फ्यूजन सापशिडी (राजीव तांबे)

फ्यूजन सापशिडी (राजीव तांबे)

‘‘पत्त्यात दोन रंग असतात. काळा आणि लाल. सर्व लाल पत्त्यांची किंमत वजा असेल. अं...आपण दोन पत्तेच घ्यायचे. दोन्ही काळे पत्ते आले तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची; पण दोन्ही लाल पत्ते आले, तर त्यांची किंमत वजा असल्यानं त्यांची बेरीज करून तेवढी घरं मागं जायचं...’’
‘‘ओए, म्हणजे हा लाल सापच झाला की!’’
‘‘हा तर महाब्रेक झाला!’’

र  विवार दुपार म्हणजे धमाल खेळकूट. पार्थ, पालवी, वेदांगी आणि शंतनू नेहाच्या घरी जमले होते.
नेहानं अगोदरच ठरवून ठेवलं होतं, की आज ‘सापशिडी’च खेळायची. तिनं सापशिडीचा पट आणला; पण त्याचे फासे काही मिळेनात. शोधाशोध सुरू झाली.
मग नेहमीप्रमाणे ‘इथंच तर ठेवले होते...काल पण इथंच होते...कुणी घेतलेत का?’ अशी वाक्‍य-मालिका सुरू झाल्यावर बाबा ‘काय ते’ समजले. बाबा कपाटातला पत्त्यांचा कॅट घेऊन आले.
बाबांच्या हातात पत्ते पाहताच नेहा तडतडली ः ‘‘ओ बाबा...पत्ते कशाला आणलेत? आज आपण सापशिडी खेळायची आहे ना? नकोत ते पत्ते...’’

पत्ते पिसत बाबा शांतपणे म्हणाले ः ‘‘अगं, पण मी कुठं म्हटलंय, पत्ते खेळू या म्हणून? आपण सापशिडीच खेळू या की...’’
आणखी तणतणत नेहा म्हणाली ः ‘‘म...पत्ते कशाला आणलेत? पत्ते कशाला पिसताय’’
‘‘अगं, रागावू नकोस. तुझे फासे मिळत नाहीएत ना...म्हणून मी हे पिसायचे फासे आणलेत गं. हे फासे घेऊन आपण खेळायची सापशिडी!’’
‘‘पण...पण कशी?’’
‘‘अगं, सोपी आयडिया आहे. आपण यातली सहा पानं घ्यायची. म्हणजे एक्का ते छक्की. ज्या कुणावर राज्य असेल त्याच्या पुढच्या मुलानं ही पानं पिसायची आणि ज्यावर राज्य असेल, त्यानं यातलं एक पान घ्यायचं...’’
‘‘म्हणजे एक्का असेल तर एक आणि पंजी असेल तर पाच...? असंच ना?’’
बाबांनी मान डोलावली आणि सगळी मुलं ओरडली ः ‘‘वॉव... मस्त आयडू, फंडू का झंडू. आम्ही असं कधीच खेळलेलो नाही.’’
आता फासा पिसून खेळायला सुरवात झाली.
थोड्याच वेळात स्वयंपाकघरातली कामं आटोपून आईपण आली. प्रथम तिला हे काय चाललंय तेच कळेना. हे पत्ते खेळताहेत की सापशिडी, तिला समजेना.
आईची अडचण ओळखून पालवी म्हणाली ः ‘‘अगं आम्ही फ्यूजन केलंय फ्यूजन. पत्ते आणि सापशिडीचं फ्यूजन!’’
‘‘तुम्ही कितीजण आहात?’’ असं आईनं विचारताच पार्थ हात उंचावत म्हणाला ः ‘‘हम पाँच.’’
‘‘तर मग तुम्ही वेगवेगळी पाच फ्यूजन करायला हवीत.’’
‘‘आँ...ती कशी काय?’’
‘‘अहो, जरा डोकं हलवा-डोकं चालवा-डोकं लढवा...’’
आईचं बोलणं थांबवत वेदांगी उत्साहात म्हणाली ः ‘‘मला सुचली आहे दुसरी फ्यूजन आयडिया. स..स.. सांगू का?’’
सगळ्यांनी वेदांगीकडं पाहत भुवया उंचावल्या...ती बोलू लागली ः ‘‘अं.. आत्ता आपण खेळण्यासाठी एक्का ते छक्की असे सहा पत्ते घेतले आहेत; पण आपण जर एक्का ते दश्‍शी असे दहा पत्ते घेतले तर खेळाची गतीपण वाढेल. काय हरकत आहे असा प्रयोग करून पाहायला?’’
‘‘लई भारी. फास्टम्‌ फास्ट आयडिया.’’

आता १० पत्ते घेतल्यानंतर खरोखरच खेळाचा वेग वाढला. पुन्हा ज्याला एक्का आला तो खूप मागं पडला आणि ज्याला दश्‍शी आली तो भलताच पुढं गेला. त्यामुळं एक्का येणाऱ्याचं तोंड जरा एकीकडं व्हायचंच.
बाबा म्हणाले ः ‘‘या फास्टम्‌ फास्टला थोडा ब्रेक लावायला पाहिजे; पण वेदांगीची फ्यूजन आयडिया नंबर दोन मात्र तशीच ठेवली पाहिजे. सांगा पाहू काय करता येईल?’’
म्हणजे आता पुन्हा एकदा जरा डोकं हलवा-डोकं चालवा-डोकं लढवा... असं करणं आलंच!
शंतनू किरकिरत म्हणाला ः ‘‘बाबा, तुम्हाला आयडिया माहीत असेल, तर सांगून टाका ना. मघापासून मलाच तीनदा एक्का आलाय आणि नेहाला दोनदा दश्‍शी...’’
पालवी हळूच खुसफुसली ः ‘‘शंतनूला एक्का कारण शंतनू पक्का.’’ पालवीकडं पाहत डोळे वटारत आई म्हणाली ः ‘‘सांगते तिसरी आयडिया. आता आपण दहाच पानं घेतली आहेत. आता आपण ३० पानं घेऊ या...’’
सगळे जणं शॉक लागल्यासारखे जोरात किंचाळले ः ‘‘क्का...य? ती ऽऽऽ स पानं? काहीतरीच काय?’’
‘‘-मग तर या खेळाचं नाव सापशिडी न ठेवता फक्त शिडीशिडीच ठेवा की...’’ नेहाच्या या बोलण्यावर तिला समजावत आई म्हणाली ः ‘‘आधी माझं सगळं बोलणं ऐकून तर घ्या. मला म्हणायचं होतं, किलवर, बदाम आणि इस्पिक यांची प्रत्येकी एक ते १० अशी एकूण ३० पानं घ्या. पानं वाढल्यामुळं आपोआपच वेगवेगळी पानं येण्याच्या शक्‍यता वाढतील, असं वाटतंय. आपण खेळूनच पाहू की.. काय?’’
‘‘गुड आयडिया’’

पुन्हा नव्यानं खेळ सुरू झाला. सुदैवानं शंतनूला अठ्ठी आली आणि त्याचा चेहरा ठीक झाला. थोड्याच वेळात मुलांची चुळबूळ वाढली.
‘‘तुमच्या लक्षात येतंय का? आकडे १० च आहेत. आपल्याला आकडे १०च ठेवून वेग कमी करता येईल का? अं.. म्हणजे एक वेगळाच बदल केला तर येईलच...’’असं म्हणत बाबांनी उजव्या हाताची तीन बोटं बंद करून दोन बोटं हलवली. हात वरती करत पार्थ ओरडला ः ‘‘मला कळलं; पण थोडसंच कळलंय...पण तरीही मी सांगतो चौथी आयडिया. आपण दरवेळी एकच पत्ता घेतो पण आता दोन पत्ते घ्यायचे... बरोबर?’’
‘‘शाबास पार्थ. आता पुढं सांग...’’ असं बाबांनी म्हणताच वेदांगी वैतागून म्हणाली ः ‘‘काहीतरीच काय बाबा? दोन पत्ते घेऊन वेग कसा कमी होईल...? मला नाही पटत.’’
‘‘अगं, पार्थनं अर्धा भागच सांगितला आहे. आता तू दोन पत्ते घे म्हणजे मी पुढचा भाग सांगतो.’’
थोड्याशा अविश्वासानंच वेदांगीनं दोन पत्ते उचलले. तिचे पत्ते होते किलवर दश्‍शी आणि बदाम नव्वी.

पत्त्यांकडं रागानं पाहत वेदांगी म्हणाली ः ‘‘हे काय? हे झाले १९. म्हणजे वेग वाढलाच ना?’’
‘‘अगं, जेव्हा आपण दोन पत्ते घेऊ तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. म्हणजे आता तू १९ घरं पुढं जायचं नाही, तर फक्त एकच घर पुढं जायचं आहे. लागला की ब्रेक!’’
बाबांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच नेहा भीत भीत म्हणाली ः  ‘‘पण समजा दोन्ही पत्ते सारखेच आले तर? तर काय करायचं..?’’
‘‘तर काहीच करायचं नाही.’’
‘‘का?’’
‘‘कारण वजाबाकी केल्यावर बाकी उरणार शून्य! म्हणजे ज्यांना दोन्ही पत्ते सारखेच येतील, त्यांनी आपली खेळी खेळायची नाही.’’
आणि सगळी मुले ओरडली ः ‘‘वॉव...मस्त आयडू, फंडू का झंडू.’’
या फ्यूजन नंबर चार खेळात खरोखरंच मजा येऊ लागली. वजाबाकी असल्यानं खेळातली उत्सुकतापण वाढली. खेळ रंगू लागला.
शंतनूचं खेळात लक्ष नव्हतं. तो कुठलातरी विचार करत होता. त्याचा चेहरा अगदी गोंधळल्यासारखा झाला होता. तो चाचरतच म्हणाला ः ‘‘पाचवी आयडिया सुचते आहे...पण नीट कळत नाहीए...’’
‘‘अरे, आम्ही सगळे करू मदत, तू बोल तर...’’
पत्त्यात दोन रंग असतात. काळा आणि लाल. सर्व लाल पत्त्यांची किंमत वजा असेल. अं...आपण दोन पत्तेच घ्यायचे. दोन्ही काळे पत्ते आले तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची; पण दोन्ही लाल पत्ते आले, तर त्यांची किंमत वजा असल्यानं त्यांची बेरीज करून तेवढी घरं मागं जायचं...’’

‘‘ओए, म्हणजे हा लाल सापच झाला की!’’
‘‘हा तर महाब्रेक झाला!’’
‘‘पण एक काळा पत्ता आणि एक लाल पत्ता आला तर...’’
‘‘मुलांनो, खेळूनच पाहू या. म्हणजे कळेल... काय...?’’

----------------------------------------------------------------------------

पालकांसाठी गृहपाठ :

  •   ‘पत्ते म्हणजे ‘टिंब टिंब’ ’ असं अनेक पालकांना वाटतं; पण तसं नाही हे लक्षात घ्या. पत्ते सकारात्मक कामासाठी वापरा.
  •   पत्ते वापरून मुलांसोबत बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांचे खेळ खेळा. हे खेळ खेळताना मुलांना कॅल्क्‍युलेटर वापरायची संधी द्या. तरीपण जर मुलांची उत्तरं चुकली तर चिडचिड न करता त्यांना सुधारण्याचीही संधी द्या.
  •   मुलांना प्रश्न ‘न विचारता’ त्यांच्यासमोर प्रश्न मांडा आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यातून मार्ग काढण्याची मुभा द्या.
  •   ‘जे मुक्तपणे प्रश्नांना भिडतात, तेच उत्तराला गवसणी घालतात,’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा!

----------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com