शाळेसाठी 1000 आयडिया (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 4 जून 2017

...आणि थोड्याच वेळात सुमारे १०० आयडिया तयार झाल्या. काही काही आयडिया तर थोड्याफार फरकानं सगळ्यांनीच लिहिल्या होत्या. मग सगळ्या आयडियांना चाळणी लावत सुमारे ७९ शिल्लक राहिल्या. मुलांना इतकं काही भराभर सुचत होतं, की त्यांनी लिहिताना तीन प्रश्‍नांची उत्तरं वेगवेगळी न लिहिता एकत्रितपणेच लिहिली होती आणि तेसुद्धा काही आयडिया एका वाक्‍यात, तर काही एका शब्दातच लिहिल्या होत्या. 

सप्तरंग आता सुटी संपत आल्यानं सगळ्यांनाच शाळेचे वेध लागलेले होते. ‘शाळा सुरू होण्याआधीच आपण सगळ्यांनी मिळून शाळेसाठी काही तरी हटके करायलाच पाहिजे,’ असं सगळ्या मुलांना वाटू लागलं होतं आणि नेमकं काय करायचं, तेच काही कळत नव्हतं. म्हणून मग या वेळी सगळ्यांनी अन्वयच्या घरी जमायचं ठरवलं. पालवीची आई आणि वेदांगीचे बाबासुद्धा येणार होते. ठरल्याप्रमाणे शंतनू, नेहा, पालवी, वेदांगी आणि पार्थ आले. पालवीच्या आईनं येताना सगळ्यांसाठी थोडा खाऊ आणला होता. शंतनूनं आज भेटण्याचं कारण सांगताच सगळी मुलं एका सुरात म्हणाली :‘‘हो, हो. आम्हाला शाळेसाठी काही तरी हटके करायचं आहे; पण काय करायचं तेच सुचत नाहीये.’’
अन्वयची आई म्हणाली :‘‘ओके. तुम्ही काय करायचं, हे तर मी अजिबात सांगणार नाही. कारण, शाळा तुमची आहे आणि ठरवलंपण तुम्हीच आहे. म्हणून ‘काय करायचं’ हे तुम्हीच शोधलं पाहिजे. मी तुम्हाला तीन प्रश्‍न विचारते. मला वाटतं, त्यामुळं तुमचे डोक्‍यातले जनरेटर सुरू होतील. एक : पहिल्या दिवशी नवीन वर्गात गेल्यावर काय दिसलं किंवा काय मिळालं, तर येणाऱ्या मुलांना आनंद होईल? दोन :पहिल्या दिवशी नवीन वर्गात गेल्यावर काय दिसलं, तर येणाऱ्या शिक्षकांना आनंद होईल? तीन ः इतक्‍या मोठ्या सुटीनंतर शाळेत आल्यावर ‘शाळा कशी दिसली’ म्हणजे ती सगळ्यांनाच आवडेल?’’
आईचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सगळ्या मुलांचे बोलण्यासाठी हात वर होऊ लागले. आता सगळ्यांचेच जनरेटर फुल स्पीडमध्ये सुरू झाले होते. प्रत्येकाच्या डोक्‍यात इतक्‍या नवनवीन आयडिया उकळू लागल्या होत्या, की आणखी थोडा वेळ जरी थांबलं तर त्या डोक्‍यातून उतू जाव्यात!
डोकं गच्च दाबत शंतनू म्हणाला ः ‘‘आता आधी माझं ऐकाच...’’
आई म्हणाली : ‘‘शंतनू, एक मिनिट थांब. आता प्रत्येकानं प्रत्येक प्रश्‍नाच्या पाच-पाच आयडिया लिहून काढा. मग त्यातल्या काही आपण निवडू. मग खाऊ खाऊ. त्यानंतर तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे...’’
‘‘काय, सरप्राइज काय आहे? सांग ना लगेच...’’ पार्थ ओरडलाच.  पार्थच्या हातात वही देत पालवी म्हणाली : ‘‘आधी लिही पाहू...’’ सगळे वहीत डोकं खुपसून बसले. सहा मुलं सहा ठिकाणी बसली. सगळ्या मिळून १५ आयडिया लिहायच्या होत्या आणि हे लिहिण्यासाठी वेळ होता फक्त २० मिनिटं. मुलं विचार करत होती. आठवत होती. भराभरा लिहीत होती.
जसजसा वेळ संपत आला, तसतशी मुलं म्हणू लागली ः ‘‘आणखी पाच मिनिटं हवीत. आणखी पाचच मिनिटं.’’ हे ऐकून आईनं मान हलवताच मुलं पुन्हा कामाला लागली आणि थोड्याच वेळात सुमारे १०० आयडिया तयार झाल्या. काही काही आयडिया तर थोड्याफार फरकानं सगळ्यांनीच लिहिल्या होत्या. मग सगळ्या आयडियांना चाळणी लावत सुमारे ७९ शिल्लक राहिल्या. मुलांना इतकं काही भराभर सुचत होतं, की त्यांनी लिहिताना तीन प्रश्‍नांची उत्तरं वेगवेगळी न लिहिता एकत्रितपणेच लिहिली होती आणि तेसुद्धा काही आयडिया एका वाक्‍यात, तर काही एका शब्दातच लिहिल्या होत्या. ‘असं का लिहिलं?’ असं विचारल्यावर अन्वय म्हणाला ः ‘‘काय करणार? भराभर लिहिण्याची ही आयडिया आहे ना. पुन्हा पहिल्या प्रश्‍नाचा विचार केला तर दुसऱ्याच प्रश्‍नाचं उत्तर सुचायचं आणि दुसऱ्या प्रश्‍नाचा विचार केला तर नवीनच काही तरी सुचायचं. मग मी ठरवलं, प्रश्‍नांची भेळ करायची आणि त्यांच्या उत्तरांची मिसळ करायची...’’
अन्वयचं बोलणं पूर्ण होण्याआधीच शंतनू ओरडला : ‘‘अरे हो, बरं आठवलं, मिसळीचं काय झालं? उत्तरं शोधून शोधून पोटात आग पेटलीय...’’
आई काय ते समजली आणि रीतसर खाऊ खाण्याचा कार्यक्रम झाला.
‘‘आता पोटोबा झालाय. आता उत्तरोबाला सुरवात करू या...’’आईचं बोलणं पुरं होताच पालवी म्हणाली : ‘‘आता आम्ही खाता खाता एक शॉर्टलिस्ट तयार केली आहे. तीमध्ये बहुतेक सगळ्यांचीच काही ना काही उत्तरं आहेतच.’’
‘‘म्हणजे ही असेल आमच्या सगळ्यांच्या उत्तरांची मिसळ-सरमिसळ.’’  ‘‘हो. अगदी बरोबर.’’
‘‘आपले प्रश्‍न थोडक्‍यात असे होते : ‘पहिल्या दिवशी वर्गात गेल्यावर काय दिसलं किंवा मिळालं तर मुलांना आणि शिक्षकांना आनंद होईल? शाळा कशी दिसली तर सगळ्यांना आनंद होईल?’ या प्रश्‍नांच्या उत्तरादाखल आता आम्ही ‘पुढील गोष्टी कराव्यात’ असं सुचवतो :
 प्रत्येक वर्गात त्या वर्गातल्या मुलांचे वाढदिवस दाखवणारं स्पेशल कॅलेंडर असावं.
 प्रत्येक मुलाकडं एक ‘मैत्रीवही’ असेल. मैत्रीवही म्हणजे पाठकोरे कागद वापरून तयार केलेली ५२ पानांची तळहाताच्या आकाराची एक वही. म्हणजे वहीच्या एका कागदाचे समान चार भाग केले की होणारा आकार. एक पान म्हणजे एक आठवडा. या ‘आठवडी पाना’वर त्या त्या आठवड्यातल्या महत्त्वाच्या नोंदी असतील. उदाहरणार्थ ः कुठलं पुस्तक वाचायचं आहे? कुठली लिंक पाहायची आहे? नवीन शिकलेले इंग्लिश शब्द. वेगळा उपक्रम किंवा शिक्षकांना विचारायची शंका वगैरे. ही ‘मैत्रीवही’ मुलं एकमेकांच्या मदतीनं तयार करतील.
 वर्गाची सजावट केलेली असेल; पण ही सजावट सगळ्या वर्गात सरसकट सारखीच नसेल. म्हणजे त्या त्या वर्गाच्या अभ्यासक्रमाला पूरक अशीच ती सजावट असेल. उदाहरणार्थ : इयत्ता चौथीला ‘पंचेंद्रियांची ओळख’ हा भाग विज्ञानात आहे, तसंच त्यांना ‘अपारंपरिक ऊर्जा’ असाही भाग आहे. मग त्या वर्गाची सजावट करताना या दोन घटकांचा विचार करून मजा करता येईल.
 वर्गात सजावट करण्यासाठी जर दोन महिन्यांनी वेगवेगळी संकल्पना घेतली, तर आणखीच मजा येईल. उदाहरणार्थ : पाऊस, कापूस, पाणी, तेल, पाण्याखालचं विश्व, अंतरिक्ष अशा अनेक थीम घेता येतील. उदाहरणार्थ ः तेल ही संकल्पना घेतली तर तीत अनेक प्रकार येतील. खाद्यतेल, इंजिनसाठी वापरलं जाणारं तेल, इंधन म्हणून वापरलं जाणारं तेल इत्यादी. तेलाचा चिकटपणा मोजण्यासाठी व्हिस्कॉसिटी हे परिमाण वापरतात त्याची माहिती, तसंच टू-स्ट्रोक आणि फोर-स्ट्रोक इंजिनांसाठी  वेगवेगळं तेल वापरतात, त्याची माहिती चित्रातून देता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळी खाद्यतेलं कोणती आणि ती कुठल्या कुठल्या प्रदेशात वापरली जातात? म्हणजे काहीजण स्वयंपाकासाठी मोहरीचं तेल वापरतात, तर काहीजण नारळाचं, तर काहीजण ऑलिव्ह तेल वापरतात. मुख्य म्हणजे ही सगळी माहिती चित्ररूप केली तर फारच इंटरेस्टिंग होईल.
 शाळेच्या कोपऱ्यात एक औषधी बाग हवी. त्यात पुदिना, गवती चहा, आलं, लसूण, तुळस, हळद अशा औषधी वनस्पती तर हव्यातच; पण त्यांची उपयुक्तता सांगणारी पुस्तिका मुलांनी शिक्षकांच्या आणि पालकांच्या मदतीनं तयार करायची.
 बागेतला एक कोपरा ‘फुलपाखरू-कोपरा’ म्हणूनच तयार करायचा. पानफुटी प्रकारातल्या वनस्पती जर तिथं लावल्या, तर तिथं लगेचच फुलपाखरं येऊन बागडू लागतात.
 शाळेच्या आवारातला एक कोपरा हा पाखरांसाठी ‘खाऊ-पिऊ कोपरा’ हवा. सगळ्या मुलांना दुपारी खिचडी मिळते, तर काही मुलं डबेसुद्धा आणतात. उरलेली थोडी खिचडी, सांडलेली खिचडी आपण त्या कोपऱ्यात पाखरांसाठी ठेवू. तिथंच त्यांना पिण्यासाठी पसरट भांड्यात पाणीही ठेवू.
 प्रत्येक वर्गाची एक ‘बी-बॅंक’ करायची. म्हणजे त्या-त्या वर्गातली मुलं आणि त्यांच्या घरातली माणसं जेव्हा जेव्हा फळं खातील, तेव्हा तेव्हा त्यातल्या बिया स्वच्छ धुऊन ठेवतील. कलिंगडाच्या, जांभळाच्या, बोराच्या, मोसंबीच्या, संत्र्याच्या, पपईच्या, सीताफळाच्या, आंब्याच्या, आवळ्याच्या अशा सुमारे १००० बिया प्रत्येक वर्गाच्या बी-बॅंकेत वर्षभरात सहजच जमा होतील. पुढच्या वर्षी जूनमध्ये पहिला पाऊस पडला, की गावाजवळच्या टेकडीवर सहल काढून तिथं या बिया पेरून टाकायच्या. दोन वर्षांनी ‘जिथं हिरवी टेकडी आहे, तिथं जवळ शाळा आहे’ असं लोक ओळखतील. मग टेकडीच काय, सगळा गावच हिरवा होऊन जाईल; पण याची सुरवात मात्र आम्ही मुलंच करू.
 शाळेचं सुशोभन करण्यासाठी प्रत्येक वर्ग आठवड्यातले दिवस वाटून घेतील. शाळेच्या प्रवेशद्वाराशी रोज वेगळी रांगोळी किंवा चित्र असेल; पण ही रांगोळी किंवा चित्र हे पर्यावरणपूरक असेल, म्हणजे या सुशोभनात रंग म्हणून टाकाऊ गोष्टींचाच उपयोग केलेला असेल. उदाहरणार्थ ः सुकलेल्या फुलांचा, पानांचा चुरा, रद्दीमधल्या जुन्या रंगीत कागदांचे कपटे, दोरे, सुतळ्या यांचे तुकडे, चहाचा चोथा, पालेभाजी निवडल्यानंतर उरलेले देठ, माती, बारीक खडे, लाकडाचा भुसा इत्यादी.
 शाळेतल्या सगळ्यांनी मिळून, म्हणजे शाळा ज्या परिसरात आहे, त्या परिसरातल्या सगळ्यांनी मिळून ‘आपल्या गावाची माहिती देणारी’ एक पुस्तिका तयार करायची. विशेषतः आपत्कालीन मदतीसाठी उपयोगी पडणारी माहितीही त्यात असावी. डॉक्‍टर, औषधांची दुकानं, रक्तदाते आणि त्यांचे रक्तगट, रुग्णवाहिका इत्यादींची माहिती आणि फोन नंबर.
 दिवाळीच्या सुटीत शाळेत ‘शिक्षणजत्रा’ ठेवायची. सगळ्या मुलांनी आपापल्या पालकांना, नातेवाइकांना आणि शेजाऱ्यांनाही या ‘शिक्षणजत्रे’ला बोलवायचं. जत्रेत ‘विज्ञानाचे खेळ’, ‘गणिताचे खेळ’, ‘भाषेचे खेळ’, ‘गमतीचे खेळ’ असे वेगवेगळे स्टॉल असतील आणि या गमती मुलंच आलेल्या लोकांना दाखवतील. सगळ्यात शेवटी ‘खाऊ-पिऊ स्टॉल’ असतील. मुलांनीच केलेली भेळ आणि सरबत पिऊन आणि शाळेला देणगी देऊन मगच सगळे परत जातील.
‘शिक्षकदिन’ आणि ‘बालदिन’ कसे साजरे करावेत, यासाठीही आमच्याकडं खूप वेगळ्या कल्पना आहेत आणि त्याही इतक्‍या आहेत, की त्यातल्या कुठल्या निवडाव्यात आणि कुठल्या निवडू नयेत हेच कळेना. मुलांना थांबवत आई म्हणाली ः ‘‘यासाठीच आहे तुमच्यासाठी सरप्राइज!’’
‘‘म्हणजे?’’
आतल्या खोलीतून टाळ्या वाजवत जोशीसर बाहेर आले. मुख्याध्यापकांना पाहताच सगळी मुलं चटकन उभी राहिली. मुलांना शाबासकी देत जोशीसर म्हणाले ः ‘‘अरे, बसा बसा. तुम्ही तर कमालच केलीत. मला खरंच तुमचं कौतुक वाटतं! मला खात्री आहे, तुमच्या १०० च काय; पण अगदी इतक्‍याच आयडिया जरी बाकीच्यांनी ऐकल्या, तरी त्यांना नक्कीच १००० आयडिया सुचतील. खरं सांगतो, आजपर्यंत मलाही एवढ्या सुंदर कल्पना कधी सुचल्या नव्हत्या; पण त्या तुम्हा मुलांना सुचल्या, याचाच आज मला खूप आनंद झाला आहे. आपण आजपासूनच कामाला लागू या. इतर मुलांनाही सोबत घेऊ या.’’
मुलांना जवळ घेऊन थोपटताना जोशीसरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते. आता मुलांचा उत्साह भलताच वाढला. मुलं सरांसोबत बसून पुढचं नियोजन करू लागली. 
बाबा सगळ्यांसाठी भरपूर जांभळं घेऊन आले. जांभळं पाहताच पार्थ म्हणाला ः ‘‘चला, सगळ्यांनी जांभळं आपापल्या पोटात भरा आणि बिया स्वच्छ धुऊन माझ्या बी-बॅंकेतल्या खात्यात जमा करा.’’

पालकांसाठी गृहपाठ
  प्रथम मुलांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकून घ्या. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत असली, तरी शांत राहा आणि मुलांना त्यांच्या पद्धतीनं त्या प्रश्नांना भिडण्याचं स्वातंत्र्य द्या.
  जेव्हा मुलांना एकच प्रश्न पडतो आणि तो त्यांना कठीण वाटू लागतो, तेव्हा एक युक्ती करा. त्या एकाच प्रश्नाची तीन किंवा चार सोप्या प्रश्नांत विभागणी करा. म्हणजे मग प्रश्नातला नेमकेपणा मुलांच्या लक्षात येतो आणि मुलं त्यातून सहजी मार्ग काढतात.
  ‘जर प्रत्येक वेळी तुमच्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना लगेचच तुम्ही उत्तरं दिलीत, तर वर्तमानातला एखादा प्रश्न एखाद्‌ वेळेस सुटेलही; पण तुम्हीच तुमच्या मुलांसाठी खणलेला तो भविष्यातला खड्डा असेल’ ही अतिप्राचीन चिनी म्हण खूप काही सांगून जाते!