वीरमातांचं स्मरण करू या! 

रेणू गावस्कर
रविवार, 14 मे 2017

मूक आक्रंदन एका आईचं...

'तिहेरी तलाक' या विषयावर चर्चा करताना धर्ममार्तंड 'धर्मग्रंथ हे संविधानापेक्षा श्रेष्ठ आहेत', असं विधान करून तिहेरी तलाकाच्या अमानुष प्रथेला पाठिंबा देतात. देशातील प्रत्येक संवेदनशील मन या भयंकर अन्यायानं दुःखी न झालं तरच नवल.

एक ना अनेक समस्यांनी देशात अस्वस्थता आहे. हुंड्यासाठी पैसे नसल्यानं कोणाची तरी लेक मृत्यूला जवळ करतेय, तर मुलाच्या हव्यासातून मातेला प्राणाला मुकावं लागतंय. तिहेरी तलाकनं तिच्या जिवाची घालमेल होत आहे. सीमेवरच्या अव्याहत गोळीबारानं तर वीरमाता आणि लेकींचा आधार तुटत असताना काळीज आतून अक्षरशः तुटत आहे. या सगळ्यांमध्ये कुणाची तरी आई, बहीण आहेच ना! 'मदर्स डे' साजरा करत असताना हे सर्व तुझ्या अंतःकरणाला भिडत असलेच. पण हे सगळं कधी थांबणार, कोण थांबवणार, असा आर्त प्रश्‍न माझ्यातली आई करत आहे...

प्रिय मुला,
तुला आठवतंय तू लहान होतास तेव्हा सहसा मी तुला तुझ्या नावानं बोलावण्याऐवजी 'मुला' अशीच हाक मारत असे. तेव्हा तुझाही या हाकेला 'आलो'... असा तत्परतेचा प्रतिसाद यायचा. आजदेखील तुला पत्र लिहायला बसले आणि वाटलं 'मुला' असाच मायना लिहावा. तर, राजमान्य राजेश्री आपणास पत्र लिहिण्याचं कारण असं, की आज तुमची 'यंग जनरेशन' मदर्स डे साजरा करण्यात मग्न झाली असताना एका आईच्या मनात उमटलेले विचारतरंग मुलापर्यंत पोचावेत असं वाटलं.

देशात गेल्या वर्षभरात ज्या घटना घडताना पाहिल्या, अनुभवल्या, वाचल्या त्यांनी आपण सगळेच अस्वस्थ झालोय. अशी किती उदाहरणं सांगू. शीतल वायाळ नावाच्या वीस वर्षांच्या कोवळ्या मुलीला केवळ वडिलांपाशी असलेल्या नापिकीमुळे द्यायला हुंडा नाही म्हणून आत्महत्या करावी लागते. स्वाती जामदाडे नावाच्या अठ्ठावीस वर्षांच्या युवतीला तिसऱ्या गरोदरपणात गर्भलिंग चिकित्सा केल्यावर मुलीचा गर्भ आहे, हे कळाल्यावर गर्भपाताला सामोरं जावं लागतं आणि त्यात तिचा मृत्यू होतो. 'तिहेरी तलाक' या विषयावर चर्चा करताना धर्ममार्तंड 'धर्मग्रंथ हे संविधानापेक्षा श्रेष्ठ आहेत', असं विधान करून तिहेरी तलाकाच्या अमानुष प्रथेला पाठिंबा देतात. देशातील प्रत्येक संवेदनशील मन या भयंकर अन्यायानं दुःखी न झालं तरच नवल.

गेल्या दोन महिन्यांत घडणाऱ्या आणखी एका हिंसाचारानं मन सुन्न आणि बधिरही झालंय. देशाच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर (एलओसी) गेल्या दोन महिन्यांपासून अव्याहतपणे गोळीबार सुरू आहे. दहशतवादी, अतिरेकी, पाकिस्तानी सैन्य कुणीही यात मागे नाही. भारतीय जवानांची आणि अधिकाऱ्यांची हत्या होत आहे. त्यांच्या मृतदेहांची विटंबना होत आहे. या विनाकारण होणाऱ्या प्राणहानीनं राष्ट्राच्या मनात आक्रोश आहे. 23 वर्षीय उमर फय्याज याचं छायाचित्र पाहताना त्या वीरमातेच्या भावनाही भारतीयांना समजत आहेत आणि पाकिस्तानी सैनिकांची 50 मुंडकी एका हत्येच्या बदल्यात आणा, असं म्हणणाऱ्या कन्येची (हुतात्मा प्रेमसागर यांची कन्या) व्यथाही भिडत आहे.

या सगळ्या बातम्या वाचताना वीरमाता अनुराधा गोरे यांना भेटले होते, तेव्हाची आठवण माझ्या मनात जागी होत होती. कॅप्टन विनायक गोरे यांना वीरगती प्राप्त झाली, त्याला कितीतरी वर्षे लोटली; पण आपल्या पुत्राचं बलिदान व्यर्थ जाऊ नये, असा निश्‍चय करून ही हिरकणी पुस्तकांच्या आणि भाषणांच्या माध्यमातून जवानांविषयी अविरत आणि अव्याहत जनजागरण करते आहे. अनुराधाताई भेटल्या तेव्हाचा क्षण माझ्या मनावर कोरल्यासारखा झाला आहे. उसासे, हुंदके आणि निःश्‍वास असं दुःखाचं कोणतंच प्रदर्शन नसलेलं ते हसतमुख व्यक्तिमत्त्व. 'मदर्स डे'च्या निमित्ताने अशा मातांच्या स्मरणानंदेखील केवढा आधार वाटतो.

कारगिल विजय दिन सोहळ्याला गेल्या काही वर्षांमध्ये जाते आहे. एका वर्षी राखीपौर्णिमा आणि स्वातंत्र्यदिन एकाच दिवशी आलं. आम्ही कितीतरी जण आमच्या सैनिक बांधवांना भेटायला गेलो. राख्या बांधल्या, त्यांना मिठाई भरवली गेली, पुस्तकांची देवाणघेवाण झाली. नंतर सुरू झाला आठवणींचा सिलसिला. आईच्या आठवणी, बहिणींच्या आठवणी. पार दूर राहिलेल्या आईच्या आणि बहिणींच्या आठवणींभोवती सैनिकांचं मन रुंजी घालत होतं. एका देशात राहणारे आम्ही परस्परांच्या सुख-दुःखानं व्याकूळ झालो होतो. शेवटी शब्द मुके झाले आणि राहिलं ते डोळ्यातलं पाणी.
माझ्या मुला, 'मदर्स डे'च्या निमित्तानं त्या सर्व वीरमातांचं स्मरण करूया. त्यांना अभिवादन करूया आणि जगातील युद्धच नष्ट होऊन वीरमातांची या दुःखपाशातून मुक्तता होऊ दे, अशी प्रार्थना करूया.

आपण दोघेही या प्रार्थनेने जोडले जाऊ अशी अपेक्षा करणारी,
- तुझी आई