ये क्‍या जगह है, दोस्तों...? (प्रवीण टोकेकर)

रविवार, 24 सप्टेंबर 2017

द टर्मिनल. प्रतिभावान दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गची ही आणखी एक अजरामर अशी कलाकृती. टॉम हॅंक्‍सनामक आधुनिक अभिनयसम्राटानं ती अधिकच गहिरी केली आहे. हा चित्रपट पाहून हरखून न गेलेला सिनेरसिक क्‍वचितच सापडावा. या चित्रपटाला ऑस्कर किंवा तत्सम कुठलंही तालेवार ॲवॉर्ड मिळालं नाही; पण तरीही चित्ररसिकांच्या मनातल्या ‘पंचायतना’त ‘द टर्मिनल’ ऐसपैस जागा अडवून बसतो.

ये क्‍या जगह है दोस्तों? ये कौनसा दयार है?
हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार है?

- अखलाक मोहम्मद खान ‘शहरयार’ (१९३६-२०१२)

ही  जिंदगी म्हणजे ना, शुद्ध बुडबुडा आहे, बुडबुडा. प्रचंड मोठा बुडबुडा. प्रत्येकाच्या बुडबुड्याचा आकार कम-जास्त असतो इतकंच. एक दिवस या बुडबुड्यातच अवतरायचं. जमेल तसं जगायचं आणि एक दिवस संपायचं. बुडबुड्यातून बाहेर जाणं म्हणजे मोक्ष का काय म्हणतात ते. 

जितेपणी या बुडबुड्याची तरल, पारदर्शक भिंत ओलांडता येतच नाही. जी काही नाचानाच, धावाधाव, लटपट करायची ती इथंच. या बुडबुड्यात. डू नॉट क्रॉस द बॅरिअर प्लीज. ट्रेसपासर विल बी प्रोसिक्‍यूटेड. ओके? दॅट्‌स लाइफ, ड्यूड.

...किंवा समजा तुम्ही प्रवासाला निघालात. म्हणजे तसे अधूनमधून निघताच. या वेळी दक्षिणेच्या राज्यात वगैरे गेलात; पण ठरल्या ठिकाणी जाण्याआधीच तुमची गाडी बंद पडली. तुम्ही उतरलात. अपरात्र. मरणाचा पाऊस कोसळतोय. त्यात तुमच्या लक्षात येतं, च्यायला, आपलं पाकीट मारलं कुणीतरी. आता? हातातल्या बॅगेत चार कपडे आणि थोडं सटरफटर सामान. जवळच्या रेल्वेस्टेशनात येता, तर तिथली शेवटची गाडी निघून गेलेली. स्टेशनमास्तरकडं जाऊन तुम्ही पडेल आवाजात चौकशी करता. तो गुर्मीत ‘कुठून आले? नाव काय?’ विचारतो. म्हणजे असं विचारत असावा. कारण, त्याची भाषा कुठं तुम्हाला येतीये? तुमची त्याला कुठं समजतीये? काय सांगणार? ‘हितून गाव किती लांब आहे?’ असं तुम्ही विचारता. त्याला काहीही समजत नाही. हात उडवून तो निघून जातो. तुम्ही भिजलेल्या मांजरागत तसेच उभेच्या उभे. आता कुठं जाणार? खिशात टांग्याचेही पैसे नाहीत. वेटिंग रूममध्ये लोकांनी ह्याऽऽ पथाऱ्या पसरलेल्या. सकाळी गाडी आलीच, तर...तर तिकिटाला खिशात कुठं फद्या उरलाय. मग? मग काय करायचं? हरे राम हरे राम राम राम हरे हरे...

तुम्ही इकडं-तिकडं भांबावून पाहता. ओळखीचं एकही चित्र नाही की अक्षर नाही. चला, एका बाकड्यावर थोडी जागा दिसतेय. तिकडं बसा. पायाशी बॅग सांभाळत. किती काळ? कुणास ठाऊक.

* * *

साधारण १९८९ चा सुमार. सोविएत राष्ट्रसंघाची मृत्युघंटा रशियाचे तत्कालीन सर्वेसर्वा मिखाईल गोर्बाचेव यांनी स्वहस्ते वाजवली आणि अकस्मात काही राष्ट्रांचा जन्म झाला. काही ठिकाणी स्वातंत्र्योत्सव झाले; पण अनेक राष्ट्रांमध्ये यादवीसदृश परिस्थिती निर्माण झाली. क्रांतीचे हुंकार उमटले. पूर्व युरोपात मोल्डोवा, बेलारूस, लाटविया, लिथुआनिया, इस्टोनिया, युक्रेन अशी नवी राष्ट्रं उदयाला आली. त्यातलं एक राष्ट्र : क्रॅकोझिया. हा इतका चिमुकला देश की इतकी वर्षं नकाशावरही क्‍वचितच दिसला. एवढं डिटेलिंग कोण करतं राव? त्या क्रॅकोझियातला एक कारागीर, त्याचं नाव विक्‍तोर नावोर्स्की. त्याची ही गोष्ट आहे. चित्रपटाचं नाव : द टर्मिनल. प्रतिभावान दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गची ही आणखी एक अजरामर अशी कलाकृती. टॉम हॅंक्‍सनामक आधुनिक अभिनयसम्राटानं या चित्रपटाला अधिकच गहिरं केलं आहे. हा चित्रपट पाहून हरखून न गेलेला सिनेरसिक क्‍वचितच सापडावा. या चित्रपटाला ऑस्कर किंवा तत्सम कुठलंही तालेवार ॲवॉर्ड मिळालं नाही; पण तरीही चित्ररसिकांच्या मनातल्या पंचायतनात ‘द टर्मिनल’ ऐसपैस जागा अडवून बसतो.  

* * *

क्रॅकोझियातल्या विक्‍तोर नावोर्स्कीला साडेसाती सुरू असावी किंवा घरातून निघताना त्याला ‘कुठं निघालात?’ असं कुणीतरी हटकलं असावं. किमान काळं मांजर तरी आडवं गेलं असावं. किती विघ्नं यावीत प्रवासात?  वडिलांचं राहून गेलेलं एक स्वप्न पुरं करण्यासाठी त्यानं न्यूयॉर्ककडं उड्डाण केलं. तो न्यूयॉर्कला पोचलाही; पण विमानतळावर उतरेपर्यंत त्याचा देशच नकाशावरून पुसला गेला होता. तिथं यादवी होऊन होत्याचं नव्हतं झालं होतं. तिथं स्वदेशात क्रांतीची मशाल धडधडून पेटली. सत्तापालट झाला आणि इथं अमेरिकेनं तातडीनं त्या देशाची मान्यताच रद्द करून टाकली. 

साहजिकच मुसाफिर नावोर्स्कीच्या हातातला पासपोर्ट हे निव्वळ कागदाचं चोपडं उरलं.

म्हणजे निर्वासितापेक्षाही बेक्‍कार अवस्था. हातातल्या चलनाला कुणी हिंग लावून विचारत नाही. डॉलर्स इल्ले. बिचारा विक्‍तोर. त्याला धड इंग्लिश येत नव्हतं आणि त्याची अगम्य भाषा इतरांना. जेएफके विमानतळावरच्या अधिकाऱ्यांसाठी ही ब्याद ठरली, यात नवल नव्हतं. अमेरिकेच्या विमानतळावरही सीमाशुल्क आणि सरहद्द विभाग कार्यरत असतो. या विभागाचा विमानतळावरचा प्रमुख फ्रॅंक डिक्‍सन जाम कडक माणूस होता. विक्‍तोरला त्याच्यासमोर उभं करण्यात आलं. डिक्‍सनला हा माणूस प्रथमदर्शनीच आवडला नाही. वैताग आणतात हे निर्वासित लेकाचे. न्यूयॉर्क म्हणजे काय पोरखेळ वाटला का? आओ-जाओ घर तुम्हारा. विक्‍तोरचा चेहराच तसा. लहान मुलासारखा निरागस. हसरे डोळे. अर्धकुरळे केस. एका हातात निरर्थक पासपोर्ट आणि दुसऱ्यात कुठला तरी जुनाट पत्र्याचा डबा. कधीकाळी या डब्यात शेंगदाणे होते, असं फक्‍त मानायचं. सोबत एक गाठोडं. भाषेची बोंब. याचा देश अस्तित्वात नाही. याच्या हातातलं चलन म्हणजे कागदाचे कपटे. सो, यानं न्यूयॉर्कमध्ये पाऊल टाकता कामा नये. नथिंग डुइंग. डिपोर्ट करा, परत पाठवा त्याला. डिक्‍सन डरकाळला...पण परत कुठं पाठवणार? विमान कुठलं? देश कुठला? धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का. अब क्‍या करें?

एक राजनैतिक समस्याच निर्माण झाली. शेवटी तोडगा निघाला तो असा : याच टर्मिनलवर त्यानं वाट पाहत बसावं. कुठंही. त्याच्या देशातली भानगड मिटेपर्यंत. अमेरिकेच्या भूमीवरती मात्र त्याला पाय ठेवता येणार नाही. हातात खाऱ्या शेंगदाण्यांचा डबा आणि प्रवासानं दमलेली एक बॅग एवढं घेऊन विक्‍तोरनं हताशेनं बसकण मारली. तो खचून गेला.

* * *

खिशात दमडी नव्हती. दूर कोपऱ्यात टर्मिनलच्या लाद्या चकचकीत पुसत असलेला राजन गुप्ता नावाचा एक म्हातारा सफाई-कर्मचारी आणि खाद्यपदार्थांची ने-आण करणाऱ्या चिमुकल्या वाहनाचा ड्रायव्हर एन्रिक हे दोघं सुरवातीला त्याच्याशी फटकून वागले खरे; पण लवकरच त्यांना कळलं की हा परदेशी असला तरी भला माणूस आहे. त्याचं हसू आणि बोलणं निरागस आहे. भाषेच्या गोंधळामुळं धम्माल विनोदाचे फटाके उडतायत. असं होणारच. खरं तर विक्‍तोरला प्रचंड भूक लागली होती. वास्तविक टर्मिनलमध्ये अन्नाची कमतरता नाही. सगळीकडं चकचकीत दुकानं. सबॅरो, मॅक्‍डॉनल्ड्‌स, बर्गर किंग, पिझा, पास्ता...सगळंच उपलब्ध होतं; पण अर्थात डॉलर्स टाकलेच पाहिजेत. नोट सरकवली तरच पलीकडची पोरगी गोड बोलते; पण नोट नसेल तर ओळखसुद्धा दाखवणार नाही. विमानतळ असाच असतो, बाबांनो. 

इतस्तत: पडलेल्या सामानाच्या ट्रॉलीज्‌ एकात एक गुंतवून योग्य जागी नेऊन ठेवल्या तर २५ सेंटची कमाई होते. ही कमाई कुणीही केली तरी चालते. विमानतळ चालवणाऱ्या प्रशासनाला तेवढंच सोईचं जातं. विक्‍तोरनं ट्रॉल्या गोळा करून पोटाचा प्रश्‍न सोडवला; पण डिक्‍सनला हेही आवडलं नाही. तो म्हणाला : ‘ए, नुसतं बसायचं तर बस. फालतू चिकटू धंदे करू नकोस.’

सामानाशी बसल्या बसल्या विक्‍तोरनं सफाईवाल्या गुप्ताशी एक विसंवादी संवाद आरंभला. गुप्ता हे एक भलतंच प्रकर्ण होतं. भारतात म्हणे त्यानं एका पोलिसाला मारलं होतं आणि इथं आला होता पळून. भारतात परतला, तर त्याची अटक ठरलेली होती. म्हणून तोही इथं फरशा पुसत दिवस काढत होता. ‘‘जोवर मी मान खाली घालून स्वच्छ लाद्या पुसतोय, तोवर अमेरिकनांना माझी पर्वा नाही. माझ्यासारख्या क्षुद्र जंतूसाठी हे लोक राबत नसतात...’’ राजन गुप्तानं विक्‍तोरला सांगितलं. अर्थात त्याला त्यातलं अक्षरही कळलं नाही, हा भाग वेगळा.हळूहळू विक्‍तोरची आसपासच्या लोकांशी थोडी जानपछान झाली. टर्मिनलवर कुठंही हिंडण्याची त्याला मुभा असल्यानं अल्पावधीतच त्याला तिथला कोपरान्‌कोपरा पाठ झाला. कपडे कुठं बदलायचे? दाढी कुठं करायची? जेवायचं कुठं?  टर्मिनल हे एक छोटंसं विश्वच असतं. कॅप्सूलमधलं विश्व. जणू कवेत मावणारं ब्रह्मांडच. 

मुसाफिर येताहेत. जाताहेत. विविध देश. वंश. रंग. स्वभाव. अन्न...जणू पृथ्वीचा आकार आक्रसून काही चौरस मीटरांपुरता मर्यादित झालेला. विक्‍तोर नावोर्स्की नावाच्या एका अजनबी इसमाला पुन्हा एकवार इथं बीजासारखं रुजायचं होतं. जमलं तर वाढायचं होतं. किती दिवस राहायचं? माहीत नाही. कधी जायचं? ठाऊक नाही...अरे, हे तर जिंदगीसारखंच झालं.

यहाँ कौन है तेरा? मुसाफिर, जायेगा कहाँ 
दम ले ले घडीभर, ये छैया पायेगा कहाँ?

* * *
बघता बघता विक्‍तोरनं बस्तान बसवलं. तशा घटनाच घडत गेल्या. टर्मिनलवरचे दिवस भराभरा जात होते. एकदा तर विमानतळावरच्या स्वच्छतागृहात दाढी करताना पाहून एक प्रवासी त्याला म्हणालादेखील : ‘‘विमानतळावर राहण्याचा अनुभव घेतला पाहिजे एक दिवस...’’

विक्‍तोरची चिकाटी वाखाणण्यासारखी होती. तो रोज आपला पासपोर्ट घेऊन इमिग्रेशनच्या काउंटरवर न चुकता जायचा. देशाला मान्यता मिळाली की आपला पासपोर्ट व्हॅलिड होईल. तो झाला की आपण न्यूयॉर्कमध्ये राजरोस जायला मोकळे, असा त्याचा आडाखा.

‘‘तू रोज का येतोस इथं?’’ काउंटरवरच्या डोलोरिसनं एकदा कंटाळून विचारलं.

‘‘तुझ्याकडं दोन स्टॅम्प आहेत. एक लाल आणि एक निळा. बरोबर?’’ विक्‍तोरनं जमेल तसं विचारलं.

‘‘मग?’’ ‘‘म्हंजे मला ५०-५० टक्‍के चान्स आहे की नाही?’’ विक्‍तोर म्हणाला.

‘‘तुझा दृष्टिकोन चांगला आहे; पण अमेरिका डझन्ट वर्क दॅट वे...’’ डोलोरिस म्हणाली.

...एकदा रातोरात त्यानं एक अर्धवट भिंत अशी काही रंगवून काढली, नटवली की बस्स. बघणारे बघत राहिले. विक्‍तोर हा कुशल कारागीर होता. त्याला छोटीशी नोकरीच मिळून गेली.

...एकदा एका मुसाफिराच्या सामानात संशयास्पद औषध आढळलं. अमली पदार्थविरोधी पथक कामाला लागलं. मुसाफिराच्या मुसक्‍या आवळल्या गेल्या. 

टर्मिनलमध्ये कुठंही कडमडणारा विक्‍तोर तिकडं पोचलाच. त्यानं हे बकऱ्यांचं औषध असल्याचं सांगितलं. ते खरं निघालं. मुसाफिर सुटला.

...गुप्ता त्याचा दोस्त झालाच होता. एन्रिकची भानगड वेगळीच होती. इमिग्रेशनच्या काउंटरवर बसणारी डोलोरिस त्याला भारी आवडायची. तिच्यावर त्याचं दिलोजान से प्रेम होतं. प्रॉब्लेम इतकाच होता, की असा एक मजनू आपल्यावर मरतोय, हे त्या लैलाला माहीतच नव्हतं. डोलोरिसच्या हालचालींची माहिती देण्याच्या दोस्तदार अटीवर एन्रिकनं विक्‍तोरला थोडंफार खायला देणं सुरू केलं. बदल्यात विक्‍तोरनं दोघांचा टाका भिडवून दिला. दोस्त असा पाह्यजे राव. दिल दरिया, प्यार समुंदर. थोडं थोडं इंग्लिश समजून घेण्याचा त्यानं जिद्दीनं सपाटा लावला. टर्मिनलमधला टीव्ही हा त्याचा गुरू होता. टर्मिनलवरचे दिवस विमानासारखे उडत होते. तिथंच त्याला भेटली अमेलिया...

* * *

अमेलिया हे दु:स्वप्नातलं एक सुनहरं स्वप्न होतं. ती एक हवाईसुंदरी होती. खरोखरची सुंदरी. प्रेमळ डोळ्यांची. कोमल हृदयाची. विक्‍तोरच्या त्रिशंकू अवस्थेनं ती बिचारी कळवळायची; पण करणार काय? विक्‍तोरच्या हृदयाची तार तिनं छेडलीच. एका रात्रीत विक्‍तोरच्या टर्मिनलमधल्या प्रतीक्षेचा हेतूच बदलला. आता तो अमेलियाची वाट बघत बसू लागला. अमेलिया त्याच्याशी खूप प्रेमानं बोलायची. वागायची. एकदा तर तिनं त्याला जेवणाचं निमंत्रण दिलं; पण आपण तिला जेवण दिलं पाहिजे, अशी जिद्द मनानं घेतलेल्या विक्‍तोरनं डिनरपुरते पैसे कमावण्यासाठी मेहनत केली. एका शानदार सायंकाळी विक्‍तोरनं अमेलियाला, आपण अमेरिकेत का आलो होतो, याचं खरं कारण सांगून टाकलं. इतके दिवस ते गुपितच होतं. उत्तरादाखल त्यानं त्याच्या हातातला खाऱ्या शेंगदाण्यांचा तो डबा उघडला. आत एक जुनाट पोस्टर होतं. पोस्टरवर धूसर झालेला एक वादकांचा ग्रुप-फोटो होता. त्यावर सह्या.

‘‘माझे वडील जॅझ संगीताचे भोक्‍ते होते. हंगेरीच्या एका वर्तमानपत्रात सन १९५८ मध्ये हे पोस्टर प्रसिद्ध झालं होतं. जगातल्या नामवंत ५७ जॅझ संगीतकारांचा तो ग्रुप-फोटो होता. माझ्या वडिलांनी ठरवलं, की या सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या मिळवायच्या. वडील गेले; पण एक स्वाक्षरी राहिली. सॅक्‍सोफोनवादक बेनी गोल्सनची. ते इथंच न्यूयॉर्कमधल्या कुठल्या तरी हॉटेलात अजूनही सॅक्‍सोफोन वाजवतात. त्यांची सही घेतली की माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण होईल. तेवढ्यासाठी मी इथं आलोय...’’ निरागस डोळ्यांच्या विक्‍तोरनं त्याच्या कामाचं स्वरूप सांगितलं आणि अमेलिया हतबुद्ध झाली. एवढुश्‍या गोष्टीसाठी किती भोगलं या प्राण्यानं? हे कसलं वेड?

अमेलियाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होता. विवाहित होता; पण संसार आणि करिअर धोक्‍यात येतंय, असं लक्षात येताच त्या अधिकाऱ्यानं आपलं विवाहबाह्य लफडं गुंडाळलं. अमेलिया कडवट झाली होती; पण विक्‍तोरसाठी तिनं त्यालाच गाठण्याचं ठरवलं. तो नक्‍की ही सही मिळवायला मदत करू शकेल. आणि तसंच घडलं. नियमाला बगल देऊन विक्‍तोरनं शहरात यावं, त्याला हवी ती स्वाक्षरी घ्यावी आणि पुन्हा टर्मिनल गाठावं, असं ठरलं. अमेलियानं तसं विक्‍तोरला सांगितलं; पण या वाटाघाटींमध्ये अमेलियाचं प्रेम पुन्हा सांधलं गेलेलं पाहून विक्‍तोर मात्र कायमचा घायाळ झाला.  प्रेमाच्या गाठी कुणी बांधू म्हटलं तर बांधता येत नाहीत आणि सोडवू म्हटलं तर सोडवताही येत नाहीत. आणखी काही दिवसांनीच क्रॅकोझियामधली यादवी संपुष्टात येऊन विक्‍तोरचा पासपोर्ट व्हॅलिड ठरला. फ्रॅंक डिक्‍सननं त्याचं गाठोडं परत पाठवण्याचा चंग बांधला. पुढं काय झालं? विक्‍तोरचं जॅझस्वप्न पूर्ण झालं? अमेलियानं त्याचं प्रेम स्वीकारलं? तो परत गेला की अजूनही त्या टर्मिनलवरच राहतो आहे? ...उत्कंठा वाढवणारा शेवट थेट पडद्यावर बघण्यातच मजा आहे.

* * *

‘द टर्मिनल’ ही गोष्टच नाही. ती एक लांबलचक घटना आहे. खरं तर हे एक रूपकच म्हणायचं. आयुष्याचा प्रोटोटाइपच. मोठमोठ्या आलिशान मोटारींची स्केल मॉडेल्स असतात ना, तसंच काहीसं. असल्या कथासूत्रावर चित्रपट बनू शकतो, हे सुचावं स्टीव्हन स्पीलबर्गसारख्या प्रतिभावंतालाच आणि त्यानंच तो चित्रपट करावादेखील. टॉम हॅंक्‍स या अभिनयसम्राटानं इथं केलेला अभिनय हा चक्‍क अभिनयाच्या क्षेत्रातला वस्तुपाठ आहे. त्याच्या डोळ्यांतल्या अनाकलनीय भाषेच्या प्रतिक्रिया तर केवळ अजोड आहेत. फॉरेनर म्हंजे अगदी शतप्रतिशत फॉरेनर. समोरचा माणूस तुमचीच भाषा बोलतोय आणि तुम्हाला ती कळतच नाहीए, असं दाखवायचंय. टॉम हॅंक्‍स तिथं ग्रेट ठरतो. वास्तविक क्रॅकोझिया नावाचा देशच नाही. त्यामुळं त्याची भाषाच नाही; पण हॅंक्‍सनं सरळ बल्गेरियन भाषेची मोडतोड करून नवी भाषा तयार केली. क्रॅकोझियाचं राष्ट्रगीतही या चित्रपटासाठी तयार करण्यात आलं. 

स्पीलबर्गनं या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रीतसर एक टर्मिनल उभारलं. तिथं अमेरिकी ब्रॅंड्‌सची खरीखुरी दुकानं उघडली. एका झपाट्यात चित्रपट पुरा केला. आता या कथेचा सगळ्यात मोठा धक्‍कादायक भाग! 

...ही एक सत्यकथा आहे चक्क. खरोखरच अशा पद्धतीनं परदेशी टर्मिनलवर तब्बल १८ वर्षं राहिलेल्या एका मुसाफिराची ही खरीखुरी कहाणी आहे. अमेरिकी प्रथेप्रमाणे तिचं पुस्तकरूपही उपलब्ध आहे. फक्‍त काही कारणानं त्याचं श्रेय मात्र चित्रपटात दिलं गेलेलं नाही. मेहरान करिमी नास्सेरीनामक एक इराणी मुसाफिर सन १९८८ मध्ये पॅरिसच्या ‘चार्ल्स द गॉल विमानतळा’वर उतरला. त्याला इंग्लंडला जायचं होतं; पण तेवढ्यात त्याचा पासपोर्ट आणि निर्वासितांसाठी आवश्‍यक असतात ती कागदपत्रं चोरीला गेली. फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्याला तिथंच डांबून ठेवलं. त्याला तिथलं ‘टर्मिनल वन’ कधीच सोडता आलं नाही. ‘इराणला परत जा किंवा इथंच राहा,’ असं त्याला सांगितल्यानंतर या नास्सेरीनं तिथंच ठाण मांडलं आणि चक्‍क जगायला सुरवात केली. नंतर नंतर त्याचं डोकं फिरायला लागलं.  ‘फ्रान्समध्ये कुठंही राहा,’ असं नंतर त्याला सांगितलं गेलं तरी तो गेला नाही. ‘माझ्या कागदपत्रांवर ‘सर आल्फ्रेड मेहरान’ असं नाव हवं,’ म्हणून तो हटून बसला. इराणलाही गेला नाही. ‘मी आता पर्शियन विसरलोय’, असं तो सांगायचा.  अखेर २००६ च्या ऑगस्ट महिन्यात त्याला इस्पितळातच हलवावं लागलं. म्हणजे सन २००४ मध्ये स्पिलबर्गचा ‘द टर्मिनल’ जगभर झळकला, तेव्हा त्या चित्रपटाचा हा खरा नायक फ्रान्सच्या विमानतळावर राहत होता!

ब्रिटिश लेखक-पत्रकार ॲन्ड्य्रू डॉनकिन यांच्या नजरेस हा इसम आला. त्यांनी चौकशी केली. इंटरेस्टिंग स्टोरी होती. मग त्यांनी आणि नास्सेरीनं एक आत्मकहाणीच लिहायला घेतली. ती २००४ मध्ये प्रसिद्ध झाली : ‘द टर्मिनल मॅन!’ स्पीलबर्गच्या ती वाचनात आली.

स्पीलबर्गनं या कहाणीच्या हक्‍कापोटी नास्सेरीला अडीच लाख डॉलर्स दिले, असं म्हणतात; पण पुढं चित्रपट करताना कथेत इतके बदल झाले, की नास्सेरीच्या कहाणीतला बराचसा भाग गायबच झाला. सबब, त्याला श्रेय दिलं गेलं नाही. आजही हे नास्सेरीसाहेब पॅरिसमध्ये निर्वासितांच्या एका छावणीत राहतात, म्हणे. एकटेच.

म्हणजे एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यात. शायर शहरयार म्हणतात ते खरं असावं : ‘हदेनिगाह तक यहाँ गुबार ही गुबार है...’

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Pravin Tokekar The Terminal