अर्धवट माहितीवर विसंबू नये हेच खरं! (भ्रमंतीतली शिदोरी)

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

आम्ही पती-पत्नी आणि आमची दोन मुलं काही वर्षांपूर्वी सहलीसाठी कोचीला गेलो होतो. गुरुवायुरचं श्रीकृष्णमंदिर, सजवलेल्या असंख्य हत्तींचा महोत्सव, कोट्टायम, अलेप्पी, तिरुअनंतपुरम असे फिरत फिरत शेवटी आम्ही कन्याकुमारीला आलो. 

एकूण सहल आनंदाची झाली. आता परतीचे वेध लागले. मात्र, परतीच्या प्रवासाचं रेल्वेचं आरक्षण निश्‍चित झालेलं नव्हतं आणि होण्याची शक्‍यताही नव्हती. कारण, सुट्टीमुळं गाड्यांना प्रचंड गर्दी होती. दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचारला रेल्वेगाडी होती. आमच्या मुक्कामाच्या ठिकाणापासून रेल्वेस्टेशन दूर होतं. गाडी पहाटे चार वाजता फलाटाला लागणार होती. तेव्हा ऐन मध्यरात्री मुक्कामाच्या ठिकाणाहून स्टेशनवर येण्यापेक्षा आम्ही आदल्या दिवशी रात्री लवकरच स्टेशनवर आलो. वर म्हटल्यानुसार, स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. 

गाडी फलाटात येत असल्याचा लांबून आवाज येताच लोकांचे लोंढे गाडीच्या दिशेनं धावू लागले. एकच गर्दी उसळली. त्यात मी आणि मुलं गर्दीच्या ढकलाढकलीत आपोआपच डब्यात शिरलो. मी मुलांना लगेच वरच्या बर्थवर बसवलं. मला मात्र उभं राहायलासुद्धा जागा नव्हती. गर्दीमुळं यजमानांची आणि माझी चुकामूक झाली होती. ते कदाचित शेजारच्या डब्यात असावेत असं मला वाटत होतं. 

धान्यानं शिगोशिग भरलेला डबा हलवल्यावर धान्य जसं डब्यात व्यवस्थित बसतं, तशी गाडी सुरू झाल्यावर प्रत्येकानं मिळेल त्या ठिकाणी जागा पटकावली. सगळ्यांना जागा मिळाली. गाडी मध्येच वेग घेई. पुन्हा वेग कमी होई. कधी थांबल्यासारखीही वाटे. असं दोन-तीन वेळा झालं. प्रत्येक वेळी गाडी थांबली की मला वाटे, शेजारच्या डब्यात यजमान असतील का ते पाहून यावं. आमच्या डब्यातले जवळपास सगळेच जण कानडी, मल्याळम्‌ भाषा बोलणारे होते. एक माणूस थोडं थोडं इंग्लिश बोलत होता. गाडी काहीशी थांबल्यासारखी वाटल्यावर मी त्याला विचारलं ः ''इथं गाडी किती वेळ थांबेल?'' तो म्हणाला ः ''बराच वेळ थांबेल.'' त्यानंतर मी डब्याच्या दरवाज्याजवळ गेले. खाली पाहिलं तर खडीचा बराच भराव टाकलेला असल्यामुळं रुळ जमिनीपेक्षा उंचीवर होते. तरीही मी उडी मारून उतरले. 

शेजारच्या डब्याकडं जाण्यासाठी वळले अन्‌ तेवढ्यात गाडी सुटली. कारण, ती कुठल्या स्टेशनमध्ये थांबलेली नव्हती व सिग्नल मिळाल्यामुळं ती हलली. मी घाबरून लगेचच मागं वळले. खडीच्या खालच्या जागेवरून माझा हात गाडीचा दांडा पकडण्यास पोचेना. मग मात्र उंच उडी मारून दोन्ही हात एकाच दांड्याच्या दिशेला केले आणि सर्व शक्ती पणाला लावून आधी एका हातानं कमकुवतपणे पकडलेला दांडा लगेच दुसऱ्या हातानं घट्ट धरत दारातून आत झेपावले. दारापर्यंत सर्व माणसं अस्ताव्यस्त झोपलेली होती. मदतीचा हात देण्यासाठी कुणीच जागं नव्हतं. हा प्रसंग केव्हाही आठवताना, मी थोडी उंच उडी मारून दाराचा दांडा दोन्ही हातांनी कसा पकडला हे मला आठवत नाही; मात्र माणूस संकटातून सुटका करून घेण्यासाठी सर्व शक्ती पणाला कशी लावू शकतो, हे मात्र मी त्या वेळी अनुभवलं होतं. 

मी दारातच बसले. झालेल्या धावपळीमुळं बरीचशी ऊर्जा वाया गेली होती. घाबरल्यासारखं झालं होतं. 

श्‍वासोच्छ्वास जोरात चालला होता. घशाला कोरडही पडली होती नि दोन्ही हातही दुखत होते. मी समोर पाहत होते. गाडीनं आता चांगलाच वेग घेतला होता. दोन्ही बाजूंनी दाट झाडी असलेल्या जंगलातून गाडी धावत होती. एरवी असा निसर्ग मनाला मोहवून टाकतो. मात्र, त्या दिवशी मी सुन्न होऊन त्या जंगलाकडं पाहत होते. गाडी बराच वेळ जंगलातूनच चाललेली होती. या प्रदेशाचं नाव अर्थातच मला माहीत नव्हतं. 

मी गाडीतून खाली उडी मारली तेव्हा माझ्या हातात फक्त एक रुमाल होता. पैसे इत्यादी काहीच नव्हतं. 

मला गाडी परत पकडता आली नसती तर त्या सुनसान जंगलात मी काय केलं असतं हा विचार तेव्हा मला भेदरवून गेला होता. एकतर अनोळखी भाषेचा मुलुख. मुलं एका डब्यात, यजमान दुसऱ्याच डब्यात आणि मी ही अशी गाडीबाहेर...! मी गाडीतून खाली उतरले तेव्हा मुलं झोपलेली होती. मी समजा परत गाडीत चढूच शकले नसते, तर आई कुठं गेली आहे, हे मुलांना कळलंच नसतं...यजमानांना तर यातल्या कशाचीच कल्पना नव्हती...नुसते विचार नि विचार माझ्या मनात येत होते व जात होते...मात्र, अखेर सर्वशक्तीनिशी मी त्या संकटातून पार पडले होते. थोडीशी स्थिरस्थावर झाल्यावर मी विचार करू लागले...गाडी किती वेळ थांबते याविषयी त्या माणसाला निश्‍चित असं काहीच माहीत नव्हतं, तर मग त्यानं मला दडपून खोटं का बरं सांगितलं असावं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, त्यानं सांगितलेली माहिती मी खरी का मानली? मी तसं अजिबातच करायला नको होतं. खोट्या, अर्धवट माहितीवर विसंबून गाडीतून उतरणं हे माझं धाडस तर नव्हतंच; उलट जिवावरच्या संकटाकडं घेऊन जाणारा तो शुद्ध वेडेपणा होता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com