नोंदतो मराठी, शोधतो मराठी (निरंजन आगाशे)

निरंजन आगाशे
निरंजन आगाशे

‘विकिपीडिया’ ही मुक्त ज्ञानाची चळवळ. आता तर 299 भाषांमध्ये चार कोटींहून अधिक लेख त्यावर आहेत. त्यावर आपापल्या भाषांचं दालन समृद्ध व्हावं, यासाठी तेलुगू, कन्नड, बंगाली, हिंदी या भाषक समाजांनी प्रयत्न सुरू केले. मराठीचं पाऊल इथंही पुढं पडलं पाहिजे, अशी तळमळ असलेल्या काही व्यक्तींनी नोंदी लिहायला सुरवात केली. आता या प्रयत्नांना अधिक संघटित, समावेशक रूप येण्यासंदर्भात एक कार्यशाळा नुकतीच पुण्यात आयोजित करण्यात आली होती. तिच्या निमित्तानं एकूणच नवीन माध्यमं आणि मराठी यांच्यासंबंधानं चर्चा.

‘‘मी  उद्‌घाटन करणार नाही,’’ असं डॉ. जयंत नारळीकर यांनी ‘आयुका’च्या सभागृहात जमलेल्या विज्ञानविषयक लेखकांच्या मेळाव्यापुढं सांगून टाकलं आणि सारे उपस्थित क्षणभर अवाक्‌ झाले. ‘‘विज्ञानाच्या उपासकानं आपलं काम करत राहावं, औपचारिकतांमध्ये अडकू नये,’’ हे आपलं म्हणणं त्यांनी कृतीतूनच दाखवून दिलं. बऱ्याचदा कृती ही शब्दांपेक्षा जास्त बोलते. ‘मराठी विकिपीडिया’चं दालन आपल्या सगळ्यांसाठी यापूर्वीच खुलं झालं आहे. आता वेळ आहे ती हे दालन विज्ञानविषयक माहिती-ज्ञानानं संपन्न करण्याची, हा संदेश उपस्थितांपर्यंत पोचला, तो या कृतीमुळंच. मुळात हा केवळ भाषण-श्रवण मेळा नव्हताच. खऱ्या अर्थाने एक ‘कार्य’शाळा होती. ‘विकिपीडिया’ या ज्ञानकोश चळवळीचं लोण मराठी भाषक समाजामध्ये पसरावं, या हेतूनं ती आयोजित करण्यात आली होती. तळमळीनं काम करणाऱ्या काही व्यक्ती, स्वयंसेवी संस्था आणि सरकार हे सगळे त्यासाठी एकत्र आले होते, हे विशेष.

‘मराठी विकिपीडिया’वर विविध विषयांच्या नोंदी कशा करायच्या, याचं संकलन-संपादन कशा रीतीनं केलं जातं, संदर्भ कसे द्यायचे, याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. तो या उपक्रमाचा एक उद्देश होताच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा उद्देश होता तो ‘जे आपणासी ठावे ते इतरांसी शिकवावे’ ही प्रेरणा रुजवण्याचा. जास्तीत जास्त ज्ञान मातृभाषेच्या अंगणात आणण्याचा ध्यास घेतलेल्या व्यक्तींनी एकोणीस-विसाव्या शतकात जागृतिपर्व घडवून आणलं. त्यांच्या हाताशी होतं मुद्रित माध्यम. आता सर्वदूर पोचू शकणारं ‘इंटरनेट’चं माध्यम आपल्याजवळ असताना गरज आहे, ती त्या बांधिलकीच्या भावनेला जागं करण्याची.

‘विकिपीडिया’ ही मुक्त ज्ञानाची चळवळ सुरू झाली, ती २००१ मध्ये. नव्या सहस्रकाच्या उषःकाली. उद्योजक जिमी वेल्स आणि विचारवंत लॉरेन्स सॅंगर हे तिचे प्रणेते. याचा आधीचा अवतार म्हणजे ‘न्यूपीडिया.’ तज्ज्ञ व्यक्तींनी केलेल्या संपादनानंतरच त्यावर मजकूर टाकला जाई; पण ही प्रक्रिया वेळखाऊ आहे, असं लक्षात आलं. पहिल्या सहा महिन्यांत दोनच लेख प्रकाशित झाले. मग तशा प्रकारची संपादकीय चाळणी लावण्याऐवजी हे खुलं व्यासपीठ बनवण्यात आलं आणि पहिल्या वर्षातच १८ भाषांतून २० हजार लेख ‘विकिपीडिया’वर आले. त्यानंतर विलक्षण वेगानं हा उपक्रम विस्तारत गेला. आता तर 299 भाषांमध्ये चार कोटींहून अधिक लेख त्यावर आहेत. त्यावर आपापल्या भाषांचं दालन समृद्ध व्हावं, यासाठी तेलगू, कन्नड, बंगाली, हिंदी या भाषक समाजांनी प्रयत्न सुरू केले. मराठीचं पाऊल इथंही पुढं पडलं पाहिजे, अशी तळमळ असलेल्या काही व्यक्तींनी नोंदी लिहायला सुरवात केली. आता या प्रयत्नांना अधिक संघटित, समावेशक रूप आल्याचा निर्वाळा या कार्यशाळेनं दिला. ‘‘महाराष्ट्रात हा नवा ‘रेनेसाँ’ घडतो आहे आणि त्याचे साक्षीदारच नव्हे, तर कर्ते होण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे,’’ हे ‘रावत नेचर अॅकॅडमी’चे संचालक प्रदीप रावत यांचे उद्‌गार या उपक्रमाची महत्ता नेमकेपणानं विशद करून गेले. ‘एकत्र येऊन संस्थात्मक कार्य करण्यापेक्षा भांडणातच मराठीजनांना धन्यता वाटते,’ या वाक्‍यातल्या समजुतीला छेद देणारं दृश्‍य या कार्यशाळेच्या निमित्तानं दिसलं. या कार्यशाळेसाठीच नव्हे तर ‘विकिपीडिया,’ ‘विकिस्रोत,’ ‘विक्‍शनरी’ या प्रकल्पांना पुढं नेण्याच्या दृष्टीनं किती जणांनी सहकार्याचे हात पुढे केले आहेत, हे पाहिल्यावर त्याची खात्रीच पटेल. ‘डॉ. जयंत नारळीकर, मंगला नारळीकर, माधव गाडगीळ, सुरेश नाईक आदी शास्त्रज्ञ, मराठी विश्‍वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर, डॉ. सदानंद मोरे, राज्य मराठी विकास संस्था, विज्ञानभारती, मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ, सेंटरफॉर इंटरनेट सोसायटी, रावत नेचर अॅकॅडमी आदी संस्थांचा या उपक्रमात सहभाग असणार आहे. 'मराठी विकीपीडिया समाजा'चे राहुल देशमुख व विजय सरदेशपांडे यांनी या प्रकल्पात सुरवातीपासून उत्कृष्ट काम केले. ते प्रचालक म्हणून काम करत आहेत.  ‘माणूस’ आणि ‘सृष्टिज्ञान’ या नियतकालिकांचे सर्व अंक ‘विकिस्रोत’साठी कॉपीराइटमुक्त करून देण्यात येणार आहेत. ‘विक्‍शनरी’च्या प्रकल्पामुळे मराठी शब्दसंग्रहात भर पडणार आहे.

वस्तुतः सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात मत-मतांचा गल्बला सुरू आहे. माहिती- ज्ञान- मनोरंजनाचा पूर आला आहे, असं म्हटलं तरी चालेल; पण त्यात विश्‍लेषण, संशोधन यांना वाव नसतो. त्यातील निके सत्त्व साठवून ठेवलं जात नाही. शिवाय मूलभूत ज्ञान ही समाजाची फार मोठी गरज आहे. वस्तुनिष्ठता, खुलेपणा, निःपक्ष दृष्टिकोन या सगळ्यांशी बांधिलकी मानणारं ‘विकिपीडिया’चं साधन त्या दृष्टीनं फार उपयुक्त आहे. ही गरज किती आहे, याची कल्पना माधव गाडगीळ आणि त्यांचे सहकारी सुबोध कुलकर्णी यांना आली ती महाराष्ट्र, गोवा, केरळ आदी राज्यांत पर्यावरण चळवळीच्या निमित्तानं हिंडताना. त्यांनी तिथल्या शाळांतल्या मुलांशीही संवाद साधला. ‘वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही माहिती कशी मिळवता,’ असं विचारलं असता, बहुतेक मुलांचं उत्तर होतं ः विकिपीडिया. त्यातल्या जवळजवळ सर्वांनाच मातृभाषेतून ज्ञान उपलब्ध झालं तर हवं आहे. तसं ते पुरेसं मिळत नसल्याची खंतही आहे. ‘‘या पिढीपर्यंत ज्ञान उपलब्ध करून देणं, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे,’’ असं गाडगीळ सर सांगतात. त्यातून शैक्षणिक उद्दिष्टं तर साध्य होतीलच; पण त्याहीपेक्षा सर्वसामान्यांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक करणं हेदेखील ज्ञानप्रसारातून साध्य होतं, याचा ते आवर्जून उल्लेख करतात. विकिपीडियावर विविध गावांची माहिती तपशीलवार उपलब्ध होत आहे आणि ती गोळा करण्यात स्थानिकांचा लक्षणीय सहभाग आहे. ‘युनिकोड’मधून हे लेखन सहजपणे करता यावं, या दृष्टीनं अभियंता प्रशांत पवार यांनी ‘सॉफ्टवेअर मॉडेल’ तयार केलं. एकूणच एका व्यापक परिवर्तनाची शुभचिन्हं यात स्पष्ट दिसताहेत. इतर विषयांवर उत्स्फूर्तपूर्ण नोंदी करणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे; पण विज्ञान क्षेत्रातला ज्ञानाचा एकूण आवाका आणि गरज लक्षात घेता, एकत्रितपणं, सातत्यानं आणि प्रेरणेनं काम होण्याची गरज आहे. विज्ञानविषयक लेखन करणाऱ्यांना एकत्र बोलावण्यामागं या प्रक्रियेला चालना देण्याचा प्रयत्न होता. या कार्यशाळेला उपस्थित राहिल्यानंतर उत्सुकता म्हणून विज्ञानाशी संबंधित काही विषयांवर ‘सर्च’ देऊन पाहिले. विज्ञान क्षेत्रच नव्हे, तर सारं सामाजिक चर्चाविश्‍व ढवळून टाकणाऱ्या ‘उत्क्रांती’च्या विषयावर दोनच वाक्‍यं आहेत. ‘विश्‍वनिर्मितीविषयक सिद्धान्त’ यावर नोंद लिहिली जाण्याची अद्याप प्रतीक्षा आहे. ‘गुरुत्वाकर्षण’ या विषयावरही जेमतेम चार-पाच ओळीच आहेत. ही उदाहरणं वानगीदाखल. हे चित्र बदलायचं तर या उपक्रमाला लोकचळवळीचं रूप द्यावं लागेल. तसं ते मिळण्याची आशा या कार्यशाळेनं उंचावली आहे. ज्यांनी उत्स्फूर्तपणे याआधीच काम सुरू केलं आहे, नियमावलीची चौकट तयार करून या प्रकल्पाचा पाया रचण्याचं काम केलं आहे, प्रचालक, संपादक आदी जबाबदाऱ्या जे सांभाळत आहेत, त्यांच्या कामाची कृतज्ञतापूर्वक नोंद घेतानाच आता या ‘जगन्नाथाच्या रथा’साठी अनेक हातांची- मेंदूंची गरज आहे.

भारतीय भाषांमधून इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या २०१६पर्यंत २३ कोटी ४० लाखांवर पोचली. हे प्रमाण आणखी वाढेल. अभ्यासकांच्या मते, देशातल्या इंटरनेटच्या एकूण वापरकर्त्यांपैकी ७५ टक्के व्यक्ती भारतीय भाषांमधूनच संवाद व्यवहार करतील. महाराष्ट्रातही साधारण असंच प्रमाण असेल. याचाच अर्थ २०२१पर्यंत पाच कोटी मराठी भाषक व्यक्ती इंटरनेटवरील मराठी सामग्रीचे ग्राहक- दर्शक- श्रोते- वाचक असतील. माध्यमाची ही ताकद आणि त्यासंबंधीचा जनमनांचा प्रवाह याचं महत्त्व बड्या व्यावसायिक कंपन्या, राजकारणी, हितसंबंधी, प्रचारगट हे सगळे ओळखतीलच; पण निखळ सार्वजनिक हित साधणाऱ्या ज्ञानव्यवहारासाठी ते ओळखणं आणि त्या दिशेनं प्रयत्न करणं, हे जास्त महत्त्वाचं. ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेखणी तयात चालवा,’ असं म्हणावंसं वाटतं ते त्यामुळंच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com