नात्यास नाव अपुल्या... (प्रवीण टोकेकर)

नात्यास नाव अपुल्या... (प्रवीण टोकेकर)

‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’ हा चित्रपट बघून झाल्यावर, राणी व्हिक्‍टोरिया आणि अब्दुल यांचं नेमकं नातं कसं होतं, हा सवालच फिजूल वाटायला लागतो. वयाच्या, शरीराच्या, मनाच्या सगळ्या मर्यादा तोडून असं अलवार नातं फुलणं हाच एक चमत्कार वाटायला लागतो. असल्या नात्यांना नाव देऊ नये. कारण असल्याच नात्यांच्या पुढं चांदण्या होतात म्हणे. सगळ्याच चांदण्यांना नावं कशी देणार?

नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही,
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही...

..कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळींची आठवण व्हावी, अशी ही एका राणीची गोष्ट आहे. निम्म्याहून अधिक जगावर तिचं साम्राज्य होतं. सरदार-दरकदार इतके कर्तबगार, की पृथ्वीतलावर तिच्या अश्‍वमेधाचा घोडा कुठल्याही दिशेला अनिर्बंध दौडला तरी त्याचा लगाम धरण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती.
सुखाची रेलचेल होती. मऊमऊ बिछान्यातून कुकुल्या बाळासारखं उठवायला प्रेमळ दाया होत्या. दैनंदिन कर्म करण्यासाठीही निष्ठावंत दासदासी होते. घास भरवायलाही उशापायथ्याशी माणसं होती. ठिकठिकाणी प्रचंड महाल आणि हवेल्या होत्या. दागदागिन्यांना ददात नव्हती. खजिना अक्षय्य होता. भरलं घर होतं. सात-आठ राजपुत्र होते. चाळीस-बेचाळीस नातवंडं महालाच्या पुष्करणीत हुंदडत होती. ऐश्‍वर्याच्या बिलोरी काचमहालात तिचं भर्जरी आयुष्य व्यतीत होत होतं. सम्राज्ञीच्या पदावर येऊनही तिला पन्नास वर्ष होऊन गेली होती.
इतकं सारं असूनही राणी बिचारी दु:खी होती...खरं तर एकटी होती.

...आणि आयुष्याच्या उतारावर तिला एक तरुण भेटला. झोंकदार फेटेवाला. उंचपुरा. नजरेत तल्लख. बुद्धीमध्ये चमक. त्या तरुणानं तिच्या मनात घर केलं. अगदी या उमरीत हृदयाची तार छेडली. अर्थात त्याच्याशी जडलेलं नातं हे असलंतसलं नव्हतं. त्याला घायाळ, मूर्ख प्रेमाचा रंग नव्हता. उलट त्या नात्यावर एक राजस वर्ख होता. तो तरुण राणीचा मित्र होता, सखा आणि सुहृद होता...खरं तर बराचसा मुलगाच होता. पोटी न जन्मलेला. वाईट भाग एवढाच, की तो एक तुलनेनं अडाणी, असंस्कृत, काळा, मुस्लिम होता.

‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटाची कहाणी असं काही अनामिक नातं दाखवून जाते, मन थोडं थबकतं. आपल्याच मनाच्या सत्राशेसाठ उंबऱ्यांना अडखळतं. प्रेम शारीर असावंच का, त्याला वयाची बंधनं असावीतच का, असल्या प्रश्‍नांना हा चित्रपट भंपक ठरवतो.
...याच वर्षी हा सुंदर चित्रपट येऊन गेला. सध्या ‘लव्ह जिहाद’ नावाचा प्रकार आपल्याकडं नको तितका चर्चेत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तर ‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’ आवर्जून बघावाच.
* * *
इसवीसन १८८७. ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य मावळायला तयार नव्हता. राज्ञी विक्‍तुरियाची मुद्रा जगभर चालत होती. याच वर्षी राणीच्या राज्यारोहणाला पन्नास वर्षं होत होती. (आणखी दहाच वर्षांनी चापेकर बंधूंनी पुण्यात याच राणीच्या राज्यारोहणाच्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या वेळी रॅंडचा वध केला होता.) त्याप्रीत्यर्थ जगभर ब्रिटिश वसाहतींमध्ये उत्सवाचं वातावरण होतं. भारतातही वेगळी परिस्थिती नव्हती. शाही समारंभासाठी खास भारतातून काही किंमती गालिचे इंग्लंडदेशी प्रदर्शनासाठी पाठवण्यात आले होते. खुद्द राणीसाहेबांना ते आवडल्याचं उलटटपाली बकिंगहॅम महालातून कळलंही होतं. त्यानं भारतातल्या गव्हर्नेर जनरल साहेबमजकुरांना अस्मान ठेंगणं झालं. राज्यारोहणाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राणीसरकारना ‘इंडिया’कडून एखादी विशेष मुद्रा घडवून ती नजर करावी, असा कल्पक आदेश गोऱ्या साहेबानं लागलीच काढला. एखाद्या हिंदू नोकराकरवीच ती मुद्रा राणीसाहेबांस दिल्यास, भारतीय जनतेने ही कृतज्ञतेची छोटीशी भेट दिल्यासारखं होईल, अशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची कल्पना होती. त्यासाठी एखाद्या रुबाबदार हिंदू तरुणास इंग्लंडास धाडावे अशी सूचना आली.

आगऱ्याच्या तुरुंगात दुय्यम कारकून असलेल्या हाफीझ महंमद अब्दुल करीम या तरुणानंच राणीला पाठवलेले गालिचे निवडले होते. गव्हर्नेर जनरलांनी त्यालाच इंग्लंडास मुद्रेसकट धाडण्याचं ठरवलं. अब्दुल करीम हा एक सालस मुस्लिम तरुण होता. हाफीझ म्हणजे अख्खं कुराण मुखोद्‌गत असलेला. मान खाली घालून बंद्यांच्या सक्‍तमजुरीचे हिशेब लिहिणं हे त्याचं काम. शिवाय अब्दुलला इंग्रजी उत्तम येत असे. ब्रिटिश इंडियानं खास घडवलेली ‘मुहर’ घेऊन अब्दुल आणि त्याचा बुटका सहकारी महंमद बख्श हे दोघं बोटीत बसून थेट लंडनच्या बंदरातच उतरले. अब्दुलला ऐनवेळी काही झालंच, तर महंमद हाताशी असलेला बरा, हा सावध हेतू होता. ‘‘संस्कृती संस्कृती म्हणतात ती हीच...,’’ बोट बंदराला लागताना बावचळलेल्या अब्दुलच्या मनात त्याच्या फिरंगी साहेबानं न्यूनगंडाचं आणखी झुरळ सोडलं. अब्दुल गप्प राहून निरीक्षण करत राहिला. तुच्छतेच्या पिंका एव्हाना नेटिव्हांना अंगवळणी पडल्या होत्या. साहेब गुरगुरला तरी गप्प राहावं, खूश झाला तरी तोंड बंद ठेवावं, हे नेटिव नोकर शिकले होते. १८५७चं बंड होऊन आता तीन दशकं उलटली होती; पण ब्रिटिशांच्या विरोधाची ठिणगी राखेखाली धगधगत होतीच.

हे इंडियन लटांबर गाठोडी सांभाळत महालाशी आलं. ‘‘संध्याकाळी शाही खाना होईल. त्यासाठी पन्नास देशांचे राजे आणि राजपुत्र हजर राहणार आहेत. पदार्थांची ने-आण संपली, की लागलीच इशारा होईल. पुढं जाऊन राणीसरकारांच्या समोर हा ट्रे अदबीनं धरायचा. ट्रेमध्ये ब्रिटिश इंडियाची मोहर असेल. काहीही बोलायचं नाही. हलायचं नाही. राणीसरकारांनी हस्तस्पर्श केला, की मागल्या मागं, पाठ न दाखवता निघून जायचं...बस, झालं तुझं काम! हे झालं, की पुढली बोट पकडून तू हिंदुस्थानात परत यायचंस. इज दॅट क्‍लीअर?’’ महालाचे प्रमुख अधिकारी सर हेन्‍री पॉन्सन्बी यांनी तुच्छतेनं बजावलं.  

शाही खाना ब्रिटिश परंपरेप्रमाणं झाला. प्रचंड मोठ्या मेजाशी पन्नास राजघराण्यांचे प्रतिनिधी सपत्नीक बसलेले. सूपपासून सुरवात होऊन एकेक न्यारा जिन्नस पेश होऊ लागला. राणीनं पदार्थ उष्टावला, की सेवक तत्परतेनं सगळ्यांच्याच पुढ्यातल्या बश्‍या उचलत होते. घास मुखाशी पोचण्याआधीच बशी गायब होत होती. शेकडो वर्षांची परंपरा आहे, राजे हो! परंपरा हीच संस्कृती. तेवढ्यात इशाऱ्याची नौबत झडली. ब्रिटिश अधिकाऱ्यानं सजूनधजून तयार असलेल्या अब्दुलला खूण केली. तो ‘मोहर’ घेऊन राणीच्या पुढ्यात निघाला...

‘‘हर हायनेस, ब्रिटिश इंडियाच्या रयतेकडून ही आपल्याला छोटीशी भेट आली आहे...’’ सर पॉन्सन्बींनी अदबीनं सांगितलं; पण राणीच्या पुढ्यात नेमका दिलखेचक केक आला होता. तिचं लक्ष नव्हतं. ‘‘ही इंडियाची मोहर आहे हर हायनेस!’’ केव्हाच्या वाकून उभ्या असलेल्या अब्दुलच्या हातातल्या मुद्रेकडं पॉन्सन्बींनी राणीचं पुन्हा लक्ष वेधलं.
...राणीनं ढुंकूनही बघितलं नाही. तेवढ्यात अब्दुलला काय वाटलं कुणास ठाऊक, मागल्या मागं अदबीनं जात असताना त्यानं थेट राणीच्या नजरेला नजर मिळवली. तो किंचिंत हसला. राणी रोखून बघत राहिली. हा इंडियन सर्वंट बराच हॅंडसम आहे...तिनं मनातल्या मनात नोंद घेतली.
* * *

‘भारतातून आलेल्या दोघा सेवकांना इतक्‍यात परत धाडू नये. त्यांना खासगीकडं सेवक म्हणून ठेवण्याचा हर हायनेसचा विचार आहे,’ असा निरोप महालातून आला. महाल कर्मचारी चक्रावलेच. दोन काळे हिंदू थेट खासगीकडं कसा प्रवेश मिळवतात? पण राजाज्ञेपुढं कोणाचं काय चालणार?
अब्दुलला तिनं बोलावून घेतलं. त्याची किरकोळ चौकशी आरंभली. अब्दुलनंही लघळपणाच्या जवळजवळ सरहद्दीपर्यंत पोचून आपली भारतीय टकळी चालवली. ‘‘मी पण लिहितो, राणीसाहेबा! दिवसभर लिहितो...’’ तो म्हणाला. राणीसाहेबा तेव्हा सरकारी कागदपत्रांवर सह्या करत होती. सकाळीच ब्रिटिश पंतप्रधानांच्या कचेरीतून दूत टपाल देऊन गेला होता.
‘‘लेखक आहेस?’’ राणीनं विचारलं.
‘‘नाही...पण खूप लिहितो मी! कैदी, त्यांची कामं, त्यांचे गुन्हे असं...’’
‘‘म्हणजे कादंबरी लिहितोस?’’
‘‘नाही नाही, छे...’’ अब्दुलला संभाषण फार रेटता येत नव्हतंच; पण तरीही तो बडबडत राहिला. राणी विक्‍तुरियाला हा नवा गडी भावला. हुशार आहे. बोलघेवडा. लिहिता येतं म्हणे. तिनं त्याला ठेवून घेतलं. आगऱ्याचा एक तुरुंगातला दुय्यम कारकून एकदम राणीचा उर्दू शिक्षक झाला. मुन्शी, मित्र आणि सोबतीही.
* * *

राणी व्हिक्‍टोरिया आणि मुन्शी मि. अब्दुल करीम यांच्या जवळीकीमुळं महालातल्या भिंतींना कान फुटले होते. पडद्यांआड कुजबूज सुरू झाली होती. गृहांतर्गत राजकारणाला तोंड फुटलं होतं. राणीनंतर सिंहासनावर हक्‍क सांगणाऱ्या राजपुत्र बर्टीचा तर संताप होत होता. सत्तरीला टेकलेल्या आपल्या आईला हा कुठला म्हातारचळ लागलाय? जगभर छीथू होईल त्याचं काय? पण राणीनं कशाचीही पर्वा केली नाही. मुन्शीसोबत तिचं महालातलं वावरणं तस्संच चालू राहिलं. एक दिवस राणीनं मुन्शीला फर्मावलं ः ‘‘मी भारताची राणी आहे, सबब मला तिथली भाषा यायला हवी.’’ मुन्शीनं राणीला ऊर्दू शिकवायला सुरवात केली. पर्शियनमध्ये त्यानं लिहून दाखवलं ः ‘मैं रानी हूं!’ राणीनं रटफ करत ते गिरवलं ः ‘माय रॅनी हु.’
खरं तर त्यांच्यातल्या भाषेला कुठलंच नाव नव्हतं. ती हृदयाची भाषा होती. मुन्शी कोवळा तरुण होता आणि उतारवयातल्या राणीच्या आयुष्यात हेच सगळं आधी घडून गेलं होतं...
* * *

मुन्शी मि. करीमनं मग राणीच्या आयुष्याचा जणू ताबाच घेतला. त्याच्यावाचून तिचं पान हलेनासं झालं. आंबा हे फळ कसं असतं? गालिचे बनवण्याची कला अकबरानं पर्शियामधून कशी आणवली? मयूर सिंहासन किती ग्रेट आहे? कोहिनूर हा जरी राणीच्या मुगुटात असला, तरी मूळचा कुठला आहे? कुराणात किती आयते आहेत? रुमी हा कविश्रेष्ठ काय म्हणतो? मुघल कसे होते?... वगैरे भारतविषयक सामान्य ज्ञान तो गप्पांच्या ओघात राणीला देत राहिला.
महालात कटकट वाढू लागली आहे, असं पाहून राणीनं सरळ ओसबोर्नच्या आपल्या शाही हवेलीत मुक्‍काम हलवला. सोबत अर्थात मुन्शी होताच. याच ओसबोर्नच्या हवेलीत तिला तरुणपणी मि. जॉन ब्राऊनचा सहवास आणि साथ मिळाली होती. जॉन थडग्यात जाऊनही आता कितीतरी वर्ष लोटली.
ब्राऊन साधा महालातला चाकर तर होता; पण राणीशी त्याची मैत्री जमली. राणीला नुकतंच वैधव्य आलेलं. नैराश्‍यानं ग्रासलेल्या राणीनं कारभार बघणंच सोडून दिलं होतं. पण ब्राऊननी तिला त्यातून बाहेर काढलं. ब्राऊनशी तिचं नातं नेमकं कसं होतं? त्याला काही नावगाव नव्हतं. तो निखळ मित्र होता. एकांतातले थोडे हळवे क्षण वाट्याला आले असतीलही; पण बव्हंशी ते एक अतीव जिव्हाळ्याचं नातं होतं. मात्र, महालानं त्याचा अखेर बळी घेतला. न्युमोनियानं तो मृत्यूशय्येवर पडला, तरी कुणी त्याच्याकडे बघितलंसुद्धा नाही.
राणी तिच्या सोन्याच्या पिंजऱ्यात बंदिस्त राहिली...‘वी ऑल आर प्रिझनर्स, मि. करीम...नाही का?’
...जॉन ब्राऊनच पुन्हा अर्थपूर्ण हसत समोर उभा राहिल्याचा भास व्हावा, असा एक भारतीय तरुण राणीसमोर पुन्हा एकदा उभा ठाकला होता. मुन्शीच्या डोळ्यात तेच आहे, जे जॉनच्या नजरेत होतं...
* * *

काहीही करून त्या मुन्शीची ब्याद परत हिंदुस्थानात पाठवा, नाहीतर जगभर अब्रूचे धिंडवडे निघतील, अशी तंबी पंतप्रधान लॉर्ड सॅलिस्बरी यांनी सर पॉन्सन्बींना दिली. पॉन्सन्बी, राणीचे खासगी डॉक्‍टर रीड, राजपुत्र बर्टी आणि महालातला संपूर्ण कर्मचारीवर्ग कमालीचा अस्वस्थ झाला होता. वृद्ध राणीच्या अश्‍लाघ्य वर्तनाची कुजबूज वाढत चालली होती. अर्थात त्यात गॉसिप आणि राजकारणच अधिक होतं. साहजिकच राणीनं त्यांना हिंग लावून विचारलं नाही. ती मुन्शी अब्दुल करीमवर मायेची पाखर घालत राहिली.

एकदा मुन्शीनं तिला सांगितलं, की त्याची शादी झाली असून बेगम आगऱ्याला एकटी राहते. राणीनं त्याला ‘बायकोला घेऊन ये,’ म्हणून आवर्जून सांगितलं. खरं तर त्याचं विवाहित असणं तिला कुठं तरी बोचलंही होतं; पण राणीनं त्या क्षणी स्वत:ला सावरून संपूर्ण नात्याचा बाजच बदलून टाकला. मुन्शी त्याची बेगम आणि सासूला घेऊन आला. बुरख्यातल्या त्या मुलीला बघून राणी म्हणाली : ‘‘किती सुंदर असेल ही!’’
मुन्शीच्या घराशी राणीनं नातं जोडलं. अब्दुल करीम शाही आश्रितासारखा राहत नव्हता. राजघराण्याच्या तोलामोलानं राहत होता. त्याच्या प्रेमात राणी सपशेल आंधळी झाली असून, केवळ स्वार्थ साधण्यासाठी तो भोळ्या राणीला घोळात घेतोय, असा बाकी कर्मचारीवर्गाचा ठाम वहीम होता. तेही खरं नव्हतं. राणीनं मुन्शीला हाकललं नाही, तर महालाचा आख्खा कर्मचारीवर्ग सामूहिक राजीनामे देईल, अशी धमकीही राणीला दिली गेली. वेळीच हे प्रकरण आवरलं नाही, तर राणीला वेडी ठरवून तिला सिंहासनावरून खाली खेचण्याचा दम राजपुत्र बर्टीनं आपल्या आईला भरला. तेव्हा राणीनं राजपुत्राला सुनावलं ः ‘‘बर्टी, मी ८१ वर्षांची आहे. मला नऊ मुलं आणि ४२ नातवंडं आहेत. शंभर कोटींच्यावर रयत माझ्या अधिकाराखाली आहे. मला संधिवात, गर्भाशयाचा विकार असून, मी नको इतकी स्थूल आहे. एका कानानं बहिरीसुद्धा आहे. गेली ६२ वर्षं २३४ दिवस मी राज्यकारभार बघते आहे. म्हणजेच जगातली सर्वांत प्रदीर्घकाळची राज्यकर्ती आहे. माझ्या कारकिर्दीत मी ११ पंतप्रधान बघितलेत आणि २३४७ विधेयकांवर सह्या केल्या आहेत. मी विक्षिप्त, जाडी, हावरट, चिडकी, स्वार्थीसुद्धा असेन; पण वेडी? शक्‍य नाही. महालकऱ्यांना माझा आज्ञाभंग करायचा असेल, तर तसं खुशाल करू दे; पण मग माझ्यासमोर, निधड्या छातीनं उभे राहा म्हणावं...’’
...ओसबोर्नच्या हवेलीत एकदा मुन्शीनं राणीला शब्द दिला होता, की तो राणीच्या अखेरपर्यंत तिची साथ सोडणार नाही. त्यानं तो सच्च्या मुस्लिमासारखा खरोखर पाळला.
* * *

इसवीसन १९०१मध्ये वयाच्या एक्‍याऐंशीव्या वर्षी राणी विक्‍तुरिया यांचं देहावसान झालं. मरणशय्येवरही त्यांच्या थरथरत्या ओठांवर ‘मुन्शी’ हीच हाक होती. मुन्शीनं राणीचा वृद्ध हात हातात घेऊन रुमीच्या काव्यपंक्‍ती म्हटल्या. ‘‘तुम्ही इथल्यापेक्षाही अधिक सुरक्षित आणि सुखाच्या प्रदेशाकडं चालल्या आहात. आता कुठंही जीव अडकवू नका. मुक्‍त व्हा...अमरत्वाच्या बगिच्यात रंगलेल्या शाही मेजवानीचं तुम्हाला निमंत्रण आहे..,’’ अश्रू परतवत मुन्शी बोलत राहिला.
‘‘यू आर माय स्वीटेस्ट सन,’’ हे राणीचे अखेरचे शब्द होते. राणीच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेल्या बर्टी ऊर्फ सातवा एडवर्ड यांनं पहिले मुन्शीच्या घरात माणसं घुसवून राणीनं दिलेली प्रत्येक चीजवस्तू, पत्रं, दस्तऐवज जाळून टाकले. मुन्शीला तात्काळ हाकलून दिलं. मुन्शी हाफीझ महंमद अब्दुल करीम निमूटपणानं बेगमेसह भारतात आग्र्याला परत आला. राणीच्या अवसानानंतर आठ वर्षांनी तोही दफन झाला. त्याच्याबरोबर त्याची कुणालाही नको असलेली प्रेमकहाणीही इतिहासाच्या धुळीच्या थरात दफन झाली...
* * *

श्राबोनी बाशू या भारतीय पत्रकार महिलेचं लक्ष पहिल्यांदा या कहाणीकडं वेधलं गेलं. श्राबोनी बाशू भारतात वाढलेल्या. शिकलेल्या. पत्रकारितेची पहिली काही वर्षं नामवंत इंग्रजी दैनिकात काढून त्या लंडनला स्थायिक झाल्या. रेसिपीज आणि कुकरीचे प्रकार शोधून ते वाचकांना पेश करणं हा त्यांचा आवडता उद्योग होऊन बसला होता. वाचकही मिटक्‍या मारत वाचत होते. राणी व्हिक्‍टोरियाला ‘इंडियन चिकन करी’ आणि ‘दाल’ खूप आवडत असे असा उल्लेख त्यांनी कुठंतरी वाचला. राणीला ‘दाल’ कुणी करून दिली असेल, हा सवाल मनात घेऊन त्यांनी शाही दस्तऐवज धुंडाळायला सुरवात केली. त्यात मुन्शी मि. करीमचा उल्लेख एकदोनदा आला. मुन्शीचे किरकोळ फोटोही दिसले; पण त्यात तो नोकरासारखा दिसत नव्हता. श्राबोनीदींनी तात्काळ संशोधन सुरू केलं. पाकिस्तानात स्थायिक झालेले मुन्शी करीमचे वंशज शोधून काढले. आणखी काही पत्रं, डायऱ्या हस्तगत केल्या. त्यातून ही थोडी खरी, थोडी काल्पनिक कहाणी उभी राहिली ः ‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल.’
श्राबोनी बाशू याच्या कादंबरीचं जाणकार वाचकांनी आनंदानं स्वागत केलं. त्यावरच हा चित्रपट आधारित आहे. अर्थात चित्रपटाच्या प्रारंभीच एक पाटी येते : ‘बेस्ड ऑन अ ट्रू स्टोरी...मोस्टली.’
* * *

खूप वर्षांपूर्वी म्हणजेच १९९७ मध्ये ‘मिसेस ब्राऊन’ नावाचा एक अद्भुत चित्रपट येऊन गेला होता. राणी व्हिक्‍टोरिया आणि तिचा वैधव्यानंतरचा मित्र जॉन ब्राऊन यांच्या नात्याचा पोत सांगणारा. ‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’ हा त्याचा पुढला अंक म्हणता येईल. त्याही चित्रपटात राणी व्हिक्‍टोरियाची भूमिका डेम ज्युडी डेंच यांनी केली होती. वृद्ध राणीच्या भूमिकेत इथंही त्याच दिसतात. ज्युडी डेंच या ब्रिटिश साम्राज्याच्या ‘डेम’ आहेत. हा बकिंगहॅम पॅलेसनं केलेल्या त्यांच्या कलाजीवनाचा सन्मान आहे. ‘व्हिक्‍टोरिया अँड अब्दुल’मधली त्यांची भूमिका इतकी जबरदस्त आहे, की थक्‍क व्हायला होतं. वय ऐंशीच्या घरात असूनही त्यांचा मुद्राभिनय, त्या खास शाही लकबी...महालातल्या गंभीर वातावरणात भरून राहिलेला तो नर्म ब्रिटिश विनोद, हे सगळं मनाचा ठाव घेणारं आहे. अब्दुलच्या तरण्याबांड रोलमध्ये भारतीय अभिनेता अली फजल दिसतो. छान तोंडवळ्याचा हा तरुण अभिनेता समजूनउमजून मुन्शीची व्यक्‍तिरेखा साकारतो. तो खरोखर राणीचा सखा आहे की स्वार्थांध माणूस, या शंकेला वाव निर्माण होईल, अशी छटा त्यानं अचूक पकडली आहे.

दिग्दर्शन केलं आहे स्टिफन फ्रिअर्सनं. व्हिक्‍टोरियन काळाचा बाज त्यांनी मस्त टिपला आहे. अर्थात काही भारतीय टाइपचे घोटाळेही त्यांनी करून ठेवले आहेत. उदाहरणार्थ, चित्रपटाच्या प्रारंभी आग्र्यातल्या मशिदीतून लाऊडस्पीकरवरची बांग ऐकू येते. आता १८८७मध्ये कुठून आले लाऊडस्पीकर? पण इथं आले! एका ठिकाणी मुन्शी राणीला म्हणतो ः ‘‘आपल्या उत्तर प्रदेशात तुम्ही यायला हवं!’’ त्या काळी उत्तर प्रदेश कुठं होता? त्याला संयुक्‍त प्रांत म्हणायचे. अशा चिक्‍कार आणि किरकोळ चुका आहेत; पण डेम ज्युडी डेंच सगळं विसरायला लावतात, हे खरं.
चित्रपट बघून झाल्यावर, राणी विक्‍तुरिया आणि अब्दुल यांचं नेमकं नातं कसं होतं? हा सवालच फिजूल वाटायला लागतो. वयाच्या, शरीराच्या, मनाच्या सगळ्या मर्यादा तोडून असं अलवार नातं फुलणं हाच एक चमत्कार वाटायला लागतो. असल्या नात्यांना नाव देऊ नये. कारण असल्याच नात्यांच्या पुढं चांदण्या होतात म्हणे. सगळ्याच चांदण्यांना नावं कशी देणार?
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा,
मंझिल की जयाची तारांगणात राही...
...रात्री आकाशात बघितलं, तर तारांगण तारकांनी खच्चून भरलेलं दिसतं. ही गोष्ट तर मनाला दिलासा
देणारी. नक्‍कीच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com