ज्युलिया रॉबर्टसच्या हातचे कांदेपोहे! (प्रवीण टोकेकर)

ज्युलिया रॉबर्टसच्या हातचे कांदेपोहे! (प्रवीण टोकेकर)

गंमत म्हणून चार घटका रमावं असा चित्रपट म्हणजे ः नॉटिंग हिल. सन १९९९ मध्ये आलेल्या या चित्रपटानं नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावरच्या जगात छान रंग भरले. यातल्या रोनन कीटिंगच्या गाण्याचे सूर कानात हळूच उतरले की मूड कसा प्रसन्न होतो. ‘वायटूके’ प्रॉब्लेमला तोंड कसं द्यायचं, अशी चर्चा गंभीर चेहऱ्यानं लोक करत होते, तेव्हा या चित्रपटानं पब्लिकला चांगलंच रिलॅक्‍स केलं.

इंग्लिश गाणी आवडणारा तरुण किंवा तरुणी भेटली की आधी हेवा वाटायचा. ‘या पोरांना बरे लक्षात राहतात ते शब्द’ असं वाटायचं. आपला तर मराठी पिंड भावगीतांच्या गावातून निखळायला तयार नाही आणि उरलेली ऐसपैस भूक हिंदी फिल्मी गाण्यांनी भागवलेली. हे अगदीच ‘हे’ वाटतं म्हणून मग
मेहदी हसन, जगजितसिंग वगैरे गझलिस्तानच्या बादशहांना अधूनमधून शरण जायचं. हिंदी-मराठी गाण्यांच्या महासागराचं तारू आपोआप लोटलं गेलं, तरी इंग्लिश संगीताचं ते दूरचं बेट दिसलंच नाही. मधलं सांस्कृतिक धुकं खूपच दाट होतं.
...सुदैवानं (किंवा खरं तर दुर्दैवानं) सुरांचा हा पश्‍चिमेकडचा दरवाजा आयुष्यात फार उशिरा उघडला. तिथून आलेल्या झुळकांनी डोक्‍यावर टप्पल मारून जणू विचारलं ः ‘‘लेका, इतकी वर्षं झोपला होतास काय? पण हरकत नाही. ऊठ आता...की ओढू पांघरुण?’’ पांघरुण फेकून उठून उतावळेपणानं खिडकीशी धावावं असं गाणं एकदा ऐकू आलं, त्यालाही आता वीसेक वर्षं होतील.
The smile on your face let’s me know that you need me
There’s a truth in your eyes saying you’ll never leave me
The touch of your hand says you’ll catch me if ever I fall
You say it best when you say nothing at all...


गायक होता कुणी रोनन कीटिंग नावाचा फिरंगी. हे भावभरं गाणं ऐकताना जाणवत होतं, भाषा इंग्लिश असली तरी भाव शुद्ध मराठीच तर आहेत! बरं, गाणं कुठल्या दणदणाटी अल्बममधलं नव्हतं. सिनेमातलंच होतं. तो सिनेमाही इंग्लिश असून आंतर्बाह्य हिंदी पठडीतला होता. साफसुथरी लव्हस्टोरी. त्यातल्या सिच्युएशन्स, पात्रयोजना वगैरे आपल्याला अगदीच परिचित. ज्याला अजिबात इंग्लिशचा गंध नाही, त्यानंही गंमत म्हणून चार घटका रमावं असा हा चित्रपट म्हणजे ः नॉटिंग हिल. सन १९९९ मध्ये आलेल्या या चित्रपटानं नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावरच्या जगात छान रंग भरले. ‘वायटूके’ प्रॉब्लेमला तोंड कसं द्यायचं, अशी चर्चा गंभीर चेहऱ्यानं लोक करत होते, तेव्हा या चित्रपटानं पब्लिकला चांगलंच रिलॅक्‍स केलं. त्यातलं रोनन कीटिंगचं गाणं आणि त्याचं भन्नाट कॉम्प्युटराइज्ड्‌ चित्रीकरण हे बघणं हा तर ग्रेट अनुभवच होता. असली ग्राफिकगंमत आजकाल जाहिरातींमध्येही सर्रास दिसते; पण १८ वर्षांपूर्वी ते किंचित नवलाईचंच होतं...तेवढ्यासाठीसुद्धा हा सिनेमा बघावा.
* * *
लंडनच्या पश्‍चिमेला आहे नॉटिंग हिल. एकेकाळी ते आळसटलेलं, टुमदार घरांचं, काटकोनातल्या सडकांचं सुरेख गाव होतं. आता तसं म्हणता येणार नाही. नॉटिंग हिलची सुंदर उन्हं लोकांना भुरळ घालायची. शांत लोकजीवन, बिनगर्दीची दुकानं, टुमदार घरं, हिरवाई, बागा वगैरे. लोकही सुसंस्कृत होते.

विल्यम ऊर्फ विल थॅकरचं तिथं पुस्तकांचं दुकान होतं ः द ट्रॅव्हल बुक कंपनी. प्रवासाची पुस्तकं, नकाशे, फोटोअल्बम आणि इतर प्रवासातल्याच दशम्या म्हणून काही बेस्टसेलर्स असा मालमसाला विकत त्याचं टुकुटुकु चाललं होतं. दिवसाकाठी दोन-चार गिऱ्हाइकं आली तरी बेहतर असा मामला. नुकताच घटस्फोट झालेला. सोबतीला त्याची बहीण हनी आणि जिवाला जीव देणारी चार-पाच दोस्तमंडळी सोडली तर विल थॅकर एकला जीव होता.
बहीण असावी तर अशी : थोडी येडपट, भोळसट, सदोदित नवनवी स्वप्नं बघणारी, चिडचीड करून शेवटी मोठ्या भावाचंच ऐकणारी.
दोस्त असावेत तर असे : आयुष्यात कश्‍शाकश्‍शाबद्दल गंभीर म्हणून नसणारे, सतत टिंगलटवाळी करणारे, निरुपद्रवी थापा मारणारे, अडचणीत आणणारे आणि सोडवणारेही.

स्पाइक हे मात्र स्वतंत्र प्रकर्ण होतं. याला मित्र म्हणावा तर जीवनात शत्रू असण्याची गरज नाही आणि शत्रू म्हणावा, तर जिवाला जीव देणारा त्याच्यासारखा दोस्त नाही. पु. ल. देशपांडे यांचा नाथा कामत, परोपकारी गंपू आणि ‘असा मी असामी’तला आप्पा भिंगार्डे (तुम्हाला सांगतो, एकदम कंडम माणूस!) आणि सुप्रसिद्ध सोन्या बागलाणकर यांच्या मिश्रणात थोडा आणखी आत्रंगपणा मिसळला की एखादा स्पाइक होतो. उंच. किडकिडीत. माणसानं आंघोळ करणं हा कायद्यानं गुन्हा करायला हवा, अशा मताचा. गालावर दाढीचे अस्ताव्यस्त खुंट.
स्पाइक कलावंत मनाचा कलंदर होता. म्हणजे दुसऱ्या शब्दांत काहीही न करणारा बेक्‍कार!
‘‘स्पाइक, * * *, लेका माझे कपडे का घातलेस?’’
‘‘मित्रवर्य, त्याला काही गुंतागुंतीची कारणं आहेत. एक नाही, अनेक आहेत. एक तर माझ्या कपड्यांना अखेर पाणी लागलं बरं!’’ इति स्पाइक.
‘‘ कधी धुतोस?’’
‘‘ शिवाय हे कपडे घातल्यानंतर मला खूप मोकळं, स्वतंत्र वाटतं आहे. यात मी चांगला अभिव्यक्‍त होतो, असं नाही का तुला वाटत?’’
...हे संवाद विल थॅकरच्या मठीत वारंवार घडत.
दिवस असे कंटाळवाणे चालले होते.
...एक दिवस विल दुकानात कंटाळून बसलेला असताना विख्यात सुपरस्टार ॲना स्कॉट तिथं दार ढकलून प्रवेश करती झाली. उपचाराचं हसून रांगेतली पुस्तकं बघायला लागली. माय गॉड, सुपरस्टार ॲना स्कॉट? हॉलिवूड सेन्सेशन थेट आपल्या दुकानात? जगातली सगळ्यात सुंदर स्त्री नॉटिंग हिलसारख्या गावंढ्यात?...हे सगळं स्वप्न तर नव्हे? ज्याला रोज स्पाइकचं तोंड बघावं लागतं, त्याला एकदम ॲना स्कॉट सदेह दिसावी हा नियतीचा कुठला खेळ आहे?
विलनं बराच घोळ घालत तिचं स्वागत केलं. जुजबी संभाषण केलं. मधाळ हसून ॲना दुकानातून निघाली, पाठोपाठ ऑरेंज ज्यूसचा कॅन घेऊन विलसुद्धा दुकानाबाहेर पडला. दोघांची जवळपास पुन्हा धडक झाली. ऑरेंज ज्यूस तिच्या महागड्या ड्रेसवर सांडला. विल ओशाळला. तीसुद्धा ‘काही हरकत नाही’ असं कसनुसं म्हणाली. पोरी-बाळींच्या कपड्यांवर डाग पाडणं ही महाभयंकर चूक असते.
‘‘ओह, आय ॲम सो सॉरी...माझं इथं जवळपासच घर आहे. तुम्हाला धुऊन देऊ का तो डाग?’’ काय बोलावं हेच विलला कळेना. आश्‍चर्य म्हणजे ॲना स्कॉट त्याला तयार झाली. चक्‍क त्याच्या घरात आली. डाग धुतला. कपडे बदलून परत जाताना तिनं त्याच्या गालाचं एक चिमुकलं चुंबनही घेतलं. हे म्हणजे भिकाऱ्याला बंपर लॉटरी लागण्यापैकीच. परमेश्वरही कधी कधी किती चेष्टा करतो गरिबाची!
‘‘मनुष्यमात्रा, किती मी महामूर्ख? ॲना स्कॉटनामे कन्यकेचा तुला निरोप द्यायचा राहून गेला. आपण त्यांसी फोन करावा. कसे?’’ स्पाइकनं एकदा उडत उडत निरोप दिला. तो अर्थातच बऱ्याच दिवसांनी दिलेला होता. खरोख्खर हा स्पाइक सणसणीत लाथ घालून घराबाहेर काढण्याच्या लायकीचा मनुष्य आहे. आपण याला का सहन करतो? एक काम धड नीट करत नाही. घरात राहण्यासाठी कबूल केलेली दमडीसुद्धा देत नाही. तरीही...
ॲना स्कॉट उतरली होती, त्या रिट्‌झ हॉटेलमध्ये ठरल्याप्रमाणे विल घाईघाईनं गेला. तिथून खरा सुरू झाला हा सिलसिला.
* * *

रिट्‌झ हॉटेलच्या त्या भव्य स्युइटमध्ये जाऊन ॲना स्कॉटला भेटणं तितकं सोपं नव्हतं. तिचा पीआर स्टाफ, सिक्‍युरिटी, हॉटेलवाल्यांची प्रायव्हसी पॉलिसी...सत्राशेसाठ भानगडी होत्या. ‘ ‘हॉर्स अँड हाउंड’ मासिकाकडून मुलाखतीसाठी आलोय,’ असं सांगून विल घुसला. छान गप्पा झाल्या.
‘‘आज संध्याकाळी काय करणार?’’ चाचरतच विलनं विचारलं.
‘‘बरीच कामं आहेत...का?’’ ॲनाच्या भिवया उंचावल्या.
‘‘काही नाही सहजच...’’ तो म्हणाला.
‘‘ एवढं विशेष काही नाही...मी रद्द करू शकते!’’
‘‘नकोच...बाहेर जेवायला जाऊ या म्हणून विचारणार होतो; पण आत्ता आठवलं! माझ्या बहिणीच्या वाढदिवसाची पार्टी आहे एका मित्राकडं! तिकडं जायचंय...!’’ विल गडबडला.
‘‘ मग मी येते की. तुझी मैत्रीण म्हणून मी येते...मला आवडेल!’’ ॲना मनापासून म्हणाली.
‘हॉर्स अँड हाउंड’चा तथाकथित रिपोर्टर विल थॅकर तिथल्या तिथं खलास झाला. हे म्हणजे अतीच झालं.
* * *

- मॅक्‍स हा जगातला सगळ्यात वाईट कूक आहे आणि त्याची बायको बेला अवघडलेली आहे; पण पार्टी त्यांच्या घरीच आहे. तिथं इतर दोस्तमंडळी येणार. आपल्यासोबत ॲना स्कॉट आहे म्हटल्यावर राडाच होईल. विल धडधडत्या हृदयानं घरात शिरला. त्याला वाटलं होतं, ते सगळं घडलं.
- मॅक्‍सनं चिकन जाळून ठेवलं. बेलाचा जबडा पडला, तो शेवटपर्यंत वर आलाच नाही. त्याच्या बहिणीला, हनीला समोर ॲना स्कॉट बघून हार्ट ॲटॅक यायचा बाकी राहिला. २४ तास शेअर मार्केटची भाषा करत कोट्यधीश झाल्याच्या समजात पर्मनंट बुडालेला बर्नी हा ॲना स्कॉटच्या मानधनाचा आकडा ऐकून बर्फासारखा गार पडला. त्याची टकळी बंद झाली. अनेक दिवसांनी आंघोळ करून पार्टीला आलेल्या स्पाइकच्या तोंडाला कुलूप लागलं, तेही बरंच झालं.  
...पण ॲना स्कॉटनं सगळ्यांना झटक्‍यात इतकं आपलंसं केलं की त्या क्षणापासून ती त्या दोस्तांच्या टोळक्‍याची मेम्बरच होऊन गेली.
* * *

एका रेस्तरांमध्ये दोघं जेवत असताना पलीकडच्या टेबलावरचं एक टोळकं ॲना स्कॉट गावात आल्याचीच चर्चा करताना ऐकू आलं. ‘या सगळ्या नट्या ***च असतात. कसली ती ॲना स्कॉट घेऊन बसलात राव?’ छापाच्या अचकट-विचकट कॉमेंट्‌स ऐकून विलचं टाळकंच सटकलं. ‘तुम्ही असं बोलू शकत नाही’ असं तो जाऊन बडबडला; पण त्या टोळक्‍यानं त्याला हाड हाडच केलं.
‘‘सॉरी गाइज्‌...तुमचं चालू दे. जेवताना गप्पा मारल्या की बरं जातं पोटात! मी मनावर नाही घेत असल्या गोष्टी. कारण, मला खात्री आहे की तुम्ही जे जे बोललात ते ते खरोखर करण्याइतका दम तुमच्यात नाही. बाय!’’ ॲनानं त्यांना वाजवलंच. अर्थात इथं तिचा टोमणा बराच सभ्य पद्धतीनं दिला आहे, प्रत्यक्षात तिनं त्यांना घामच फोडला.
‘‘माझ्या खोलीत येतोस? चल’’ असं म्हणून ती विलला घेऊन हॉटेलच्या रूमवर आली, तर तिथं तिचा अमेरिकी बॉयफ्रेंड (अर्थात सुप्रसिद्ध नट) येऊन थडकलेला. विलला सर्व्हिस बॉय समजून त्यानं उष्ट्या बश्‍या आणि पेले उचलायला लावले. सगळंच मुसळ केरात गेलं. विल कमालीचा दुखावला. हे प्रकरण जमण्यासारखं नाही, हे त्याच्या लक्षात आलं होतं.
‘‘मित्रा, उगीच जीव जाळू नकोस. पोरगी आयुष्यात आली की पहिल्यांदा आपली विहित दैहिक कर्तव्यं पार पाडावीत, तद्‌नंतर किमान असं दु:ख तरी वाट्याला येत नाही..तसं काही तू केलंस का?’’ स्पाइकनं त्याला सल्ला देऊ केला. जनावर आहे लेकाचा.
* * *

बऱ्याच दिवसांनी ॲना अचानक त्याच्या घरीच आली. कुठला तरी जुना विवस्त्र फोटो छापून आल्यानं प्रेसवाले तिच्यामागं हात धुऊन लागले होते. त्यांचा ससेमिरा चुकवत ती विलकडं आली होती. या वेळी मात्र दोघांनीही वेळेचा सदुपयोग केला. मध्यंतरात तिचा  बॉयफ्रेंड गेलेलाच होता. ब्रेकप. ॲनाला ते हवंच होतं.
‘‘मी आणखी थोडा वेळ इथं थांबू?’’ तिनं विचारलं.
‘‘आयुष्यभर थांब की!’’ तो म्हणाला.
घराच्या पोटमाळ्यावर एक छोटी खोली होती. तिथं तिची सोय विलनं केली. तो स्वत: सोफ्यावर आडवा झाला. रात्री दबक्‍या पावलानं घरात आलेल्या स्पाइकनं तिला पाहिलं आणि तो खुळावला. ‘ॲना स्कॉट आमच्याकडं राहायला आली आहे,’ हे त्यानं फार कुणाला नाही; पण किमान १५-२० लोकांना अभिमानानं सांगितलं! सकाळी विलनं तोकड्या चड्डीतच पुढलं दार उघडलं तर समोर २००-३०० प्रेसवाले!! पाठोपाठ त्याहूनही भयंकर अवस्थेतल्या स्पाइकनं प्रेसवाल्यांना दर्शन दिलं. तयार होऊन घाईघाईनं निघालेल्या ॲनानंही जाण्यासाठी दार उघडलं. ती हबकूनच गेली!
‘फालतू प्रसिद्धीसाठी माझा बळी दिलास’, असा आरोप करून ती रडतच घराबाहेर पडली. स्पाइकच्या निरागस मूर्खपणापायी बिचारा विल थॅकर बाराच्या भावात गेला.
* * *

किती सुंदर दिवस होते ॲनाबरोबरचे...सगळं संपलं. पोटमाळ्यावरच्या छोट्याशा पलंगावर रंगलेल्या गप्पा. गच्चीवर तिचे डायलॉग्ज्‌ पाठ करून घेणं, ते चोरीछुपे भेटणं, मित्रांना उल्लू बनवत तिच्याबरोबर वेळ घालवणं...
इथंच कुठंतरी सेटल व्हावं. चारचौघांसारखं शांत आयुष्य काढावं, असं ॲनाचं स्वप्न होतं. नॉटिंग हिलच्या बागेतला कोपऱ्यातला बाक हे त्यांचं हक्‍काचं ठिकाण होतं. तिथं ते स्वप्नं बघत बसत.
‘‘तू इथं पुस्तक वाचत बसायचं. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली मी पोटुशी...आपली पोरं आसपास खेळतायत...मस्त ना?’’ ॲना एकदा म्हणाली होती. हॉलिवूडच्या राणीलाही चारचौघांसारख्याच भावना असतात तर...विल थॅकर कोण कुठला एक साधासा पुस्तकविक्रेता. जगाला अप्राप्य वाटणारी लावण्यवती त्याच्या बाहुपाशात आपण होऊन चालत यावी? कोणती पुण्ये अशी येती फळाला?
विलनं ॲनाला विसरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्याच्या मित्रांनीही त्याला दुसरीकडं गुंतवण्याचा आटापिटा केला; पण ॲना खरंच एकमेव होती. सगळं वैभव, कीर्ती पायाशी लोळण घेत असूनही ती या फाटक्‍या माणसाच्या प्रेमात पडली; पण आपलं तरी कुठं चुकलं?
अचानक एक दिवस पुन्हा ॲना स्कॉट त्याच्या दुकानात येऊन उभी राहिली. झालं गेलं विसरून पुन्हा नातं फुलवायची तिची इच्छा होती. तो नको म्हणाला.
‘‘ तू बिव्हर्ली हिल्सची. मी नॉटिंग हिलचा. कुठवर जमणार हे? दरवेळी मला अशाच जखमांना तोंड द्यावं लागेल. तसं दुखरं आयुष्य ओढत जगण्यात काय हशील आहे? आपल्या वाटाच वेगळ्या आहेत, ॲना. मी एक फार फार साधा माणूस आहे. जस्ट अ कॉमन बॉय!’’ तो म्हणाला.
‘‘बिव्हर्ली हिल्स विसर...मीही एक साधी मुलगी आहे आणि एका साध्या मुलाला एक साधासा प्रश्न विचारतेय की ‘माझा होशील का?’ ’’ भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली; पण या वेळी तो बधला नाही. ती निघून गेली...
पुढं काय झालं?
तीच खरी पडद्यावरची बॉलिवुडी गंमत आहे. ती शब्दात सांगणं म्हणजे ‘माझा होशील का?’ हे आशा भोसले यांचं अजरामर गीत पोस्टकार्डावरच्या मजकुरासारखं रटफ करत वाचून दाखवण्यापैकी आहे. काही काही गाणी चालीतच ऐकायची असतात.
* * *

ज्युलिया रॉबर्टस आणि ह्यू ग्रॅंट या जोडगोळीनं ‘नॉटिंग हिल’ची खुमारी बेहद्द वाढवली आहे. दोघंही इतके फिट्‌ट आहेत की मनातून हटता हटत नाहीत. हीच ज्युलिया रॉबर्टस ‘प्रेटी वूमन’ मध्ये रोडसाईड मवाली पोरगी होती. ती इथं आता ग्रेसफुल हॉलिवूड स्टार म्हणून येते. ह्यू ग्रॅंटचा तर चेहराच रोमिओटाइप आहे. यातलं स्पाइक हे कॅरेक्‍टर जबरदस्त इंटरेस्टिंग आहे. कमालीचा तापदायक आणि तितकाच लोभस. ऱ्हिस आयफन्स या वेल्श रॉक कलावंतानं ही भूमिका केली आणि ती त्याची आयुष्यभरासाठी ओळख बनली. धमाल माणूस आहे.
‘फोर वेडिंग्ज्‌ अँड अ फ्युनरल’चा दिग्दर्शक रॉजर मिशेल ह्याचीच ही हलकीफुलकी पेशकश. अर्थात तो चित्रपटही साधारणत: याच जातकुळीतला आहे हे खरं; पण रिचर्ड कुर्टिसनं ‘नॉटिंग हिल’ची पटकथा त्याच्याकडे सोपवली, तेव्हा तो आनंदानं वेडाच झाला. पुढल्या १५ मिनिटांत त्याची स्टारकास्टही ठरली.
‘‘स्टारकास्ट १५ मिनिटांत ठरली, हे तितकंसं खरं नाही. माझ्या बेकारीच्या काळात ‘नॉटिंग हिल’ माझ्या मनात तयार होत होता. रात्र रात्र जागा राहून मी ही गोष्ट उघड्या डोळ्यांनी आढ्यावर ‘पाहत’ असे. तेव्हाही मला ज्युलिया रॉबर्टस आणि ह्यू ग्रॅंट हेच दिसायचे...’ असं नंतर रॉजर मिशेलनं सांगितलं होतं. एखादा चित्रपट कुंडलीत बरे ग्रह घेऊनच जन्माला येतो. या चित्रपटाला विघ्नं अशी काही आलीच नाहीत. ज्युलिया रॉबर्टसलाही कथानक बेहद्द आवडलं. वास्तविक नव्वदीच्या दशकात ती हॉलिवूडची खरोखरची राणी होती, तरीही तिनं सलग ६१ दिवसांच्या तारखा शूटिंगसाठी दिल्या.

आयरिश गायक रोनन कीटिंगचं गाणं हा या चित्रपटाचा हायलाइट ठरला. रस्त्यातून एकटाच पायपीट करणारा विल थॅकर चालतोय...आणि त्याच्या पावलागणिक भवतालाचे ऋतुरंग बदलताना पाहून हरखून जायला होतं. रोनन कीटिंग हा विख्यात आयरिश गायक-संगीतकार ‘नॉटिंग हिल’मधल्या गाण्यानं जगभर गाजला. त्या गाण्याची चाल, सोप्पे शब्द, संगीतयोजना आणि चित्रीकरण सगळंच इतकं काही जमून आलंय की बस!  
खूप वर्षांनी एक फ्रेश विनोदी प्रेमकहाणी बघायला मिळाल्याचं समाधान रसिकांना मिळालं, समीक्षकांनीही चित्रपटाला एकमुखानं गौरवलं. १९९९ चा बख्खळ गल्ला गोळा करणारा हा चित्रपट होता. ‘नॉटिंग हिल’चं विल थॅकरच्या घराचं निळं दार तर इतकं फेमस झालं की नंतर तिथं टूरिस्ट येऊन आपापले जोडीनं फोटो काढून घ्यायला लागले. शेवटी त्या घराच्या मालकानं दारच बदलून टाकलं. अर्थात निळ्या दाराचा लिलाव झाला आणि इंग्लंड-अमेरिकेत काही काळ दर्शनी दार निळं करण्याची फॅशन आली.

तिथल्या बागेतला तो विल आणि ॲनाचा स्वप्नांचा बाक...तो लिलावात एका ऑस्ट्रेलियन धनाढ्यानं भरपूर पैसे देऊन विकत घेतला आणि मायदेशातल्या एका बागेत नेऊन ठेवला. याच बाकावर ॲना आणि विल यांनी संसाराची सुखस्वप्नं रंगवली होती.

...रोनन कीटिंगचे सूर कानात हळूच उतरले की मूड कसा प्रसन्न होतो. काहीतरी जादू होते. पोपडे निघालेल्या आपल्या दोन खणी घराचं दारही निळं निळं होऊन जातं. खोलीतला पाय लचकलेला जुना सोफाही तो बागेतला बाक वाटू लागतो.
घरात सैपाकघराशी ओठंगून साक्षात ज्युलिया रॉबर्टस पोह्यांना फोडणी देतेय, असं वाटू लागतं. ज्युलिया रॉबर्टसच्या हातचे कांदेपोहे!...बस, हीच आहे ‘नॉटिंग हिल’ची खमंग जादू.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com