हास्यरेषा फुलवणारा दिवस (प्रसाद इनामदार)

prasad inamdar write artilce in saptarang
prasad inamdar write artilce in saptarang

जगण्याच्या धावपळीत आपण हसणं विसरू लागलो आहोत. ओढलेल्या चेहऱ्यांवर हास्याची एखादी लकेर उमटणं गरजेचं बनलं आहे आणि त्यासाठी निमित्त म्हणजे आजचा दिवस. "एप्रिल फूल' बनवण्याचा दिवस. ही प्रथा नेमकी सुरू कशी झाली, तिचा अर्थ काय, इतर देशांत काय केलं जातं आदी गोष्टींबाबत रंजक माहिती...

फोन येतो आणि तो तातडीनं निघतो. जीवाची अगदी घालमेल. ठरलेल्या ठिकाणी पोचतो. त्याची बावरलेली नजर कोपरा अन्‌ कोपरा पिंजून काढते. विचारांचा धुमाकूळ सुरू. नेमके काय पाहायला लागणार या विचारांनी डोळ्यांच्या बाहुल्या ताणलेल्या. क्षणोक्षणी मनावर वाढतं ओझं. संयमचा बांध फुटण्याच्या वाटेवर...आणि अचानक ती समोर येते आणि खळाळून हसत त्याचा हात हातात घेते आणि म्हणते...""एप्रिल फूल...एप्रिल फूल!'' लपून बसलेल्या मित्रांचा एकच कल्ला आणि त्याचा चेहरा काहीसा रडवेला, काहीसा हसरा आणि बराचसा आपण "असे कसे गंडलो यार' म्हणून विचारात बुडालेला!

हे असं निर्व्याज मैत्रीत एकमेकांना खेचून फजिती करणारं खोडकर दृश्‍य. तुमच्याही लक्षात आलं असेलच मी कशाबद्दल बोलतोय ते. अहो, आज 1 एप्रिल! खोड्या काढण्यासाठीचा आणि आपल्या जवळच्या व्यक्तींची, मित्रमंडळींची थोडीशी गंमत करून आनंद लुटण्याचा हक्काचा दिवस. हा दिवसच जगभर एकमेकांना फसवून मजा घेण्याचा आणि फजिती झालेल्यांना चिडवण्यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात या खोड्या गांभीर्यानं घ्यायच्या नसतात, हे सूत्र पक्कं आहेच.

आपल्या रोजच्या आयुष्यात झगडणं जास्त आणि आनंदाचे क्षण अभावानं येत असतात. आपण या क्षणांची पुरचुंडी बांधत राहतो आणि वेळ मिळेल तेव्हा ती उघडून त्याचा आस्वाद घेत राहतो. जगण्याच्या धावपळीत आपण "जगणं' विसरू लागलोय. नात्यांमधला रुक्षपणा वाढताना दिसतोय. एकमेकांसोबत व्यक्त होतानाही हातचं राखलं जातं. खळाळून हसणंही दुर्मिळ होऊ लागलं असताना मित्रांसोबत गप्पांचा अड्डा जमवणं, माणसा-माणसांतला सहवास वाढवणं, ओढलेल्या चेहऱ्यांवर हास्याची एखादी लकेर उमटणं गरजेचं बनलंय आणि त्यासाठी निमित्त शोधण्याची वेळ आलेली आहे. एक एप्रिल हे त्यासाठी नामी असं निमित्त. या माध्यमातून आनंदाचं गाणं गुणगुणलं जातं आणि सैल होणाऱ्या नात्यांची वीणही काहीशी घट्ट होऊ पाहते. आपण मूर्ख बनलोय, फसवले गेलोय हे समजूनही ते हसण्यावारी नेलं जाते ते याच दिवशी. उलट आपल्याला दिवसभरात कोणीही "उल्लू' बनवलं नाही म्हणून हुरहुरण्याचाही हा दिवस. बच्चे कंपनी अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतून हा आनंद मनसोक्त लुटते. आई-बाबांना, ताई-दादाला फसवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडणारं हसू हा आनंदाचा अमूल्य ठेवाच. हे हसू फसल्याची भावना पार वाहून नेते. या फसण्यातली मौज आज अनुभवायलाच हवी. आजचा दिवस मस्त एंजॉय करा. नक्की कोणाची तरी खोडी काढा, कोणाला तरी "प्रॅन्क' करा, फजिती करा...फसवले गेलात, तर खिलाडू वृत्तीनं त्यातलीही गम्मत अनुभवा. काळजी फक्त एकच घ्या. ही चेष्टा, खोडी कोणाच्या जीवावर बेतणार नाही, कोणी मनापासून दुखावलं जाणार नाही आणि माणूसपणावरचा विश्‍वास उडवणारी ठरणार नाही याची आणि करा "एप्रिल फूल...'

इतिहासात डोकावताना
"एक एप्रिल'लाच फसवणं, खोडी काढणं कधी सुरू झालं, याच्या काही सुरस कथा आहेत. एका फ्रेंच कथेनुसार, पंधराव्या शतकात फ्रान्समध्ये ज्युलियन कॅलेंडर वापरात होतं. त्या कॅलेंडरनुसार, नववर्षांची सुरवात 25 मार्च ते 1 एप्रिल या आठवड्यात होत असे. या आठवड्यात वसंत ऋतूचं स्वागत आणि एक एप्रिलला नववर्ष साजरं केलं जाई. फ्रेंचांनी 1582 मध्ये जॉर्जियन कॅलेंडरचा स्वीकार केला. या नवीन कॅलेंडरनुसार, एक जानेवारीला नववर्ष प्रारंभ होत असे. हा बदल काहींना मान्य नव्हता. खेडेगावांतून हा बदल पोचलाच नाही. त्यामुळं ते पूर्वीप्रमाणंच एक एप्रिलला नववर्ष साजरे करत राहिले. ज्यांनी नवं कॅलेंडर स्वीकारलं होतं, अशा उच्चभ्रू फ्रेंचांनी आपल्याच देशबांधवांना "मूर्ख- फूल्स' ही उपाधी दिली. जे लोक जुन्या कॅलेंडरनुसार एक एप्रिलला नववर्ष साजरं करत राहिले, त्यांना "एप्रिल फूल' संबोधणं सुरू झालं. आजही फ्रेंच मुलं आपल्या मित्रांच्या नकळत त्यांच्या पाठीवर कागदाचा मासा करून चिकटवतात. जेव्हा त्या मुलाच्या लक्षात येतं, तेव्हा त्याला "एप्रिल फिश' म्हणूनही चिडवतात.
***
जोसेफ बास्कीन या इतिहासाच्या प्राध्यापकाच्या म्हणण्यानुसार, कॉंस्टंटाइन साम्राज्याच्या राजाच्या दरबारातल्या काही विदूषकांनी राज्यकारभारावरून राजाला डिवचलं. त्यामुळे राजा काहीसा चिडला; पण त्यावर त्यानं एक नामी युक्ती काढली. तुम्ही राज्यकारभारावर टीका करताय ना, मग एक दिवस तुम्हीच राज्यकारभार करून दाखवा. ठरल्याप्रमाणे एक दिवस कारभार विदूषकांच्या हातात देण्यात आला. मग काय विदूषकांनी दिवसभरात अनेक मूर्खपणाचे आदेश दिले. दिवस संपल्यानंतर झालेला गोंधळ राजानं निस्तरला; पण त्यामुळं दिवसभरात अनेक विचित्र गोष्टी घडल्या आणि राज्यातलं वातावरणही काहीसं सैलावलं. त्यामुळं राजानं दरवर्षी या दिवशी काहीतरी विचित्रपणा करावा, असा आदेशच काढला आणि "एप्रिल फूल' बनवण्याची प्रथा रुढ झाली, असंही सांगितलं जातं.
***
अनेक देशांत मार्च महिना आर्थिक घडामोडींचा अखेरचा महिना असतो. या महिन्यात अनेक कामं पूर्ण केली जातात. त्यासाठी कर्मचारी कामांत गुंतून पडतात. त्यामुळं ते थकतात. त्यांचा थकवा घालवण्यासाठी त्यांना काहीतरी विरंगुळा वाटावा म्हणून एकमेकांच्या खोड्या काढण्याची प्रथा रुढ झाली, असाही एक मतप्रवाह आहे. काहींच्या मते रोमन राजवटीत साजरा केल्या जाणारा "हिलेरिया फेस्टिवल' हा एप्रिल फूलचा जनक आहे. स्पॅनिश बोलणाऱ्या देशांमध्ये "फिस्ट ऑफ फूल' हा उत्सव एप्रिल फूलचा प्रथम अवतार मानला जातो.
***
देशोदेशीच्या पद्धती
- पोर्तुगालमध्ये एकमेकांच्या अंगावर पीठ फेकून खोड्या काढतात.
- स्वीडन आणि इतर स्कॅन्डिनेव्हियन देशांत इतर देशांप्रमाणं एक एप्रिल हाच "एप्रिल फूल' म्हणून साजरा करतात.
- स्कॉटलंडमध्ये दोन प्रकारे हा दिवस साजरा होतो. पहिल्या दिवशी "हंट द गॉक' म्हणून, तर दुसऱ्या दिवशी "टेली डे' म्हणून. "टेली डे'ला थट्टामस्करी, चेष्टा करतात. कधी शेपटी लावली जाते, तर कधी काही स्टिकरही चिकटवले जातात.
- ब्रिटनमध्ये या दिवशी ज्यांना मूर्ख बनवतात, त्यांना "गॉब्ज' किंवा "गॉबी' म्हणतात आणि ज्यांच्यावर विनोद करतात त्यांना "नूडल' म्हणतात.

असाही एक दिवस
एक एप्रिलसारखाच एक दिवस कोरियामध्येही साजरा केला जातो. बर्फवृष्टी ज्या दिवशी सुरू होते, त्या दिवशी राजघराण्यातले आणि दरबारातले लोक एकमेकांची चेष्टा-मस्करी करतात, काही तरी बहाणे करून ज्याला मूर्ख बनवायचं त्याच्याकडं बर्फानं भरलेला बाऊल पाठवण्याचा प्रयत्न होतो. जो तो बाऊल स्वीकारतो तो मूर्ख ठरतो.

भारतात आगमन
दीडशे वर्षं भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांनी भारताला ही "देणगी' दिली. ब्रिटनमधील परंपरा आपल्या कार्यकालात त्यांनी इथं साजऱ्या केल्या. त्या भारतात स्वीकारल्या गेल्या आणि या दिवसाचा आनंद भारतातही घेतला जाऊ लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com