उद्याची आरोग्यसंपदा (डॉ. अविनाश भोंडवे)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

मानवाला आरोग्यसंपन्न बनवण्यासाठी, विविध आजारांना पळवून लावण्यासाठी वैद्यकीय आणि औषधशास्त्रात महत्त्वाचं संशोधन सुरू आहे. आगामी काळात वेगवेगळ्या गोष्टी पूर्णत्वाला जाऊन उपचारपद्धती विकसित होतील आणि वैद्यकीय क्षेत्राचं परिमाणच बदलून जाईल. कल्पनेच्याही पलीकडच्या, थेट मुळापर्यंत जाऊन आजार बरे करू शकणाऱ्या उपचारपद्धती, भविष्यातली उपकरणं आणि इतर गोष्टी यांचा वेध. 

जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळुनी किंवा पुरुनी टाका I 
सडत न एक्‍या ठायी ठाका, सावध! ऐका पुढल्या हाका II 

कविवर्य केशवसुतांनी सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी मानवाच्या सर्व क्षेत्रांतल्या प्रगतीला आवाहन करणारी 'तुतारी' फुंकली होती. नाही तरी प्रगती म्हणजे दुसरं काय असतं? मानवाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी जुन्या रूढींना कवटाळून न बसता, आजच्या जीवनातल्या उणिवा दूर करणाऱ्या नव्या जीवनपद्धती, नवी परिमाणं, नवी संशोधनं, नवीन उपकरणं, नवीन औषधं, नव्या उपचारपद्धती अशासारख्या अद्ययावत गोष्टी म्हणजेच उत्कर्ष. 

डोंगराच्या उतारावरून घरंगळत जाणारे ओंडके पाहून मानवानं चाक बनवलं आणि विज्ञानाच्या प्रगतीची चक्रं फिरू लागली, चकमकीच्या दगडांनी उडणाऱ्या ठिणग्या पाहून निर्माण झालेल्या शास्त्रीय स्फुल्लिंगांनी मानवी प्रगतीची मशाल आजतागायत सदोदित पुढंच नेली. यामध्ये भौतिक आणि रसायन या शास्त्रांनी गणितासारख्या मूलशास्त्राच्या साह्यानं पृथ्वीच्या अवकाशापलीकडं झेप घेतली आणि या तीन बीजशास्त्रांच्या आधारांवर प्राण्यांच्या आणि मानवाच्या शरीरातील दुर्बोध रचना, त्यातलं बिघाड आणि त्याचं निदान करून त्यावर उपचार शोधणाऱ्या जैविक आणि वैद्यकीय शास्त्रांनी गगनभरारी घेतली. आज एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात असताना, वैद्यकीय शास्त्रातल्या भावी प्रगतीच्या कल्पना नुसत्या न्याहाळल्या, तर हे शास्त्र क्षेपणास्त्राच्या वेगानं किती उत्तुंग झेपावणार आहे याची कल्पना येईल. एखाद्या विज्ञान काल्पनिकेप्रमाणं अशाश्वत मानवी जीवनाचं कोडं उलगडणारा हा भविष्यकाळ असेल याची शाश्वती वाटू लागते. 

अचानक समोर उभे ठाकलेले नवनवीन आजार आणि त्या दृष्टीनं त्वरित केलेले संशोधनात्मक बदल ही वैद्यकीय आणि औषधशास्त्राची ठळक वैशिट्यं मानली जातात. वैद्यकीय ज्ञानाची क्षितिजं जसजशी रुंदावत गेली, तसतसे अनेक ज्ञात गोष्टींचे नवे पैलू समोर आले आणि आजवर अज्ञात असलेले असंख्य चमत्कार निर्माण होत गेले. यापुढच्या काळात ज्या वाटा नव्यानं चोखाळल्या जाणार आहेत, त्यांचं फलित शेवटी रुग्णाला मिळणार आहे. या प्रत्येक नव्या संशोधनामुळं जगातल्या प्रत्येक मानवाचं आयुष्य रोगमुक्त, आरोग्यसंपन्न आणि सुखदायी होणार आहे. आधीच्या संशोधनापेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात मानवजातीचा सकारात्मक फायदा होणार आहे. 

उपचारांची नवी क्षितिजं 
कर्करोग प्रतिबंधक रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनो आँकॉलॉजी) : आजमितीला कर्करोगाचा उपचार केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीद्वारे केला जातो. यामध्ये औषधं आणि किरणोत्सर्गाच्या साह्यानं कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जात आहेत; पण यामध्ये कर्करोगाच्या पेशींसमवेत त्या सभोवतालच्या शरीरातल्या चांगल्या पेशीदेखील नष्ट होत जातात; मात्र 'फायझर' कंपनीनं चालवलेल्या एका नव्या संशोधनात शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचा वापर करून कर्करोगांच्या पेशी समूळ नष्ट कशा करता येतील यावर लक्ष दिलं जात आहे. 

कर्करोग म्हणजे केवळ एकाच प्रकारचा आजार नसतो. प्रत्येक अवयवाच्या कर्करोगात आणि त्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण पेशीत फरक असतो. त्यामुळं प्रत्येक अवयवाच्या आणि त्यातील पेशींच्या कर्करोगामध्ये फरक असतो. शिवाय कर्करोगाच्या सध्याच्या उपचारामध्ये काही कर्करोग औषधोपचाराला अजिबात दाद देत नाहीत. नवीन संशोधनात प्रत्येक अवयवाचं आणि त्यातल्या रोगग्रस्त पेशींचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन, रोगप्रतिकारशक्ती आणि अन्य उपाय एकत्रित करून कर्करोग पूर्ण बरा करण्याच्या दृष्टीनं संशोधन केले जात आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीनं हे एक वरदानच ठरेल. 

जनुकोपचार (जीन थेरपी) : मानवाच्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये जनुकं एका ठराविक क्रमामध्ये असतात. एखाद्या व्यक्तीमध्ये, जर एखादं जनुक त्याच्या क्रमप्राप्त जागेवर निर्माण झालेलं नसलं किंवा अस्तित्वात असूनही ते निष्क्रीय असलं, तर त्या व्यक्तीला जे आजार होतात, त्यांना 'जनुकीय विकार' म्हणतात. या आजारांवर आजवर कोणताही उपाय नाही. मात्र, 'स्पार्क थेराप्युटिक्‍स' या संस्थेच्या संशोधनामध्ये, रुग्णामध्ये नसलेलं हे जनुक कृत्रिमरित्या निर्माण करून त्या जागेवर बसवणं शक्‍य होणार आहे. यामुळं अगणित जनुकीय आजार कायमचे बरे होतील, अशी आशा आहे. या कृत्रिम जनुकांचं कार्य काही काळानं मंदावलं, तर त्या जागी पुन्हा नव्यानं ते बसवण्याच्या दृष्टीनंसुध्दा प्रयत्न होत आहेत. 

व्यक्तिसापेक्ष उपचार : जगातली प्रत्येक व्यक्ती अद्वितीय असते. हाताचे ठसे जसे वेगवेगळे असतात, तसेच आजारांबाबतही अनेक सूक्ष्म फरक असतात. त्यामुळं एकाच मापाचे रेडीमेड कपडे जसे सगळ्यांनाच बरोबर होत नाहीत, तसंच 'सब घोडे बारा टक्के' या न्यायानं होणाऱ्या सध्याच्या औषधोपचारामुळं प्रत्येकाला सरसकटपणे बरं वाटतंच असं नाही. मात्र, भविष्यकाळात प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीनुसार तिच्यावर उपचार होणं शक्‍य होईल. दुर्धर आजारांत - विशेषत: कर्करोग, जनुकीय आजारांमध्ये रोगनिदान, उपचार आणि रुग्णाची उपचारपश्‍चात सेवा यांमध्ये व्यक्तिसापेक्ष विचार होईल. 

डिजिटल तंत्रज्ञान 
वैद्यकीय क्षेत्र नेहमीच प्राथमिक शास्त्रांच्या प्रगतीचा वेध घेत प्रगत होत गेलं. ईसीजी, एक्‍स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, किरणोत्सर्गी उपचार, रोबोटिक शस्त्रक्रिया अशा असंख्य अत्युच्च सेवा भौतिक आणि अभियांत्रिकीशास्त्राच्या प्रगतीनं झाल्या. रसायनशास्त्रातली प्रगती औषधं निर्माण करताना वापरली गेली. आज प्रचलित असलेलं डिजिटल तंत्रज्ञान रुग्णसेवेसाठी वापरलं जाणार आहे. 

संगणकीय बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) : संकलित केलेल्या कुठल्याही माहितीचं पृथक्करण आणि त्यातून मिळणारे निर्णय संगणकाच्या अफाट गणितीय शक्तीमुळं आणि वेगामुळं होतं. अमेरिकेतील एमआयटी आणि हार्वर्ड या दोन जगद्विख्यात संस्था संगणकाच्या या डिजिटल शक्तीचा 'डेटाबेस' निर्माण करून, कोणत्याही व्यक्तीच्या आजाराची लक्षणं, डॉक्‍टरी तपासणीतील घटक, इतर चाचण्या यांचं क्षणात विश्‍लेषण करून रुग्णाच्या आजाराचं निदान आणि उपलब्ध औषधोपचार देणं या तयारीला लागलेल्या आहेत. त्यामुळं जगातील कोणीही डॉक्‍टर इंटरनेट आणि टेलिमेडिसिन याद्वारे आपल्या आजाराचं निदान आणि उपचार क्षणात मिळवू शकेल. मात्र, या सेवेत डॉक्‍टरांच्या वैयक्तिक मताला आणि ज्ञानाला प्राधान्य दिलं जाईल. अखिल मानवजात रोगमुक्त आणि आनंदी करण्याचा याहून चांगला दुसरा कोणता मार्ग असेल?. 

नोव्हार्टिस आणि क्वांटम ब्लॅक या कंपन्यांच्या सहकार्यानं 'नर्व्ह लाइव्ह' नावाच्या एका संशोधनपर प्रकल्पात डिजिटल बुद्धिमत्तेचा वापर करून निरनिराळ्या माहितीचं विश्‍लेषण क्षणार्धात करून त्यातले निर्णय संशोधकांना सोपवण्याचं कार्य होणार आहे. यामुळं औषधांच्या आणि उपचारपद्धतीच्या जगातल्या पातळीवरच्या चाचण्यांचे निर्णय खूप जलद रीतीनं मिळतील. यामुळं जगातल्या विविध खंडांतल्या, विविध वर्णांच्या, वेगवेगळ्या वयांच्या स्त्री-पुरुष रुग्णांमध्ये हे उपचार कसे करावेत, याची मार्गदर्शक तत्त्वं लगेच प्राप्त होतील. 

वेअरेबल डिजिटल उपकरणं : आजमितीला ऍपल वॉच, मोबाईलद्वारे रक्तदाब मोजणारी, ईसीजी, नाडीचे ठोके मापणारी, व्यायामानं खर्च होणाऱ्या आणि आहारातून मिळणाऱ्या कॅलरीज मोजणारी असंख्य ऍप्लिकेशन्स लोकप्रिय आहेत. भविष्यात याहीपेक्षा जास्त विश्वासार्ह आणि वैद्यकीय उपचारांतल्या विविध गोष्टींसाठी, शरीराच्या विविधांगावर वापरण्याची अनेक वेअरेबल उपकरणं; तसंच ऍप्स मोठ्या प्रमाणात आणि वाजवी किंमतीत उपलब्ध होणार आहेत. 2026 पर्यंत रुग्णापर्यंत पोचू शकणाऱ्या ही गॅजेट्‌स आपण अवयवांनुसार बघू या. 

  • डोकं : मिलिटरी ऍपरल, इमेंसिव्ह इन्फोटेन्मेंट, वर्कवेअर 
  • कान : हिअरिंग एड्‌स, हेडफोन्स, कानावर लावण्याचे ट्रॅकर्स 
  • डोळे : स्मार्ट चष्मे, स्मार्ट कॉन्टॅक्‍ट लेन्सेस, ऑगमेंटेड रिऍलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिऍलिटी (व्हीआर) दर्शवणारी डोळ्यांवरची उपकरणं 
  • छाती-पोट : स्मार्ट क्‍लोदिंग, चेस्ट स्ट्रॅप्स, स्मार्टवर्क, औषधी पट्ट्या, संगणकीय खेळ खेळण्यासाठी उपकरणं 
  • बाहू : विविध स्मार्ट वैद्यकीय उपकरणांचे पट्टे, शरीरांतर्गत क्रियांचे मोजमाप करणारे ट्रॅकर्स, रोगनिदान करणारे टॅटूज, त्वचेवर लावण्याचे औषधी पॅचेस, डिजिटल खेळांच्या उपकरणांचे पट्टे 
  • मनगट : स्मार्ट घड्याळं, व्यायामाचं मोजमाप करणारे पट्टे. 
  • पाय : स्मार्ट फूटवेअर, वैद्यकीयदृष्ट्या शारीरिक तपासणी करणाऱ्या उपकरणांचे पट्टे, लष्करी हालचाली करताना लागणारी उपकरणं, खेळातील प्रगती आणि कॅलरीज तपासणारी उपकरणं. 
  • दात आणि जबडा : दातात बसवलेल्या सेन्सरद्वारे जबड्याची हालचाल, रुग्णाचं खाण्याचं प्रमाण, पद्धत आणि आहारातले घटक, बोलणं, धूम्रपान यांवर नियंत्रण ठेवता येईल. 
  • इतर : शरीरात बसवता येणारी विविध शारीरिक तपासण्या आणि उपचार करणारी यंत्रं 
  • या साऱ्या डिजिटल गॅजेट्‌समधून रुग्णाच्या दैनंदिन जीवनात होणाऱ्या शारीरिक क्रियांची माहिती मिळू शकते. म्हणजे त्याच्या हृदयाचे ठोके, रक्तदाब, रक्तातली साखर, श्वसनाचा वेग, शारीरिक वेदना इत्यादींचा दिवसातल्या दर मिनिटाचा हिशेब मिळेल. रुग्णाची श्रवणशक्ती, दिसण्याची क्षमता, नित्य वर्तनातले दोष यांचं विश्‍लेषण केलं जाऊन रुग्णाच्या खऱ्याखुऱ्या आजाराची कल्पना येऊ शकेल आणि तो कशा पद्धतीनं वाढतोय किंवा कमी होतोय याबद्दल माहिती मिळू शकेल. कोणत्याही व्यक्तीचा चालण्याचा वेग, त्यामध्ये त्याचा तोल जाण्याची किंवा चक्कर येण्याच्या वेळा किंवा त्याबाबत असलेली शारीरिक कारणं, उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांच्या चमूला चुटकीसरशी माहिती होतील. हे क्षेत्र दिवसागणिक अमर्यादपणे विस्तारित होत जाणार आहे. 

विविध शास्त्रीय संशोधनं 
ऑगमेंटेड रिऍलिटी : 'गूगल'नं पेटंट घेतलेल्या स्मार्ट कॉन्टॅक्‍ट लेन्सेसमध्ये अश्रूंचं पृथक्करण करून रक्तातल्या साखरेच्या पातळीचं निदान दर मिनिटाला करून मधुमेहाचा उपचार अत्यंत सुलभ पद्धतीनं केला जाईल. 

मायक्रोसॉफ्टनं विकसित केलेल्या होलोलेन्सद्वारे आयपॅडचा वापर करून शस्त्रक्रिया करण्याआधी आणि रुग्णाच्या अवयवाचं विच्छेदन करण्यापूर्वीच रुग्णाच्या शरीराच्या आतल्या रक्तवाहिन्या, हाडं, मज्जातंतू, स्नायू, आतले अवयव आणि त्या अनुषंगानं येणारे दोष नजरेस पडू शकतील. साहजिकच शस्त्रक्रिया खूपच सहजतेनं आणि कोणताही धोका न पत्करता होऊ शकेल. 

गूगल ब्रेन : रे कुर्झवाईल या आयटी तंत्रज्ञाच्या आविष्कारानं मानवी मन संगणकावर अपलोड करून, मानवी आयुष्य एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर कुठलीही संदिग्धता न राहता आरपार पद्धतीनं जगता येईल. 

संगणकीय ज्ञानेंद्रियं : यंत्रमानव शारीरिक क्षमतेची कामे करतात; पण संगणकीय मानवाच्या साह्यानं ज्याची दृष्टी अतिक्षीण आहे, अशा व्यक्तीला व्यवस्थितपणे दिसू शकेल. मात्र, ज्याची दृष्टी सर्वसामान्य आहे अशाला एखाद्या गरुडासारखी तीक्ष्ण आणि दूरवरचं स्पष्ट दिसणारी दृष्टी प्राप्त होऊ शकेल. 

हीच गोष्ट श्रवणशक्तीबाबत घडू शकते. कर्णबधिर व्यक्तीला अगदी व्यवस्थित ऐकू येईल आणि वेळ आल्यास खूप दूरवर घडणारं संभाषणसुद्धा ग्रहण करता येईल. हे शास्त्र इतर ज्ञानेंद्रियांबाबतदेखील प्रत्यक्षात येऊ शकेल. म्हणजे मूक व्यक्तीला वाचा, त्वचा बधिर असताना स्पर्श आणि गंधहीन व्यक्तीला वासाचं ज्ञान मिळू शकेल. 

त्रिमितीय मुद्रण : थ्री-डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वैद्यकीय शास्त्रात वापरून रुग्णाची चक्काचूर झालेली हाडं व्यवस्थित करण्याचे प्रयोग आज चीन, घाना, इंडोनेशियामध्ये यशस्वी झाले आहेत; पण भविष्यात या तंत्रानं कृत्रिम हातपाय आणि इतर अवयव, कान, नाक, त्वचा बनवणं सहज शक्‍य होईल. याचा फायदा अपघातात हे अवयव विद्रूप झालेल्या व्यक्तींना तर होईलच; पण गॅंगरिनमुळं एखाद्याचा अवयव निकामी झाल्यास, भाजल्यामुळं त्वचा किंवा चेहरा विकृत झाल्यास त्या अवयवांची निर्मिती पुनश्‍च करता येईल. 

संगणकीय क्‍लृप्त्या आणि खेळ : संगणकीय चिप्स औषधांच्या बाटल्यांवर बसवून रुग्णांना औषधं घेण्याच्या वेळांची आठवण करणं, औषधाचा डोस विसरल्यास अलार्म वजनं अशा क्‍लृप्त्या आजमितीला केल्या जात आहेत; पण भविष्यकाळात गोळ्यांमध्ये बसवलेल्या चिप्सद्वारे त्या कितपत पचल्या आणि शोषल्या गेल्या याचं ज्ञान होईल. याचा उपयोग रुग्णांना, त्यांच्या डॉक्‍टरांना तर होईलच; पण औषधांचं संशोधन करणाऱ्या वैद्यकीय संस्थांनादेखील होईल. रुग्ण आपले उपचार घेतात की नाही यावर वैद्यकीय विमा कंपन्या लक्ष ठेवू शकतील आणि या माहितीद्वारे रुग्णांचे क्‍लेम पास करतील किंवा नाकारू शकतील. 

'पोकेमान'सारख्या संगणकीय खेळांमध्ये थोडं परिवर्तन करून लठ्ठ रुग्णांना वजन कमी करण्यासाठी चालायला आणि व्यायाम करायला प्रवृत्त केलं जाऊ शकेल. 

नवे डिजिटल आजार आणि उपचार : सध्या स्मार्ट फोनमधला कॅमेरा वापरून सेल्फी काढण्याच्या खुळाला 'सेल्फायटिस' असा आजार मानला जातो. भविष्यात डिजिटल तंत्रज्ञानाच्या अतिआहारी जाऊन 'व्हर्च्युअल पोस्ट ट्रॉमॅटिक डिसॉर्डर' सारखे नवे आजार आणि त्यावरचे नवे डिजिटल उपचार निर्माण होतील. 

शस्त्रक्रियेची उपकरणं : शस्त्रक्रिया करण्यासाठी नव्या प्रकारची सुरी विकसित केली जात आहे. यात रुग्णाच्या ज्या अवयवाची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, त्याला सुरी लावताच तिच्यात विद्युतप्रवाह खेळवला जाईल आणि त्या अवयवाला स्पर्श करताच एक सौम्य धूर निर्माण होईल. या धुराचं स्पेक्‍ट्रोमीटरद्वारे पृथक्करण होऊन त्या अवयवामध्ये कर्करोगाची बाधा आहे का इतर काही आजार आहे याची पक्की माहिती सर्जनला मिळेल आणि त्या पद्धतीनं पुढची शस्त्रक्रिया पार पडेल. 

रुग्णाची माहिती : शस्त्रक्रिया करताना, रुग्णावर तातडीचे उपचार करताना 'होलोग्राफिक' तंत्रज्ञानानुसार डॉक्‍टरांसमोरच्या भिंतीवर व्हर्च्युअल की-बोर्ड प्रसारित केला जाईल. त्यामध्ये रुग्णाची माहिती भरली जाईल. दुतर्फा संपर्क साधण्याची क्षमता असलेल्या या तंत्रज्ञानामुळं रोजच्या व्यवहारातले लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल यांचा वापर बंद होऊ शकेल. 

सोशल मीडिया : रुग्णाची माहिती, उपचार, डॉक्‍टरांचा सल्ला शेअर करायला सोशल मीडिया आणि इतर संपर्क साधनांचा वापर आज होऊ लागला आहे. तो अधिकाधिक विस्तृत आणि लोकाभिमुख होईल. ई-पेशंट आणि ई-डॉक्‍टर ही संकल्पना कदाचित रूढ होईल. 

ई-रेडिऑलॉजी : रुग्णाचे फोटो, व्हिडिओ क्‍लिप्स, सेल्फी यांच्या पृथ्क्करणानं त्याला असलेल्या आजारांची- विशेषत: कर्करोगाच्या शक्‍यतेची चाचणी होऊ शकेल. 
सिलिकॉन चाचण्या : माणसाच्या प्रत्येक प्रकारच्या पेशीची सिलिकॉन चिप्स मॉडेल्स तयार केली जातील. स्टेमसेल्सचा (मूलपेशी) वापर करून बनवल्या जाणाऱ्या पूर्णपणे मानवी पेशींना साकारणाऱ्या या चिप्सवरती नव्या औषधांच्या आणि अद्ययावत नूतन उपचारांच्या चाचण्या केल्या जातील. यामुळं चाचण्यांचे निकाल लवकर तर हाती लागतीलच; पण गिनिपिग, ससे, उंदीर, कुत्री अशा प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांवर होणाऱ्या चाचण्यांची गरज भासणार नाही. प्राण्यांवर होणाऱ्या चाचण्यांना विरोध करणाऱ्या मानवतावादी भूतदयावादी कार्यकर्त्यांना ही एक खूशखबरच असेल. 
वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण : व्हर्च्युअल थ्री-डी आणि फोर-डी तंत्रज्ञान वापरून मानवी शरीराची रचना, शरीरांतर्गत क्रिया वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवल्या जातील. मृतदेहाचं डिसेक्‍शन, रुग्णावरच्या शस्त्रक्रियेचं प्रशिक्षण, गंभीर रुग्णाला द्यायचे उपचार, हृदयक्रिया बंद पडल्यावर देण्याचं सीपीआर तंत्र हे सारे विद्यार्थ्यांना क्‍लाउड बेस्ड इंटरॅक्‍टिव्ह तंत्रज्ञानानं शिकवले जाईल. शिकलेल्या या तंत्रांचा सराव विद्यार्थी अशा व्हर्च्युअल पद्धतीनं करून त्यात जास्त तरबेज होतील. 

ऑप्टोजेनेटिक्‍स : प्रकाशलहरींचा वापर करून रुग्णांमध्ये भीती, काळजी, आनंद, प्रेम, दया अशा भावना मानवी मेंदूत निर्माण करता येतील. याद्वारे व्यसनं केल्यास मनात भीती उत्पन्न होऊन त्याला त्या व्यसनांपासून मुक्त करता येऊ शकेल. 

यंत्रमानव : रोबोटिक सर्जरी आज सर्वत्र रूढ होत आहे; पण यंत्रमानवाद्वारे रुग्णाला सलाईन लावणं, त्याची दिसत नसलेली रक्तवाहिनी शोधून त्यातून रक्त घेणं आणि त्याची तपासणी करणं शक्‍य होईलच; पण रुग्णालयातल्या आणि घरातल्या रुग्णाला खाटेवरून उचलून अन्यत्र हलवणं, त्याला उभं राहायला बसायला अशा हालचालींना मदत करणं, बेडसोअर झालेल्या रुग्णाला दर तीन तासांनी कुशीवर वळवणं अशा परिचारिकांच्या कामात यंत्रमानव वापरला जाईल. 

अद्ययावत उपकरणं : रुग्णाच्या शरीरावर बसवलेल्या काही ऍप्सच्या मदतीनं त्याचं शरीराचे तपमान, हृदयाचे ठोके, ईसीजी, रक्तदाब, झोप, विशेष हालचाली, शरीराची बसण्याची किंवा चालण्याची सदोष ढब यांची सतत नोंद घेत त्यांचं मूल्यमापन होईल. 
'सर्वेपि सुखिन: सन्तु I सर्वेपि सन्तु निरामय:' या उक्तीप्रमाणं येत्या पंचवीस-तीस वर्षांत वैद्यकीय क्षेत्र नवनव्या तंत्रज्ञानाचा शोध घेऊन मानवी जीवनातल्या रोगांचं निदान, त्यावरचे उपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन याबाबतीत एक गगनभरारी निश्‍चितच घेईल. या भावी संशोधनात माणूस आणि त्याचे आजार हाच वैद्यकीय उपचारांचा युगानुयुगं असलेला केंद्रबिंदू असेल आणि यामुळं मानवजात सर्वसाधारण आणि दुर्धर आजारांपासून मुक्त होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com