माझं आभाळ तुला घे... (प्रवीण टोकेकर)

प्रवीण टोकेकर pravintokekar@gmail.com
रविवार, 27 ऑगस्ट 2017

‘द बॉय इन स्ट्राइप्ड्‌ पैजामा’ हा चित्रपट एक प्रायश्‍चित्त म्हणून तरी कुठल्याही सुजाण माणसानं आवर्जून बघायला हवा. खरंतर कादंबरी वाचणं अधिक चांगलं. दोन्ही केलं तर उत्तमच. त्यानंतर किमान ऊठ-सूट ‘आपल्या लोकांना खरंतर हिटलरसारखा हुकूमशहाच हवा,’ अशा मतांच्या फालतू पिचकाऱ्या मारणाऱ्यांच्या सणसणीत कानसुलात तरी मारावीशी वाटेल. गॅरेंटी!

‘द बॉय इन स्ट्राइप्ड्‌ पैजामा’ हा चित्रपट एक प्रायश्‍चित्त म्हणून तरी कुठल्याही सुजाण माणसानं आवर्जून बघायला हवा. खरंतर कादंबरी वाचणं अधिक चांगलं. दोन्ही केलं तर उत्तमच. त्यानंतर किमान ऊठ-सूट ‘आपल्या लोकांना खरंतर हिटलरसारखा हुकूमशहाच हवा,’ अशा मतांच्या फालतू पिचकाऱ्या मारणाऱ्यांच्या सणसणीत कानसुलात तरी मारावीशी वाटेल. गॅरेंटी!

का  ही काही पुस्तकं किंवा चित्रपट खोल जखम करून जातात. बराच काळ ती भळभळत राहते. कालांतरानं बरी होते; पण व्रण मात्र कायम राहतो. थंडी-वाऱ्याच्या दिवसांत ती उगीचच दुखते. आपलं अस्तित्व जाणवून देते. ‘मीसुद्धा तुझ्या भूतकाळाचा एक भाग आहे,’ याची आठवण करून देते. माणसाला वेदनेची स्मृती राहत नाही म्हणतात. ते एक वरदानच. मात्र, या असल्या जखमांच्या वेदना मात्र कशा काय कोण जाणे, कायम राहतात. ‘द बॉय इन स्ट्राइप्ड्‌ पैजामा’ हा असाच एक चित्रपट. दहाएक वर्षांपूर्वी येऊन गेला; पण तो मरेपर्यंत छळत राहणार.

दुसऱ्या महायुद्धातल्या हिटलरप्रणित यहुदी छळछावण्यांबद्दल आजवर लाखो पृष्ठं लिहिली गेली. शेकडो चित्रपटही निघाले. गाजलेदेखील. मानवी इतिहासातलं ते एक निव्वळ दु:स्वप्न मानणं, हा आपला कोडगेपणा आहे. इतक्‍या भयंकर अमानुषतेला फक्‍त दु:स्वप्न मानायचं? हिटलरच्या नाझी वरवंट्याखाली हजारो-लाखो यहुद्यांना किडा-मुंगीपेक्षाही वाईट हालहाल होऊन मरावं लागलं. तरणेताठे कसेबसे तगले. आजारी, वृद्ध आणि लहान लहान मुलं थेट गॅसचेम्बरमध्ये गेली. धूर होऊन वातावरणात मिसळली. माणूस म्हणवून घेण्याची शरम वाटावी, असा हा प्रकार.
पण कालौघात या जखमाही भरल्याच. ‘होलोकॉस्ट’ या विषयावर आता काही नको, असं वाटत असतानाच २००३ मध्ये एक जॉन बॉइन नावाचा एक आयरिश तरुण लेखक उठतो काय, अवघ्या अडीच दिवसांत एक चिमुकली कादंबरी लिहितो काय आणि अवघ्या रसिकांना पुन्हा मुळासकट हादरवतो काय...सगळंच अतर्क्‍य.
बॉइननं ही कादंबरी लिहिली, तेव्हा तो अवघ्या ३२ वर्षांचा होता. म्हणजे त्यानं महायुद्धातला ‘म’सुद्धा पाहिलेला नव्हता. शिवाय, कहर म्हणजे त्यानं ही कादंबरी लिहिली ती मुलांसाठी! होलोकॉस्ट हा विषय बालवाङ्‌मयात नेण्याचा त्याचा हा अट्टहास कुठल्या खात्यात टाकायचा? तुम्हीच ठरवा. पण बॉइनची कादंबरी कुमारवाङ्‌मय म्हणून गाजलीच; पण प्रौढांनाही तिनं अस्वस्थ केलं. या कादंबरीवर आधारित चित्रपट २००८ मध्ये आला. त्यानं सुज्ञांच्या घशात पुन्हा एकदा आवंढा आणला.
एक प्रायश्‍चित्त म्हणून तरी कुठल्याही सुजाण माणसानं हा चित्रपट आवर्जून बघायला हवा. खरंतर कादंबरी वाचणं अधिक चांगलं. दोन्ही केलं तर बेष्टच. त्यानंतर किमान ऊठ-सूट ‘आपल्या लोकांना खरंतर हिटलरसारखा हुकूमशहाच हवा,’ अशा मतांच्या फालतू पिचकाऱ्या मारणाऱ्यांच्या सणसणीत कानसुलात तरी मारावीशी वाटेल. गॅरेंटी.
* * *

महायुद्धाचे ढग आसमंतात कोंदत होते. जग घाबरंघुबरं झालं होतं; पण बर्लिनमध्ये राहणाऱ्या हिटलरच्या एसेस ऑफिसर राल्फच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. त्याची बायको एल्सा पार्टीत छान मिसळली आहे. नवऱ्याबद्दलचा अभिमान नक्‍को तितका ओसंडतोय. राल्फला नुकतंच प्रमोशन मिळालं आहे. राल्फ नाझी लष्करात चांगल्या हुद्द्यावर आहे आणि त्याच्या गर्विष्ठ चेहऱ्यावर त्याचं फौजीपण दिसतंच. तो आता कमांडंट झालाय. युद्धकैद्यांच्या एका तळाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर फ्यूररनं स्वत: दिली आहे...

...छोट्या ब्रुनोला काही कळेना. हे काय चाललंय? घरात केकचा वास दर्वळतोय. आजी-आजोबा येणारेत का? त्याची मोठी बहीण ग्रेटेलसुद्धा खुशीत आहे. प्रमोशन म्हणजे चांगली नोकरी का? ग्रेटेलताई म्हणाली की तसंच काहीसं. बाबा युनिफॉर्ममध्ये दिसतातच तगडे. ते सोल्जर आहेत ना! त्यांच्या कमरेला गन असते; पण ते तिला अजिबात हात लावू देत नाहीत. जेवणाच्या टेबलावर उगीचच विनोद केल्यासारखा करतात; पण जाम हसायला येत नाही. मम्माही त्यांना दबकूनच असते. मात्र, बाबांची नवी नोकरी म्हणजे इथून जावं लागणार? ग्रेटेलताई म्हणाली की हो. आणखी चांगल्या घरात जायला मिळणार. कुठं? दूर तिकडं. तिनं नावही सांगितलं.- आऊटविथ की कायसं. पण हॅ: तिकडं कोण जाईल? मग इथले मित्र? मार्टिन, इथेल, जोसेफ...छोटा ब्रुनो खट्टू झाला; पण काय करणार? आई-बाबांबरोबर त्याला आऊटविथला जावं लागलं.

...घर मोठ्ठंच्या मोठ्ठं होतं. त्यांच्या त्या ‘आऊटविथ’ कॅम्पला लागूनच होतं. घरात हे भलेमोठे जिने. क्‍येवढ्या खोल्या. अबब! बाहेर अंगण. अंगणात खूप झाडं. अंगणाच्या प्रवेशद्वाराशी मोठ्ठं गेट. त्या गेटपाशी एक सोल्जर २४ तास पहारा देतो. त्याच्या हातात भयंकर जर्मन शेफर्ड कुत्र्याची साखळी. क्‍येवढा कुत्रा...बाप रे! एक तो म्हातारा पावेल नावाचा माणूस मान खाली घालून आईला मदत करत असतो.

कुठून तरी मोटारी भर्रर्रकन येतात. सोल्जर्स उतरतात. जातात. बाबांना न चुकता सलाम करतात. कस्ले आहेत ना बाबा! सॉल्लिड. पण ॲड्‌जुटंट कोटलर ब्रुनोला अजिबात आवडत नाही. बाबांची सगळी घरगुती कामं तो करतो. दार उघडणं, आलेल्या पाहुण्यांची बसायची व्यवस्था करणं, गाडी पुसून-धुऊन लख्ख ठेवणं, बाबांचे बूटसुद्धा तोच पॉलिश करतो. कायम युनिफॉर्ममध्ये. जाम हॅंडसम आहे; पण तो असला की ग्रेटेलताई उगीचच नको तितकी खिदळते. काही कारण नसताना कोटलरच्या दंडाबिंडाला हात लावते. मोठ्ठी असली म्हणून काय झालं? मी आठ, ती फक्‍त बारा; पण कशी वागते? तिचं नाव एक दिवस मम्माला सांगणारेय. बाबांना सांगून कोटलरला काढूनच टाकलं पाहिजे. सारखी माझ्या डोक्‍यावर टप्पल मारतो.
ब्रुनो कंटाळला. एक दिवस त्यानं कोटलरला विचारलं ः ‘‘इथं एखादं जुनं टायर मिळेल का?’’
‘‘कशाला हवंय?’’
‘‘झोपाळा लावायचाय!’’
कोटलरनं घरच्या नोकराला-पावेल त्याचं नाव- परसदारात पिटाळलं. परसदारी जाण्याची ब्रुनोला मनाई होती; पण टायर शोधायला तो पावेलबरोबर गेला. परसदारी एक अडगळीची खोली होती. त्या खोलीला एक उंच झरोकाही होता. पलीकडं काय असेल? पावेलनं लावून दिलेल्या टायरच्या झोक्‍यावर ब्रुनोचे काही दिवस गेले. त्याच्या बाबांनी एक दिवस हेर लिस्ट्‌झ म्हणून मास्तर आणले. म्हणजे इथं शाळाही नाही. घरीच शिकायचं. श्‍शॅ!! लिस्ट्‌झमास्तरांनी पहिल्याच भेटीत विचारलं ः ‘‘ब्रुनो, तू मोठेपणी कोण होणार?’’
हे काय विचारणं झालं? अर्थात संशोधक. अनेक गोष्टींचे शोध लावायचेत मला. मग त्यांनी सांगितलं, नवा जर्मन देश घडवायचं काम सुरू आहे. तुझे बाबा त्यासाठीच काम करतायत. तुझाही उपयोग होईल; पण आधी ती ज्यू नावाची घाण घालवायला हवी. त्यांनी हा देश नासवला.
नासवला? हा कोण ज्यू नावाचा माणूस?
-मास्तर हसून म्हणाले ः ‘‘ज्यू हा एक नाही. अनेक असतात. शिवाय ती माणसं नव्हेत.’’
सगळे ज्यू घाण असतात? एकही चांगला नसतो? मास्तर म्हणाले ः ‘‘एक जरी चांगला ज्यू शोधून दाखवलास, तर जगातला सर्वात श्रेष्ठ संशोधक होशील तू.’’
* * *

एक दिवस मम्मा बाहेर गेली होती. ग्रेटेलताईसुद्धा कुठंतरी कडमडली होती. म्हातारा हरकाम्या पावेल बटाटे सोलत बसला होता. ब्रुनो झोपाळ्यावर बसून खेळत होता. खेळता खेळता दाणकन्‌ पडला. म्हाताऱ्या पावेलनं उचलून त्याला घरात नेलं. गुडघ्याला खरचटलं होतं. तिथं बॅंडेज बांधलं.
‘’फार काही लागलं नाही तुला. थोडं खरचटलंय. होईल बरं!’’ पावेल हळू आवाजात म्हणाला.
‘‘तुला काय म्हाईत? तू काय डॉक्‍टरेयस?’’ ब्रुनोनं रडत रडत विचारलं.
‘‘हो’’ तो म्हणाला.
‘‘छट्‌...तू बटाटे सोलतोस!’’ ब्रुनोचा विश्वास नव्हताच.
‘‘बटाटे सोलायच्या आधी मी...मी...डॉक्‍टरच होतो,’’ पावेल म्हणाला. तेवढ्यात मम्मा आली. तिनं बॅंडेज तपासलं. म्हणू की नको, या संभ्रमातच शेवटी ती पावेलला म्हणाली : ‘‘थॅंक यू.’’
* * *

घरात सगळा गोंधळ होता. जो तो आपला ह्यात. त्यात ब्रुनो उठला आणि डोळा चुकवून परसदारातल्या अडगळीच्या खोलीत गेला. झरोक्‍यातून उडी मारून थेट मागल्या भागात. शेवटी तो पिंडानं संशोधक होता ना...एक्‍स्प्लोरर लोकांना असं धाडस करावंच लागतं.
झाडंझुडं. झुडपं. मधून जाणारी पायवाट. मध्ये एक ओढा लागला. ओढ्यात पाणी नव्हतंच. ते ओलांडून तो थोडा पुढं आला, तर त्याला तारांचं काटेरी कुंपण दिसलं. कुंपणापलीकडं काही माणसं काम करत होती. हाच तो बाबांचा आऊटविथ कॅम्प असणार. मजाय!
सिमेंटच्या तुळयांच्या ढिगाऱ्याशी त्याला तो मुलगा दिसला. कुंपणापलीकडं. डोई पूर्ण तासलेला. चम्मनगोटा. चट्टेरीपट्टेरी कापडाचा मळका नाइट ड्रेस घातलेला. मान खाली घालून उन्हात नुसता बसला होता.
कुंपणाशी जाऊन ब्रुनो म्हणाला ः ‘‘हाय!’’
‘‘हाय’’ क्षीण आवाजात तो मुलगा म्हणाला. किंचित हसला. त्याचे दात किडलेले आहेत.
‘‘मी ब्रुनो. तुझं नाव?’’
‘‘श्‍मूएल’’
‘‘श्‍मूएल? हे काय नाव झालं? मी पहिल्यांदाच ऐकतोय!’’ ब्रुनोला हसायला आलं.
‘‘ब्रुनो हे नावही मी पहिल्यांदाच ऐकतोय!’’ श्‍मूएल म्हणाला.
‘‘मी तिथं राहतो, त्या घरात,’’ पाठीमागं झाडीकडं बोट दाखवत ब्रुनो म्हणाला ः ‘‘तू ये ना आमच्याकडं खेळायला!’’
‘‘मी तिथं नाय येऊ शकत ना...’’ श्‍मूएल म्हणाला. त्यानं दोघांच्या मधल्या कुंपणाकडं बोट दाखवलं ः ‘‘हे आहे ना मध्ये!’’
‘‘तू काय केलंस? म्हणून तुला इथं ठेवलंय?’’ ब्रुनोनं विचारलं.
‘‘मी ज्यू आहे ना...’’ श्‍मूएल म्हणाला.
* * *

ब्रुनोला नवा दोस्त मिळाला. श्‍मूएलशी त्याला धड शेकहॅंडसुद्धा करता येत नव्हता; पण कुंपणाच्या अल्याडपल्याड त्यांच्या गप्पा व्हायच्या. श्‍मूएल आणि ब्रुनो दोघंही आठ वर्षांचे; पण एकाचा बाप कमांडंट होता, दुसऱ्याचा ज्यू. ब्रुनो कपड्यातून पाव, केक असं लपवून कुंपणाशी नेऊ लागला. श्‍मूएल सदान्‌कदा भुकेला असे. तो बकाबका खायचा. भोंगा वाजला की घाबरून पळून जायचा. त्याचे आजोबा, वडील सगळेच कॅम्पात कुठं कुठं राहत होते. आजोबा तर सार्वजनिक न्हाणीघरात गेले, ते परत दिसलेच नाहीत. काय म्हाईत कुठं गेले?
घर छान होतं. नाही म्हटलं तरी ब्रुनोचे बाबा कॅम्पचे प्रमुख होते. तिथं मजुरीची कामं चालत. अधूनमधून भट्टीतून काळा धूर येई. पाठोपाठ खूप घाणेरडा वास. ब्रुनोच्या आईला तो फार असह्य होई. बाबांकडं तक्रार केली, तर त्यांनी बोलणंच टाळलं.
एकदा ब्रुनोची आई कोटलरशी बोलत होती. बोलता बोलता कोटलर तुच्छतेनं म्हणाला : ‘‘हे ज्यू घाणेरडे असतातच; पण जळल्यावर जास्तीच घाण वास मारतो!’’ ब्रुनोची आई चरकली. या कॅम्पमध्ये असलं काही चालतं? राल्फ कधी बोलला नाही. तिनं राल्फला जाब विचारला ः ‘‘नव्या डॉइशलॅंडच्या पुनर्निर्माणासाठी हे करणं आवश्‍यक आहे आणि माझ्या कामात दखल देणारी माणसं मला आवडत नाहीत.’’
‘‘तू हैवान आहेस!’’ तोंडावर हात दाबून ब्रुनोची आई ओरडली. राल्फ थंड नजरेनं बघत राहिला.
* * *

वाईन सांडण्याचं निमित्त झालं आणि कोटलरनं म्हाताऱ्या पावेलला इतकं मारलं, की पुन्हा कधी त्याचं हाडसुद्धा दिसलं नाही. ग्रेटेलसुद्धा कमी बोलू लागली. ब्रुनोच्या आईनं तर माहेरी जाण्याचं ठरवलं. या असल्या अमंगळ जागेत तिला राहायचं नव्हतं आणि मुलांना वाढवायचंही नव्हतं. शेवटी बाबासुद्धा कबूल झाले. ‘जा, बाई जा...पण मला या राष्ट्रकार्यातून अंग काढून घेता येणार नाही.’
अखेर ठरलं. एल्सा, ग्रेटेल आणि ब्रुनोनं आऊटविथमध्ये राहायचं नाही. दूर शहरात परत जायचं.
‘काय हे? आत्ता कुठं श्‍मूएलसारखा एक दोस्त भेटला आणि हे म्हणतात, दुसरीकडं जायचं? याला काय अर्थय?’ ब्रुनो वैतागला.
एक दिवस त्यानं श्‍मूएलसोबत कट रचला. तुला येता येत नाही ना? मग मीच येतो तिथं. तुझे गायब आजोबा आणि वडिलांना आपण शोधून काढू. मी मोठा संशोधक आहे हं. फटक्‍यात शोधू त्यांना; पण लौकर. कारण आता मी शहरात जाणार. पुन्हा येईनच असं नाही. तू फक्‍त माझ्यासाठी असा चट्टेरीपट्टेरी ड्रेस घेऊन ये. पुढचं सोड माझ्यावर. ओके?
* * *

ठरल्याप्रमाणे श्‍मूएल त्याच्यासाठी एक ड्रेस घेऊन आला. फावड्यानं तारेच्या कुंपणाखाली खड्डा खणून ब्रुनो आत सरकला. कॅम्पमध्ये दाखल झाला. तेवढ्यात काय झालं की जाम पाऊसच सुरू झाला. पळापळ झाली. भोंगा वाजला. दोन्ही पोरं जीव खाऊन झोपडीकडं पळाली. श्‍मूएलचे बाबा कुठं दिसले नाहीत. न्हाणीघराच्या इथं माणसं जमली होती. तिथं ती पोरं गेली. सगळ्या जत्थ्याला न्हाणीघरात पिटाळण्यात आलं. ‘‘कपडे काढा,’’ ध्वनिक्षेपकावरून घोषणा झाली. शॉवर घ्यायचाय नुसता, अशा चर्चा झाल्या. सगळ्यांनी कपडे काढले. चहूबाजूंनी उघडीधप्प मोठ्ठी माणसं. मधोमध ही दोन चिंगूमंगू पोरं. तेवढ्यात न्हाणीघराचं दार धाडकन्‌ बंद झालं. जाडजूड अडसर घातल्याचा आवाज आला. एकच आकांत उडाला. शॉवरमधून बरसणाऱ्या पाण्याबरोबर आणखी काही तरी विषारी उतरलं.
...न्हाणीघराची चिमणी अभद्र धूर ओकू लागली.
* * *

या चित्रपटात एकही बंदुकीची गोळी सुटत नाही. युद्धबिद्ध काहीही नाही. छळछावणीतली हृदयद्रावक दृश्‍यं नाहीत. एकही मृतदेह दिसत नाही की काही नाही; पण तरीही ‘द बॉय इन स्ट्राइप्ड्‌ पैजामा’ हा चित्रपट बघून झाल्यावर दोन दिवस जेवण जाणं कठीण होतं. दिग्दर्शक मार्क हेरमन यानं कादंबरीशी प्रामाणिक राहण्याचा खूपच प्रयत्न केला आहे. पटकथाही त्यानंच लिहिली. ब्रुनोचा रोल करणारा आसा बटरफिल्ड आणि श्‍मूएलची भूमिका करणारा जॅक स्कॅनलन ही मुलं आता विशीच्या उंबरठ्यावर आहेत. दोघंही संगीतक्षेत्रात धडपडताहेत; पण या चित्रपटाचा प्रभाव अजून फेकून देऊ शकलेले नाहीत. बघणाऱ्याचे हाल होतात, तिथं त्यांची काय अवस्था असणार?
अर्थात हॉलिवूडच्या रीतीभातींनुसार कादंबरी आणि चित्रपट दोहोंवरही टीकेची झोडदेखील उठली. अनेकांनी तर कादंबरीचं मूलभूत सूत्रच चुकल्याची टीका केली. कुठल्याही यातनातळावर आठ वर्षांची मुलं नव्हती. कारण, त्यांना तळावर नेण्याआधीच ठार मारलं गेलं होतं, असं होलोकॉस्टमधून वाचलेले काही लोक सांगतात. ब्रुनो ज्याचा उल्लेख संपूर्ण कादंबरीभर ‘आऊटविथ’ असा करतो, तो बहुधा आऊसविट्‌झ यातनातळ असावा; मात्र तिथं अशी काही घटना घडल्याचा पुरावा नाही; पण शेवटी ती कादंबरी आहे. लेखकाच्या प्रतिभेतून साकारलेली.

चित्रपटापेक्षा कादंबरी अधिक जास्त परिणामकारक वाटते. कारण, एकतर कादंबरी लहान मुलाच्या नजरेतूनच सांगितलेली आहे. त्यामुळं वर्णनं अंगावर येतात. मृत्यूच्या अगदी कडेकडेनं जाणारा हा निरागसतेचा प्रवाह अगदी हलवून सोडतो. अर्थात, चित्रपट चुकवणं हासुद्धा गुन्हाच ठरेल असा आहे. ब्रुनो आणि श्‍मूएल दोघं चिमुकले गोड मित्र. अमानुषतेचं काटेरी कुंपण त्यांना रोखू शकलं नाही. दोघांनी आपापलं आभाळ एकमेकांना देऊ केलं आणि खरंच देऊनही टाकलं. त्यांच्या निरागस जगात कोरडी आश्‍वासनं नसतातच. ती ‘मिरास’ आपल्यासारख्या अमानुषतेची कुंपणं घालत फिरणाऱ्या प्रौढ जगाची.