अमेरिकेतलं क्रिकेट आणि प्रशिक्षकांचं ‘स्वयंवर’ (सुनंदन लेले)

रविवार, 16 जुलै 2017

अमेरिकेत क्रिकेटचा शिरकाव झाला असला, तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. गेल्याच महिन्यात युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशनचं (उसाका) सदस्यत्व आयसीसीनं रद्द केलं. तिथं क्रिकेट फुलवण्याचे प्रयत्न भारतीयांकडून होत आहेत; मात्र तरुण मुलांनी प्रत्यक्ष खेळायला पुढं येण्याची जास्त गरज आहे.
 

क्रिकेट खेळणाऱ्या देशात जन्माला आलेला मुलगा जगाच्या पाठीवर कुठंही गेला, तरी त्याचं क्रिकेटप्रेम जिवंत राहतं. चीनमध्ये भारतीय, ऑस्ट्रेलियन आणि ब्रिटनच्या वकिलातीत काम करणारे लोक मोठमोठ्या कंपन्यांत काम करणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना एकत्र करून क्रिकेट खेळतात, असा अनुभव मला माझा मित्र प्रकाश वाकणकरनं सांगितला होता. इतकंच काय, जपानमध्येही तिकडं काम करायला गेलेले भारतीय वंशाचे लोक आवडीनं क्रिकेट खेळतात. अगदी तसाच काहीसा अनुभव अमेरिकेत फिरताना आला. नेवार्क विमानतळावर मला न्यायला आलेल्या स्वानंद वझेच्या डिकीत बॅग ठेवायला गेलो, तर क्रिकेटचं मोठं कीट दिसलं. स्वानंदकडूनच मग न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्निया भागात क्रिकेट प्रचंड प्रमाणात खेळलं जातं, याच्या कहाण्या ऐकायला मिळाल्या.  

क्रिकेटचा इतिहास जुना
तसं बघायला गेलं, तर न्यूयॉर्कमधल्या वर्तमानपत्रांत इसवीसन १७३९मध्ये क्‍लब सामने खेळायला क्रिकेटपटू हवेत, अशी जाहिरात बघायला मिळाली आहे. तसंच क्रिकेटची स्पर्धा झाल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या असल्याचं समजतं. अमेरिकेतल्या २२ राज्यांतल्या १२० शहरांत १८६०मध्ये क्रिकेट खेळलं जात होतं. जवळपास दहा हजार क्रिकेटपटू खेळाचा आनंद घेत असल्याची नोंद मिळते. १९६५मध्ये युनायटेड स्टेट्‌स ऑफ अमेरिका क्रिकेट असोसिएशन (उसाका) नावानं संस्था स्थापन झाली. अगदी आत्तापर्यंत म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत ‘उसाका’ आयसीसीची सदस्य होती. गेल्याच महिन्यात आयसीसीनं बऱ्याच वाटाघाटी आणि विचारविनिमयानंतर ‘उसाका’चं सदस्यत्व रद्द केलं.

आयसीसीचे कठोर उपाय
आयसीसीनं ‘उसाका’चं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घाईगडबडीनं घेतलेला नाही. बऱ्याच वेळा आयसीसीनं ‘उसाका’च्या पदाधिकाऱ्यांना बोलावून अर्थव्यवहारातले गैरव्यवहार रोखण्यापासून ते संघटनेची घटना आयसीसी नियमांनुसार बदलण्यापर्यंत बरेच उपाय सुचवले होते. अमेरिकन क्रिकेट नियामक मंडळाच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी अपेक्षित बदल करायला ठोस पावलं उचलली नाहीत, ज्याचे गंभीर परिणाम अमेरिकेतल्या क्रिकेटपटूंना भोगावे लागले आहेत. 

खरं तर, गेली दहा वर्षं विशेषः अमेरिकेतल्या पश्‍चिम विभागात क्रिकेटची मुळं खोलवर रुजावीत म्हणून चांगले प्रयत्न करण्यात आले होते. सचिनला मार्गदर्शन करणारे अजित तेंडुलकर बरीच वर्षं सॅनफ्रान्सिस्को भागात जाऊन तरुण क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत होते. महाराष्ट्राचे माजी वेगवान गोलंदाज शाम ओक, बडोद्याचा माजी खेळाडू तुषार आरोठे हे दोघे या भागात प्रशिक्षण देऊन आले आहेत. सगळ्यांचं म्हणणं एकच आहं ः ‘‘भारतातून शिकायला अमेरिकेत गेलेल्या तरुण मुलांनी तिथलं क्रिकेट एका उंचीवर नेलं. आता १५ ते २० या वयोगटातल्या मुलांनी क्रिकेट खेळणं मनावर घेण्याची गरज आहे. ‘उसाका’चं काम त्या भागात मनोभावे सांभाळणारे अजय आठवले म्हणतात ः ‘‘आम्ही गेली १० वर्षं अत्यंत प्रामाणिक प्रयत्न करतो आहोत. अजित तेंडुलकरसारख्या दादा व्यक्तीनं मार्गदर्शन केल्यानं आमच्या इथल्या खेळाडूंच्या खेळात लक्षणीय फरक पडला आहे. अडचण दोन ठिकाणी येते. एक म्हणजे शाळा चालू असेपर्यंत पालक मुलांना क्रिकेट खेळायला आनंदानं पाठवतात; पण ती कॉलेजला जायला लागली, की त्यांचं खेळणं बंद होतं. नव्या जमान्यात आणि खासकरून अमेरिकेसारख्या देशात चांगल्या कॉलेजशिक्षणाशिवाय काहीच प्रगती करता येत नाही आणि कॉलेजमध्ये क्रिकेट संघ तयार करणं कठीण होऊन बसतं, हे मान्य आहे. दुसरीही एक अडचण आहे. अमेरिकेत १९ वर्षांपर्यंत चांगल्या प्रशिक्षणाची आणि स्पर्धेची सोय आहे. त्यानंतर मुलाला एकदम थेट वरिष्ठ संघात खेळायचा प्रयत्न करावा लागतो. भारतात जसं १९ वर्षांखालच्या स्पर्धेनंतर पूर्वी २२ वर्षांखालची स्पर्धा असायची तशी स्पर्धा अमेरिकेत चालू होणं नितांत गरजेचं आहे.’’

प्रेक्षक नकोत...खेळाडू हवेत
अमेरिका ही क्रिकेटसाठी किती मोठी बाजारपेठ आहे, हे आयसीसी जाणून आहे. म्हणून ‘उसाका’चं सदस्यत्व रद्द करताना आयसीसीनं अमेरिकन क्रिकेटपटूंना धक्का लागू नये म्हणून पावलं उचलली आहेत. अमेरिकेत क्रिकेट वाढावं म्हणून आयसीसीनं खास आणि भरघोस निधी बाजूला ठेवला आहे. इतकंच नाही, तर इंग्लंडच्या माजी खेळाडूला अमेरिकेतल्या तरुण मुलांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केलं आहे. 
गेल्या वर्षी भारतीय संघ पहिल्यांदा अमेरिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. फ्लोरिडा राज्यातल्या फोर्ट लॉडरडेलला भरवल्या गेलेल्या प्रत्येक सामन्याची तिकिटं हातोहात विकली गेली होती. गेल्या वर्षी मिळालेला भरघोस प्रतिसाद लक्षात ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ चालू वर्षात भारतासह दोन मोठ्या संघांना पाचारण करून त्याच जागी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा भरवायचा घाट घालत आहे, असं समजलं आहे. नुसते सामने भरवून प्रेक्षक येऊन अमेरिकेतलं क्रिकेट सुदृढ होणार नाहीये, हे आयसीसी जाणते. त्यासाठी स्थानिक क्रिकेटचा पाया मजबूत कसा करता येईल, याकडं बारकाईनं लक्ष द्यावं 
लागणार आहे.

‘शास्त्री’य निवड
भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या अनावश्‍यक दौऱ्यावर गेला असताना बीसीसीआय भारतीय संघाचे भावी प्रशिक्षक शोधण्यात मग्न होतं. आयसीसी चॅंपियन्स करंडक स्पर्धा सुरू असताना कोहली-कुंबळे वादाला तोंड फुटलं होतं. बीसीसीआय सचिवांनी ‘‘असं काही नाहीच आहे...कुंबळे-कोहलीदरम्यान मतभेद असल्याच्या बातम्या धादांत खोट्या आहेत,’’ असं सांगत माध्यमांवर टीका केली होती. मात्र, प्रत्यक्षात कर्णधार आणि प्रशिक्षकांतले वाद विकोपाला होतेच. चॅंपियन्स करंडक स्पर्धा संपली आणि कुंबळेनं राजीनामा दिला. बीसीसीआयच्या ढिसाळ कारभारानं अनिल कुंबळेसारख्या सभ्य माणसाची गच्छंती अत्यंत वाईट प्रकारे झाली. 

शोधाशोध
नव्या प्रशिक्षकाच्या शोधकार्याला प्रारंभ करताना बीसीसीआयनं अर्ज करण्याची मुदत वाढवून रवी शास्त्रीकरता वाट मोकळी करून द्यायला पहिलं पाऊल उचललं. रवी शास्त्रीला कर्णधार विराट कोहलीसह बाकी पण काही खेळाडूंचा आवाजी पाठिंबा होता, हे लक्षात घेतलं गेलं. सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुलीच्या समितीनं पाच संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. रवी शास्त्रीला प्रशिक्षकपदी नेमायला सौरव गांगुलीचा विरोध होता. विराट कोहलीसह खेळाडूंचा रवी शास्त्रीला हिरवा कंदील असल्यानं गांगुलीचा नाइलाज होता. नेमणुकीचा रस्ता मोकळा करण्याअगोदर समितीनं रवी शास्त्रीला नवी भूमिका काय आहे, हे स्पष्ट सांगितलं. अगोदर शास्त्री संघाचा मार्गदर्शक होता, आता त्याला प्रमुख प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. नवी नेमणूक दोन वर्षं म्हणजेच २०१९च्या विश्‍वकरंकडक स्पधेपर्यंत केली जाणार असल्याची पूर्ण जाणीव शास्त्रीला करून देण्याचा समंजसपणा बीसीसीआय आणि तीन माजी खेळाडूंच्या समितीनं त्याच्या हाती संघाच्या दोऱ्या देताना दाखवला.

सुखद धक्के
रवी शास्त्रीची नेमणूक करताना गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून झहीर खान आणि परदेश दौऱ्यावर जात असताना फलंदाजांना मार्गदर्शक करायला राहुल द्रविडची केली गेलेली नेमणूक सुखद धक्का होता. २०११मध्ये भारतीय संघानं विश्‍वकरंडक जिंकला, तेव्हा झहीर खान गोलंदाजांचा नुसता नेता नव्हता, तर त्यांचा मार्गदर्शक होता. परदेश दौऱ्यावर भारताचे वेगवान गोलंदाज सातत्यानं चांगली कामगिरी करतील, तेव्हाच भारतीय संघाला खरा प्रगतीचा मार्ग  मिळेल. झहीर खानची नेमणूक त्याच अर्थानं मोलाची ठरते. मोहंमद शमी, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव आणि जसप्रीत बुमराला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे- जी झहीर खान बरोबर पूर्ण करू शकतो, असा विश्‍वास बीसीसीआय आणि सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि सौरव गांगुलीच्या समितीनं व्यक्त केला आहे.

गेल्या १४ महिन्यांत भारतीय संघ १७ कसोटी सामने मायदेशात खेळला आणि त्यात या संघानं उत्तम कामगिरी केली. येत्या वर्षात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका आणि पुढच्या उन्हाळी मोसमात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. भारतीय फलंदाजांकरता हे दोनही दौरे कठीण परीक्षेचे ठरणार आहेत. जास्तकरून गेल्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाची झालेली वाताहत बीसीसीआय विसरलेलं नाही. कसोटी सामन्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर मोठ्या धावा करायला वेगळी तयारी करून घ्यावी लागणार, हे लक्षात घेऊन राहुल द्रविडची नेमणूक मार्गदर्शक म्हणून केली गेली, हे सुलक्षण समजता येईल.

थोडक्‍यात रवी शास्त्री, संजय बांगर, झहीर खान आणि परदेश दौऱ्यांवर राहुल द्रविड भारतीय संघाला मार्गदर्शन करणार आहेत. विराट कोहलीला सगळं काही मनासारखं मिळालं असल्यानं चांगली कामगिरी करण्याचा चेंडू आता त्याच्या कोर्टमध्ये असेल. जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय संघाचा नवा प्रवास नव्या प्रशिक्षकांसोबत चालू होणार आहे.

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा