मनं जोडणारा खेळ (सुनंदन लेले)

मनं जोडणारा खेळ (सुनंदन लेले)


जम्मू-काश्‍मीरमध्ये उडी भागात लष्कर आणि सर्वसामान्य जनता यांच्यात चांगलं नातं तयार व्हावं यासाठी ‘उडी प्रीमियर लीग’ची कल्पना पुढं आली. लष्कर आणि असीम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एक-दोन नव्हे, तर ४८ संघांनी भाग घेतला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सचिन तेंडुलकरनं वेब कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन केलं आणि गप्पाही मारल्या. क्रिकेटच्या माध्यमातून मनं जोडण्याच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमावर एक नजर....

‘‘क्‍या   है आपके जेब में?’’....श्रीनगर विमानतळावरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यानं आमच्या पथकातल्या डॉक्‍टरांना विचारलं.

‘‘साबजी, गोली है,’’ डॉक्‍टर उत्तरले.

‘‘निकालो बाहर...अच्छा ये है!...भाईसाब, कश्‍मीरमे आने के बाद अलग शब्द इस्तमाल करना सिखो...आप दवाई...टॅब्लेट बोलोगे तो ज्यादा ठीक रहेगा...‘गोली’ का मतलब कश्‍मीरमें एकही होता है...बंदूक की गोली...भुलना नहीं,’’ सुरक्षा कर्मचारी समजावणीचा सूर पकडत; पण हसतहसत म्हणाला आणि आम्हालाही लगेच जाणीव झाली.

यापूर्वी दोन वेळा काश्‍मीरला फिरायला जाण्याचा योग जुळून आला होता. श्रीनगरहून सुरू होणारी सहल गुलमर्ग, सोनमर्ग, पेहलगाम करून परतायची. सगळंच छान छान, गोडगोड असायचं. या वेळी काश्‍मीरला फिरायला नाही, तर एका अर्थी ‘मिशन’वर आलो होतो. भारतीय लष्कर आणि स्थानिक काश्‍मिरी जनता यांच्यात संवाद वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. भारतीय लष्करही विविध उपक्रम राबवून जनतेशी नातं जोडायचा प्रयत्न करतं. अगदी खरं सांगायचं तर काश्‍मिरी जनतेला भारतीय लष्कराबद्दल खूप आपुलकी आहे असं नाहीये. हा दुरावा कमी व्हावा याकरता काय उपाययोजना करता येतील, याचा सतत विचार होत असतो.

चांगली बाब अशी आहे, की काही मजेदार परिणाम साधू शकतील असे उपाय सर्वसामान्यांकडून सुचवले गेले, तर ते अंमलात आणायला भारतीय लष्कर उत्सुक असतं. पुण्यातल्या सारंग गोसावी या व्यवसायानं काँप्युटर इंजिनिअर; पण देशप्रेमी ध्येयवेड्या तरुणानं ‘असीम फाउंडेशन’ नावाची संस्था सुरू करून मनं जोडण्याच्या कामाला प्राधान्य दिलं आहे. गेली जवळपास १५ वर्षं असीम फाउंडेशन काश्‍मीरच्या दुर्गम भागात चांगलं काम करत आहे. या कामात सारंगला पत्नी नेहासह अनेक तरुण-तरुणी पाठबळ देत आहेत आणि झटून काम करत आहेत. 

काश्‍मीरच्या उत्तरेला एकदम सीमेवर उडी नावाचा भाग आहे, जो खरोखरच तीन बाजूंनी पाकिस्तानकडून घेरला गेलेला आहे. मजेची सकारात्मक गोष्ट अशी, की वाटेत लागणाऱ्या बारामुल्ला भागातले लोक भारताचा दु:स्वास करत असताना उडी भागातल्या लोकांना भारताबद्दल आपुलकी आहे. उडीतल्या भारतीय लष्करातल्या उत्साही अधिकाऱ्यांनी, ‘लोक लष्करी दलांकडं आणखी मैत्रीच्या नजरेनं बघतील, तरुणांना आवडेल अशी कल्पना मांडा,’ असं असीम फाउंडेशनला सांगितलं होतं. या विषयावर विचारमंथन झाल्यावर, सर्वांत जोडणारा सोपा दुवा म्हणजे क्रिकेटचा खेळ असल्याची सर्वांची भावना झाली. त्यातून ‘उडी प्रीमियर लीगची कल्पना पुढं आली. सगळ्यांच्या अपेक्षांना सुखद आश्‍चर्याचा धक्का बसला, कारण एक-दोन नव्हे, तर तब्बल ४८ संघांनी ‘उडी प्रीमियर लीग’मध्ये भाग घेण्याकरता नावनोंदणी केली.

जुलै महिन्याच्या मध्याला चालू झालेली स्पर्धा एक महिन्यानंतर ऑगस्ट महिन्यात संपली. अंतिम सामना बघायला पाच हजार प्रेक्षक उडी आर्मी कॅंपमधल्या निसर्गसुंदर मैदानावर जमा झाले. अपेक्षेपेक्षा ‘उडी प्रीमियर लीग’ खूपच यशस्वी झाली.

स्पर्धेचं संयोजन करणाऱ्या कॅप्टन नेहा जोशी यांनी क्रिकेटचा जुळलेला धागा पुढं कसा नेता येतील, याच्या विचारविनिमयाकरता असीम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना उडीला भेट देण्याचं निमंत्रण दिलं म्हणून उडीला जाण्याचा योग जमून आला. श्रीनगरहून जवळपास शंभर किलोमीटर अंतरावर उडी गाव आहे. इथला आर्मी कॅंप खरच नितांतसुंदर निसर्गात वसलेला आहे. वरून शांत आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या ‘काला पहार’ आर्मी कॅंपला आम्ही पोचलो, तेव्हा ‘हाय ॲलर्ट’ दिला गेलेला होता. बरोबर एक वर्षापूर्वी याच तळावर अतिरेक्‍यांनी हल्ला केला होता, ज्यात भारतीय लष्कराचे दहापेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. त्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याकरता २६ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्करानं पाकिस्तानमधल्या अतिरेकी प्रशिक्षण केंद्रावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला होता. या दोन घटनांना एक वर्ष पूर्ण होत असताना परत अतिरेकी हल्ला करायचा प्रयत्न करतील म्हणून सुरक्षेचा इशारा उडी कॅंपला देण्यात आला होता.    

२३ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता आर्मी गुडविल शाळेतली मुलं-मुली मिळून जवळपास शंभर विद्यार्थी, उडी प्रीमियर लीगच्या विजेता संघासह अजूनही काही खेळाडू मिळून शंभर क्रिकेटपटू आणि काला पहार आर्मी कॅंपचे उत्साही जवान पदाधिकारी असे लोक खास सभागृहात जमा झाले. मी ४५ मिनिटं उपस्थितांना क्रिकेटच्या रंजक; परंतु काही ना काही बोध देणाऱ्या कहाण्या सांगून रमवलं. त्यानंतर एक चांगला प्रशिक्षक वेब कॉन्फरन्सद्वारे सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहे, असं जाहीर करण्यात आलं. मग मजेदार पद्धतीनं उलटगणती करून लॅपटॉपला जोडलेल्या प्रोजेक्‍टरनं प्रकाशझोत समोरच्या मोठ्या पांढऱ्या पडद्यावर फेकण्यात आला आणि पडद्यावर अवतरलेला प्रशिक्षक बघून सगळेच्या सगळे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडू लागले. होय!...कारण पडद्यावर चक्क भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थितांना नमस्कार करून स्वागत करत होता. असीम फाउंडेशन आणि कॅप्टन नेहा जोशी यांच्या विनंतीला मान देऊन, वेब कॉन्फरन्सद्वारे विद्यार्थी आणि खेळाडूंशी संवाद साधायला सचिन आपल्या मुंबईतल्या घरून लॉगइन झाला होता.

‘‘खूप आनंद होतो आहे तुमच्याशी संवाद साधताना. आपलं नातं आहे सगळ्यांचं- कारण तुम्ही क्रिकेटपटू आहात आणि मीसुद्धा. क्रिकेट हा मनं जोडणारा खेळ आहे. भारतीय लष्कर आणि असीम फाउंडेशननं एकत्रितपणे तुमच्यासाठी ‘उडी प्रीमियर लीग’ भरवली. तिला उदंड प्रतिसाद लाभला. ४८ संघ स्पर्धेत सहभागी झाले, हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी इतकंच सांगेन, की मनापासून तुम्हाला कोणतीही चांगली सकारात्मक गोष्ट करावीशी वाटत असेल, तर त्या स्वप्नांचा पाठलाग करा. या स्वप्नांना कष्टाच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे पंख लावा आणि भरारी घ्या. कधीकधी स्वप्नांचा पाठलाग करताना ‘दिल आणि दिमाग’ यांत भांडण होतं; पण मी सांगेन, की अशावेळी ‘दिमाग’पेक्षा ‘दिल’चं ऐका. एक महत्त्वाचा सल्ला म्हणजे योजना आखून मेहनत करताना आणि स्वप्नांचा पाठलाग करताना ‘शॉर्टकट’ मारू नका,’’...सचिन तेंडुलकर मनापासून बोलत होता आणि सभागृहातले सगळे कान देऊन ऐकत होते.
नंतर सचिननं उपस्थित लोकांना प्रश्‍न विचारण्याची मुभा दिली. त्या संधीचा फायदा घेऊन नुबिया नावाच्या नववीमध्ये शिकणाऱ्या मुलीनं महिला क्रिकेटबद्दल प्रश्‍न विचारला. ‘‘गेल्या काही वर्षांत महिला क्रिकेटच्या प्रांतात भारतीय संघानं जबरदस्त प्रगती केली आहे. भारतीय महिला संघानं विश्‍वकरंडकाच्या अंतिम फेरीत धडक धडक मारली, जे खूप अभिमानाचं होतं. नुबिया तुला क्रिकेट आवडत असेल, तर तू जरूर खेळ. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतलीस, तर तुला यश नक्कीच मिळेल,’’ असं उत्तर सचिननं दिलं.

हजर असलेल्या बऱ्याच लोकांना सचिनच्या तंदुरुस्तीचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. सचिननं त्यांना सगळं कळेल, अशा अगदी सरळ-साध्या शब्दांत सांगितलं ः ‘‘तंदुरुस्तीचं मुख्य कारण असते स्वयंशिस्त. व्यायाम जितका गरजेचा तितकाच आहार. असं बघा, की समजा तुमची गाडी चांगली आहे... गाडी मस्त चालावी, असं वाटत असलं, तर तिची देखभाल चांगली पाहिजे; तसंच त्याला शुद्ध इंधन घातलं पाहिजे. तुम्ही शुद्ध पेट्रोल गाडीत टाकलं, तर गाडी सुरळीत चालेल; पण पेट्रोलमध्ये भेसळ केलीत, तर गाडी झटके देईल. किंवा नको तिथं बंदही पडेल. शरीराचं तसंच आहे. तुम्ही व्यायाम काय करता याबरोबर काय खाता याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. अजून एक म्हणजे चांगली योग्य विश्रांती.’’

त्यानंतर एका उत्साही मुलानं मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना काय विचार केला पाहिजे, हा मोलाचा प्रश्‍न सचिनला विचारला. ‘‘धावसंख्या कितीही मोठी असो- तुम्ही शेवटच्या आकड्याचा विचार करत बसलात तर मनावरचं दडपण वाढेल. त्याकरता सोपी उपाययोजना अशी असते, की मोठ्या धावसंख्येचे छोटे भाग करायचे. त्या छोट्या ध्येयाचा पाठपुरावा कसा करता येईल, याकडं लक्ष केंद्रित करायचं. एकएक छोटं ध्येय बरोबर पादाक्रांत करत गेलात, की मोठं ध्येय नजरेत पडू लागतं. मोठी १५ मजली इमारत बांधताना चांगला पाया रचला जातो. मग एकएक मजला एकाग्रतेनं बांधला जातो...एकएक वीट बरोबर रचत गेल्यानंच मोठी इमारत उभी राहते हे लक्षात घ्या...क्रिकेटमध्ये समोरच्या संघाचं बलस्थान काय आहे, त्यांचे तगडे गोलंदाज कोण आहेत आणि कमकुवत गोलंदाज कोण आहेत याचा योग्य अंदाज घेऊन मग योजना आखून आक्रमण करायचं असतं,’’ कठीण समस्येचं उत्तर सचिननं सोपं करून दिलं.
विद्यार्थी आणि खेळाडूंच्या अजूनही काही प्रश्‍नांना सचिननं उत्तरं दिली. शेवटी उडी संघाच्या कर्णधारानं आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सचिनला उडीला भेट देण्याची प्रेमाची विनंती केली. 

खेळाच्या माध्यमातून लष्कर आणि काश्‍मिरी लोकांना एकत्र आणायच्या प्रयत्नानं पुढची पायरी गाठली असून, एक ते आठ ऑक्‍टोबरदरम्यान उडी प्रीमियर लीगमधल्या सर्वोत्तम १५ खेळाडूंचा संघ असीम फाउंडेशनच्या पुढाकारानं पुण्यात येत आहे. वॅरॉक वेंगसरकर अकादमी, पीवायसी क्‍लब, पूना क्‍लबनं पुढं सरसावत उडी क्रिकेट संघाला आपल्या मैदानावर सरावाकरता निमंत्रित केलं आहे. सरावादरम्यान स्थानिक निष्णात प्रशिक्षक काश्‍मिरी क्रिकेटपटूंना खेळाचं प्रशिक्षण देणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटना उडी संघातल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची सफर घडवणार आहे आणि डेक्कन जिमखाना क्‍लब आठ ऑक्‍टोबरला पुणे संघ आणि उडी संघादरम्यानच्या सामन्याचं यजमानपद भूषवणार आहे. 

जुन्या जमान्यातल्या एका महान क्रिकेट पत्रकारानं लिहून ठेवलं आहे ः ‘क्रिकेट हा नुसता खेळ नसून ती एक संस्कृती आहे.’ क्रिकेटच्या माध्यमातून काश्‍मिरी जनता आणि भारतीय लष्करातले दुवे मजबूत करायचा असीम फाउंडेशनचा प्रयत्न खरोखरच स्तुत्य म्हणावा लागेल.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com