सूर म्हणतो साथ दे... (प्रवीण टोकेकर)

सूर म्हणतो साथ दे... (प्रवीण टोकेकर)

एका इटालियन दंतकथेत वणव्याच्या खूप वर गाणी म्हणत उडणाऱ्या निळ्या पक्ष्याचं वर्णन आहे. आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारं खालचं बन, धुराचे लोट यांच्याही वरती हा पक्षी उडत राहतो म्हणे. ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा सिनेमा म्हणजे असाच एक निळा पक्षी आहे. भले दंतकथेतला असेल; पण खराखुरा आहे!

काही काही क्षण आयुष्यभर साथ देत राहतात. त्यांची तशी जगायसाठी दैनंदिन गरजही नसते; पण याच क्षणांनी आपल्याला कधीतरी श्रीमंत केलं होतं, ही कृतज्ञतेची भावना टिकून राहते. उदाहरणार्थ ः गावाकडल्या खूप वर्षांपूर्वीच्या एखाद्या चांदण्यारात्री मावसबहिणीच्या मैत्रिणीनं आपल्याकडं बघत बघत म्हटलेल्या एखाद्या गाण्याचा गंधस्वर अजूनही कधी कधी वाट चुकून मनात शिरतो. शाळेपासून घरापर्यंतची जोडीनं केलेली वाटचाल आठवते आणि मन उगीचच पिंपळाच्या पानोळ्यासारखं सळसळतं. कधी कॉलेजच्या दिवसातली ‘ती’ आठवण बोटावर फिरणाऱ्या वहीसारखी अचानक थबकते आणि कुकरची शिट्टी वाजून एखाद्या व्यग्र गृहिणीचं मन थाऱ्यावर यावं, तसं मन वास्तवात येतं. वाटतं, अजूनही ‘आपल्यात’ हे सगळं शिल्लक आहे?

‘साउंड ऑफ म्युझिक’ हा खरं तर पाच-पन्नास वर्षांपूर्वीचा चित्रपट. त्यानंतर चित्रकथा आणि पडद्यावरचं कथाकथन यांच्या तंत्रामंत्रात कितीतरी फरक पडला आहे; पण ‘साउंड ऑफ म्युझिक’चा स्मरणभाव अजूनही मनाला कातर करतो. विशेषत: आयुष्याच्या मस्त मस्त उतारावर हातातली काठी खांद्यावर टाकून शीळ घालत निघालेल्या निमबुजुर्गांना तर नक्‍कीच थबकवतो. उतारावरची पावलं मंदावतात. हीच तर त्याची जादू आहे.

१९६५ च्या मार्च महिन्यात हा चित्रपट येऊन गेला. त्याचं उत्फुल्ल कथानक, त्यातल्या गोजिऱ्या व्यक्‍तिरेखा, स्वप्नवत्‌ दृश्‍यं आणि आंतर्बाह्य मूड बदलून टाकणारं बेजोड संगीत अशा मिलाफानिशी आलेला हा सिनेमा चित्रपटसृष्टीच्या इतिहासातली दंतकथा ठरला. एखाद्या बऱ्यापैकी संध्याकाळी अचानक किशोरकुमारचं ‘ आ चल के तुझे मैं ले के चलूँ इक ऐसे गगन के तले...’ ऐकू येतं किंवा त्याचंच ‘ठंडी हवा ये चाँदनी सुहानी’ अवचित ओठांवर येतं. तशीच लकेरीसारखी येते ‘साउंड ऑफ म्युझिक’ची याद....हा चित्रपट कुठल्याही सुहृदानं दोन-चारदा तरी पाहावा. जमलं तर दुकट्यानं, हातात हात घेऊन पाहावा.

एका इटालियन दंतकथेत वणव्याच्या खूप वर गाणी म्हणत उडणाऱ्या निळ्या पक्ष्याचं वर्णन आहे. आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारं खालचं बन, धुराचे लोट यांच्याही वरती हा पक्षी उडत राहतो म्हणे. ‘साउंड ऑफ म्युझिक’ हा असा निळा पक्षी आहे. भले दंतकथेतला असेल; पण खराखुरा आहे!
* * *
ऑस्ट्रियाच्या पर्वतराजीच्या कुशीत वसलं आहे झाल्सबुग. जग त्याला साल्झबर्ग अशा स्वच्छ नावानं उच्चारत असलं तरी तिथले डोंगराळ स्थानिक झाल्सबुगच म्हणतात. अशा या निसर्गरम्य झाल्सबुगनजीकच्या एका रुक्ष जोगिणींच्या शाळेत मारिया आली खरी; पण मारिया होती फुलपाखरासारखी. टवटवीत. आसपासचे हिरवेगार पर्वत तिला खुणावत राहायचे. जगण्यात भरून राहिलेली उत्फुल्लता तिच्या देह-मनात भिनायची. ओठांवर गाणं यायचं. मन अवखळ, वय अवघड. तरीही नियतीचं दानच असं पडलं की तिला जोगीण होण्यासाठी यावंच लागलं.

रेव्हरंड मदर ॲबेसनं तिचा नूर ओळखला होता. काही काही पक्षी पिंजऱ्यासाठी बनलेलेच नसतात. त्यांचं घर आभाळातच असतं. तेवढ्यात झाल्सबुगच्या तालेवार ट्रॅप खानदानाकडून एक विनंती आली. एखादी गव्हर्नेस हवी आहे. सालस. सुसंस्कृत. नीटस. मिळेल?
रेव्हरंड मदर ॲबेसनं मारियाला दिलं पाठवून ट्रॅप कुटुंबीयांकडं. झाल्सबुगच्या निळ्याशार तळ्याकाठी ट्रॅपमहाशयांची शानदार हवेली होती. घराणं मातब्बर; पण एरवी जहाजावर हयात घालवलेल्या कॅप्टनसाहेबांना घरदेखील जहाजच वाटायचं. आपल्या आज्ञेवर घरातले खलाशी चालले पाहिजेत. ‘आय आय सर’ म्हणत धावून आले पाहिजेत असा खाक्‍या. कॅप्टनसाहेबांची पत्नी बऱ्याच वर्षांपूर्वी निवर्तली होती. अवघी हयात समुद्रावर गेलेल्या कॅप्टनसाहेबांनी हाती मिळालेला अल्पसा सांसारिक वेळ सत्कारणी लावला होता. त्यांना सात मुलं होती.  लिझल, फ्रेडरिक, लुईझा, कुर्ट, ब्रिजिता, मार्ता आणि ग्रेट्‌ल.

ही सातही मुलं म्हणजे रत्नं होती. अंमलदार वडिलांनी आणून ठेवलेल्या गव्हर्नेसला सळो की पळो करून सोडायचं आणि बॅग भरून परत पाठवायचं, हा या पोरांचा मुख्य धंदा. घरात हवं नको बघणारी एक पूर्णवेळ दाई असे. तिच्यावर घर सोडून कॅप्टन गेओर्गे समुद्रसफरीला जात असत. पैका मुबलक होता. हवेली शानदार होती. नव्हतं ते मातृत्व आणि स्वातंत्र्य. कॅप्टन गेओर्गे शिस्तीचे भोक्‍ते होते. मुलांचं हे बागडण्याचं वय आहे, हेच मुळी या गृहस्थाच्या गावी नाही. अशा घरात मारिया पोचली. कॅप्टन गेओर्गे व्हॉन ट्रॅप व्हिएन्नाला मोहिमेवर निघून गेले. इथं नव्या गव्हर्नेसची हालत पतली करून तिला परत पाठवण्याचे मुलांचे बेत ठरले. उद्धट, शिष्टाचार औषधालाही नसलेली, अभ्यासाच्या नावानं बोंब असलेली ही सात मुलं म्हणजे शुद्ध नरकवास होता; पण मारियाकडं एक जादूची कांडी होती ः संगीत. काय? अभ्यास करायचा नाही? गाणी म्हणायची? डोंगरावर फिरायला जायचं? जांभळं तोडायची? पडद्याची कापडं कापून त्याचे ड्रेस शिवायचे? तळ्यात होडी घेऊन जायचं? पावसात छत्री नेणं वाईट? नाच करायचा? मस्ती करायची चिक्‍कार? अरे, असं कसं चालेल?
पोरांची मनं मारियानं अल्पावधीत अशी काही जिंकून घेतली की विचारता सोय नाही. पोरांचं मारियावाचून पान हलेना. एक दिवस कॅप्टनसाहेब परतले, तेव्हा त्यांच्यासोबत बॅरनेस एल्सा श्रेडर होत्या. श्रीमंत, आधुनिक महिला. कॅप्टनसाहेब आणि त्यांची तार व्हिएन्नात जुळली असणार. दोघांनी एकमेकांबरोबर राहायचं ठरवलं होतं. वाङ्‌न्÷िन्नश्‍चयाची तारीख ठरायची होती इतकंच; पण आल्या आल्या त्यांनी बघितलं की तळ्यातल्या होडीत आपली मुलं धुमाकूळ घालताहेत आणि खुद्द त्यांना शिस्त लावायला ठेवलेली गव्हर्नेसच त्यांची म्होरकी आहे.

काठाशी येता येता होडी उलटली. नखशिखान्त ओल्यागिच्च पोरांनी पाहुण्या बॅरनेससमोर सगळी इज्जत धुळीला मिळवली. बॅरनेससुद्धा दचकल्याच. कॅप्टननी संतापून मारियाला जोगिणींच्या शाळेत परत जायला फर्मावलं. घरात येऊन पाहिलं तर मुलं बॅरनेसच्या स्वागताप्रीत्यर्थ सुरेल गाणं म्हणत होती. बॅरनेस मनातून हलल्या होत्या. कॅप्टनसाहेब खडूस होते; पण सहृदयही होते. त्यांनी मारियाची माफी मागितली. ‘इथंच रहा’ अशी गळ तिला घातली. पुढे जे घडलं ते बॅरनेस एल्स श्रेडरनाही जड गेलं. मारियालाही...आणि अर्थातच कॅप्टनसाहेबांनाही. कारण, कॅप्टनसाहेब नव्या गव्हर्नेसच्या प्रेमात पडत गेले. ते त्यांच्या वाग्दत्त वधूला पाहावं लागलं. जोगीण व्हायला निघालेल्या मारियालाही आपलं ओढाळ मन आवरत नव्हतं. त्यांना एकमेकांकडं आकृष्ट करणारी, अवघ्या ट्रॅप कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवणारी चीज होती एकच ः संगीत...फक्‍त संगीत.

एक दिवस कॅप्टन गेओर्गनं हातात गिटार घेतली आणि सुंदर गीत छेडून दाखवलं. गाणं गळ्यातून आलं की सुंदर होत नाही. ते हृदयातून उमटायला हवं आणि नुसतं गळ्यानं नव्हे, डोळ्यांनीही गाता यायला हवं. सूर साथ मागतात. तो हात मिळाला की उन्हाचंही चांदणं होतं. दगडांमधून झरे फुटतात.
...बॅरनेस एल्सानं प्रसंग ओळखून आपला वाङ्‌न्÷िन्नश्‍चय रद्द केला आणि त्या परत गेल्या. मारियाच्या सुराला कॅप्टनची साथ मिळून गेली. आरडाओरडीनिशी घर डोक्‍यावर घेणाऱ्या सप्त असुरांचं रूपांतर बघता बघता सात सुरांमध्ये झालं. अवघ्या घराचं गाणं की हो झालं. पण...
पण इतकं गोड काही या जगात असत नाही. जुन्या परिकथांमध्ये नाही का, राजकन्येला राजकुमार हवा असतो आणि तसा तो घोड्यावरून दौडत येतोदेखील; पण नेहमी मध्येच एक राक्षस उपटतोच. इथंही तो राक्षस आला. त्याचं नाव आडोल्फ हिटलर असं होतं...
ऑस्ट्रियाच्या रम्य भूमीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या कॅप्टन व्हॉन ट्रॅप आणि त्यांची नवी सहचरी मारिया यांनी राक्षसाचा पाडाव कसा केला? त्यांच्या सात सुरांसारख्या सात मुलांनी त्यांना कशी साथ दिली? झाल्सबुगच्या जोगिणींनी त्यांना वाचवण्यासाठी कशी धमाल ‘पापं’ केली? हिटलर नावाच्या दानवाला धूळ चारण्याचं धाडस या फॅमिलीनं नेमकं कसं केलं? त्याची गोष्ट म्हणजे ‘साउंड ऑफ म्युझिक.’
***

‘साउंड ऑफ म्युझिक’ हा बघण्याचा चित्रपट आहेच; पण त्याहूनही अधिक तो ऐकण्याचा आहे. किती सुरेल असावी एखादी गोष्ट, याचं उदाहरणच आहे हा सिनेमा. ही तशी खरी खरी गोष्ट. ‘द स्टोरी ऑफ व्हॉन ट्रॅप फॅमिली सिंगर्स’ नावाच्या मारिया व्हॉन ट्रॅप लिखित आत्मचरित्राचं हे रुपेरी स्वरूप आहे. १९४९ मध्ये हे प्रसिद्ध झालं. नंतर त्याचं रूपांतर संगीत नाटकात करण्यात आलं. आजही ते जगभर ठिकठिकाणी होतं. ‘साउंड ऑफ म्युझिक’मधली गाणी तर आपल्या भावगीतांसारखी अजरामर आहेत. अशा गाण्यांच्या मुखड्यांचे मुहावरे होतात. ‘क्‍लाइंब एव्हरी माउंटन’,  ‘सिक्‍स्टीन गोइंग ऑन सेव्हन्टीन’ किंवा ‘एडलवाइज’ ही गाणी त्यातलीच.
‘साउंड ऑफ म्युझिक’च्या नाटकाचा चांगलाच बोलबाला झाला होता. त्याच सुमाराला ‘ट्‌वेंटीएट्‌थ सेंच्युरी फॉक्‍स’ आणलेला भव्य ‘क्‍लिओपात्रा’ सपशेल आपटला होता. कंपनी कंगाल झाली होती. तरीही कंपनीनं १० लाख डॉलर्स (त्या काळात!) देऊन त्याचे चित्रपटीय हक्‍क विकत घेतले. ‘मेरी पॉपिन्स’च्या मज्जेदार चित्रपटानं प्रकाशात आलेल्या ज्युली अँड्य्रूजलाच मारियाची भूमिका देऊ करण्यात आली. कॅप्टनच्या रुबाबात खिस्तोफर प्लमर उभा राहिला. सात मुलांच्या निवडीसाठी अफाट चाचण्या घेऊन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ऑस्ट्रियातली पर्वतराजी तशीही कमालीची गूढरम्य. तिथंच चित्रीकरण पार पडलं.

पुढं पडद्यावर आल्यावर या चित्रपटानं कहर केला. जगभर हा चित्रपट इतका चालला की ट्‌वेंटीएट्‌थ सेंच्युरी फॉक्‍सची कंगालावस्था संपून पुन्हा गब्बरगंडावस्था आली. ज्युली अँड्य्रूजला खरं तर हा रोल नको होता. ‘मेरी पॉपिन्स’ पुन्हा करायची? ती वैतागलीच होती; पण पैसे चांगले मिळणार होते. ख्रिस प्लमर तर भडकून ‘साउंड ऑफ म्युकस’ (नाक शिंकरण्याच्या आवाजासकट!) असाच उल्लेख करायचा. एका चिडक्‍या, विस्कळित घरात येऊन आनंदाचं वाटप करणाऱ्या अप्सरेची आयडिया त्याही काळात अनेकांना शिळी वाटत होती; पण पब्लिकनं सिनेमा काहीच्या काहीच उचलून धरला. त्याचा आत्मविश्‍वास फक्‍त दिग्दर्शक रॉबर्ट वाइजला होता.

लेखिका मारिया व्हॉन ट्रॅप यांना तर प्रीमिअरचं निमंत्रणदेखील नव्हतं. त्यांनी शेवटी तिकीट काढून झाल्सबुगच्या थिएटरात सिनेमा पाहिला. ‘साउंड ऑफ म्युझिक’च्या इतक्‍या कहाण्या आहेत की सांगायला गेलं तर पुस्तकाची पानं पुरणार नाहीत. दंतकथेचं असंच होतं. तिच्याभोवती असंख्य दंतकिस्से आणि दंतकहाण्या फेर धरू लागतात. ‘साउंड ऑफ म्युझिक’ ही तर दंतकथेचा सूर घेऊन आलेली सत्यकथाच.
...अस्सल गाणं असंच असतं. खरं, तरीही कमालीचं सुरेल. अशा गाण्याच्या कुशीतच कवितेचाही गर्भ वाढत असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com