गुन्हेगारी विश्‍वातला थरार 

Saptarang Marathi features
Saptarang Marathi features

खरी कहाणी आणि नाट्यमयता यांचा मिलाफ साधून तयार केलेली अतिशय रंजक मालिका म्हणजे 'नार्कोस.' कोलंबियातल्या एके काळच्या अंमली पदार्थांच्या तस्करांच्या विश्‍वाचं चित्रण असलेली ही मालिका प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावते. पाब्लो एस्कोबार या जुन्या काळच्या ड्रग माफियावर आधारित ही मालिका. या पाब्लोच्या मागं स्टीव्ह मर्फी हा अमेरिकन डीईए एजंट लागलाय. या स्टीव्हचा सहकारी आहे एक हावी नावाचा.

स्टीव्ह आणि हावी हे दोघं मिळून पाब्लोला पकडण्यासाठी शक्‍य असेल ते सगळं करत असतात, अगदी शेवटपर्यंत! पोलिस आणि गुन्हेगार यांच्यातल्या शह-काटशहावर अनेक मालिका, चित्रपट आले असले, तरी 'नार्कोस' वेगळी आहे. एक तर ही मालिका सत्यकथेवर आधारित आहे. जवळपास पाच ते दहा टक्के भाग रेकॉर्डेड चित्रफितींचा वापर करून सादर केलेला आहे. अतिशय कल्पकपणे जुन्या बातम्या आणि काही खासगी चित्रफिती यांचा वापर करून मालिकेला वास्तवाचा जबरदस्त टच देण्यात आल्यामुळं ती जास्त प्रभावी ठरते. बऱ्यापैकी सर्वच जागा/व्यक्तिरेखांची नावं अशा सगळ्या गोष्टी एकदम 'ओरिजिनल' असल्यामुळं ही मालिका बघताना वेळोवेळी डॉक्‍यु-ड्रामा बघण्याचा अनुभव येतो. 

प्रेक्षकाला पाब्लो एस्कोबारबद्दल माहिती असो वा नसो, असे दोन्ही प्रेक्षक नक्कीच 'पुढं काय होणार आता' या प्रश्नावर एकावर एक भाग बघून मालिकेच्या जाळेत अडकतात. त्यात सत्तर-ऐंशीच्या दशकातला काळ... तेव्हाचं ते जग, लॅंडलाईन, पेजर आणि मोठ्या सेलफोनचा तो जमाना, तेव्हाचे कपडे, केशरचना, गाड्या, रस्ते या सर्वांचं इतकं काळजीपूर्वक चित्रण करण्यात आलं आहे, की तुम्ही तेव्हाच्या जगात जगायला लागता. या सर्वांत अजून एक भाग म्हणजे पाब्लोला इंग्लिश येत नसतं. त्यामुळे त्याच्यासकट त्याच्या आसपासच्या सगळ्याच व्यक्तिरेखा स्पॅनिश भाषेत बोलतात.

अर्थात 'सबटायटल्स' असतात, त्यामुळे नीट लक्ष देऊन पाहावी/वाचावीही लागते ही मालिका. भाषेच्या या गंमतीमुळंही ती अजून परिणामकारक होत जाते. पाब्लो साकारणाऱ्या वॅगनार मोरा या कलाकारानंही खूप मेहनत घेतलेली आहे. वयोमानानुसार वाढणारं पोट, बदलणारा आवाज, वागण्याची पद्धत, वाढत जाणारा उर्मटपणा, कुटुंबाबरोबरचं आणि व्यवहारातलं वेगवेगळं वर्तन या गोष्टींद्वारे त्यानं पाब्लो सफारइदारपणे जिवंत केला आहे. गुन्हेगार असून त्याच्याबद्दल कधीतरी सहानुभूतीही जाणवते. त्यातूनही मालिकेची 'ग्रिप' अजून वाढते. एकूणच पाब्लोचा प्रवास, चढउतार आणि त्याचा शेवट हे सर्व पाहण्यासाठी कुठली डॉक्‍युमेंटरी पाहण्यापेक्षा ही मालिका पाहणं कधीही मनोरंजनकारक! 

आता काही या पाब्लोविषयी. कोलंबियन ड्रग विश्‍वाचा सगळ्यात महत्त्वाचा महाखलनायक म्हणजे हा पाब्लो. त्यानं तेव्हाच्या अंमली पदार्थांच्या विश्‍वात इतका धुमाकूळ घातलेला, की अमेरिकेत जाणाऱ्या ऐंशी टक्के अंमली पदार्थांच्या मागं तोच होता! ही झाली त्याची एका वाक्‍यातली ओळख. छोट्याशा शहरात वाढलेला, सतत दंगली आणि अस्थिरता अनुभवलेला हा मुलगा 'डॉन' होतो. त्यानंतरची त्याची वाटचाल, त्यानं केलेले गुन्हे, कूटनीती, प्रतिस्पर्ध्यांवर कधी सहजतेनं तर कधी पराभवानं खचून केलेली मात दिग्दर्शकानं मस्तच रंगवली आहे. पाब्लोचं कौर्यकर्म थांबवण्यासाठी कोलंबियन पोलिसांना येणाऱ्या अपयशाला कारणीभूत असलेले स्थानिक पोलिसच या मालिकेत दुसरे खलनायक आहेत. त्यांच्यात राहूनच पाब्लोचा काटा काढण्याचं काम स्टीव्ह आणि हावी करत असतात.

कोलंबियन सरकारविरुद्ध पुकारलेलं अघोषित युद्ध आणि त्यातून प्रवासी विमान पाडणं, भर चौकात गोळ्या घालणं, खुल्या बाजारपेठेत बॉम्बस्फोट घडवून आणणं अशी भयंकर कृत्यं करून ही पाब्लो निवडणुकीत उभा राहतो आणि जिंकतोही! 'चोर पोलिसांच्या नेहमी दोन पावलं पुढे असतो,' याची पाब्लोच्या एकूण प्रवासामुळे खात्री पटते. जगातला सगळ्यात श्रीमंत माणसांपैकी एक असलेल्या पाब्लोचे काही विश्वास न ठेवता येण्यासारखे मजेशीर प्रसंगही आहेत. त्यातला एक लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे, पाब्लो एके काळी फरार असताना आपल्या कुटुंबाबरोबर एका गुप्तस्थळी राहत असतो. प्रचंड थंडी असते आणि आपल्या लहान मुलीला त्या थंडीपासून वाचवण्यासाठी पाब्लो चक्क पैशांची होळी करतो! 

या पाब्लोचा अंत झाला तरी नार्कोस तिथं संपत नाही. 2015मध्ये प्रदर्शित झालेली ही मालिका. आतापर्यंत तीन सीझन्स आलेले आहेत. प्रत्येक सीझनमध्ये दहा एपिसोड्‌स असे तब्बल तीस भाग प्रसारित झाले आहेत. पहिले वीस पाब्लोवर आहेत. तिसऱ्या सीझनपासून 'काली कारटेल' हे प्रकरण सुरू होतं. पाब्लोची क्रूरता तीन-चार जणांनी वाटून घेतल्यावर कथानक आणखी किती थरारक होतं हे या सीझनमधून दिसतं. एक अतिशय वेगळा विषय, समर्थ हाताळणी आणि वास्तव आणि नाट्यमयतेचं सुरेख मिश्रण यांमुळं ही 'नार्कोस' खिळवून ठेवते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com