आँखो ही आँखोमें 'क्‍लिक' हो गया! 

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

'इंटरनेट सेन्सेशन'नं अनेक नवे स्टार जन्माला घातले आहेत. प्रस्थापित माध्यमांच्या खिजगणतीमध्येही नसलेल्या नव्या चेहऱ्यांना 'सुपरस्टारडम' मिळतं. मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हे असंच एक 'डोळस' उदाहरण. ही 'इंटरनेट सेन्सेशन' नक्की कशामुळं तयार होतात, तरुणांच्या विचारशैलीशी त्याचा काय संबंध आहे, ती कितपत टिकतात आदी गोष्टींचा वेध. 

जगभरातील तमाम प्रेमवीरांचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'व्हॅलेंटाइन डे'च्या एक-दोन दिवस आधीच मल्याळम चित्रपट 'ओरू आडर लव्ह' च्या गाण्यातलं भुवया उडवण्याचं दृश्‍य सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आणि अनेकांच्या मनात 'प्यारके लड्डू' फुटू लागले. कालपरवापर्यंत कुणाच्या खिजगणतीमध्येही नसलेली आणि मुख्य म्हणजे चित्रपटातही मुख्य नायिकेच्या भूमिकेत नसलेली प्रिया प्रकाश वारियर ही नवोदित अभिनेत्री रातोरात स्टार बनली. प्रियाच्या नक्षीदार भुवयांनी अनेकांना घायाळ केलंय. व्हॉट्‌सऍपवरील 'डीपी'पासून फेसबुकवरच्या 'पोस्ट्‌स'पर्यंत अन्‌ 'इन्स्टाग्राम'वरच्या पिक्‍चर्सपासून ते ट्‌विटरवरील चिवचिवाटापर्यंत 'प्रिया वारियर'मय वातावरण झालं होतं. एका व्हिडिओनं प्रियाला 'नॅशनल क्रश' बनवलंय. हे सगळं झालं ते 'इंटरनेट सेन्सेशन'मुळे. 

थ्रिसूरमधल्या अठरा वर्षांच्या प्रियाची 'सुपर स्टारडम'च्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. दोनच आठवड्यांमध्ये 'इन्स्टाग्राम'वरच्या तिच्या फॉलोअर्सची संख्या चाळीस लाखांच्या पुढं गेली. 'गूगल सर्चिंग'मध्ये तिनं जोरदार आघाडी घेतली आहे. तिची 28 सेकंदांची 'सॉंग क्‍लिप' भारताप्रमाणंच पाकिस्तान आणि आखाती देशांमध्येही व्हायरल झाली आहे. 'यूट्युब'वरच्या तिच्या व्हिडिओला वीस तासांमध्ये पन्नास हजार लाइक्‍स मिळाल्या. दहा लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. एवढंच काय फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि टीव्ही सेलेब्रिटी केली जेन्नरलाही तिनं टक्कर दिलीय. इंटरनेटमुळं 'जन्मलेल्या' 'मायक्रो सेलिब्रिटीं'च्या यादीत भारतात सध्या तरी प्रियाच अव्वल आहे. 

जगाला वैश्‍विक खेडं बनवू पाहणारा सोशल मीडिया आणि त्याचं मुख्य वाहक असलेल्या इंटरनेटनं सिटिझनला नेटिझन बनवून त्याची डिजिटल जगामध्ये एक वेगळी 'व्हर्च्युअल ओळख' निर्माण केली, त्यालाही आता बराच काळ लोटलाय. इंटरनेटच्या जन्माची पाळंमुळं ही नव्वदच्या दशकात शोधावी लागत असली, तरी सोशल मीडियाचा उत्क्रांतीकाळ उणापुरा दहा वर्षांचा. प्रस्थापित माध्यमं आणि प्रसिद्धीतंत्रासमोर इंटरनेट आणि सोशल मीडियाने उभ्या केलेल्या आव्हानांचा वेध घ्यायचा झाला, तर आपल्याला संवादतज्ज्ञ डेव्हिड वेईनबर्गर यांच्या व्याख्येचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं, तर 'इंटरनेटनं आता पारंपरिक माध्यमांना शह देत प्रसिद्धीचं नियंत्रण सर्वसामान्यांच्या हाती दिलं आहे. माऊसच्या एका क्‍लिकसरशी 'मायक्रो सेलिब्रिटी' तयार होऊ लागलेत.' एकीकडं कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रभावामुळं जागतिक तंत्रकारणामध्ये आमूलाग्र बदल होत असताना सोशल मीडियाची वाटचाल 'पीपल्स मीडिया'च्या दिशेनं सुरू झाली आहे. पेट्रोलप्रमाणे 'इंटरनेट डेटा' 'स्पीड ऑइल' बनलाय. जगभरातली सोशल आणि सर्चिंग इंजिनं यावर धडधडत असतात. 

काही प्रश्‍न अनुत्तरित 
या नवमाध्यमीय बदलाकडं भारतीयांची पाहण्याची दृष्टी मात्र अद्याप 'एक हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीसारखी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. तसं नसतं, तर 'इंटरनेट सेन्सेशन'मुळं निर्माण झालेल्या लहरी केवळ स्मार्ट फोनपुरत्याच मर्यादित राहिल्या असत्या. त्या अशा जमिनीवर अस्ताव्यस्त पसरल्या नसत्या. प्रियाच्या व्हिडिओनं समाज म्हणून काही महत्त्वाचे प्रश्‍न आपल्यासमोर उपस्थित केले आहेत. देशातील तरुणाई 'व्हायरल कल्चर'मध्ये हरवत चालली आहे का? मेसेज पुढं ढकलण्याच्या नादात आपली विचारप्रक्रियाच थांबली आहे का? किंवा आपलं समाजमनच बोथट झालंय का? हे प्रश्‍न उपस्थित करण्याचे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे प्रियाच्या व्हिडिओच्या विविध सामाजिक गटांमध्ये उमटलेल्या भिन्न प्रतिक्रिया होत.

एकीकडं आपली तरुणाई हा व्हिडिओ पाहून हरखून गेली होती, तर दुसरीकडं दांभिकतेचे पीळ आणखी घट्ट झाले होते. एक तिसराही वर्ग होता तो म्हणजे हा व्हिडिओ चोरून पाहणारा आणि प्रत्यक्षात प्रतिक्रिया देताना मात्र नाकं मुरडणारा. 'अंडं चालतं; पण कोंबडी नाही,' या श्रेणीतला तथाकथित व्हाइट कॉलर. या सगळ्याच वर्गांनी समाजमाध्यमांमध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरवात केल्या, तेव्हा मात्र एकच हलकल्लोळ निर्माण झाला. शेवटी हा वाद जमिनीवर आल्यानंतर मात्र न्यायपालिकेलाच यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. यामुळं 'इंटरनेट सेन्सेशन'चा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे 

वापर कसा होतो? 
ज्या व्हिडिओमुळं 'इंटरनेट सेन्सेशन' निर्माण होतं, त्याची मूळ आवृत्ती डिजिटल विश्‍वात कायम राहत असली, तरीसुद्धा त्याचीच अनेक बनावट भावंडं समाजमाध्यमांमध्ये फिरू लागतात. प्रियाच्या व्हिडिओला काही जणांनी राजकीय नेत्यांच्या व्हिडिओशी मिक्‍सअप करून एक नवं डिजिटल विडंबन जन्माला घातलं. हे गंमतिशीर व्हिडिओ क्षणभर मनोरंजन करत असले, तरीसुद्धा यामुळे नकळतपणे काहींच्या भावना दुखावल्या जातात. प्रत्यक्षात एखाद्या चित्रपटात ज्या गोष्टी नाहीतच, त्या वाढवून सांगणाऱ्या क्‍लिप्सचा सुळसुळाट समाजमाध्यमांमध्ये पाहायला मिळतो. यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाते. या अशा गॉसिपिंगचा सर्वांत मोठा फटका संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या चित्रपटाला बसला. यानंतर भडकलेल्या आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं. अशा परिस्थितीत नेटिझन्सनी 'सेल्फ सेन्सॉरशिप' अंगिकारणं कधीही चांगलंच. 

हेही बनले 'इंटरनेट स्टार' 

  • पूजा जैन ('ढिन्चॅक' गाण्याद्वारे प्रसिद्ध झालेली उत्तर प्रदेशातली सर्वसामान्य तरूणी) 
  • आर्शद खान (पाकमधील चहा विक्रेता) 
  • ताहेर शहा (पाकिस्तानी गायक) 
  • विद्या वोक्‍स (भारतीय अमेरिकी संगीतकार) 
  • संदीप माहेश्‍वरी ('इमेज बझार'चा संस्थापक) 
  • भुवन बाम (दिल्लीतील गायक) 

'इंटरनेट सेन्सेशन'चे फंडे 

  • 'फ्री फॅन' वेबसाइटची निर्मिती करून क्‍लब तयार करणं 
  • आपल्या यूट्युब चॅनेलवर हटके व्हिडिओ पोस्ट करणं 
  • आकर्षक फेसबुक पेजच्या माध्यमांतून लोकांपर्यंत पोचणं 
  • सोशल मीडियातून सातत्यानं स्व-कृत्यांबाबत चर्चा 
  • इतरांचा 'फॅन क्‍लब' जॉईन करणं 
  • आपल्या कृतीतून खरं बोला; पण रेटून बोला 

'सेन्सेशन'मागची मानसिकता तपासायला हवी 
'इंटरनेट सेन्सेशन'चा मानसशास्त्रीय दृष्टीनं विचार करताना आपल्याला दोन बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एक म्हणजे तपासून न घेता एखाद्या गोष्टीवर चटकन्‌ विश्‍वास ठेवण्याची प्रवृत्ती आणि दुसरी म्हणजे विचार न करता कृती करणं ही होय. बिनधास्तपणा, लैंगिक भावना, सौंदर्य, संपत्ती, बुद्धी आणि ताकद यांचं सर्वांनाच आकर्षण असतं. खरं तर याच गोष्टी 'इंटरनेट सेन्सेशन'च्या मुळाशी आहेत. आपल्याला हवीहवीशी वाटणारी मूल्यं आणि भावनिक गोष्टींचा इंटरनेटच्या माध्यमातून प्रचार केला जातो हेच 'सेन्सेशन' होय. शेवटी इंटरनेट हे एक 'टूल' आहे, त्यामुळं त्याचा वापर कसा करायचा नेटिझन्सनीच ठरवावं. 
- डॉ. वासुदेव परळीकर, मानसोपचारतज्ज्ञ 
 

'इंटरनेटच्याही आधी अनेक स्टार' 
तसं पाहता 'इंटरनेट सेन्सेशन'ला आपणच फार महत्त्व देतो. केवळ माध्यमांमधल्या स्थित्यंतरांमुळं हे बदल झालेले दिसतात. इंटरनेटच्याही आधी केवळ सिरिअलच्या माध्यमातून अनेक जण स्टार झालेले आहेत. हल्ली प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्यानं एखादी गोष्टी व्हायरल होण्याचं प्रमाण वाढलं आहे; पण कोणत्या गोष्टीवर किती व्यक्त व्हायचं हे वापरकर्त्यानंच ठरवावं. शेवटी तंत्रज्ञानामुळं तुमच्यापर्यंत असंख्य गोष्टी पोचत राहतील, त्यामुळं लोकांना त्यांचा भावनावेगही आवरावा लागेल. एखाद्या गोष्टीचा सारासार विचार करूनच त्यावर आपण प्रतिक्रिया देणं कधीही चांगलं. 
- निपुण धर्माधिकारी, दिग्दर्शक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com