हिरवाईचं एक स्वप्न (पोपटराव पवार)

popatrao pawar
popatrao pawar

हिवरेबाजारमध्ये जलसंधारणाचे वेगवेगळे प्रयोग झाले, तसेच इतरही एक प्रयोग झाले. इथली मायंबा टेकडी हिरवीगार करण्याचं असंच एक स्वप्न तिथल्या ग्रामस्थांनी बघितलं. माथ्यावर खडक असल्यामुळं उपग्रहांद्वारे घेतलेल्या छायाचित्रांत टेकडीचा माथा उघडा दिसतो. ग्रामस्थांना संपूर्ण हिरवीगार टेकडी हवी होती. कृत्रिम स्फोटांद्वारे खडक फोडणं, खड्डे घेणं, श्रमदान, रस्ते तयार करणं अशा अनेक प्रयत्नांद्वारे या प्रयत्नाला हळूहळू यश येऊ लागलं आहे. या स्वप्नाची कहाणी...

हिवरेबाजार इथं वनक्षेत्र, ग्रामपंचायतीचं गायरान आणि खासगी मालकीच्या क्षेत्रावरच्या वृक्षारोपण यशस्वीपणे करण्यात आलं आणि तेही संपूर्ण वन विभाग आणि श्रमदानातूनच! मायंबा टेकडी (प्रशिक्षण केंद्राजवळ) हे ग्रामपंचायतीचं गायरान असून, त्यावर आदर्श गाव योजनेअंतर्गत 1995-96 मध्ये सलग समपातळी चराद्वारे (टाकळकर मॉडेल) रोजगार हमी योजनेअंतर्गत काम पूर्ण करण्यात आलं. कामाला सुरवात केली तेव्हा मजुरांना 8-10 रुपये रोज पडत होता. त्यामुळं हे काम बंद होते की काय असं वाटत होतं; मात्र गावानं एकी दाखवून संपूर्ण काम पूर्ण केलं आणि मिळालेली मजुरी गावात जमा करून पहिल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरवात केली. पुढं उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडं सुकू लागली, तर गावातल्या सर्व महिलांनी मुंबादेवीच्या मंदिरापासून टेकडीच्या जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर डोक्‍यावर हंड्यानं पाणी वाहून ही झाडं भर उन्हाळ्यात जागवली आणि पावसाळ्यात जून-जुलैमध्ये अर्धी टेकडी हिरवीगार झाली. कुकड्या डोंगर आणि खासगी मालकीचा पोखरण हे भागही हिरवेगार झाले; परंतु पंचायतीचं गायरान मात्र पायथ्याला हिरवं आणि माथ्याला उघडं आणि बोडखं राहिलं. निरीक्षण केलं असता पायथ्याला मुरूम माती, तर माथ्याला खडक होता. उपग्रहाच्या छायाचित्रामध्ये डोंगर चहूबाजूंनी हिरवा आणि माथ्यावर उघडा आणि बोडखा दिसत होता. अनेक वेळा बीजारोपण करून आणि आठवड्याला पाणी देऊनही गेल्या दहा वर्षांत एकही झाड आम्ही जगवू शकलो नाही.

मात्र, 2007 मध्ये कृत्रिम खडक दुभंजनाचा जो प्रयोग केला, त्याच अनुभवातून मायंबा टेकडीवर असा काही प्रयोग करता येईल का, असा विचार सुरू झाला आणि त्यासाठी नगरचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अजय कर्वे यांच्याशी चर्चा करून भूजलविकास यंत्रणेच्या माध्यमातून शिवकालीन योजनेअंतर्गत हिवरेबाजार- पिंपळगाव रस्त्यावर दहा फूट खोलीचे पाच बोअर घेण्यास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी मिळाली. प्रशिक्षण केंद्राच्या रस्त्यावर हा प्रयोग यशस्वी होऊन पाचही वडाची झाडं आज मोठी झाली; पण पाच खड्ड्यांचा प्रयोग चारशे खड्ड्यांपर्यंत आम्हाला घेऊन जायचा होता; पण त्यासाठी दोन-अडीच लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता, तरच मायंबाची टेकडी हिरवीगार होणार होती. पाच वर्षांच्या सततच्या प्रयोगानंतर 2016-17 या वर्षात लक्ष्मी मॅडम या नगरच्या उपवनसंरक्षकपदी हजर झाल्या आणि आमच्या प्रयत्नांना यश आलं. त्यांना या प्रयोगाचं महत्त्व पटलं.

प्रयत्नांची पराकाष्ठा
महाराष्ट्राच्या बहुसंख्य भागात डोंगर टेकड्यांची अशीच अवस्था आहे. 52 टक्के अवर्षणप्रवण भागात हे प्रमाण सर्वाधिक आहे; परंतु याला तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी कशी मिळणार हा विषय महत्त्वाचा होता. त्यासाठी आम्ही गेली 15 वर्षे गावात काम करणाऱ्या महावीर जांगीड या ब्लास्टिंगचं काम करणाऱ्या राजस्थानी माणसाची मदत घेऊन चारशे खड्डे घेऊन, त्यामध्ये पाच फूट खोली केली. तीन होल मारून जिलेटिनचा वापर करून त्यात ब्लास्ट करण्यात आले. असे पाच फूट खोलीचे चारशे खड्डे आम्ही तयार केले. नंतर दहा ट्रॅक्‍टर पोयटा आणि चार ट्रॅक्‍टर कंपोस्ट खत तीनशे फूट उंचीवर टेकडीवरच्या खड्‌यांमध्ये भरण्यासाठी वाहून न्यायचं होते. श्रमदानातून एक आठवड्यात एक ट्रॅक्‍टर पोयटाच आम्हाला वर नेता आला. मग आम्हाला जुन्नर इथले सहायक वनरक्षक कडू पाटील आणि रेंज फॉरेस्ट ऑफिसर शिंदे यांनी क्रेनची संकल्पना सांगितली. अकोले इथं गाढवांनी माती वाहून नेल्याचंही सांगण्यात आलं; पण या दोन्ही पर्यायांमध्ये दीड ते दोन लाख रुपयांच्या मजुरीची मागणी होत होती. मग आम्ही पंढरपूरवरून गाढवं विकत आणून काम पूर्ण झाल्यावर ती पुन्हा विकायची, अशी तयारी चालू केली. मग गाढवं हाकणाऱ्यांनी 25 हजार रुपये मंजुरी सांगितली. या सगळ्यात एक महिना निघून गेला- कारण गाढवांना वर चालण्यासाठी रस्ता हवा होता. मग तोही प्रयोग बारगळला. मग लक्ष्मी मॅडम यांनी वनक्षेत्रातलं काम असल्यानं रस्ता करू शकतो, असं सांगून सातशे मीटर लांबीच्या रस्त्याची मंजुरी दिली. त्यातून बारा ट्रॅक्‍टर वर गेले आणि चारशे खड्ड्यांमध्ये हिवरेबाजार ग्रामवन समितीनं पोयटा भरला आणि आता त्या टेकडीवर तेरा कोटी वृक्षवागवडीच्या कार्यक्रमार्तर्गत कामाचे नियोजन केले. मग प्रत्यक्ष झालेल्या खर्चाच्या अनुसार अंदाजपत्रक तयार केले. लक्ष्मी मॅडम यांनी ते नाशिक वनवृत्ताकडे मंजुरीसाठी पाठविले. परंतु, अशा प्रकारचे काम पहिल्यांदाच होत असल्याने त्याला निधीची मंजुरी मिळण्यास अडचण निर्माण झाली. यासाठी अप्पर प्रधान वनरक्षक, नागपूर- भगवान यांच्याकडं हा प्रस्ताव मंजुरीसाठी गेला. अतिशय सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी देऊन निधी दिला. यानंतर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व उपवनरक्षक आदर्श रेड्डी यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून वृक्षलागवडीच्या एका चांगल्या प्रयोगाचा प्रारंभ केला.

प्रामाणिक हेतूंमुळं कामाला गती
आता या टेकडीवर शंभर प्रकारच्या औषधी वनस्पती, फळं, विविध फुलं यांची लागवड करण्यात आली आहे. ठिबकच्या साह्यानं पुढील काळातही आम्ही झाडं जगवू आणि उपग्रहाद्वारे अखंड हिरव्यागार टेकडीचं छायाचित्र मिळवू, ही प्रामाणिक इच्छा आहे. आपला हेतू प्रामाणिक असेल, आणि निसर्गावर खरंच मनापासून प्रेम असेल, तर कितीही अडथळे आले, तरी एक अज्ञात शक्ती ते काम पूर्णत्वास नेते, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. याचा प्रत्यय हे काम करताना नक्कीच आला. निसर्गावर मनातून प्रयोग केल्यास असा नाविण्यपूर्ण उपक्रम उघड्या आणि बोडख्या डोंगर टेकड्यांसाठी भविष्यकाळात पथदर्शी ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com