शिकागोत गेले. तिथं अल्‌ कपोनचा उजवा हात फ्रॅंक निट्टी त्याला ओळखत होता. फ्रॅंकनं त्याची कहाणी ऐकली आणि शांतपणे सांगितलं. माईक, तू परत जा. बदल्याबिदल्याच्या भानगडीत पडलास तर तुला वाचवायला कुणीही नाही. मीही नाही. मी फक्‍त धंदा सांभाळतो. माणसं नव्हे. इथून पुढं तू एकटा आहेस आणि फार जगणार नाहीस, हे नक्‍की.

...लेक मिशिगनजवळ पर्डिशन नावाचं एक गाव आहे. तळ्याला लागूनच असलेल्या घरात त्याची बहीण राहते. तिच्याकडं आपलं एकमेव उरलेलं पोरगं ठेवायचं आणि तुकडा पाडायचा, असा सुलिवानचा बेत असावा.

 

(पर्डिशन या नावाचं कुठलंही गाव वास्तवात नाही. ते चित्रपटातलं काल्पनिक गाव आहे. इंग्लिशमध्ये पर्डिशनचा अर्थ नरक...जहन्नम). पर्डिशनच्या मार्गावर हे दोघं असतानाच फ्रॅंक निट्टीनं एका व्यावसायिक मारेकऱ्याला सुलिवानला खतम करण्याची सुपारी दिली होती. हा मारेकरी होता एक फोटोग्राफर. त्याचं नाव हार्लेन मॅग्वायर; पण मढ्यांचे फोटो काढणारा. पर्डिशनच्या रस्त्यावरच्या एका टावरान हॉटेलात सुलिवानवर पहिला हल्ला झाला. त्यातून बाप-लेक कसेबसे वाचले. पर्डिशनला जाण्यात अर्थ नाही, हे सुलिवाननं ओळखलं. आता बदलाच घ्यावा लागणार, दुसरा मार्ग नाही.

 

* * *

‘‘हा क्‍लच...हे गॅस पॅडल आणि हा ब्रेक,’’ सुलिवाननं आपल्या पोराला रस्त्यातच गाडी चालवायचे धडे दिले. १२-१३ वर्षांचं ते चलाख पोरगं बघता बघता शिकलं. आता तो फक्‍त पोरगा नव्हता. पार्टनर होता. सुलिवाननं शिकागोतल्या निवडक बॅंका हेरल्या. मॅनेजरच्या कपाळावर सरळ पिस्तूल टेकवलं. ‘अल्‌ कपोनचा काळा पैसा तेवढा द्या. बाकी काही नको,’ हे बजावून सांगितलं.

‘‘तू मूर्ख आहेस. तू कोण आहेस हे ते लोक दोन मिनिटांत हुडकतील. मरशील!’’ बॅंकेचा व्यवस्थापक घाम पुसत म्हणाला.

‘‘सुलिवान. स्पेलिंग सांगू?’’ बाप म्हणाला. सुलिवाननं कपोनलाच आव्हान दिलंय, हे एव्हाना जॉन रूनीलाही कळलं होतं. शेवटी रक्‍ताचं नातं अधिक दाट असतं. आपल्या नादान पोरापायी रूनीनं मायकेलच्या मृत्यूचं फर्मान काढलं. सुलिवानचे दिवस भरले होते. ‘‘मला माझा वाटा कधी मिळेल?’’ एका हॉटेलात काही खात असताना माईकनं सवाल केला.

‘‘किती पाहिजेत?’‘ सुलिवान शांतपणे म्हणाला.

‘‘दोनशे डॉलर्स’’

‘‘डील!

‘‘आणखी मागायला हवे होते मी?’’

‘‘आता विचारून काय फायदा?’’

...हे बाप-लेकातलं संभाषण होतं.

बॅंकलुटीचं सत्र संपलं ते सुलिवानला गोळी लागून तो जखमी झाल्यानं. छोट्या माईकनं गाडी दूरवर दामटली. शुद्ध हरपलेला बाप घेऊन तो एका रस्त्यालगतच्या शेतघरात गेला.

* * * 

एक वृद्ध जोडपं या शेतघराचं मालक होतं. त्यांनी प्रेमानं सुलिवानची शुश्रूषा केली. बाप-लेकाला घरात राहू दिलं. सुलिवान हळूहळू सुधारला.‘‘तुम्हाला पीटर जास्त आवडत होता ना?’’ माईकनं दुखऱ्या आवाजात एक दिवस विचारलं.

‘‘नाही...दोघंही सारखेच आवडता.’’

‘‘ पीटरचे तुम्ही लाड करायचात,’’ माईक म्हणाला.

‘‘तो छोटा होता..छोट्यांचे लाड होतातच,’’अवघडलेला सुलिवान उत्तरं देत राहिला.

‘‘ माझ्याबद्दल तुम्हाला काही वाटत होतं?’’

‘‘ तू छोटाच आहेस...पण माझ्यासारखा वाटायचास म्हणून...तू माझ्यासारखा होऊ नये...म्हणून मी...’’ सुलिवानला पुढं बोलता आलं नाही. घशात आवंढा आला. पुढं काय वाढून ठेवलंय, हे आठवून मन कातर झालं. बिचाऱ्या पोराला काय भोगावं लागणाराय...

...बापाच्या हतबलतेनं कासावीस झालेल्या माईकनं पटकन उठून आयुष्यात पहिल्यांदा बापाला गळामिठी मारली. दुसऱ्या दिवशी भलीमोठी रक्‍कम शेतघराच्या आवारात भेट म्हणून ठेवून बाप-लेक पुढल्या प्रवासाला निघाले. 

* * *

पर्डिशनला पोचल्यावर सुलिवाननं विशाल मिशिगन तळ्याकडं नजर टाकत समोरचं घर गाठलं. घरात कुणीही नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत असतानाच पाठीमागून मारेकऱ्याच्या गोळ्यांनी त्याचा वेध घेतला. हार्लेन मॅग्वायर संतापानं त्याच्याकडं बघत होता.

तेवढ्यात पाठीमागून छोट्या माईकनं त्याच्यावर बंदूक ताणली. सुलिवान त्याला रक्‍तबंबाळ अवस्थेत सांगत होता, ‘नको, पिस्तूल टाक. गोळी झाडू नकोस.’
...काही कळायच्या आत हार्लेन मॅग्वायरवर सुलिवाननं आपली आयुष्यातली अखेरची गोळी चालवली.

...अशा रीतीनं मायकेल सुलिवान ज्युनिअरवर पुढच्या आयुष्यात एकदाही पिस्तूल चालवायची वेळ आली नाही. चित्रपटाच्या शेवटी धाकटा मायकेल प्रेक्षकांना सांगतो की:
‘‘तुझा बाप चांगला माणूस होता की भयानक वाईट, असं कुणी विचारलं तर मी फक्‍त सांगतो, ते माझे वडील होते...’’

* * *

डॉन जॉन रूनीची व्यक्‍तिरेखा पॉल न्यूमनसारख्या ज्येष्ठ अभिनेत्यानं साकारली आहे आणि त्याच्यासमोर मायकेल सुलिवान सीनिअर म्हणून उभा राहिला आहे टॉम हॅंक्‍स. या दोघांच्याही अभिनयाला खरोखर तोड नाही. ही जुगलबंदी पडद्यावरच पाहावी. चित्रपटात संवाद तसे कमीच आहेत. कहाणी पुढं जात राहाते ती दृश्‍यांमधून आणि विलक्षण बोलक्‍या अभिव्यक्‍तीतून. ही खरी चित्रभाषा, हे तत्काळ जाणवतं. संपूर्ण चित्रपटभर मृत्यूचं सावट दिसत राहतं. गुन्हेगारी जगतातलं निर्दय आणि त्याच वेळी दिवाभीतासारखं घाबरलेलं जग इथं कॅमेऱ्यानं असं काही टिपलं आहे की जाणकारांनीही दाद द्यावी. रूनीच्या सख्ख्या मुलाची भूमिका डॅनियल क्रेगनं केली आहे. तोच तो जेम्स बाँड इथं भन्नाट अभिनय करताना बघून चकित व्हायला होतं. टायलर होचलिन नावाच्या पोरानं ज्युनिअर मायकेल सुलिवान साकारला आहे. त्याची अभिनयाची समज हक्‍काचा सलाम वसूल करणारी. ‘शेरलॉक होम्स’ चित्रपटात डॉ. वॉटसन साकारणारा विख्यात इंग्लिश नट ज्यूड लॉ इथं मारेकरी मॅग्वायरच्या रूपात समोर येतो. त्याचं वावरणं शहारे आणणारं आहे. सुलिवानची घरेलू बायको झालेली जेनिफर जेसन ली आणि कपोनचा साथीदार फ्रॅंक निट्टी झालेला स्टॅन्ली टुच्ची यांच्यासारखे ऑस्कर-नामांकित नटदेखील आहेतच. याहूनही तगडा रोल आहे तो कॅमेरामन कॉनरॅड हॉल याचा आणि संपूर्ण चित्रपटभर चाललेल्या मृत्यू आणि बर्फ-पावसाच्या संमोहित करणाऱ्या खेळाचा. कॉनरॅड हॉलनं त्या वर्षीचं ऑस्कर पटकावलं. चित्रपटाचं थॉमस न्यूमन यांनी दिलेलं संगीत तर अलौकिक दर्जाचं आहे.

मॅक्‍स ॲलन कॉलिन्स या लेखकानं ‘रोड टू पर्डिशन’ ही एक सचित्र कादंबरी लिहिली होती. ती हातोहात स्टीव्हन स्पीलबर्गकडे पोचली. त्यालाही आवडली; पण दिग्दर्शनासाठी त्याच्याकडं वेळ नव्हता. मग सॅम मेंडिस या एरवी जेम्स बाँडचे चित्रपट करणाऱ्या दिग्दर्शकानं त्या कादंबरीचं सोनं केलं.वास्तविक गेल्या शतकात १९३० च्या दशकात जॉन लूनी नावाचा एक खरोखरचा डॉन अमेरिकेत होऊन गेला. मुळात एका वकिलाचा हा गॅंगस्टर झालेला होता. त्याच्या मुलाचं नाव ओकॉनर होतं. त्याचा चित्रपटात कॉनर झाला. कादंबरीतही वास्तव किती प्रखर अस्तित्व दाखवतं, त्याचं हे उदाहरण. या गोष्टीचा चित्रपट करायचा ठरवल्यावर सॅम मेंडिसनं विख्यात नट पॉल न्यूमन यांचं मन वळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. सन १९८६ मधला मार्टिन स्कोर्सिसीचा ‘कलर ऑफ मनी’ ज्यांनी पाहिलाय, त्यांना न्यूमन ही काय चीज आहे, ते कळेल. या चित्रपटात त्यांची भूमिका तशी कमीच आहे; पण तेवढ्यातही त्यांनी आपली छाप सोडली आहे. सुलिवान आपल्या या मानसबापाला क्‍लायमॅक्‍सच्या आधी गोळी घालतो, ती रात्र तर न्यूमनच्या अभिनयानं कमालीची गडद होत जाते. सन २००८ मध्ये न्यूमन गेले; पण मरण्यापूर्वी एक छान चित्रपट हातून झाल्याचं समाधान त्यांना होतं.  
‘रोड टू पर्डिशन’ हा एव्हाना अनेकांच्या हृदयीचा ठेवा बनून गेला आहे. 

...हा चित्रपट बघण्यासाठी आपणही एका खुर्चीत बसावं. दुसऱ्या खुर्चीत बाप किंवा मुलगा/मुलगी असावा/असावी. तोंडातून एकही शब्द उचकटू नये. टक लावून समोरच्या प्रतिमांचा खेळ बघावा. ‘रोड टू पर्डिशन’ हा एक संस्कार आहे. एक समृद्ध करणारा अनुभव. खुर्चीतून उठताना तुमच्या हातात एखादा वृद्ध किंवा कोवळा हात नक्‍की असेल.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा